कोविड-19 लसी वरून भारत सरकारची भूमिका अस्पष्ट….

आम्हाला लस मिळणार का ?

एकीकडे कोविड व्हायरस वरील ‘लस’ तयार करण्यात भारताने आघाडी घेतली असतांनाच सुखावलेल्या भारतीयांमध्ये ही लस आपल्यापर्यंत पोहोचणार की नाही याबद्दल गोंधळाचे वातावरण निर्माण होवू लागले आहे. सुरुवातीपासूनच माध्यमातून येणाऱ्या संबंधित माहितीनुसार संपूर्ण देशभर ही लसीकरणाची मोहीम राबविली जाईल असा देशवासीयांचा समज झाला होता. मात्र भारत सरकारने आता या भूमिकेपासून ‘घुमजाव’ केल्याने देशवासीय गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहेत. कोविड 19 लसी वरून भारत सरकारची भूमिका अस्पष्ट दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

निरनिराळ्या देशांना चाचण्यांद्वारे कोविडवरील लस तयार करण्यास यश मिळाले आहे. त्यासर्व देशांमधून लसीकरणाचे वारे वाहू लागले आहे. भारतात देखील सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून लसीची निर्मिती केली जात आहे. मात्र भारत सरकारने अद्यापही कोणत्याही लसीला मान्यता दिली नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना लस दिली जाईल असे आश्वासन दिले होते. बिहारच्या निवडणूक प्रचारात बिहारमधील सर्व जनतेला मोफत लस दिली जाईल असे आश्वासन दिले होते.

सिरमचे सीईओ अदर पुनावाला

सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि औषध क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योगपती सायरस पुनावाला यांनी कोविड लसीच्या संदर्भात बोलताना देशातील पन्नास टक्के लोकांना मोफत लस देणार असल्याचे वक्तव्य केले होते. तर सिरमचेच सीईओ अदर पुनावाला यांनी मात्र सुरुवातीपासूनच मोफत ऐवजी सर्वसामान्यांना खिशाला परवडेल अश्या दरात म्हणजेच पाचशे ते हजार रुपयांपर्यंत ‘लस’ उपलब्ध करून देण्याची भूमिका मांडली होती. आता ही भूमिका देखील देशवासियांना मान्य झालेली असली तरी सरसकट देशभर लसीकरण होणार नसल्याच्या भारत सरकारच्या नव्या भूमिकेने गोंधळ उडाला आहे.

आईसीएमआरचे बलराम भार्गव

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय औषध नियंत्रण बोर्डाचे कार्यकारी संचालक बलराम भार्गव यांनी मात्र संपूर्ण देशभरातील लसीकरणाचा मुद्दा फेटाळून लावला आहे. अश्यापद्धतीचे कोणतेही आश्वासन केंद्र सरकारने दिले नसल्याचे स्पष्ट करीत ज्या राज्यांमधून रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे अश्याच राज्यांमध्ये लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. आपला उद्देश हा कोरोनाची साखळी तोडण्याचा आहे. त्यामुळे अश्या ठिकाणीच लसीकरण केले जाईल असे त्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधानांची भूमिका आणि आरोग्य मंत्रालयाची भूमिका या दोन्हीही सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्या भूमिकेनंतर बदललेल्या दिसत आहेत. तर सिरमचे संस्थापक सायरस पुनावाला यांची पन्नास टक्के जनतेला मोफत लस देण्याची भूमिका सिरम इन्स्टीट्यूटने बदलली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने मात्र लसीकरणासाठी यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या स्तरावर तीस कोटी जनतेला लस देण्याचे उद्दिष्ट्य आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

मोबा.क्र. :- 8806188375.

मराठा आरक्षण आणि उदयनराजे भोसले…!

उदयनराजे भोसले

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर तोफ डागली असून तुम्हाला जमत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा, आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतो असे उघड आव्हान दिले आहे. बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराजांना मराठा समाज किती गंभीरतेने घेतो यावरच आता नव्या राजकीय नाट्याची रंगत वाढणार आहे.

नाद नाय करायचा

तीनवेळा खासदारकीसाठी निवडून आलेल्या उदयनराजे महाराजांचा राजकीय प्रवास हा उतार-चढावाचा असाच आहे. त्यांच्या सातारा या मतदार संघात त्यांचा जितका प्रभाव आहे त्यापेक्षाही अधिक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून मराठी माणसांवर त्यांचा प्रभाव आहे. राजकीय पक्षांना सत्तेची गणितं मांडतांना अश्या प्रभावशाली व्यक्तींची गरज भासत असते. त्यामुळे अश्या प्रभावशाली व्यक्ती पक्ष संघटनांशी बांधिलकी मानणाऱ्या नसतात. महाराजांच्या बाबतीत देखील हेच सूत्र लागू आहे. महाराज देखील कोणत्याच राजकीय पक्षाची बांधिलकी मानणारे नाहीत. तसं ते आजवर उघडपणे बोलत आले आहेत. आत्तापर्यंत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी अन् पुन्हा भाजपा असा राजकीय प्रवास करणाऱ्या महाराजांच्या या धरसोड वृत्तीकडे दुर्लक्ष करीत त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या वाढत्या जनसंख्येची भीती सर्वच राजकीय नेत्यांना असते हीच त्यांची दहशत आणि ताकद आहे.

तुम्हाला जमत नसेल तर…..

आता महाविकास आघाडीला सत्तेवर येवून वर्ष पूर्ण झाले आहे. कोरोना महामारीच्या तणावाची परिस्थिती असल्याने राजकीय वाचाळवीरांच्या ‘विदूषकी’ वक्तव्याने गेली सहा महिने मनोरंजन झाले आहे. धारेवर धरणारे मुद्दे, निदर्शने, आंदोलने नसल्याने सरकार अगदीच ‘मजेत’ चालले आहे. सर्वोच्च मराठा आरक्षणाचा स्थगिती दिल्यानंतर ‘कोरोना’च्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे थंडावलेल्या आंदोलनाला आता उदयनराजे महाराजांच्या रूपाने ‘हवा’ देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

समाजाला किरकोळीत घेवू नकात….

मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडतांना उदयनराजे यांनी अनेक मुद्द्यांवर आपली बेधडक मते मांडली. जातीचे राजकारण करणाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, मराठा समाजाला किरकोळीत घेवू नकात, मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही ? हे त्या-त्या वेळच्या सत्तेतील नेत्यांना जाब विचारा या अश्या मुद्द्यांसह आधी स्वतःचे बघा मग देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करा याबरोबरच फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवा, ते आरक्षण देतील याची जबाबदारी मी घेतो असे सूचक वक्तव्य देखील महाराजांनी केले आहे. एरवी फडणवीस आणि इतर भाजपा नेत्यांवर तोंडसुख घेणारे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ आता महाराजांच्या वक्तव्याचा ‘समाचार’ घेतील का ? तेंव्हा मराठा समाज कुणाच्या पाठीशी उभा राहील हे येणारा काळच ठरवेल. मात्र आरक्षण मुद्द्याला महाराज गांभीर्याने घेणार असतील तरच…..

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

मोबा.क्र. :-8806188375

महाराष्ट्रात ‘ट्रेडिंग पॉवर’ नावाचं नवं राजकीय वादळ..!

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांच्या ‘तिघाडी’चे सरकार एक वर्षाचा आपला कार्यकाळ पूर्ण करीत असतांनाच राजकीय विश्लेषक आणि लेखिका असलेल्या प्रियम गांधी-मोदी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या नव्याकोऱ्या पुस्तकाने महाराष्ट्रात नवे राजकीय वादळ निर्माण केले आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या भाजपला पुरेसे संख्याबळ मिळाले नसल्याने सरकार बनविता येणे अशक्य असल्याचे बघून ‘युती’चा अजेंडा घेवून भाजपासोबत मतदारांसमोर ‘मत’ मागायला गेलेल्या शिवसेनेने स्वतःचे पुरेसे संख्याबळ नसतांनाही ‘मुख्यमंत्री’पदाची मागणी करीत राजकारणाचा नवा सारीपाट मांडायची तयारी सुरू केली. या घडामोडीतच राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देत एका पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सत्तानाट्याने राष्ट्रवादी पक्षासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात त्सुनामी उसळली.

फडणवीस-अजितदादा यांचं हे सत्तांतर नाट्य शपथविधी नंतर केवळ ऐंशी तास देखील टिकलं नाही. पण या सत्तानाट्याने राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबात सर्वकाही आलबेल नाही हे नवे चित्र मात्र जगासमोर आले. व्यथित झालेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पवार कुटुंबियांना अजूनही या प्रश्नाला उत्तर द्यावे लागत आहे. पुढे अजितदादा यांचे बंड शमवित शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी महाविकास आघाडी तयार करीत उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर आले. या मंत्रिमंडळात देखील अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आले. सरकार चालेल की नाही ? याबद्दल साशंकता निर्माण होत असतानाच कोरोना महामारी या सरकारच्या एकप्रकारे मदतीलाच धावली असे म्हणता येईल. महामारीच्या संकटाशी मुकाबला करतांना सत्ता उलथवून टाकण्याचे ‘नाट्य’ घडले नाही. ही जमेची बाजू म्हंटली पाहिजे. आता या सरकारने वर्षाचा कालावधी पूर्ण केलाय. नेमके याचवेळी प्रियम गांधी-मोदी यांचे ‘ट्रेडिंग पॉवर’ हे सत्तानाट्याच्या अंतरंगात डोकावणारे पुस्तक प्रकाशित झाल्याने पुन्हा एकदा ‘पहाटे’च्या शपथविधी सोहळ्याचेच चर्वितचर्वण सुरू आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

मोबा. क्र. :- 8806188375.

भारतीयांना राजकारण्यांचा ‘राग’ का येतोय…?

जगातला सर्वात मोठा लोकशाहीवादी देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतासारख्या विकसनशील देशात समाज आणि विकास यामधला महत्वाचा दुवा म्हणून ‘राजकीय’ नेत्यांकडे फार अपेक्षेने पाहिले जाते. मात्र संथगतीने होत असलेला विकास आणि राजकारण्यांच्या प्रत्येक गोष्टीतील ‘हस्तक्षेपा’मुळे भारतीयांना राजकारण्यांचा राग येतोय का ?

भारतासारख्या बहुभाषिक आणि बहुधर्मीय देशात सर्वसमावेशक आणि समानतेच्या धोरणावरच सत्ताकारण केले जावू शकते. मात्र अलीकडच्या काळात बहुतांश सर्वच राजकीय पक्ष हे ‘व्होट बँके’च्या राजकारणामुळे कोणत्या न कोणत्या जाती-धर्माच्या संघटनांशी हितसंबंध जोडून कार्य करतांना दिसत आहेत. यामुळे जाती-धर्मांच्या संघटनांचे ‘प्राबल्य’ वाढलेले दिसत आहे. यातूनच सामाजिक तेढ, वैमनस्य वाढत चालल्याचे दिसत आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाही ही फक्त उच्चारण्या पुरतीच दिसत आहे.

यातूनच जाती-धर्मांच्या संघटनांचा वर्चस्ववाद वाढला असून मतांचं लांगुणचालन करणाऱ्या राजकारण्यांकडून फूस लावणारी कृती आणि विधाने होत असल्याने सामाजिक अशांतता आणि अस्थिरता वाढू लागली आहे. याबरोबरच लोकशाहीमध्ये राजकीय भूमिकेचे अनन्यसाधारण महत्त्व असल्यानेच राजकीय नेत्यांच्या शैक्षणिक अहर्ता आणि पात्रतेविषयी नव्या शिक्षित पिढीमध्ये तिरस्काराची भावना घट्ट होताना दिसत आहे.

देशातील वाढती बेरोजगारी आणि आर्थिक असमानतेमुळे तरुण पिढी मोठ्या अपेक्षेने राजकीय पक्ष आणि नेत्यांकडे पहात असतांना त्यांचा भ्रमनिरास होत असल्याची भावना वाढत आहे. कमी शिकलेले नेते आणि पदवीधर युवक यांच्यात पात्रतेचा समतोल राखला जावू शकत नाही. यातूनच भारतीयांना राजकारण्यांचा राग येत असावा.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

मोबा. क्र. :- 8806188375.

आता कोरोना लसीच्या ‘राजकारणा’ला सुरुवात….!

नोव्हेंबर २०१९ मध्ये चीनच्या वूहान मधून प्रकटलेल्या कोरोनाने संपूर्ण जगालाच संसर्गित केल्यानंतर जून 2020 पासून विविध देशांमधून कोरोनाचा प्रतिबंध करणाऱ्या ‘लसी’चा शोध लावल्याचे दावे करण्यात आले. त्यानंतर त्याच्या चाचण्यांची यशस्वितेबाबतचे दावे आणि त्याचा पुरवठा करण्याची क्षमता याबाबतचे दावे करण्यात आले. आता लसीच्या लाभाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या जनतेसमोर लसीकरणाबाबतचे राजकारण सुरू होईल. विशेषतः भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या लोकशाहीवादी देशात तर कुठलीही गोष्ट राजकारणाशिवाय पूर्ण होत नाही, तिथे आता लसीकरणाच्या मुद्द्यावर ‘राजकारण’ सुरू केले जाईल यात शंकाच नाही.

जून २०२० पासूनच चीन, अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलियासह भारत आणि जपान, जर्मनीसारख्या प्रगत देशातून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसींचा शोध आणि निर्मितीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. वेगाने संक्रमित झालेल्या कोरोनामुळे संपूर्ण जगच भयभीत झाले होते. त्यापेक्षाही प्रभावी उपचार आणि औषधं उपलब्ध नसल्याने अधिक लाचार आणि हताश झाले होते. अशात प्रत्येक देशाच्या लस संशोधनाच्या दाव्याला प्रतिसाद देण्यावाचून जगासमोर पर्यायच नव्हता. आता सर्व दावे आणि यशस्वी चाचण्या नंतर आता प्रत्यक्ष लसीकरणाची वेळ येवून ठेपली आहे.

भारतात पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या उत्पादित केलेल्या कोरोना व्हायरस वॅक्सिनच्या लसीचे प्रामुख्याने लसीकरण केले जाणार आहे. एकतर संपूर्ण देशी बनावटीचे उत्पादन असल्याने ते परवडणाऱ्या दरात आणि मुबलक प्रमाणात असेल. असे असले तरी लसीकरणाची नियोजन पद्धती आणि त्यावर खर्च होणाऱ्या निधीच्या तरतुदीवरून आता राजकीय प्रेशरकुकरच्या शिट्या ‘वाजू’ लागल्या आहेत. मोदी सरकारपुढे सध्यातरी विरोधीपक्ष निष्प्रभ असले तरी लसीकरणाच्या मुद्यावर गदारोळ करीत आपली उपद्रवमूल्यता सिद्ध करण्यासाठी आता सर्वच प्रमुख राजकीय पक्ष सरसावतील यात शंकाच नाही. त्यातही आपण जनतेचे किती कैवारी आहोत असा आव आणत तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत लस वितरित करणाऱ्या यंत्रणेला पहिल्यांदा लक्ष करतील. यंत्रणेतील दिरंगाई, विसंगती आणि शेवटी कथित भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित करीत सरकारला अडचणीत आणण्याचे राजकीय नाट्य सुरू होईल.

त्याची नांदी देखील झाली आहे. लसीकरणा संदर्भात काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार प्रश्न विचारले आहेत. वरकरणी हे प्रश्न जनतेच्या हिताचे वाटत असले तरी पुढच्या राजकारणाची ती ‘नांदी’ आहे हे कुणाही जाणकारांच्या सहज लक्षात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला हे नक्की सांगायला हवे की, सर्व कोरोना लसींपैकी भारत सरकार कोणती लस निवडणार व का ?, लस पहिल्यांदा कोणाला मिळणार व वितरणाचे धोरण काय असेल ?, लस मोफत उपलब्ध व्हावी यासाठी पी.एम.केअर फंडाचा वापर केला जाईल का ? आणि सर्व भारतीयांना कधीपर्यंत लस दिली जाईल ? हे चार प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी लसीकरणाच्या भूमिकेचा आपल्या पक्षाच्या राजकीय नाट्याचा अंक सुरू केला आहे.

आता भाजपा प्रणित आणि मित्रपक्षांच्या राज्यांमध्ये या मुद्द्यावर सर्वच विरोधीपक्ष रान उठवतील तर ज्या राज्यांमध्ये भाजपा आणि मित्रपक्ष विरोधात आहेत त्यांना मात्र केंद्रातील आपल्याच पक्षाच्या विरोधात बोलता येणार नसल्याने त्यांची ‘कोंडी’ करण्याचे प्रयत्न करत सर्वसामान्य जनतेच्या मनातून भाजपा आणि मोदी सरकारचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. यासगळ्या राजकीय गदारोळात कोरोना लस तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत कधी पोहोचेल ? हे प्रत्यक्ष ब्रह्मदेव देखील सांगू शकणार नाही, हे मात्र खरे ! तेंव्हा समजत असले तरी तोंडावरचा मास्क काढू नकात आणि सोशल डिस्टनसिंग पाळा…. तूर्त इतकेच.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

मोबा.क्र. :-8806188375

गुलाम म्हणून जगताना….!

माझ्या पाठीवर
उमटलेल्या शाबासकीच्या
वळाने
पाठ त्वचेचे सर्व रंध्रे
रक्तवर्णी होतात,
मी चित्कारतो…..
भेसूरतेने अन्
शाश्वत जग विसरत
होतो चेतना भ्रष्ट…!
युगायुगाच्या अंतानंतर
या प्रक्रियेला
इतिहासानेच नाव दिले
गुलामी…..!
अलौकिक इतिहास,
असामान्य कर्तृत्व,
म्हणूनच अभिमान वाटतो
मी “गुलाम” असल्याचा…..
एकदा का रक्त गोठले
की मग गुलामीचा बिल्ला
आपल्या कपाळावर
ठोकल्या जातो…..
मग त्या खिळ्यांना वाट मिळते
आत…खोलवर रुतून बसण्याची
त्यांचंही बरोबरच आहे…!
पिढ्यानपिढ्या हालायचं नसतं
आता रक्ताला अन् ठिसूळ हाडांना
पूर्ण सराव होतो..!
गुलामीत सुद्धा नैसर्गिक वाढ
असतेच
त्याशिवाय का गुलाम जन्मतात ?
कधीतरी जखमा चिघळतात,
किडेही वळवळतात
मग त्यावर वंश, जात, धर्म
याचा मलम लावावा लागतो.
जालीम असल्याने
रक्तातल्या शत्रू सैन्याशी
मुकाबला तोच करतो
आपण फक्त विजयाची
वाट पहायची….
एकदा का रक्तातला बंडखोर
धारातीर्थी पडला की मग
उर्वरित आयुष्य सुखाने
जगता येते……
गुलाम म्हणून
अगोदरच्या अन् नंतरच्या
पिढ्यांचा नाही लेखाजोखा
कारण….
गुलामांचा इतिहास नसतो
तो तर जगण्याचा
उपहास असतो.

मुकुंद मधुकर हिंगणे.

मोबा.क्र.:-8806188375.

मराठेशाहीचा अस्त करणारे रणांगण म्हणजे येवतीचा तलाव..!

मराठेशाहीचे अतोनात नुकसान आणि दारुण पराभव करणारे युद्ध हरियाणातील पानिपत येथे १४ जानेवारी १७६१ मध्ये अहमदशाह अब्दाली बरोबर झाले होते. जवळपास एक लाख मराठा सैन्याची कत्तल झाली होती. पण १८१८ मध्ये आष्टी-येवतीच्या मैदानात ब्रिटिशांच्या बरोबर झालेल्या युद्धात दुसरा बाजीरावाचा पराभव झाला. त्याचबरोबर मराठेशाहीचा अस्त झाला. ब्रिटिशांनी त्या स्मृती पुसून टाकण्यासाठी जवळपास साठ वर्षांनी रणांगणावर तलाव बांधला. हाच तो मराठेशाहीचे पानिपत करणारा सोलापूर जिल्ह्यातील येवतीचा तलाव.

१८१८ मध्ये दुसरा बाजीराव पेशव्यांच्या विरोधात बंडाळी माजलेली असतांना इंग्रजांनी पुणे, कोरेगावसह ठिकठिकाणी सैन्याची कुमक पाठवून दुसऱ्या बाजीरावाला पुण्यातून हुसकावून लावण्यात यश मिळवले होते. साताऱ्याकडे पलायन केलेला बाजीराव पेशवा फलटणमार्गे सोलापूरकडे येण्यासाठी निघाला. वाटेत आष्टी येथे सेनापती बापू गोखले सैन्यासह येवून मिळाले. याचवेळी मागावर असलेले ब्रिटिश सैन्य समोरासमोर आले आणि आष्टी-येवतीच्या मैदानात तुंबळ युद्ध झाले. या युद्धात मराठेशाहीचा शेवटचा सेनापती बापू गोखले धारातीर्थी पडले. हे समजताच दुसऱ्या बाजीरावाने पलायन केले. म्हणून इतिहासात त्याला ‘पळपुटा’ बाजीराव म्हंटले जाते. मराठेशाहीचा पराभवा बरोबरच अस्त झाला अन् पुण्याच्या शनिवार वाड्यावर मराठेशाहीचे ‘निशाण’ उतरवून ‘युनियन जॅक’ फडकला. भारत खऱ्या अर्थाने त्याचवेळी पारतंत्र्यात गेला.

त्या युद्धभूमीवर सेनापती बापू गोखले यांची समाधी बांधलेली होती. ते स्फूर्तिकेन्द्र झाले तर ईस्ट इंडिया कंपनी विरोधात उठाव होईल या भीतीने जवळपास ६२ वर्षांनी ब्रिटिशांनी दुष्काळाचे निमित्त साधून त्या युद्धभूमीवर १८८० साली महाराणी व्हिक्टोरिया तलाव बांधला. या तलावाला १४० वर्षे पूर्ण झाली आहेत. या तलावाभोवती वनराई निर्माण करून ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या ‘हॉलिडे कॅम्प’साठी एक विश्रामगृह देखील बांधले गेले.

हेच ते विश्रामगृह, पुढे ते ‘गवती बंगला’ म्हणून ओळखले जावू लागले. हा इतिहास सांगण्याचे मुख्य कारण म्हणजे मराठेशाहीचा दारुण पराभव आणि आत्यंतिक नुकसान जरी पानिपतच्या लढाईत झाले असले, तरी मराठेशाहीचा अस्त झालेला नव्हता. पण आष्टी-येवतीच्या लढाईने मात्र आपण पारतंत्र्यात गेलो. पण या ऐतिहासिक घटनेची दखल म्हणावी तेव्हढी आजही घेतली जात नाही. हा ऐतिहासिक वारसा आपण जपला पाहिजे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

मोबा. क्र. :- 880618837

मराठ्यांच्या इतिहासाची पाने उलगडणारा दुर्मिळ ग्रंथ

“राधा माधव विलास चंपू” ही एखाद्या बालकथेतील पात्र वाटतील, पण तसं नाहीय. हा मराठ्यांच्या इतिहासाची पाने उलगडणारा शहाजीराजे भोसले यांच्या चरित्राचे वर्णन करणारा संस्कृत आणि प्राकृत भाषेतील एकमेव काव्यग्रंथ आहे. शिवाजी महाराज की जय म्हणत छाती काढून फिरणाऱ्या अनेक युवा मावळ्यांना याची माहिती व्हावी म्हणूनच ही पोस्ट.
या चंपू काव्याचे नाव जरी “राधा माधव विलास चंपू” असे असले तरी त्यात मुख्यतः शहाजीराजांचे चरित्र वर्णन केलेले आहे. ही काव्य रचना जयराम पिंड्ये या कवीने केलेली आहे. विशेष म्हणजे त्याने ही काव्यरचना दस्तुरखुद्द शहाजीमहाराजांना ऐकविली (इतिहासात हा उल्लेख आहे) त्यामुळे या काव्यग्रंथाला फार मोठे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शहाजीराजांचा चरित्रात्मक असा एकमेव ग्रंथ आहे.
अलीकडे इतिहासालाच खोटे ठरविण्याची उठाठेव सुरू असते म्हणून हा खुलासा. या काव्यग्रंथात राधा-कृष्णाच्या वर्णनाचा एक तृतीयांश भाग संस्कृत मधून आहे तर शहाजीराजांच्या चरित्राच्या वर्णनाचा एक तृतीयांश भाग संस्कृतमधून तर एक तृतीयांश भाग प्राकृत भाषेतून आहे. या काव्यात शहाजीराजांच्या दरबारातील सत्तर लोकांची नावे व त्यांची वर्णने आलेली आहेत.
कवी जयराम पिंड्ये हे मूळचे नाशिकचे होते. त्यांना संस्कृतसह भारतखंडातील तत्कालीन बारा भाषा येत होत्या. हा कवी शहाजीराजांचा दरबारी कवी होता. त्यामुळेच हे चरित्र खूप विश्वसनीय आहे. १६५३ ते १६५८ या काळात त्याने हे चरित्रकाव्य लिहिले आहे. इतिहासकार वि. का. राजवाडे यांना या ग्रंथाची मुळप्रत चिंचवड येथे मिळाली. त्याला त्यांनीच संशोधनपर प्रस्तावना लिहिली आहे. इंटरनेटवर हा काव्यग्रंथ उपलब्ध होऊ शकतो.
इतिहासकाळात मराठ्यांची पीछेहाट का झाली ? याची कारणमीमांसा शोधण्यासाठी हा ग्रंथ प्रमाण मानला जातो. ज्यांचे इतिहासावर प्रेम आहे. विशेषतः छत्रपतींचे नाव अभिमानाने घेणाऱ्या प्रत्येक इतिहासप्रेमी आणि संशोधकाने हा काव्यग्रंथ समजून घेतला पाहिजे. इथे त्याकाळची प्राकृत आणि संस्कृत भाषा अभ्यासून हा ग्रंथ वाचावा लागेल हीच मोठी अडचण आहे. इतिहासात “ध चा मा” करीत इतिहासालाच खोटे ठरविणारे इतिहास संशोधक गल्लोगल्ली तयार झालेत. अश्या काळात “राधा माधव विलास चंपू” नावाचा शहाजीराजांच्या चरित्र ग्रंथांबद्दल कितीजणांना माहिती असेल ? हा देखील चर्चेचा विषय होईल. कोणाला पीडीएफ फाईल पाहिजे असल्यास त्यांनी संपर्क साधावा.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
मोबा.क्र. : 8806188375.

एका डासाच्या “महानिर्वाणा”ची शोभायात्रा

विज्ञानाबाबत "अगाध" ज्ञान असएका डासाच्या "महानिर्वाणा"ची शोभायात्रा वि आहे. याच अगदी कालपरवा मला ज्ञान झाले. परवा कीटक शास्त्राचा अभ्यास असणारा एक पीएचडीचा विद्यार्थी "डास" या किटकसदृश्य प्रजातीवर भरभरून बोलला. माणसाला चावून रक्त शोषणारी "मादी" डास म्हणजेच "डासीन" असते (आपल्या भाषेत) तर "नर" डास हा परागकण शोषतो हा शोध मला माहित झाला. मग मला रात्रभर डास चावले हा वाक्यप्रयोग चुकीचा वाटू लागला. बघा, म्हणजे शोषणाबाबतही योग्य माहिती नसेल तर आपण चुकीच्याच जमातीला शोषणाकर्ता म्हणून जबाबदार धरतो. हे असं आपल्या बाबतीत खूपवेळा होत राहते. बऱ्याच वेळा आपल्या चुकीच्या समजुतीने "इतिहास" देखील मलिन झाला आहे. तर या मिळालेल्या माहितीनंतर मला "डास" या प्रजातीबद्दल राग येण्या ऐवजी त्यांच्याबद्दल कुतूहल वाढले. त्यांची नारी शक्ती एव्हढी "पॉवरफुल" आहे, जी रोज सर्वशक्तिमान अशा मनुष्यप्राण्याला सळो की पळो करून सोडते. याचंच मला कौतुक वाटू लागलं. आज सकाळी मात्र भिंतीवरून काळ्या मुंग्यांची रांग धीर गंभीर वातावरणात जाताना दिसली. रांगेच्या अगदी मधोमध काही मुंग्यांनी एका मृत डासाचे "शव" आपल्या खांद्यावर घेतलेले दिसले. तो डास की डासीन हे समजू शकले नाही. मात्र ज्या सन्मानाने आणि धीर गंभीर वातावरणात ती अंत्ययात्रा सुरू होती त्यावरून ती मोठ्या शूर योद्धाची अंतिम महानिर्वाण यात्रा असावी असे जाणवत होते. मृत योद्धयाच्या शरीरावर विटंबनेच्या कोणत्याही खुणा दिसत नव्हत्या. माणसांपेक्षाही कीटकांचे जीवन शास्त्र जास्त सन्मानजनक असावे. मुंग्यांचं समाज शास्त्रच मुळी शिस्तबद्ध असतं. स्वतःहून कुणाच्या वाटी जाणार नाहीत की कुणाची विटंबना करणार नाहीत. मला डासात आणि माणसात एक "साम्य" मात्र आढळले. त्या महानिर्वाण यात्रेकडे एकही डास फिरकला नाही. अगदी माणसा सारखं, मृत व्यक्ती बद्दल चार चांगले शब्द बोलायचे सुद्धा विसरून गेला आहे. सारखं चावून रक्त शोषून डासांना देखील माणसांचा प्रादुर्भाव झाला आहे. रक्तात दोष निर्माण झाला की पुढची पिढी बरबाद होते हा सिध्दांत इथेही लागू होत असावा बहुदा...! अन्यथा एका शूर डासाची अंत्ययात्रा एव्हढी शांत कशी निघाली असती ?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

मोबा.क्र.:-8806188375

मराठी नाटकांचे काय होणार..?व्यावसायिक मराठी रंगभूमीला कोरोना महामारीच्या संकटाने मार्च २०२० मध्येच पहिला धक्का बसला. जनता कर्फ्यु अन् त्यानंतर सुरू झालेल्या लॉक डाऊनच्या सत्रांमुळे २२ मार्चपासूनच नाटकांचे प्रयोग आणि राज्यभरातील दौरे थांबविण्यात आले. इतर व्यवसायांप्रमाणेच लॉक डाऊन उठविल्यानंतर नाट्यप्रयोग सुरळीतपणे सुरू होतील हा भाबडा विश्वास व्यावसायिक नाट्यनिर्माते, कलावंत आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर घटकांना होता. आता राज्यसरकारने नाट्यगृहांना अटी व शर्थींसह परवानगी दिली असली तरी आसनक्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षक संख्येवर नाट्य व्यवसायिकाला किंवा हौशी कलावंताला प्रयोग लावणे परवडणारे असेल का ? सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या दहशतीखाली असलेले प्रेक्षक नाटक पहायला येतील का ? काहीच दडपण नाही अश्या अविर्भावात मनोरंजन करण्याची नाटकवेड्या मराठी माणसाची मानसिकता असेल का ? मग मराठी नाटकाचं काय होणार ?
किमान एक महिनाभर जनजीवन ठप्प झाल्यानंतर तरी कोरोनाची साखळी तुटेल हा विश्वास असल्याने नाट्यक्षेत्र इतरांप्रमाणेच निर्धास्त होते.
मात्र महिन्याभरानंतरही लॉक डाऊनचा विळखा सुटत नाही म्हटल्यानंतर नाट्य व्यावसायिक आणि त्यावर अवलंबित घटकांचे धाबे दणाणले. याकाळात निर्मार्त्यांनी आपआपल्या नाटक कंपनीतील पडद्यामागील कलावंत-तंत्रज्ञ तसेच ज्येष्ठ कलावंतांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी, वैद्यकीय खर्चासाठी काही प्रमाणात मदत केली. मात्र अनिश्चीततेच्या या वातावरणात रंगकर्मींची भ्रांत वाढू लागली होती.
याकाळात प्रशांत दामले पासून ते अनेक नामवंत कलावंतांनी पडद्यामागील कलावंत, तंत्रज्ञ आणि ज्येष्ठ रंगाकर्मींसाठी मदतीचा ओघ सुरू ठेवला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनेही शंभरावे नाट्य संमेलन अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलून कलावंत मदतनिधीची योजना पुढे आणली. अ.भा.नाट्य परिषदेचे तरुण अध्यक्ष प्रसाद उर्फ नवनाथ मच्छिंद्र कांबळी यांनी दहा कोटींचा मदतनिधी उभारण्याचा संकल्प केला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भरत जाधव, माधुरी दीक्षित अशी अनेक मंडळी पुढे सरसावली आहे. या संकटातून रंगकर्मींच्या तात्पुरत्या उपजीविकेचा प्रश्न सोडविण्याचा यातून प्रयत्न होताना दिसतोय. मात्र या महामारीनंतर व्यावसायिक नाटकांचे भवितव्य काय ? यावर मात्र भलेमोठे टाळे लागलेले सध्या तरी दिसत आहे.
कोरोना महामारीने सगळं जगच बदलतेय की काय ? असं वाटू लागलंय. सगळेच व्यवसाय आणि व्यवहार बदलतील असा बोलबाला सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी नाटक बदलेल का ? याची घालमेल रंगकर्मींच्या मनात नक्कीच सुरू आहे. दोन्ही जागतिक महायुद्धानंतर जसे जागतिक पातळीवर एकूणच जीवनमानावर बदल घडून आले होते. त्याचा प्रभाव हा कला सादरीकरणावरही झाला होता. आताही असाच काहीसा बदल होवू पाहतोय.
कोरोनाच्या प्रभावातून सुटका झाल्यानंतर समूहांच्या जीवनमानात बरेच सूक्ष्म असे पण परिणाम करणारे बदल घडून आलेले दिसणार आहेत. त्याचे पडसाद कला सादरीकरणावर नक्कीच पडणार आहेत, यात शंकाच नाही. पण नेमके बदल कोणते ? याबद्दलच रंगकर्मी सध्यातरी अनभिज्ञ दिसत आहे.
नाटक हे ‘टीमवर्क’ आहे, अर्थात समूहाचे सादरीकरण आहे. त्यामुळे त्याच्या अस्तित्वापासून ते बदलते सादरीकरण कसे असेल ? याबाबतचे आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे.
मराठी नाटकाच्या बाबतीतच बोलायचे झाल्यास इथे सादरीकरणाचे प्रचलित दोन प्रवाह आहेत. एक म्हणजे व्यावसायिक रंगभूमी आणि दुसरी हौशी रंगभूमी. व्यावसायिक रंगभूमीवरची नाटके बदलत्या जीवनमानात कोणता बदल स्वीकारणार याचे आडाखे व्यावसायिक नट आणि निर्माते बांधत आहेत. तर हौशी रंगभूमीवर देखील हौशी, प्रायोगिक आणि अर्धव्यावसायिक रंगकर्मी आपआपली मत मांडू लागली आहेत.
नाटकाच्या व्यवहार्य बाजूमध्ये म्हणजेच अर्थकारणात अतिशय कमकुवत समजला जाणारा वर्ग म्हणजे बॅक स्टेज आर्टिस्ट, त्याला आपण पडद्यामागील कलाकार म्हणतो. या होणाऱ्या बदलांचा परिणाम हा पहिल्यांदा त्याच्यावर दिसतो. त्यानंतर नाटक निर्मिती व्यवस्थेवर आर्थिक स्वरूपात परिणाम दिसून येतो. प्रसिद्धीच्या वलयात असलेल्या अभिनेता-अभिनेत्रींवर झालेले आर्थिक परिणाम हे फार उशिरा समोर येतात. व्यावसायिक पातळीवर हे परिणाम अगदी गंभीरपणे रोजच्या ‘ब्रेड-बटर’ पर्यंत येऊन थडकतात.
व्यावसायिकता झुगारून कलासक्त म्हणून निर्भेळ आनंद देणाऱ्या आणि मिळविणाऱ्या हौशी रंगभूमीवर आर्थिक खाचा नसल्या तरी नाटक जगण्याची आणि जगवण्याची उर्मी तयार होत असते. त्याच्यावर परिणाम होवून एकूणच रंगभूमीच्या विकासाला खीळ बसण्याची भीती निर्माण होवू शकते.
मुळात काही वर्षे किंवा काही महिने नाटक थांबले तर एव्हढा काय परिणाम होणार आहे ? असा वरवरचा विचार मांडून या प्रश्नाचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न करणे देखील गफलतीचे ठरणार आहे.
यापूर्वी आलेल्या महामारी आणि आत्ता आलेली कोरोना महामारी याच्या परिणामांची देखील भिन्नता आहे. या महामारीने सोशल डिस्टनसिंग अर्थात सामाजिक अंतर हा नवा संस्कार स्वीकारण्यास समाजाला भाग पाडले आहे. महामारीचे पूर्ण निर्दालन होईपर्यंत हे सोशल डिस्टनसिंग पाळावे लागणार आहे. शिवाय हा कालावधी नेमका किती वर्षांचा असेल याचा अंदाज आजमितीस कुणीच बांधू शकत नाही.
अशास्थितीत नाटकाकडे येणारा प्रेक्षकवर्ग हाच आता नाटकाच्या अस्तित्वाचा मुख्य घटक ठरणार आहे. जसे महायुद्धानंतर भीषणतेचे सावट कथानकांवर पडलेले होते. अगदी तसेच सावट आता नव्या नाटकांच्या कथानकातून दिसेल. ते अगदी अपरिहार्यतेने येईल. प्रेक्षकही त्या कथानकांशी एकरूप होतील. त्यामुळे नाटके कशी असावीत ? हा फार कळीचा मुद्दा असणार नाही. सादरीकरणाची तंत्रे आणि कालावधी यामध्येही फार मोठे बदल करावे लागणार नाहीत.
बदल करावा लागेल तो प्रेक्षागारातील आसन व्यवस्थेत. सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत आसन व्यवस्था करावी लागेल. याचाच अर्थ थिएटरमध्ये सध्या अस्तित्वात असलेली आसन व्यवस्था मोडून ती निम्म्यावर आणावी लागणार आहे. नाटकाचं अर्थकारण बिघडणार आहे ते नेमकं इथेच.
नाटक निर्मिती, वाहतूक, कलावंतांची बिदागी, थिएटर भाडे, जाहिराती यासगळ्याची बेरीज करून तयार झालेल्या बजेटचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ घालणे व्यावसायिक निर्मात्याला अशक्य ठरणार आहे.
हौशी रंगभूमीवर बजेटचा प्रश्न गौण जरी ठरवला तरी अश्या नाटकांना आधीच उदासीनता दाखविणारा प्रेक्षक किती प्रतिसाद देणार ? त्याचा प्रतिसाद मिळविण्यासाठी प्रयोगाची संख्या वाढविण्याचे ‘मृगजळ’ हौशी रंगभूमीला तयार करणे पराकोटीचे ठरणार आहे. असं काहीच घडणार नाही, अशी ठाम समजूत असणारा रंगकर्मींचा वर्गही असू शकतो. नेहमी नाटकाच्या सुखांतात रमणारे असतात अनेक, पण बदल हा निसर्गाचा नियम आहे, अन् कला हा देखील निसर्गाचाच अविष्कार आहे. मराठी नाटक आता बदलाच्या वळणावर आलेले आहे हे मात्र नक्की.
मराठी नाटकाचा तारणहार हा मध्यमवर्गीय नोकरदार मराठी माणूस आहे. महिनाभर चाकरी करून मिळणाऱ्या पगारात आपल्या कौटुंबिक गरजा भागवून शिलकीतल्या पैश्यात मनोरंजनासाठी नाटक पाहण्याची हौस भागविणाऱ्या मराठी नाट्य रसिकाला आता बदलत्या मराठी नाटकाचे व्यावसायिक अर्थकारण पेलवेल का ? हाच मुद्दा आहे.
सोशल डिस्टनसिंग पाळत जर थिएटरमधील आसन व्यवस्था केली, तर आपोआपच त्याची संख्या निम्म्यावर येणार आहे. म्हणजेच याचा भार हा तिकिटांचे दर वाढविण्यावर होणार आहे. आत्ताचा असणारा दर नाट्यरसिकाला परवडणारा नसल्यानेच मराठी व्यावसायिक नाटकाकडे रसिकांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. त्यातूनही पुन्हा तिकीट दरवाढ केली तर मखमली पडदा उघडणे अवघडच होणार आहे. यातुलनेत गुजराती नाटकांची स्थिती ही मराठी नाटकांपेक्षा चांगली आहे. त्यांचा प्रेक्षकवर्ग हा धनिक-व्यापारी वर्ग असल्याने त्यांना मर्यादित प्रेक्षक संख्येतही अपेक्षित व्यवसाय करणे शक्य होणार आहे. मराठी व्यावसायिक नाटकांची हीच खरी गोची आहे. हा नुकसानीचा व्यवसाय नको म्हणून मराठी नाट्य निर्माते आणि त्यांचे अर्थ पुरवठादार इथून पुढे नाट्य निर्मिती करतील का ? हाच प्रश्न आहे.
शिवाय प्रसिद्धी आणि पैसा मिळतो म्हणून व्यावसायिक नाटक करणारे सेलिब्रिटी नटमंडळी देखील मराठी नाटकाकडे पाठ फिरवतील. त्यांना सिरीयल, वेबसिरीज, सिनेमा, जाहिरातीचे जग खुणावेल. मग मराठी नाटक जगणार कसे ?
तर नाटक ही हौस समजणारा हौशी रंगकर्मी इथून पुढे मराठी नाटकांचा तारणहार म्हणून पुढे येताना दिसेल. त्याला जशी आर्थिक फटाक्याची भीती वाटत नसते तशीच पाचपन्नास रसिकांसमोर नाटक सादर करण्यात तोटा वाटत नसतो.
जर सुरक्षित अंतराची आसन व्यवस्था होणार असेल तर मिनी थिएटर ही संकल्पना बाळसे धरू शकेल. याबाबतीत गोव्याचे हौशी रंगकर्मी विजयकुमार नाईक यांनी ‘बॉक्स थिएटर’ ही संकल्पना तर वर्ध्याच्या हरीश इथापे यांनी ‘ग्रीन थिएटर’ या रुजवलेल्या संकल्पना मार्गदर्शक ठरतील.
दरवर्षी राज्यनाट्य आणि कामगार नाट्य स्पर्धांमधून पाचशे ते सहाशे नाटके रंगभूमीवर येतात. त्यातही नव्या संहितांचे प्रमाण जास्त असते. शिवाय अनेक चांगल्या दर्जाचे कलावंत या स्पर्धांमधूनच मिळतात. त्यामुळे भलेही व्यावसायिक नाटकांचा अवतार संपत आला असला तरी हौशी नाटकांची सद्दी सुरूच राहणार आहे.
हौशी रंगभूमीवर सातत्याने वेगवेगळे प्रयोग यशस्वी करणाऱ्या रंगकर्मींना सोशल डिस्टनसिंगमुळे बदलणाऱ्या प्रेक्षागाराची अडचण न होता बंदिस्त प्रयोगाची उंची वाढविण्यास मदतच होणार आहे. विदेशात ऑनलाईन नाटक ही संकल्पना देखील जोर धरत आहे. मात्र प्रत्यक्ष रंगाविष्कार आणि स्क्रीनवरचा अविष्कार यात अंतर असल्याने हा प्रकार आपल्याकडे फारसा रुजेल याची शाश्वती वाटत नाही. शिवाय निर्मिती संस्थेच्या बँक अकाऊंट मध्ये तिकिटांचे पैसे ट्रान्स्फर होतील याचीही शाश्वती वाटत नाही. त्यामुळे अश्या स्थितीत हौशी रंगकर्मीच नाटकाची धुरा समर्थपणे वाहू शकतात. मराठी नाटकाचं काय होणार ? याचं नेमकं उत्तर हौशी रंगभूमीचं देवू शकणार आहे.
लेखक :- मुकुंद मधुकर हिंगणे.
मोबा.क्र. :- 8806188375

प्रयोगाच्या प्रतीक्षेत रंगमंच.

रावण पण कुणाचा तरी ‘अवतार’च असेल ना…?


सत्य, अहिंसा आणि नीतिनियम, धर्माने वागणारे हे देवाचे अवतार समजले जात असतील तर असत्य, हिंसा, अनीती आणि अधर्माने वागणारे राक्षसांचे अवतार समजले जातात. रावणाला देखील राक्षसांचा अवतार समजले जाते. पण हे एक अर्धसत्यच म्हणावे लागेल. प्रभू रामचंद्र जर भगवान विष्णूचे अवतार असतील तर रावण कुणाचा अवतार असेल…?
कारण रामाशी केलेले युद्ध, इंद्राचा केलेला पराभव आणि नवग्रहांना पायाशी ठेवण्याच्या कृतीने रावण खलनायक तर ठरू शकत नाही. केवळ मायावी राक्षस मारीचच्या मदतीने केलेले सीता हरण त्याला खलनायक बनवू शकत नाही. पण आपण त्याला खलनायकच ठरवले आहे.
रावण हा तपस्वी आणि तेजपुंज महाप्रतापी होता याचे देखील पुराणात दाखले मिळतात. आपल्या तपश्चर्येने देवाधिदेवालाही वश करण्याचे सामर्थ्य ठेवणारा महाप्रतापी रावण राक्षस कुळाचा कसा काय ठरू शकतो..? प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांशी वैर निर्माण करीत भीषण युद्ध करणारा रावण त्याच्या पहिल्या जन्मात भगवान विष्णूंचा द्वारपाल होता. म्हणजेच तो प्रभू रामचंद्रांचा द्वारपाल होता.
पौराणिक कथेनुसार एकदा सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे ऋषीमुनी भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी आले. त्यावेळी दरबाराच्या प्रवेशद्वारावर दोन पहारेकरी पहारा देत बसले होते. ज्यांची नावे जय आणि विजय अशी होती. आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर आपण हातात भाला घेतलेल्या पहारेकऱ्यांच्या दोन आकृत्या चितारतो त्या ह्याच ‘जय-विजय’ यांच्या असाव्यात.
तर ह्या दोन्ही द्वारपालांनी त्या ऋषिमुनींना दरबारात जाऊ दिले नाही. संतप्त ऋषींनी त्या दोघांना पुढील जन्मी राक्षस व्हाल असा शाप दिला. ते दोघेही द्वारपाल गर्भगळीत झाले, गयावया करू लागले. उःशाप मागू लागले. शेवटी भगवान विष्णूंना मध्यस्थी करावी लागली. शेवटी ते ऋषीमुनी शांत झाले. त्यांनी उःशाप दिला. तीन जन्म राक्षस कुळात जन्म घ्यावा लागेल. याबरोबरच प्रत्येक जन्मात भगवान विष्णूंच्या अवताराकडून त्यांचा वध होईल. त्यानंतरच त्यांना पुन्हा जय-विजय या अवतारात येता येईल.
ऋषींच्या शापाप्रमाणे पहिल्या जन्मात जय-विजय हे हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू बनले. भगवान विष्णूने त्यांचा वध केला. त्यानंतर दुसऱ्या जन्मात ते रावण आणि कुंभकर्ण म्हणून जन्मले. विष्णुअवतार प्रभू रामचंद्रांनी त्यांचा वध केला. त्यानंतर तिसऱ्या जन्मात ते शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून जन्मले. त्यावेळी भगवान विष्णूंनी श्रीकृष्णावतार घेऊन त्यांचा वध केला. त्यानंतर त्यांना ऋषींच्या शापातून मुक्ती मिळाली.
आता या पुराणकथेप्रमाणे रावण हा दुसरा-तिसरा कुणी नसून भगवान विष्णूंचा द्वारपाल ‘जय’ होता. त्यानंतर त्याने कुठलाच जन्मावतार घेतल्याचा पुराणात उल्लेख नाही. मग आम्ही प्रत्येक खलप्रवृत्तीच्या माणसाला रावण का समजतोय. शिवाय तो मूळचा राक्षस नाहीय. शापामुळे त्याला राक्षसकुळात जन्म घ्यावा लागलाय.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
मोबा.क्र :-8806188375