रावण पण कुणाचा तरी ‘अवतार’च असेल ना…?


सत्य, अहिंसा आणि नीतिनियम, धर्माने वागणारे हे देवाचे अवतार समजले जात असतील तर असत्य, हिंसा, अनीती आणि अधर्माने वागणारे राक्षसांचे अवतार समजले जातात. रावणाला देखील राक्षसांचा अवतार समजले जाते. पण हे एक अर्धसत्यच म्हणावे लागेल. प्रभू रामचंद्र जर भगवान विष्णूचे अवतार असतील तर रावण कुणाचा अवतार असेल…?
कारण रामाशी केलेले युद्ध, इंद्राचा केलेला पराभव आणि नवग्रहांना पायाशी ठेवण्याच्या कृतीने रावण खलनायक तर ठरू शकत नाही. केवळ मायावी राक्षस मारीचच्या मदतीने केलेले सीता हरण त्याला खलनायक बनवू शकत नाही. पण आपण त्याला खलनायकच ठरवले आहे.
रावण हा तपस्वी आणि तेजपुंज महाप्रतापी होता याचे देखील पुराणात दाखले मिळतात. आपल्या तपश्चर्येने देवाधिदेवालाही वश करण्याचे सामर्थ्य ठेवणारा महाप्रतापी रावण राक्षस कुळाचा कसा काय ठरू शकतो..? प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांशी वैर निर्माण करीत भीषण युद्ध करणारा रावण त्याच्या पहिल्या जन्मात भगवान विष्णूंचा द्वारपाल होता. म्हणजेच तो प्रभू रामचंद्रांचा द्वारपाल होता.
पौराणिक कथेनुसार एकदा सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे ऋषीमुनी भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी आले. त्यावेळी दरबाराच्या प्रवेशद्वारावर दोन पहारेकरी पहारा देत बसले होते. ज्यांची नावे जय आणि विजय अशी होती. आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर आपण हातात भाला घेतलेल्या पहारेकऱ्यांच्या दोन आकृत्या चितारतो त्या ह्याच ‘जय-विजय’ यांच्या असाव्यात.
तर ह्या दोन्ही द्वारपालांनी त्या ऋषिमुनींना दरबारात जाऊ दिले नाही. संतप्त ऋषींनी त्या दोघांना पुढील जन्मी राक्षस व्हाल असा शाप दिला. ते दोघेही द्वारपाल गर्भगळीत झाले, गयावया करू लागले. उःशाप मागू लागले. शेवटी भगवान विष्णूंना मध्यस्थी करावी लागली. शेवटी ते ऋषीमुनी शांत झाले. त्यांनी उःशाप दिला. तीन जन्म राक्षस कुळात जन्म घ्यावा लागेल. याबरोबरच प्रत्येक जन्मात भगवान विष्णूंच्या अवताराकडून त्यांचा वध होईल. त्यानंतरच त्यांना पुन्हा जय-विजय या अवतारात येता येईल.
ऋषींच्या शापाप्रमाणे पहिल्या जन्मात जय-विजय हे हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू बनले. भगवान विष्णूने त्यांचा वध केला. त्यानंतर दुसऱ्या जन्मात ते रावण आणि कुंभकर्ण म्हणून जन्मले. विष्णुअवतार प्रभू रामचंद्रांनी त्यांचा वध केला. त्यानंतर तिसऱ्या जन्मात ते शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून जन्मले. त्यावेळी भगवान विष्णूंनी श्रीकृष्णावतार घेऊन त्यांचा वध केला. त्यानंतर त्यांना ऋषींच्या शापातून मुक्ती मिळाली.
आता या पुराणकथेप्रमाणे रावण हा दुसरा-तिसरा कुणी नसून भगवान विष्णूंचा द्वारपाल ‘जय’ होता. त्यानंतर त्याने कुठलाच जन्मावतार घेतल्याचा पुराणात उल्लेख नाही. मग आम्ही प्रत्येक खलप्रवृत्तीच्या माणसाला रावण का समजतोय. शिवाय तो मूळचा राक्षस नाहीय. शापामुळे त्याला राक्षसकुळात जन्म घ्यावा लागलाय.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
मोबा.क्र :-8806188375