आपत्तीतील जन्म आपुला…!

जन्म आणि मृत्यूदरम्यान प्रत्येकालाच वेगवेगळ्या आपत्तीला सामोरे जावे लागते. कधी मानवनिर्मित तर कधी निसर्गनिर्मित आपत्ती कोसळते. कधी ती फारसा परिणाम करणारी नसते तर कधी ती प्रलयंकारी असते. आपत्तीला सामोरे जाणे म्हणजेच जगणे तर नसावे..?

चाळीस ते सत्तरच्या काळात जन्मलेल्या अनेकांना आपत्ती म्हणजे काय ? हे निश्चित सांगता येईल. वडीलधारी म्हणून या काळात जन्मलेली पिढीच आता आपल्या समोर ‘सिनिअर’ म्हणून आहेत. त्या अगोदरची पिढी एकतर विस्मृतीमध्ये गेलेली आहे किंवा मरणासन्न अवस्थेत पोहोचलेली दिसेल. चाळीसचे दशक सर्व जगालाच लक्षात राहणारे दशक ठरले. एकीकडे साथीचे रोग आणि दुष्काळाने ग्रासलेले अर्धे जग तर दुसरीकडे महायुद्धाच्या खाईत लोटलेले संपूर्ण जग. होय, महायुद्ध ही मानवनिर्मित आपत्तीच आहे ना ! एकोणविसाव्या शतकाच्या प्रारंभी उद्रेकासारखा उसळलेल्या प्लेगची साथ संपत नव्हती. त्यातच पहिले महायुद्ध झाले. पहिल्या महायुद्धानंतर जगाला नवी दृष्टी मिळाली. यंत्रयुगाने वेग घेतला. विज्ञान देखील गतिमान झाले. कधी नव्हे ते पर्यावरण शास्त्राकडे लक्ष गेले. शतकाच्या प्रारंभापासून चाळीस वर्षे खरंतर जग घडून गेलेल्या आपत्तीतून बाहेर पडू लागले होते. बहुदा आपत्ती व्यवस्थापन हे तेंव्हाच हळूहळू आकाराला येत असावे. त्यानंतर चाळीसच्या टप्प्यावर जग पुन्हा एकदा दुसऱ्या महायुद्धात ओढले गेले. नरसंहार, वित्तहानीचा उद्रेक सोबत अनेक रोगाच्या साथी याकाळात जगाने पाहिल्या. एकमात्र झाले, दुसरे महायुद्ध संपुष्टात आल्यानंतर पारतंत्र्यात अडकलेल्या अनेक देशांमध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. चाळीस ते साठच्या वीस वर्षांच्या काळात अनेक देश गुलामीतून मुक्त झाले. त्यामुळे एकोणिसाव्या शतकातील चाळीस ते साठच्या द्विदशकात स्वातंत्र्याची अनुभूती घेणारी पिढी ही खऱ्या अर्थाने भाग्यवान ठरली. त्यानंतर साठ ते ऐंशीच्या द्विदशकात सुखाच्या शोधात अडकलेल्या पिढीला फार मोठ्या आपत्तीला सामोरे जावे लागले नाही. देश उभारणी, औद्योगिक प्रगती, रोजगार यामध्ये ही पिढी अडकली.

ऐंशीच्या दशकानंतर जगभर उसळलेल्या वांशिक, धार्मिक दंगलीच्या आपत्तीला तोंड द्यावे लागले. त्यातच आखाती युद्धाने सगळ्या जगाला पुन्हा एकदा युद्धभूमीवर नेवून ठेवले. नैसर्गिक आपत्ती पेक्षाही आजवर मानवनिर्मित आपत्तीनेच सर्वाधिक नुकसान झाले हेच इतिहासात डोकावले तर आपल्या लक्षात येईल. नाही म्हणायला महापूर, भूकंप, चक्रीवादळे आणि रोगराईच्या साथी हे दरवर्षीच माणसांच्या नशिबी लिहिलेल्या आहेत. साठच्या दशकात जन्मलेली पिढी ही तशी आपत्तीला तोंड देण्याबाबत परिपूर्ण पिढी आहे असा माझा समज आहे. अर्थात याला अनेकजण खोडूनही काढण्याचा प्रयत्न करतील. परिपूर्ण यासाठी म्हणतोय कारण नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना समजून घ्यायचा वयात या पिढीने अनेक आपत्ती नुसत्या अनुभवल्या नाही तर त्याला सामोरे जात झुंज देखील दिली.

आमच्या पिढीने काय नाही पाहिलंय…? असं सांगायची आता गरज पडणार नाही. कारण पूर, भूकंप, युध्दसदृश्य परिस्थिती, महागाई, बेरोजगारी, दंगली हे तर आता जगण्याचा अविभाज्य घटक बनलेत. पण आत्ता समज आलेल्या वयातील जी पिढी आहे ती पिढी आपल्या ‘सिनिअर’ पिढीशी एका गोष्टीत मात्र बरोबरी करू शकते. ती म्हणजे महामारीच्या अनुभूतीची. शंभर वर्षानंतर प्लेगपेक्षाही महाभयंकर अश्या ‘कोरोना महामारी’ला ही पिढी सामोरी जात आहे. प्लेगच्या भयावह कथा ऐकणाऱ्या आमच्या पिढीने महाप्रलंय बघितला, तसा दुष्काळ देखील अनुभवला. दरवर्षी येणाऱ्या रोगराईच्या साथीला धीराने तोंड दिले. आजकाल दोन देशांच्या सीमेवरचा तणाव ही आपत्ती नाहीतर पॉलिटिकल गेम झालेला आहे. त्यामुळे एखाद्या सिनेमासारखे त्याकडे पाहिल्या जाते. त्यामानाने गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीशी ज्या समजूतदार पणाने नवी तरुणपिढी तोंड देतेय ते पाहिल्यावर ‘आमच्या पिढीने अनेक आपत्तींना समर्थपणे तोंड दिलंय’ असं ‘सिनिअर’ पिढी नक्कीच म्हणणार नाही. त्यामुळे आमच्या पिढीने ७२ चा दुष्काळ पाहिला, स्काय लॅब पडताना पाहिले, प्रलयंकारी महापूर आणि भूकंप पाहिला, युद्धे पाहिली हे सांगताना नवी तरुण पिढी म्हणेल आम्ही तुमच्या बरोबरच कोरोना महामारी पाहिलीय……!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

फिल्मी शालीनतेची नागडी सभ्यता….!

एकीकडे महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठलाची आराधना करीत आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. अध्यात्माची निर्मिती करणाऱ्या या पंधरवड्यात चारित्र्य आणि सभ्यतेचा मुखवटा धारण केलेल्या सेलिब्रिटींचा मुखवट्या मागचा भेसूर चेहरा समोर येताना दिसतोय. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती असलेला उद्योगी राज कुंद्रा (बरंच काही असलेला) हा पॉर्न फिल्म केसमध्ये मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आणि विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेला सारा महाराष्ट्र खडबडून जागा झाला. पॉर्न फिल्म इंडस्ट्रीतून आलेल्या एका संतीनीचे (महिला असल्याने संताचे संतीन असे समजावे) पार्ट्यांमधून आणि पत्रकार परिषदेतून शालीनतेचे गोडवे ऐकत असतानाच आता पॉर्न फिल्म इंडस्ट्रीचा मठाधिपतीच पोलिसांच्या हाती लागल्याने या फिल्मी लोकांच्या शालीनतेची नागडी सभ्यताच उघडी पडली आहे.

राज कुंद्रा आणि त्याची अभिनेत्री असलेली पत्नी शिल्पा शेट्टी

तीन-चार वर्षांपूर्वी ‘मी टू’ प्रकरणात अशाच स्त्रीवादी भूमिका मांडत फिल्मी संतीनींनी गोंधळ मांडला होता. आताही तसाच काहीसा प्रकार घडला. फक्त तो पॉर्न फिल्म इंडस्ट्री मधला आहे. त्यामुळे आपल्याला तो निषिद्ध किंवा फारतर आपल्या सभ्यतेला अस्पृश्य वाटू शकतो. पण आता राज कुंद्राच्या पॉर्न फिल्म प्रॉडक्शन आणि डिस्ट्रिब्युशन प्रकरणाने फिल्मी सावित्र्या (सावित्रीचे अनेकवचन) आपल्या आलिशान लाईफ मधून बाहेर येत पत्रकार परिषदा घेताना दिसतील. ‘मी बाई संतीन माझ्या मागे दोन-तीन’ म्हणत आपलं ‘कास्टिंग काऊच’ कसं झालं…त्यांनी आपल्याला कशी ऑफर दिली….आपण ती कशी नाकारली याचं आत्मकथन पत्रकारांसमोर करतील. नाहीतरी सध्या कोरोनाच्या टेन्शन मधून लोकांना रिलीफ पाहिजे. लोकांना तणावमुक्त करणे हे कलावंतांचे कामच असते. त्याबरोबर उद्या चमचमीत आणि रसभरीत आर्टिकल लोकांच्या पुढ्यात टाकलं पाहिजे हे पत्रकारांची ड्युटी असते. अन जनतेचे लक्ष दुसऱ्या विषयाकडे वळविणे हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे काम असते. त्यामुळे हा ‘योग’ चांगला जुळून आला आहे.

हीच ती अभिनेत्री सागरिका शोना सुमन

फेब्रुवारी २०२१ मध्ये अश्लील चित्रपटासाठी ‘न्यूड’सिन करण्यास भाग पाडले जात असल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंद करीत अभिनेत्री गहना वशिष्ठसह एकूण ९ जणांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी अश्लील चित्रफिती पेड मोबाईल अप्लिकेशनवर रिलीज करण्यात येत असल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी राज कुंद्रा याचा असिस्टंट उमेश कामत याला अटक केली होती. त्यावेळी पहिल्यांदा राज कुंद्रा याचे नाव पोलिसांच्या रडारवर आले होते. त्यावेळी म्हणजेच फेब्रुवारी २०२१ मध्ये अभिनेत्री सागरिका शोना सुमन हिने पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा मास्टर माईंड राज कुंद्रा असून त्याला अटक का केली जात नाही असा आरोप केला होता. सागरिकाला व्हिडीओ कॉल वर न्यूड ऑडिशन देण्याची विचारणा झाली होती. तिने ऑडिशन द्यायला नकार दिला होता. तिच्या आरोपानंतर ४ फेब्रुवारी २०२१ रोजी मालवणी पोलीस स्टेशन मध्ये राज कुंद्राच्या विरोधात इंडियन पिनल कोडच्या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आणि इनसिडेंट रिप्रिझेन्टेशन ऑफ वुमन ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानुसार मुंबई पोलिसांनी परवा राज कुंद्रा याला अटक केली आहे. भारतीय सिनेमा उद्योगात सेन्सॉर कार्यरत असल्याने चित्रपटातील अश्लीलता आणि देहप्रदर्शनावर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवता येते. मात्र आता इंटरनेट आणि मोबाईलवरील वेगवेगळ्या ऍप मुळे ओटीटी सारख्या प्लॅटफॉर्मवर नंगानाच सुरू झाला आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये त्यांच्या संस्कृती आणि सभ्यतेनुसार अश्लीलतेची व्याख्या केली जात असली तरी भारतीय सभ्यतेमध्ये नग्नतेला अश्लीलच समजले जाते. आता या प्रकरणात न्यूड सिन करायला लावणारा आरोप हा बचावासाठी केला जातोय की आर्थिक मागणी पूर्ण केली नाही म्हणून केला जातोय हे तपासातून बाहेर येईलच. तोपर्यंत स्त्रीचे पाशवी शोषण म्हणून टीकेची राळ उठेल. आता हा ‘उद्योग’पती असलेला राज कुंद्रा गप्प थोडीच बसणार आहे…. त्याच्या मागेही मोठी लॉबी असणार…काही दिवस चर्चा करायला लोकांना विषय मिळणार…मग पुन्हा प्रकरणावर पडदा पडणार ! मोठ्या संकटातून सहीसलामत बाहेर पडलो म्हणत तो आणि त्याची गँग पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमातून आपल्या श्रीमंतीचा ‘माज’ दाखवत फिरणार आणि आम्ही त्यांना उद्योगपती म्हणून गौरवणार….भारतीय कथांचा शेवट हा गोड असतो ना…..!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

देव बंदी ही मंदिरी, कैसे जाऊ पंढरपुरी ।।

वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला आणि भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेल्या वारकऱ्याला यंदाही आषाढी एकादशीला विठू माऊलीचे दर्शन घेता येणार नाही. कोरोना प्रादुर्भाव आणि कोरोना निर्बंधांमुळे मंदिराचे दरवाजे बंद झाले. गेल्या दोन वर्षांपासून विठूमाऊलीचे आषाढीला दर्शन घेता येत नाही की चंद्रभागेमध्ये डुबकी घेता येत नाही.

अवघ्या दोन दिवसांवर म्हणजेच २० जुलै रोजी आषाढी एकादशी आलीय. वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच येणाऱ्या आषाढी एकादशीला कैवल्याचा राणा श्री पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली असते. तहान भूक विसरून अनवाणी पायाने काट्याकुट्याची वाट तुडवत टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडीसह पंढरपूरकडे निघालेले वारकरी कोरोना साथीचा प्रादुर्भाव आणि रोखण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूरच्या वाटेवर दिसेना. तर मंदिरात कुलूपबंद झालेली विठूमाऊली देखील दर्शन देईना. देव भेटीची ओढ लागलेल्या भक्तांना माऊली दर्शन केंव्हा देणार हीच आषाढी एकादशीची आर्त हाक आहे. शिवारात कोसळणाऱ्या पावसाच्या सरी मध्ये विठूमाऊली शोधावी की रानात उगवणाऱ्या पिकांच्या कोंबामध्ये माऊली पहावी….अठ्ठावीस युगांपासून नित्यदर्शन देणाऱ्या देवाने गेल्या दोन वर्षांपासून मात्र कुलूपबंद व्हावं ! कैसी ही आगळीक झाली गे माये, माझा वैकुंठाचा राणा रुसला गे माये ।।

यंदा आषाढी एकादशी २०२१ साठी महाराष्ट्र शासनाने नियोजित कार्यक्रम घोषित केला असून यंदा मानाच्या फक्त दहा पालख्यांना आषाढी एकादशीला पंढरपूरला एसटी बस मधून येण्याला परवानगी दिली आहे. तर वाखरी मैदानापासून मंदिरापर्यंतचे दीड किलोमीटर एव्हढे अंतर पालखीतील वारकऱ्यांना पायी चालत जायला मंजुरी दिली आहे. १९५ संत महाराज मंडळींना पांडुरंगाच्या मुखदर्शनाची संमती दिली आहे. मानाच्या दहा पालख्यांसाठी सरकारने वीस बसेसची सोय केली आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोबत १०० वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घेता येणार आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर तपासणी केली जाईल. तसेच सर्व दक्षता आणि तपासण्या करूनच परवानगी देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही सामान्य नागरिकाला दर्शन घेता येणार नाही. जवळपास नऊशे-साडेनऊशे वर्षांची परंपरा असलेली आषाढी वारी गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सामान्य भाविकांच्या अनुपस्थितीतच साजरी केली जात आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

कैद्यांच्या पत्नीचा शरीरसुखाचा प्रश्न : एक चर्चा

शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या जीवनावर, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांवर आणि जेलमध्ये मिळत असलेल्या सुविधा आणि अत्याचारावर जगातील अनेक भाषांमध्ये सिनेमे निघाले. कैद्यांचे मनपरिवर्तन करणाऱ्या स्टोरी देखील प्रेक्षकांना आवडल्या. पण त्यांच्यासोबतच नकळतपणे शिक्षा भोगणाऱ्या त्यांच्या पत्नीच्या इच्छेचं काय ? तिला शरीरसुखाच्या नैसर्गिक इच्छेपासून वंचित ठेवण्याचा अधिकार आहे का ? हा प्रश्न मात्र सामाजिक संकोच आणि कैद्यांबद्दल वाटत असलेल्या तिरस्कारामुळे ऐरणीवर येत नाही. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते-माजीमंत्री अण्णा डांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रश्नाला तोंड फोडले आहे. खरंच कैद्यांच्या पत्नीच्या स्त्रीसुलभ निसर्गदत्त अधिकाराची मुस्कटदाबी होवू नये असं समाजाला वाटते का…?

महाराष्ट्र राज्याचे तुरुंग महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी परवा म्हणजे १२ जुलै रोजी कैद्यांना कारागृहाच्या कॅन्टीनमध्ये चिकन, मटण, अंडीपासून पनीर, श्रीखंड यासारख्या ८५ खाद्यपदार्थांची सुविधा उपलब्ध करीत असल्याचे आदेश पारित केले. या निर्णयाचे स्वागत करताना इस्लामपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी एका नव्या विषयाच्या चर्चेला वाट मोकळी करून दिली. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पत्नीला पती मिलनाची मुभा शासनाने अटी व शर्थींसह द्यावी याकरिता शुल्क देखील आकारले जावे. यातून तुरुंग विभागाच्या उत्पन्नात देखील वाढ होईल असे वक्तव्य करून नव्या चर्चेला सुरुवात केली. १९९५ साली सत्तेवर आलेल्या भाजपा-सेनेच्या युती सरकारमध्ये आण्णा डांगे हे ग्रामीण विकास व पाणीपुरवठा विभागाचे मंत्री होते. अण्णा डांगे पुढे म्हणाले की, एखादा गुन्हा अथवा अपराध सिद्ध झाल्यावर आरोपीला शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात डांबले जाते. त्याने केलेल्या गुन्ह्याचे त्याला सतत स्मरण रहावे म्हणूनच तुरुंगात त्याचे जीवन कष्टप्रद ठेवले जाते. मात्र महाराष्ट्र सरकारने जर कैद्यांसाठी तुरुंगातील उपहारगृहातून चांगले सामिष आणि मिष्टान्न उपलब्ध केले तर गुन्हेगार गुन्हे करून तुरुंगात उपलब्ध केलेले पदार्थ खायला आत येऊन बसतील. मग त्यांच्या बायकांनी काय गुन्हा केलाय ? आता त्यांनी हे उपरोधाने म्हंटले की मनापासून ? हे त्यांनाच माहीत. पण याविषयावर गांभीर्याने चर्चा व्हायला काय हरकत आहे. हाच विषय अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जपान, जर्मनी सारख्या देशांमधून चर्चिल्या गेला तर आपण फार गांभीर्याने घेणार पण नाही. पण भारतासारख्या परंपरावादी देशात स्त्रीसुलभ विषयांवर चर्चा होणार असेल तर….?

मुळात गुन्हा केलेला सिद्ध झाल्यानंतर त्या गुन्ह्याची शिक्षा ही फक्त त्या गुन्ह्याला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारालाच होत नाही. तर त्याच्या पश्चात त्याचे कुटुंब, पत्नी, मुले यांना त्यांची काहीही चूक नसतांना गुन्हेगाराचे आप्त म्हणून समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीची शिक्षा त्यांना भोगावी लागते. एकीकडे तुरुंगात डांबलेल्या कैद्यांच्या वर्तणुकीत सुधारणा घडविण्या बरोबरच त्यांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून जर सरकार त्यांच्या आहाराबाबत दक्ष राहणार असेल तर ही गोष्ट निश्चितच स्वागतार्ह आहे. याबरोबरच त्या कैद्यांच्या पत्नीच्या सुखाचा विचार करून तिला पती मिलनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा घडवून काही नवा प्रयोग करता येईल का ? याचा विचार करायला काय हरकत आहे? चित्रतपस्वी व्ही. शांताराम यांनी निर्मिती केलेला ‘दो आँखे बारह हाथ’ नावाचा कैद्यांच्या मनपरिवर्तन घडविणारा हिंदी चित्रपट आठवतो ना ! त्यात खुल्या कारागृहाची कल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर सरकारने जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना त्यांचे वर्तन पाहून बंदिस्त कारागृहातून काढून मोकळ्या वातावरणात शिक्षेचा कालावधी पूर्ण करता यावा अश्या खुल्या कारागृहाची निर्मिती केली. हा प्रयोग एक यशस्वी प्रयोग म्हणून सिद्ध झाला आहे.

स्त्रीच्या भावनांचा आणि संवेदनांचा सन्मान आणि नैसर्गिक अधिकार याचा विचार करून कैद्याच्या पत्नीला पती मिलनाचा अधिकार देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला तर स्त्रीत्वाचा सन्मान करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरेल. अर्थात सर्व कडक नियमावली तयार करून त्यासाठी तुरुंगाच्या आवारातच इमारत बांधून ही सुविधा उपलब्ध करता येईल. त्यासाठी शुल्क देखील आकारले तर तुरुंग व्यवस्थापनाला उत्पन्न देखील मिळेल. शिवाय शिक्षा भोगताना कुटुंबाशी जोडलेला असल्याने शिक्षा पूर्ण करून सुटका झाल्यावर त्या कैद्याला आपल्या कुटुंबात परत जाता येईल. शिवाय तुरुंगात होणारे अनैसर्गिक प्रकार थांबून कैद्यांचे वर्तन देखील सुधारेल. ज्येष्ठ नेते, माजीमंत्री आण्णा डांगे यांनी भलेही उपरोधाने हा विषय चर्चेत आणला असेल पण मानवाधिकाराच्या कक्षेत येणाऱ्या या विषयावर साधक-बाधक चर्चा तर व्हायला हवी. मग तुम्हाला काय वाटतं..? कैद्याच्या पत्नीला पती मिलनाचा तिचा नैसर्गिक अधिकार द्यायला हवा…. आपल्या लाईक अन कमेंट अपेक्षित आहेत.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

पांढऱ्या राजाला ‘चेकमेट’ करू पाहणारा काळा वजीर..!

युद्धात, राजकारणात आणि बुद्धिबळाच्या डावात कधी कोणती खेळी खेळल्या जाईल यात तर्कसंगती असावीच असा कोणताही नियम नसतो. जिंकण्यासाठीची खेळी एव्हढाच नियम तिथे लागू असतो. मग जिंकण्यासाठी कोणताही ‘आटापिटा’ केला तरी चालतो. विशेषतः राजकारणात विचारधारा, तत्वे यांना गुंडाळूनच जिंकण्यासाठी खेळी खेळावी लागते. भारतासारख्या बलाढ्य लोकशाही असलेल्या देशात तर आता निवडणूक जिंकण्यासाठी पक्षकार्य आणि पक्ष प्रतिमेपेक्षा रणनीती आखणारे पोलिटिकल स्ट्रॅटेजीस्ट नेमले जातात. पक्ष नेतृत्व आणि कार्यकर्त्यापेक्षा या नेमलेल्या निवडणूक रणनीती आखणाऱ्या व्यक्तीवर विजयाची भिस्त ठेवली जाते. लोकशाहीसाठी हे किती घातक आहे…? याचे कुठल्याही राजकीय पक्षाला सोयरसुतक राहिलेले नाही. आता काही राज्यांच्या होवू घातलेल्या निवडणुका, २०२२ मध्ये होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजनीतिज्ञ प्रशांत किशोर हे कामाला लागले असून सध्या ते विरोधीपक्षांचे तारणहार बनले आहेत.

कॉंग्रेससारख्या प्रमुख राजकीय पक्षाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी २०११ ते २०१४ पर्यंत भारतीय जनता पक्षाची रणनीती आखत होते तेच प्रशांत किशोर आता काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी सर्व विरोधकांची एकजूट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या विरोधात राजकीय व्यूहरचना करण्यात गुंतले आहेत, हेच सर्वात मोठे राजकीय व्यंग निर्माण झाले आहे. २०११ मध्ये हेच प्रशांत किशोर नरेंद्र मोदी यांना गुजरातचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनविण्यासाठी रणनीती आखत होते. २०१४ मध्ये तर मोदींना देशाचे पंतप्रधान बनविण्यासाठी त्यांनी यंत्रणा लावली होती. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पाठीशी प्रशांत किशोर उभे होते. या काळात हमखास निवडणूक जिंकून देणारे राजकीय रणनीतिकार अशी प्रतिमा प्रशांत किशोर यांची तयार झाली. जोपर्यंत पटतंय तोपर्यंत त्या नेत्यासाठी-पक्षासाठी काम करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी ‘प्रोफेशन’ म्हणूनच याकडे पाहिले आहे. २०१९ पासून ते मोदींविरोधी किंवा भाजपा विरोधी म्हणून इतर राजकीय पक्षांना ते आपलेसे झाले आहेत. विशेषतः प्रादेशिक पक्षांना रणनीतिकारांची गरज असते. कारण त्यांचे अस्तित्व हेच मुळी विशिष्ट विषयांवर अवलंबून असते. मात्र राष्ट्रीय पक्षांना स्वतःची अशी स्वतंत्र विचारधारा, परंपरा, कार्यकर्त्यांची मजबूत फळी असते. आजवरच्या त्यांच्या कार्यामुळे समाजात त्यांची स्वतंत्र प्रतिमा निर्माण झालेली असते. अश्यावेळी त्यांना बाहेरचा रणनीती आखणारा प्रोफेशनल आयात करावा लागतो हेच त्या राजकीय पक्षाचे आणि एकूणच निकोप लोकशाहीचे दुर्दैव असते. अशावेळी ‘व्यक्ती महात्म्य’ वाढण्याचा धोका असतो. एक व्यक्ती त्या देशाच्या राजकीय स्थितीला स्वतःला हव्या त्या पद्धतीने आकार देताना दिसतो. अशावेळी तो राजकीय पक्ष अथवा विचारधारा आपले नैसर्गिक अस्तित्वच हरवून बसते. सध्या भारतीय राजकारणात हाच धोका प्रशांत किशोर यांच्या रूपाने निर्माण झाला आहे. केवळ सत्तेची लालसा आणि मोदींविरोध यामुळे पछाडलेल्या विरोधी पक्षांनी प्रशांत किशोर यांच्या रूपाने राजकीय व्यवसायाला खतपाणी घालण्याचे कार्य सुरू केल्याचे दिसत आहे. त्यात मोदी विरोध अधिक कडवा करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्या राजकीय खेळी रचायला सुरुवात केली आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदींचे पर्यायाने भारतीय जनता पार्टीचे पारिपत्य करण्यासाठी देशातील मोदींविरोधी राजकीय पक्षांची मोळी बांधण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. मोदींना तुल्यबळ ठरणारा ‘चेहरा’ सध्या देशातील कोणत्याही विरोधी पक्षांकडे नाही हे सर्वमान्य झाल्याने आता विरोधकांचा चेहरा शोधण्याचे काम प्रशांत किशोर करीत आहेत. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांना मोदींविरोधी तुल्यबळ चेहरा म्हणून पुढे आणण्याची धडपड सुरू केली आहे. मात्र एकाचवेळी ते शरद पवार यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून चर्चेत आणत असतांना आता त्यांना राष्ट्रपतीपदाचे विरोधकांचे उमेदवार म्हणून पुढे आणण्याची प्रशांत किशोर खेळी खेळत आहेत. सार्वत्रिक निवडणुकांमधून वयोमान परत्वे उमेदवारी दाखल न करण्याचा निर्णय शरद पवार यांनी जाहीर केला असतांना त्यांचे नाव चर्चेत आणायला स्वतः शरद पवार साहेबांनी संमती दिली आहे का ? हा प्रश्न निर्माण होतो. मग पंतप्रधानपदाच्या उमेदवारी बरोबरच आता राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसंदर्भात त्यांच्या नावाच्या चर्चेला त्यांची मूकसंमती आहे का ? हा देखील प्रश्न उपस्थित होतो. त्यातून दोन्हीपैकी कुठल्यातरी एका पदाची संधी मिळवू असा विचार पवार यांच्यासारखे मुरब्बी राजकारणी करतील का ?

स्वतःचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असताना निवडणूक प्रचारात वयाच्या ऐंशीव्या वर्षी भरपावसात सभा गाजवत निवडणुकीचे चित्र पालटणारा हा नेता प्रशांत किशोर सारख्या राजनीतिज्ञा बरोबर दावपेचात सहभागी होवू शकेल का ? याचे उत्तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य मतदार देखील देवू शकतील. शरद पवार हे आता सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहणार नाहीत हे त्यांनी स्वतःच घोषित केलेले असतांना विरोधीपक्षाचा चेहरा म्हणून त्यांचे नाव चर्चेत आणण्याची खेळी का खेळली जात आहे ? आता मुद्दा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा…पंतप्रधान होता आले नाही तर निदान राष्ट्रपती तरी होवू अशी लालसा बाळगण्या इतके शरद पवार अपरिपक्व नक्कीच नाहीत. आता राष्ट्रपतीपदाच्या निवडीबाबत थोडेसे बघू…. या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा, एकूण तीस राज्यांच्या विधानसभा आणि केंद्रशासित दिल्ली व पुद्दुचेरीच्या विधानसभेचे निवडून आलेले सदस्य मतदार असतात. तांत्रिक भाषेत सांगायचे तर या सर्वांच्या निर्वाचक गणाच्या सदस्यांकडून (इलेक्टरल कॉलेज) राष्ट्रपती निवडला जातो. संख्यात्मकदृष्ट्या बघितले तर लोकसभेचे ५४३, राज्यसभेचे २३३ आणि तीस विधानसभांचे ४१२० असे एकूण ४८९६ मतदार आहेत. आता पक्षीय बलाबल बघितले तर लोकसभेत भाजपाचे बहुमत आहे. राज्यसभेतही भाजपाने शंभरी ओलांडलेली आहे. तीस विधानसभांपैकी पाच ते सहा भाजपा विरोधी राज्यांची गोळाबेरीज करून भाजपा उमेदवाराला आव्हान देण्याचा प्रशांतकिशोर यांचा खटाटोप आहे. २०२२ च्या या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपासमोर तगडे आव्हान उभे केले तर आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची लोकप्रियता ओसरून तो पिछाडीला जाईल हा त्यामागचा प्रशांतकिशोर यांचा तर्क आहे. पण त्यासाठी शरद पवार हे ‘मुखवटा’ व्हायला तयार होतील का ? शरद पवार हे लाटेत वाहून जाणारे नाही तर लाटेवर स्वार होणारे राजकारणी आहेत हे विसरता कामा नये. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत येत असेल तर ते मूकसंमती दर्शवित मौन धारण करतील. वेळप्रसंगी ते मोदींसोबतही तडजोड करू शकतील. राजकारणात काहीही अशक्य नसते. स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थान मजबूत करण्यासाठी त्यांच्या राजकीय खेळी असतात. भल्याभल्यांना शरद पवार नावाचे रसायन अजून कळले नाही तिथे प्रशांतकिशोर कोण…?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

मनापासून धन्यवाद….!

वर्डप्रेस च्या ब्लॉगच्या दुनियेत प्रवेश करून मला जवळपास ७ महिने होवून गेलेत. ‘dhagedore.in’ हा मराठी भाषेतील ब्लॉग सुरू करताना भाषेच्या माध्यमातून अनेक अडचणी आल्या. संगणक युगातील नव्या प्रणाली आत्मसात करताना दडपण देखील होतं. कागद-पेन सोबत घेवून जगणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला या डिजिटल जगात हरवल्या सारखं होवून गेलं. पण ठरवलं…जगाची भाषा भलेही इंग्रजी असेल आपण आपल्या मायबोलीतून (मराठी भाषेतून) आपल्या संवेदना मांडायच्या. शेवटी संवेदनेला भाषेचे कुंपण नसते. ती भावनेवर स्वार असते. जगात विविध भाषा असल्या तरी भावना एकच असते. आज सात महिन्यात पाच हजार वाचकांनी माझ्या ब्लॉगला भेट दिली हे ही नसे थोडके..! 🙏🙏🙏🙏

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

पृथ्वीवर महा सौरवादळ धडकले की नाही….?

पृथ्वीच्या दिशेने १६ लाख किलोमीटर प्रति तास वेगाने येणारे महा सौरवादळ नेमके गेले कुठे ? ते पृथ्वीवर धडकणार होते. रविवार आणि सोमवार ( ११ जुलै आणि १२ जुलै ) या दोन दिवसात केंव्हाही हे महा सौरवादळ पृथ्वीवर आदळू शकेल ही संशोधकांची भीती खोटी ठरली की सौरवादळाने अचानक आपली दिशा बदलून पृथ्वीला धडकण्याचे टाळले की काय ? काहीच समजायला मार्ग नाही. दोन रात्री जागून काढल्या पण आकाशात उत्तरेकडे अग्नीच्या ज्वाळा काही दिसल्या नाहीत. बरं प्रचंड उलथापालथ होवून पृथ्वी वरील जनजीवन पार कोलमडेल हा अंदाज पण साफ खोटा ठरला आहे. त्यामुळे वादळ नक्की आले का ? हा प्रश्न नॉस्ट्रेडमसच्या भविष्यवाणी सारखाच अंतराळात लटकत राहिला.

स्पेस वेदर डॉट कॉम ( Space Weather.com ) च्या रिपोर्ट नुसार सूर्याच्या पृष्ठभागावर निर्माण झालेले हे महा सौरवादळ हे १६ लाख ९ हजार ३४४ किलोमीटर प्रति तास या वेगाने पृथ्वीच्या दिशेने निघाले असून दि. ११ जुलै (रविवार) अथवा दि. १२ जुलै या दोन दिवसात कोणत्याही क्षणी हे वादळ पृथ्वीवर येवून थडकेल. तर अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्र, नासाच्या रिपोर्टनुसार या वादळाची गती आणखीन वाढू शकते त्यामुळे पृथ्वीचे वायूमंडल तप्त होवू शकते ज्यामुळे सॅटेलाइट वर याचा परिणाम होऊ शकतो. जीपीएस नेविगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्ही मध्ये अडथळे निर्माण होवू शकतात. वीज पुरवठ्यात वीज प्रवाह एकदम गतिमान होवू शकतो. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर उडू शकतात.

यापूर्वी १९८९ मध्ये आलेल्या सौर वादळामुळे कॅनडा मधील क्यूबेक शहराचा विद्युत पुरवठा १२ तासांसाठी खंडित झाला होता. त्यामुळे लाखों लोकांना या संकटाचा सामना करावा लागला होता. तर १८५७ मध्ये आलेल्या जिओ मॅग्नेटिक वादळामुळे युरोप आणि अमेरिका मध्ये टेलिग्राफ नेटवर्क उद्ध्वस्त झाले होते. तर १५८२ साली आलेल्या सौरवादळाची सर्वसामान्यांना ‘हे सर्व जगच नष्ट होवू शकते’ अशी भीती निर्माण झाली होती. पण ती केवळ भीतीच ठरली होती. लाखों वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळणाऱ्या उल्का, अश्म यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. पुन्हा तीच पुनरावृत्ती होईल या शंकेने माणूस घाबरतो. त्यामुळे अवकाशात नियमिततेने घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांनी देखील आपण विचलित होवून जातो.

आत्ता या घटनेमुळे देखील जग विचलित झाले नसेल तर नवलच म्हणावे लागेल. आजकाल संशोधकांचे अंदाज देखील भाकड ज्योतिषासारखे निघू लागले आहेत. एखादा अश्म जरी आपली कक्षा सोडून पृथ्वीच्या दिशेने येवू लागला तर लगेचच पृथ्वीच्या विनाशाच्या कथा नोस्ट्रेडमसाच्या भविष्यवाणीशी जोडून सांगण्याची स्पर्धा सुरू होते. त्यातही आपण किती अचूक सांगतो याचा गवगवा केला जातो. एकतर कोविड महामारीने सगळे जग त्रस्त झालेले आहे अश्यातच नव्या घटनांना सामोरे जाणे त्याच्या नशिबी आले आहे. एखाद्या विषयाचा अभ्यास सकारात्मक पद्धतीने लोकांसमोर मांडला तर त्याबद्दल भीती ऐवजी जिज्ञासा वाढू शकते. नाही तर ‘आभाळ पडलं पळा पळा’ अशी गत होवून जाते.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

मुंबई-सोलापूर रेल्वेचे १५५ वर्षांपूर्वीचे वेळापत्रक…..!

ग्रेट इंडियन पेनेनसुला रेल्वेचे मुंबई ते पुणे आणि पुणे ते सोलापूर धावणाऱ्या रेल्वेचे १ फेब्रुवारी १८६५ सालाचे हे अतिशय दुर्मिळ वेळापत्रक..
सहा दिवसांपूर्वीच म्हणजेच दि. ५ जुलै रोजी मी 'एकशे साठ वर्षांचे झाले सोलापूर रेल्वेस्टेशन'ही ब्लॉगवर पोस्ट लिहिली. त्या पोस्टला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ती पोस्ट वाचून हल्ली पुण्यात दै.लोकमतचे उपसंपादक म्हणून कार्यरत असलेल्या श्री. प्रसाद कानडे यांनी त्यांच्या संग्रही असलेले १८६५ सालातील ग्रेट इंडियन पेनेनसुला रेल्वेच्या जीर्ण झालेल्या वेळापत्रकाची फोटोकॉपी पाठवून दिली. टंकलिखित असल्याने त्यातील आकडे अस्पष्ट झालेत. शिवाय गावांच्या नावांचा ब्रिटिशांकडून उच्चारात होणाऱ्या बदलाने त्याचे स्पेलिंग देखील अपरिचित वाटते. मात्र बारकाईने अभ्यास केला तर बदलणारी गावांची नावे लक्षात येतात. ढोबळमानाने अनेक अंदाज बांधता येतात. आणखी महत्वाचे म्हणजे लोकल ट्रेनचे देखील त्यात वेळापत्रक आहे.
मुंबई ते पुणे धावणारी ग्रेट इंडियन पेनेनसुला रेल्वे (दख्खनची राणी).

भारतीय रेल्वेची जन्मदात्री म्हणून ओळखल्या जाणारी ग्रेट इंडियन पेनेनसुला रेल्वे ही कंपनी दि. १ ऑगस्ट १८४९ मध्ये अस्तित्वात आली. कंपनीचे लंडन आणि मुंबई येथे मुख्यालय होते. कंपनीने मुंबई ते ठाणे या ३३.८ कि. मी. अंतरावर पहिल्यांदा रेल्वे चालविण्याचा प्रयोग दि. १६ एप्रिल १८५३ मध्ये यशस्वी केल्यानंतर दि. १ मे १८५४ मध्ये ठाणे ते कल्याण हा कठीण मार्ग दोन बोगद्यासह कार्यान्वित केला. पुढे दि. १२ मे १८५६ मध्ये कल्याण ते खोपोली (पळसदरी मार्गे) हा मार्ग खुला केला. तर दि. १४ जून १८५८ मध्ये खंडाळा-पुणे रेल्वेमार्ग तयार होवून रेल्वे पुण्यापर्यंत आली. पुढे १८६० पर्यंत पुणे ते बारसी रोड (आत्ताचे कुर्डुवाडी) आणि सोलापूर पर्यंत रेल्वेमार्ग तयार झाला. पुढे १८६५ पर्यंत सोलापूर ते मद्रास (आत्ताचे चेन्नई) पर्यंत ग्रेट इंडियन पेनेनसुला रेल्वेचे जाळे पसरले. याच काळात मुंबई उपनगरांना जोडणारी लोकल ट्रेन देखील अस्तित्वात आलेली होती. मुंबई, माहीम, ठाणे, कल्याण या मार्गावर लोकल धावत होती.

ग्रेट इंडियन पेनेनसुला रेल्वेच्या मुंबई ( त्यावेळच्या बॉम्बे ) ते पुणे आणि पुढे बारसी रोड ( आत्ताचे कुर्डुवाडी) आणि सोलापूर पर्यंतच्या दि. १ फेब्रुवारी १८६५ पासून लागू केलेल्या वेळापत्रकात निरखून पाहिले तर त्यात त्याकाळच्या रेल्वे प्रवासाला लागणारा वेळ देखील समजतो. सोलापूर ते पुणे हे २३० कि. मी.चे अंतर कापण्यासाठी त्याकाळी जवळपास दहा तासांचा कालावधी लागायचा. अर्थात सुरुवातीला वाफेवर चालणारे इंजिन त्यानंतर डिझेल इंजिन आल्यावर हा कालावधी कमी होत होत साडेतीन तासांवर आला. अर्थात नॅरो गेज, मीटर गेज आणि ब्रॉड गेज बरोबरच इंजिनच्या क्षमतेमध्ये वाढ ही प्रगती देखील तेव्हढीच महत्वाची ठरली. म्हणजेच साडेसहा तास वेळेची बचत करण्यासाठी रेल्वेला जवळपास दीडशे वर्षे लागली असे म्हणता येईल.

सैन्याच्या हालचालींना वेग यावा याबरोबरच कापूस, सूत, ऊस, मसाल्याच्या पदार्थांची निर्यात वाढविण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांनी जरी भारतात रेल्वे आणली असली तरी चाक आणि गतीचे तंत्र आणल्याने पारतंत्र्यात राहणाऱ्या भारतीयांची ते प्रगती रोखू शकले नाहीत. ब्रिटिश राजवटीच्या सूर्याचा कधीच अस्त होणार नाही अशी मिजास दाखविणाऱ्या ब्रिटिशांच्या सत्तेची पाळेमुळे या रेल्वेच्या प्रसाराने उखडली गेली. कारण दळणवळणाचे सुरक्षित आणि वेळेची बचत करणारे साधन उपलब्ध झाल्याने स्वातंत्र्याच्या लढ्याला देखील गती मिळाली. कित्येक क्रांतीकारकांना, स्वातंत्र्य सेनानींना याच रेल्वेने त्यांच्या योग्य ठिकाणी सुरक्षित पोहोचविण्याचे काम चोख बजावले होते. पुढे स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये ग्रेट इंडियन पेनेनसुला रेल्वे कंपनीने भारतातून आपला गाशा गुंडाळला आणि ही रेल्वे भारतीय मध्य रेल्वे म्हणून ओळखली जावू लागली.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

दुष्काळ आणि महामारीमध्ये मृतांची संख्या वाढण्याचा भारतीय इतिहास..!

 1. वैभवशाली परंपरा आणि संस्कृती असलेल्या भारतदेशाला सततच्या दुष्काळाशी आणि रोग साथीशी मुकाबला करताना सर्वात जास्त कंगाल बनवले ते त्याकाळी स्थापित असलेल्या राजवटींनी.
 2. गेल्या सातशे-आठशे वर्षांचा भारताचा इतिहास पाहिला तर विस्तारलेली मुघलशाही आणि त्याच्या अंकित असणाऱ्या छोट्या राजेशाही आणि सरंजामदारांच्या सत्ता आणि त्यांच्यातील सततच्या संघर्षाने बरबटलेला इतिहास आहे.
 3. सतराव्या शतकात व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी भारतातील राजेशाही मधील सत्तासंघर्षाचा फायदा उचलत ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य स्थापन करीत भारताला पारतंत्र्यात ढकलले.
 4. कंपनी राज आल्यानंतर जनतेवरील जुलूम अधिकच वाढला. दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती. सततचा दुष्काळ, अन्नधान्याची कमतरता त्यात राजवटीचा जुलूम यामध्ये जनता उपाशी तडफडून मेली.
 5. हीच गोष्ट रोगांच्या साथीच्या महामारीच्या बाबतीतही झाली. प्लेगच्या सर्वात मोठ्या तिसऱ्या लाटेतही मृत्यूची संख्या वाढण्यामागे ब्रिटिशांची जुलमी राजवट कारणीभूत होती.
 6. आता स्वातंत्र्यानंतर लोकांनी निवडलेले सरकार असतानाही महामारीच्या विरोधात उपाययोजना करताना यंत्रणेमधील त्रुटी आणि भ्रष्ट वृत्तीमुळे महामारी नियंत्रणात आणण्यात सरकारला अजून यश मिळत नाही.

भारताला दुष्काळाची मोठी परंपरा आहे. इसवी सन १३९६ ते १४०८ या काळात सतत १२ वर्षे पडलेला दुष्काळ दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणून ओळखला जातो. १६३० ते १६३४ या काळातील महाराष्ट्रातील दुष्काळ, १७६९ ते १७७३ या काळातील बंगालचा दुष्काळ, १७८९ ते १७९२ या काळातील दोजी बारा दुष्काळ अशी दुष्काळाची मोठी परंपरा भारताला आहे. या दुष्काळात कोट्यवधी मृत्यू झाले. भारतात आलेल्या महाभयंकर दुष्काळाच्या मुळाशी राजसत्तेकडून निर्दयपणे केलेले जनतेचे शोषण, साधनसंपत्तीची असंतुलित आयात आणि दुष्काळाच्या काळात राजसत्तेने अत्यंत क्रूरपणे केलेली करवसुली प्रामुख्याने होती. उपासमारीने तडफडून मरायला टेकलेले शेतकरी कर भरू शकत नव्हते. पण राजसत्ता मात्र मरणाऱ्या माणसांकडूनही करवसुली करायला मागेपुढे पहात नव्हती.

जुलमी राजसत्तेच्या विरोधात जनक्षोभ उसळून झालेल्या बंडामध्ये प्लेगच्या साथीत ब्रिटिश राजवटीतील पुण्याचा कमिशनर जनरल रँडचा खून हे प्रकरण इतिहासात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. १८९७ च्या प्लेग महामारीत ब्रिटिशांनी एक कायदा संमत केला. त्या कायद्याच्या आधारावर ब्रिटिशांनी नागरिकांचा अनन्वित छळ सुरू केला. साथीचा संसर्ग वाढू नये हे कारण पुढे करीत वसाहती विस्थापित केल्या. उपचार आणि उपाययोजनांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या विलगिकरणाच्या छावण्यात ब्रिटिश लष्कराने लूटमार सुरू केली. पुण्यात याप्रकाराने असंतोष उसळला. त्यातूनच दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हरी चाफेकर या तिघा क्रांतिकारक बंधूंनी पुण्याचे कमिशनर जनरल रँड यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून केला. भारतीय स्वातंत्र्याच्या रक्तरंजित इतिहासाला या घटनेने सुरुवात झाली. चिडलेल्या ब्रिटिश सरकारने या तिघा क्रांतिकारी बंधूंना फाशीवर लटकावले. महामारीमध्ये अत्याचाराने मृतांची संख्या वाढत असताना उसळलेल्या जनक्षोभातून क्रांतीची बीजे पेरल्या गेली. हा इतिहास आहे.

हिवताप, मलेरिया, प्लेग, डेंग्यू, देवी, महारोग, कुष्ठरोग अश्या अनेक महामाऱ्यांशी लढा देताना रोगाच्या प्रादुर्भावामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा व्यवस्थेच्या भ्रष्ट आणि जुलमी यंत्रणेमुळे मृत्यूची संख्या वाढल्याची भारतीय इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. निदान आता लोकांची राजवट असलेल्या लोकशाही प्रणालीत कोरोना महामारीच्या निर्मूलनाच्या वेळी पुन्हा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होवू नये हीच जनतेची इच्छा आहे. प्लेग महामारीच्या कालखंडात विज्ञानाला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड नव्हती. त्यामुळे प्लेगची लस शोधून काढायला ३० ते ४० वर्षांचा कालावधी लागला. मात्र आता तंत्रज्ञान अद्ययावत झालंय. त्यामुळे कोविड वर लस शोधायला एक वर्षाचा कालावधी देखील प्रगत राष्ट्रांना पुरेसा ठरला. विज्ञान आणि यंत्रज्ञानात जरी प्रगती साधलेली असली तरी आपत्कालीन व्यवस्थापनात (डिझास्टर मॅनेजमेंट) शिरलेल्या भ्रष्ट यंत्रणेमुळे उपाययोजना राबविण्यात त्रुटी निर्माण होतात. याचा परिणाम महामारीत बळींची संख्या वाढण्यात होतो. इंजेक्शन्स, औषधांचा तुटवडा, हॉस्पिटलच्या यंत्रणेतील ढिसाळपणा, लूटमार यावर सरकारने नियंत्रण मिळविले तरच या महामारीच्या संकटावर आणि वाढणाऱ्या मृत्यूच्या संख्येवर नियंत्रण मिळवता येईल. हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. कारण हा देश लोकनियुक्त सरकार चालविते.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

एकशे साठ वर्षांचे झाले सोलापूर रेल्वे स्टेशन….!

भारतातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे ही कंपनी स्थापन करण्यात आली. त्यानंतर हळूहळू तिचा सर्वत्र प्रसार सुरू झाला. त्यातूनच २३ ऑक्टोंबर १८५९ रोजी पुण्यापर्यंत आलेल्या रेल्वेने पुणे ते बारसी रोड म्हणजे आत्ताचे कुर्डुवाडी पर्यंत मजल मारली. त्यानंतर मुंबई ते मद्रास म्हणजे आत्ताचे चेन्नईकडे मार्गस्थ होणारी रेल्वे १८६० मध्ये सोलापूर पर्यंत आली. निश्चित तारीख मिळाली नसली तरी सोलापूर रेल्वे स्थानकाचे हेच वर्ष गृहीत धरावे लागेल. म्हणजेच आजमितीस सोलापूर रेल्वेस्थानक हे १६० वर्षांचे झाले आहे.

भारतावर गुलामी लढणाऱ्या ब्रिटिश सत्तेला १८५० ते १८६० हे दशक जसे राजवटीसाठी धामधुमीचे होते तसेच भारतीयांसाठी देखील हे दशक महत्वाचे ठरले होते. १७ व्या शतकाच्या सुरुवातीला व्यापारासाठी आलेल्या इंग्रजांनी १७५६ च्या प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलाचा पराभव करीत खऱ्या अर्थाने ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल सुरू केला. पुढे शंभर वर्षे एक-एक प्रदेश काबीज करीत संपूर्ण भारत, नेपाळ, अफगाणिस्तानात कंपनीची सत्ता स्थापन केलेल्या ब्रिटिशांना १८५० पासूनच सत्तेला हादरे बसू लागले. या दरम्यान लष्कराच्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारी रेल्वे त्यांनी १८५३ मध्ये भारतात आणली. गोऱ्या लोकांना घेवून धावणाऱ्या या रेल्वेत तेंव्हा अंधश्रध्देपोटी भारतीय बसायला देखील घाबरायचे. १८५७ च्या लष्करी उठावानंतर ब्रिटिश सत्तेमध्ये मोठा फेरबदल झाला. ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता काढून घेत राणी व्हिक्टोरियाची राजवट १८५८ पासून सुरू झाली. कंपनीच्या व्हॉइसरॉयच्या जुलमी अनिर्बंध राजवटीला थोडासा लगाम घालत ब्रिटिशांनी सत्ता चालविताना पहिल्यांदाच भारतीयांच्या नागरी सुविधांचा विचार सुरू केला. याबरोबरच लष्कराचे दळणवळण अधिक मजबूत करण्यासाठी भारतभर रेल्वे मार्गाचे जाळे पसरविण्यास सुरुवात केली. याचकाळात मुंबई ते मद्रास रेल्वेमार्ग सुरू करण्यामागे देखील मद्रास येथील लष्कराच्या कंपनीला सुविधा मिळावी हाच ब्रिटिशांचा प्रमुख हेतू होता. काहीही कारण असले तरी यानिमित्ताने का होईना भारतात रेल्वे सुरू झाल्यापासून अवघ्या सहा-सात वर्षात रेल्वेची चाकं सोलापूरपर्यंत पोहोचली हे मात्र खरं आहे.

सोलापूरला ब्रिटिश ‘शोलापूर’ म्हणायचे. त्यांचा उच्चार सदोष असला तरी सोलापूर हे स्वातंत्र्याच्या उठावात खरोखरच ‘शोला’पूर बनले होते. या रेल्वेने ब्रिटिशांच्या सत्तेला जशी मजबुती दिली. अगदी तशीच मजबुती भारतीय समाजाच्या विकासाला दिली. या रेल्वेमुळेच सोलापूरचे औद्योगिकीकरण जसे झपाट्याने वाढले तसेच स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र म्हणून देखील सोलापूर पुढे आले. संपूर्ण भारताला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर १९३० मध्ये सोलापूर शहर हे तीन दिवसांसाठी ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाले होते. केवळ रेल्वे आल्याने या शहराचा औद्योगिक कायापालट जसा झाला तसाच स्वातंत्र्याच्या लढ्याला वेग मिळाला त्याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल. सोलापूर मिल ही त्याकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी सूतगिरणी म्हणून लौकिक प्राप्त होती. त्याकाळी या मिलमध्ये दहा हजार कामगार होते. कामगारांच्या वसाहतींनी भरलेल्या सोलापूरला गिरणगाव म्हणून देखील ओळख मिळाली. रेल्वेमुळेच नवे तंत्रज्ञान या शहरात फार लवकर पोहोचले. मुंबई नंतर मोठमोठे उद्योग सोलापुरात उभारले गेले. या रेल्वेमुळेच सोलापूरला पारतंत्र्यात असतांनाही वैभव प्राप्त झाले होते.

सोलापूरचे सर्वात पहिले म्हणजे १८६० मधील रेल्वेस्टेशन नेमके कुठे होते ? आणि त्याचे स्वरूप कसे होते ? याबाबत जुनी छायाचित्रे किंवा माहिती उपलब्ध होत नाही. मात्र सध्या असलेल्या ठिकाणीच जर रेल्वे स्थानक असेल तर रेल्वेच्या इमारतीच्या विस्तारीकरणात त्याकाळचे ‘नॅरो गेज’ रेल्वेस्टेशन इतिहासजमा झाले असावे. नॅरो गेज, मीटर गेज आणि पुढे ब्रॉड गेज असे रेल्वेमार्गाचे बदल होत गेले तसे स्टीम इंजिन, कोळसा इंजिन, डिझेल इंजिन ते आता विद्युतीकरणाकडे जाणारे रेल्वे इंजिन हे गेल्या १६० वर्षातील रेल्वेचे विकासात्मक बदल या सोलापूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मने बघितले आहेत. प्रवाशांच्या सुखदुःखात सोबत करत त्याला यशाच्या प्रवासाला हिरवा झेंडा या स्थानकाने अव्याहतपणे दाखवला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे युनियन जॅक खाली उतरवून स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकताना या रेल्वेस्थानकाने लाखों भारतीयांना सुरक्षित आपल्या घरी परतताना पाहिले आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

‘लगान’ चुकता हो गया रे भुवन…..!

सीमेवर कधी युद्धाची ठिणगी पडेल या तणावात लष्कर आहे. भारत आपल्या वरचढ होईल या तणावात पाकिस्तानचा अब्बाहुजूर चीन आहे. अमेरिकेचे लष्कर गेल्यावर काय होईल ? या तणावात अफगाण आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने सर्व भारतीय तणावात आहेत. मात्र मिस्टर परफेक्टनिस्ट अमीर खान आणि किरण राव यांच्या ‘तलाक’ने पुढे काय होईल ? म्हणून भारतीय मीडिया तणावात आहे. मी गुडघाभर पाण्यात उभा आहे, तुझ्याकडे किती पाणी साचलं ? असले भुक्कड प्रश्न विचारत मुंबई तुंबलीचे वार्तांकन करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला आता ‘अमीर-किरण’च्या तलाकचा विषय चघळायला मिळाला. म्हणजे मिस्टर परफेक्टनिस्टने तलाकचा ‘तुकडा’ फेकला आहे. लॉक डाऊनमुळे उपासमारी सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना त्याचं काय पडलंय….?

२००१ साली प्रदर्शित झालेल्या आशुतोष गोवारीकरच्या ‘लगान’ या हिंदी चित्रपटाचा ‘भुवन’ नावाचा नायक असलेल्या अमीर खानच्या दुसऱ्या लग्नाची प्रेमकहाणी पडद्यामागे सुरू झालेला हाच तो सिनेमा. ‘लगान’च्या पडद्यावरच्या प्रेमकहाणीला ऑस्करपर्यंत नेले. तर याचवेळी असिस्टंट डिरेक्टर असलेल्या किरण रावशी सूत जुळवत तिला बोहल्यावर चढवत अमीरने किरणला खान कुटुंबाची सदस्य बनवत पत्नीची रिकामी झालेली जागा भरून काढली. नट-नट्यांच्या प्रेमकहाण्या आणि त्यांची लग्ने तसेच त्यांचा ‘डिव्होर्स’ हा सिनेरसिकांचा खरंतर आवडीचा विषय आहे. कोणत्या अभिनेत्याने कोणत्या अभिनेत्रीला गटवले यापेक्षा किती वर्षे तो तिच्यासोबत राहिला ? यावर तो किती आदर्श आणि कुटुंबवत्सल आहे हे ठरविणाऱ्या भाबड्या समाजाला नेहमीच ‘चुतीया’ समजत हे नट-नट्या आपला पडद्यामागचा भोग भोगत असतात. सिनेमाचं आकर्षण असणारा समाज मात्र त्यांना डोक्यावर घेऊन नाचत असतो. समाज-सभ्यता आणि संस्कृती याची कोणतीही चाड नसलेले हे नट-नट्या आपल्या भोंगळ जीवनवादाचे प्रदर्शन मात्र मांडत असतात. लग्न करताना जशी लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न करतात तसाच प्रयत्न ते ‘डिव्होर्स’ घेताना सुद्धा करतात. यात सुद्धा त्यांचं कोणतं ना कोणतं फायद्याचं गणित असतंच. त्याला ते ‘मुक्त जगण्याचं स्वातंत्र्य’ असं बरळत आपण थोर विचारवंत असल्याचा खोटा अभिनय करत असतात.

याच अमिरखानने काही वर्षांपूर्वी माझ्या पत्नीला आणि मुलाला या देशात असुरक्षित वाटते असं विधान करून खळबळ उडवून दिली होती. आता तलाक नंतर किरण राव आपल्या लेकराला घेऊन कुठं राहणार आहे ? कदाचित आपल्या ‘डिव्होर्स’चं दुःख विसरायला दोन-चार वर्षे ती परदेशात पण जाईल. किंवा आमिरच्या ‘त्या’ विधानाशी आपला काही संबंध नाही असं म्हणून ती ‘लगीन’ तुटल्याची मिळालेली ‘लगान’ घेऊन गपगुमान इथेच भारतात राहील. आम्ही आता पती-पत्नी या नात्यापेक्षा पुढे गेलो आहोत. दोघेही सगळी कर्तव्ये पार पाडत आपला वेगळा ‘स्पेस’ जगणार आहोत. असा भलामोठा आदर्श कार्यक्रम सांगत हे पुन्हा नव्या भोगनात्याला सज्ज होणार. आम्ही मात्र त्यांच्या आयुष्यातल्या या चढउताराचा सिनेमा आपल्या डोक्यात तयार करणार.

हा सर्व प्रसिद्ध, करोडपतींच्या अस्सल जीवनवादाचा विषय मीडिया चघळत आपला टीआरपी वाढविणार. रोजच मृत्यूच्या भयाखाली उपासमार सहन करत असह्य झालेलं जगणं जगणारी माणसे हा विषय डोळ्यातील बुबुळे बाहेर पडे पर्यंत डोळे वासून पहात बसणार. आम्ही सर्वसामान्य आपल्या आयुष्यात असलं नाट्य कधीच घडू नये म्हणून आपल्या कष्टाचे आणि वेदनेचे ‘लगान’ या धनदांडग्यांकडे भरत राहणार आहे लोक स्वतःच्या माजाचे नवे समर्थन करत प्रत्येक टप्प्यावर नवा ‘लगान’ वसूल करणार. शेवटी त्यांच्या खासगी आयुष्यातील हा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा माध्यमांचा टीआरपी वाढविण्यासाठीच असतो. बाकी सरकारचा कर बुडवत संपत्तीची वाटणी करत विभक्त होण्याचे नाटक करणाऱ्या या जमातीपासून समाजाला कोणता विचारवाद अपेक्षित असतो…?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

हे असं किती दिवस चालणार…?

हा प्रश्न फक्त माझ्यापुरता किंवा माझ्या शहरापुरता मर्यादित नाही. प्रत्येक देशातील नागरिकांच्या व्यवहार्य जीवनमानाचा प्रश्न आहे. कोरोनाला प्रतिबंध करायला मार्ग सापडत नाही, तो ‘स्प्रेड’ होवू नये म्हणून ‘लॉक डाऊन’ करायचे ही तात्पुरती उपाययोजना आणखी किती दिवस, किती महिने, किती वर्षे अंमलात आणणार…? लॉक डाऊनमध्ये शिथिलता दिली की लोकांची गर्दी होणार…मग पुन्हा कोरोनाचे संक्रमण वाढणार. एका अनामिक दडपणाखाली जगणाऱ्या नागरिकांना मोकळा श्वास कधी मिळणार ? सर्वात महत्वाचे घरात बंदिस्त केलेल्या नागरिकांना जगावायचे कसे ? औषध सापडत नसेल तर कमीतकमी नुकसान देणारी उपाययोजना तरी शोधा…. शत्रू समोरच येवून उभा ठाकला तर कमीतकमी जीवितहानी सोसून त्याच्यावर हल्ला करायचा हेच युद्धशास्त्र सांगते. रोजच्या जगण्यात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आता त्यावर सर्वसमावेशक उपाय हवा आहे.

भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हे लॉक डाऊनचे भयनाट्य मार्च २०१९ पासून सुरू झाले आहे. त्यामुळे सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत. काम बंद असल्याने रोजगार मिळेनासा झालाय. तर प्रत्येक देशाच्या उत्पादकतेवर परिणाम झालेला आहे. ‘एका बाथरूममध्ये सगळेच नागडेया न्यायाने सगळ्या जगाचीच ही अवस्था आहे हे लॉजिक किती दिवस चालवायचं. परिस्थिती काही न करताच पालटणार नाही. कोणत्याही प्रकारचे नुकसान न होता जीवितहानी न होता हे युद्ध जिंकण्याची देखील शक्यता मावळली आहे. आता सध्या जेव्हढ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. त्यातून फारसं काही साध्य होताना दिसत नाही. उलट एव्हढ्या उपाययोजना अवलंबून देखील मृत्यू हे होतच आहेत. पण मृत्युदर वाढलेला नाही असं म्हणत आपण केवळ आशावाद जागवत आहोत. यापेक्षा वेगळे काही घडत नाही. कोरोना विषाणूचा प्रभाव आपोआप कमी होईल. त्याचा संपर्क झाला नाही तर तो नष्ट होईल. हे प्रत्यक्ष कृतीत आणणे म्हणजे बंदूक रोखलेल्या शत्रूसमोर न जाता बंकर मध्ये लपून बसा असे म्हणण्यासारखे आहे. शत्रू माघारी जाणारच नसेल तर लपून बसण्यापेक्षा त्याच्याशी दोनहात करणे केंव्हाही शहाणपणाचे ठरणार आहे. आपण हे सर्व मृत्यूच्या भीतीने करत आहोत का ? मग सध्या आपल्या सोबत असे किती आजार आणि रोग आहेत ? ज्यामुळे दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडतात. अपघाती मृत्यूचे प्रमाण किती आहे ? याकडे एकदा नजर वळवून बघा. अपघातात मृत्यू होण्याचे टाळण्यासाठी आपण दळणवळण बंद ठेवू शकतो का ? बरं त्या समस्येवर उपाययोजना करूनही अपघात हे घडतातच. मृत्यू होतातच. हार्ट अटॅक, डायबेटीस, कॅन्सर असे अनेक दुर्धर आजार आहेत ज्यावर चांगल्या दर्जाची ट्रीटमेंट देखील उपलब्ध आहे. पण या आजारातही मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. पण म्हणून आपण त्यासाठी लॉक डाऊन पाळतो का ? केवळ संसर्गजन्य रोग म्हणूनच जर लॉक डाऊन पाळणार असू तर जगात यापूर्वीही किती साथी आल्या. त्या साथीचा मृत्युदर काय होता ? आणि त्यावेळी लॉक डाऊन सारखी उपाययोजना किती काळ अंमलात आणली ? याचा आता अभ्यास होणे गरजेचे आहे.

बरं सगळं खुले करून आपण मृत्यूला सामोरे जावू म्हणजेच जपानी ‘हाराकीरी’ करू असं मला मुळीच म्हणायचं नाही. ज्यावेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना आपल्याजवळ कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध नव्हती. तेंव्हा जनजीवन बंदिस्त ठेवणे हा उपाय योग्य होता. आता कोविड 19 वर लस तयार होवून ती परिणामकारक म्हणून सिद्ध झालेली असतानाही केवळ त्याचे उत्पादन आणि वितरण नियोजित पद्धतीने सरकारला करता येत नाही म्हणूनच पुन्हापुन्हा ‘लॉक डाऊन’चे अस्त्र वापरले जात आहे. हीच वेदना देणारी बाब आहे. कोविशील्ड आणि को वॅक्सिन या लसींच्या उत्पादना बरोबरच बाहेरून देखील लस खरेदी केल्यानंतर मोफत लसीकरणाची सरकारने मोहीम देखील सुरू केली. पण नियोजनाअभावी त्याचा पुरता फज्जा उडाला आहे. रोजच मरण समोर असेल तर माणूस मरणाची देखील चिंता सोडून देतो. आता माणसं घाबरत आहेत ते हॉस्पिटलच्या बिलाला. खासगी हॉस्पिटल मधील उपचार सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. सरकारने लॉक डाऊनमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी उपचार खर्चावर नियंत्रण आणले. तर सर्वसामान्य माणूस त्याच्या कामाच्या ठिकाणी निर्धास्तपणे जाऊ शकेल. आर्थिक व्यवहारावर परिणाम करणाऱ्या उपाययोजना राबविण्यापेक्षा कमीतकमी नुकसानीच्या उपाययोजना भारतासारख्या विकसनशील देशांना उपयुक्त आहेत. अन्यथा वेगवेगळ्या रोगामुळे, अपघातामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्याकडे सरकार कुठे गांभीर्याने बघते ? जवळपास दीड वर्ष पूर्ण होत आले आहे. देशाची उत्पादकता घसरली आहे. सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. महागाई वाढत आहे. अश्यास्थितीत जीडीपी घसरलेलाच राहणार. एक सारखं रिकामेपण आले की माणसांची क्रयशक्ती नष्ट होते. ही एकप्रकारची राष्ट्रीयहानीच आहे. कोरोनापासूनच्या बचावासाठीच्या उपाययोजना बाबत एकीकडे जनजागृती सुरूच आहे. आता उपचाराच्या खर्चावर नियंत्रण आणले तर लॉक डाऊन करण्याची गरज भासणार नाही.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

मध्यम लोकसंख्येच्या शहरातून गर्दी वाढतेय…!

लॉक डाऊनमध्ये रोजगार ठप्प झाल्याने उपासमारीच्या भीतीने गावाकडे परतणारी गर्दी
 • औद्योगिकीकरणा अभावी खेडेगाव आणि निमशहरी भागातील कामगार, मजूर, नोकरदारवर्ग मोठ्याप्रमाणात रोजगाराच्या अपेक्षेने मोठ्या शहरात दाखल होत होता.
 • स्थानिक पातळीवर त्याला रोजगार, चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि राहणीमान उपलब्ध करून देण्यात सरकारचे प्रयत्न कमी पडल्याने महानगरांकडे जाण्याचा कल वाढला होता.
 • गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून हे प्रमाण वाढतच गेलेले दिसून आले आहे.
 • गावे रिकामी होताना दिसत होती तर महानगरांवर या गर्दीमुळे नागरी सुविधा पुरवताना अतिरिक्त ताण पडलेला दिसत होता.
 • आता कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या भीतीने सरकारने अनिश्चित काळासाठी लॉक डाऊन पुकारल्याने रोजगार ठप्प झालेला वर्ग उपासमारीच्या भीतीने आपल्या निमशहरी गावाकडे परतला आहे.
 • कोरोना महामारीच्या संसर्गाचा वेग नियंत्रणात येत नसल्याने निर्बंध घालण्याशिवाय सरकारच्या हातात सध्यातरी कोणतीच उपाययोजना दिसत नाही.
 • अश्यास्थितीत पुन्हा महानगरांकडे जाण्यास स्थलांतरित झालेला वर्ग तयार नाही.
 • एकीकडे महानगरांमधील गर्दी कमी होताना दिसत असली तरी निमशहरी गावांमधून वाढणारी ही गर्दी नियोजनाअभावी जनजीवनावर ताण निर्माण करणारी ठरत आहे.

गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून रोजगारानिमित स्थलांतरित झालेल्या मजूर, कामगार, नोकरदारांचा आपल्या मुळगावाशी असलेला संपर्क तुटलेला आहे. केवळ सणासाठी अथवा लग्नकार्याच्या समारंभासाठी गावाकडे उपस्थिती दाखविणारा हा वर्ग महानगराच्या दाटीवाटीच्या वसाहती आणि शहरी जीवनाशी पूर्णपणे रुळला होता. महानगरातून सहजतेने रोजगार मिळतो. त्याचा मोबदला देखील चांगला मिळतो. त्यामानाने गावाकडे रोजगाराची आणि त्यापासून मिळणाऱ्या मोबदल्याची शाश्वती नसल्याची त्याची पक्की खात्री झाल्याने काहीजणांनी तर मुळगावाशी असलेला संपर्क देखील कायमचा तोडलेला होता. मात्र कोरोना महामारीमुळे पुन्हा गावाकडे परतण्याची या सर्वांवर वेळ आली आहे. सुरुवातीला कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी म्हणजेच मार्च-एप्रिल २०१९ च्या दरम्यान हजारोंच्या संख्येने महानगरातून गावाकडे निघालेल्या या झुंडीतूनच कोरोनाचा देखील ग्रामीणभागात शिरकाव झाला. उपजीविकेसाठी गाव सोडून गेलेले हे आपलेच लोक आहेत या भावनेतून त्यांना गावकऱ्यांनी सामावून घेतले असले तरी गेल्या १४-१५ महिन्यांपासून या शहरी संस्कृतीशी समरस झालेल्या लोकांमुळे ग्रामीण जनजीवनावर ताण पडू लागला आहे.वाढलेल्या लोकसंख्येमुळे ग्रामीण भागातील सुविधा आणि व्यवस्थेवर देखील याचा ताण पडत आहे. याबरोबरच केवळ महामारीमुळे रोजगार बंद झाला म्हणून आलेले हे लोक पुन्हा सर्वकाही सुरळीत झाले तर परत माघारी जातील. त्यामुळे गावातच राहणाऱ्या लोकांबरोबर जुळवून घेणे या शहरी बनलेल्या लोकांना अवघड होत आहे. गावाचे सरळसरळ दोन गट पडल्याचे दिसत आहे.

शहरी जीवनाची सवय झालेले लोक आता महानगराऐवजी छोट्या आणि मध्यम लोकसंख्येच्या शहरांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत.

कोरोना महामारी आटोक्यात आणण्यात सध्यातरी सरकारला यश मिळत नाही. त्यामुळे महामारीचा कालावधी वाढतच चाललेला आहे. अश्यात महानगरातून गावाकडे आलेला वर्ग आता रोजगार मिळविण्यासाठी जवळपास असलेल्या छोट्या-मध्यम लोकसंख्येच्या शहरांमध्ये दिसू लागला आहे. रोजगार मिळविण्यासाठी येणाऱ्याला ही शहरे रोखू शकत नाहीत. कारण रोजगार मिळविणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. लॉक डाऊनमध्ये शिथिलता मिळाली की ही गर्दी नव्याने शहरात घुसते. त्यामुळे पुन्हा कोरोनाच्या फैलावाचा प्रश्न समोर येतो. शहरातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नाला त्यामुळेच अपयशाला सामोरे जावे लागत आहे. याबरोबरच वाढत्या लोकसंख्येमुळे पुन्हा आरोग्याचे, नागरी व्यवस्थेचे प्रश्न नव्याने तयार होत आहेत. विशेषतः भाजीविक्रीच्या व्यवसायात हे नवे चेहरे शहरात प्रवेश करून आता शहरांच्या विकसित भागातील नागरी वसाहतीमधून दिसू लागली आहेत. मध्यम लोकसंख्येच्या शहरात पारंपारिक व्यवसायाची बाजारपेठ या लोकांना रोजगार देवू शकते. शिवाय अर्थकारणाला गती देणारे लघु उद्योगही छोटे-छोटे रोजगार उपलब्ध करू शकतात. अश्या शहरांमध्ये घरजागा भाड्याने देण्याचा उत्पन्न देणारा व्यवसाय तेजीत असतो. त्यामुळे शहरात नव्याने येणाऱ्याला सहजतेने रहायला जागा देखील मिळते. सध्या हेच घडत आहे. मध्यम लोकसंख्येच्या शहरातील नव्याने वसलेल्या वसाहतीमधून भाड्याने रहायला आलेल्यांची संख्या वाढत आहे. याचा नगरप्रशासनावर देखील ताण पडतो. मात्र हा विषय हाताळायला सध्या प्रशासनाला वेळ नाही. मूळ शहरी नागरिक कितीही ओरडले तरी याविषयाकडे डोळेझाक केली जात आहे. शेवटी ‘त्या’ लोकांनी जायचं कुठे ? हा प्रश्न पुढे केला जात आहे. रोजगार बंद झाल्यावर महानगर सोडून मूळगावी परत आल्यानंतर गावात त्यांची उपजीविका होत नाही. म्हणून ते परत जवळच्या शहरात रोजगाराच्या निमित्ताने प्रवेश करतात. त्याशहराच्या नियोजन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. पुन्हा त्या शहरातील वसाहती गर्दीने धोकादायक बनतात. रोजगार आणि शहरीकरणातून गावे ओस पडली तरी माणसा-माणसांमध्ये नवा संघर्ष तयार होतोय. सध्या त्याकडे कुणाचेच लक्ष नाहीय.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

वीस मिनिटात ३८० जणांचा मृत्यू परत गेल्याची सत्यकथा…!

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अचानक मृत्यूचे प्रमाण वाढले. उपचाराची दिशा निश्चित झाल्यानंतर देखील हे मृत्यूचे प्रमाण वाढले होते. हॉस्पिटलला होणारा ऑक्सिजन पुरवठा रुग्णांची संख्या वाढत चालल्याने कमी पडू लागला होता. ही स्थिती भारतात सगळीकडेच कमी-अधिक प्रमाणात होती. सरकार आपल्यापरीने प्रयत्न करीत होते. मात्र उत्पादन कमी असताना मागणी अचानक वाढली की बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होते. अगदी तेच मेडिकल ऑक्सिजन सिलेंडरच्या बाबतीत झाले होते. महाराष्ट्र राज्यात एप्रिल २०२१ मध्ये ठिकठिकाणी हॉस्पिटल मधून ही कृत्रिम टंचाई भीषण रूप धारण केलेली होती. मी राहतो त्या सोलापूर शहरातील ही सत्यघटना आहे. दि. २१ एप्रिल २०२१ रोजी रात्रीच्या सुमारास शासकीय रुग्णालयात ३८० अत्यवस्थ कोरोना पेशंट होते आणि फक्त २० मिनिटे पुरेल एव्हढाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक होता. जर २१ व्या मिनिटाला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला नसता तर…..?

अंदाजे दहा लाख लोकसंख्या असलेले सोलापूर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. एकेकाळी सूत गिरण्यांमुळे आशिया खंडात प्रसिद्ध असलेले औद्योगिक शहर म्हणून या शहराची ओळख होती. गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्रात हे शहर खूप पिछाडीला पडले आहे. हे सांगण्याचे कारण आजमितीस सोलापुरात लिक्विड ऑक्सिजन रिफिलिंगचे केवळ चारच प्लान्ट आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सगळीकडेच लिक्विड ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळेच सोलापूरला आवश्यक तेव्हढा साठा उपलब्ध करून देण्यात आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला अडचणी येत होत्या. तश्याही स्थितीत सोलापूरच्या होटगीरोड औद्योगिक वसाहतीत अलिम अकबर शेख या तरुण उद्योजकाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांच्या प्रोत्साहनामुळे नोव्हेंबर २०२० मध्येच लॉक डाऊनचा काळ असतांनाही मुंबई, पुणे, हैदराबाद येथे जाऊन मशिनरी खरेदी करून मेडिकल ऑक्सिजनचा प्लान्ट आरटीएस एअर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कार्यान्वित केलेला होता. सुरुवातीला दररोज ६ टन लिक्विड ऑक्सिजन उत्पादन होत असल्याने ते सुरळीतपणे पुरविले जात होते. याकाळात सलग ५० दिवस दिवसरात्र एकही मिनिट न थांबता उत्पादन घेऊन शहरातील रुग्णालयांना मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम आरटीएस एअर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक अलिम अकबर शेख यांनी केले.

एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासूनच शहरातील हॉस्पिटलमधून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली होती. त्यातच अतिशय अत्यवस्थ अवस्थेत ऑक्सिजनची पातळी खालावलेल्या अवस्थेतील रुग्णसंख्या वाढतच चाललेली होती. शासकीय रुग्णालयात ही संख्या चारशेच्या घरात पोहोचलेली होती. तर इतर प्रमुख दहा-बारा रुग्णालयातून प्रत्येकी ६० ते ७० रुग्ण ऑक्सिजनवर होते. दि. २१ एप्रिल २०२१ रोजी अचानक ऑक्सिजन साठ्याच्या पुरवठ्यामध्ये त्रुटी निर्माण झाली आणि प्रशासनाचे धाबे दणाणले. बाहेरून कुठूनही साठा उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा अलिम शेख यांच्या आरटीएस प्लान्ट वर दाखल झाली. केवळ २० मिनिटे पुरेल एव्हढाच मेडिकल ऑक्सिजनचा साठा शासकीय रुग्णालयात शिल्लक होता. त्यानंतर अलिम शेख यांनी इतर ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सिजन साठ्यात ऍडजेस्टमेंट करीत ६८ ऑक्सिजन सिलिंडर वेळेत शासकीय रुग्णालयात पोहोचविले. याबाबत प्रशासनाने रुग्णांमध्ये आणि शहरवासीयांमध्ये कोणत्याही प्रकारची घबराट पसरू नये म्हणून कमालीची गुप्तता पाळली. प्रसिद्धी माध्यमांपर्यंत देखील ही घटना पोहोचू नये याची दक्षता घेतली.

हेच ते कोविड योद्धा अलिम अकबर शेख.

जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आणि सर्व आरोग्य यंत्रणेच्या प्रोत्साहनातून इंडस्ट्रीयल लिक्विड गॅसची एजन्सी चालविणाऱ्या अलिम शेख यांनी कोरोना महामारीत लॉक डाऊनच्या काळात केवळ सामाजिक जाणिवेतून मेडिकल ऑक्सिजनचा ६ टन क्षमतेचा प्लान्ट सुरू केला. त्यांच्या या सामाजिक जाणिवेमुळेच शासकीय रुग्णालयातील ‘त्या’ ३८० अत्यवस्थ रुग्णांचे प्राण वाचले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय देणारी ही सत्यघटना आहे. आता आगामी काळात ते १० टन क्षमता वाढवीत आहेत. म्हणजे एकूण १६ टन उत्पादन क्षमता वाढेल. त्यामुळे शहरातील सर्व रुग्णालयांना आपत्कालीन परिस्थितीतही ऑक्सिजन पुरवठा शक्य होईल.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

गरीब माणसांची आनंदाची ‘इकीगाय’ संकल्पना कोणती असावी ?

'इकीगाय' या जपानी शब्दाचा मूळ अर्थ स्वतःच्या अस्तित्वामागील कारणे असा होतो. आपला जन्म नेमका कोणत्या उद्देशासाठी झाला आहे ? हे उलगडणारी संकल्पना म्हणजेच 'इकीगाय' फॉर्म्युला. जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य या 'इकीगाय' फॉर्म्युल्यात दडलेले आहे असं विद्वान लोक मानतात.

परवा एका डॉक्टर मित्राकडे त्याची मुलाखत घ्यायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांची मुले डॉक्टरच कशी होतात ? किती टक्के मुले वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचं धाडस दाखवतात, याविषयावर चर्चा सुरू झाली. त्यावेळी त्या डॉक्टर मित्राने तुला ‘इकीगाय’ फॉर्म्युला माहिती आहे का ? असा प्रश्न मला केला. कॉलेजमध्ये असताना ‘मी कोण ?’चा शोध घेणारे तत्वज्ञानी पुस्तक वाचल्याचे आठवत होते. तत्वज्ञान समजायला फार कठीण असतं. त्यातील विश्लेषण अतिशय कंटाळवाणे असते बहुदा त्यामुळेच ‘मी कोण ? या अस्तित्वाची जाणीव करून देणाऱ्या विषयाचे आकर्षण वाटले नसावे. त्याकाळातच आत्म्याशी संवाद साधण्यासाठी ‘प्लॅंचेट’ शिकण्याचा रात्र-रात्र जागून प्रयत्न देखील केला होता. तेंव्हाच ‘इकीगाय’ हा शब्द कुणाच्या तरी तोंडून ऐकला होता. हाच शब्द पुन्हा खूप वर्षांनी डॉक्टर मित्राच्या तोंडून ऐकला. त्यामुळे त्याबद्दल उत्सुकता ताणली गेली. तर इकिगायचा फॉर्म्युला काय सांगतो…..आपल्या जन्माचे उद्दीष्ठ शोधताना चार प्रमुख गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करायचे. १) तुम्हाला सर्वात जास्त काय करायला आवडते म्हणजे तुमची पॅशन कोणती ? २) कोणती गोष्ट तुम्ही उत्तम प्रकारे करू शकता म्हणजे तुमचं प्रोफेशन कोणतं ? ३)कोणत्या गोष्टींद्वारे तुम्ही पैसे कमावू शकता म्हणजे तुमचं व्होकेशन कोणतं ? ४) जगाला तुमच्याकडून काय हवं आहे म्हणजे तुमचं मिशन कोणतं ? या चार प्रमुख प्रश्नांत किमान दोन उत्तरे जरी समान मुद्यांची आली तरी तेच तुमचं इकीगाय आहे असं समजायचं. डॉक्टर मित्राने मला हे समजून सांगितल्यावर डॉक्टरांची मुले डॉक्टरच का होतात हे जरी मान्य करावे लागले असले तरी काही प्रश्न मनात आजही रेंगाळत आहेत.

स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न जसा शिक्षित माणसांना पडत असतो तसा तो गरीब माणसांना पडत नसावा का ? हातगाडी ओढणाऱ्या कष्टकरी हमालाची आवड ही हातगाडी ओढण्याची असू शकते का ? त्याच प्रोफेशन हमाली असेल का ? त्याचा हमाली हा व्यवसाय होवू शकतो का ? आणि जगाला काहीतरी देण्यासारखं त्याच्याकडे काय असू शकतं ? गरिबी आणि उपासमारी शिवाय त्याच्याकडे दुसरं काय असणार ? मग तेच त्याचं मिशन असावं का ? बरं यापेक्षा वेगळी आवड म्हणजेच पॅशन तो कोणती ठेवू शकतो. त्याचं प्रोफेशन, व्होकेशन आणि मिशन वेगळं काय असू शकते ? त्याला आनंदी आणि सुखी जीवन जगण्याची स्वप्ने पडत नसावीत का ? सुखी होण्याची आवड त्याच्यात नसावी का ? मग ती आवड त्याचा व्यवसाय का बनू शकत नसावा. सर्वात शेवटी जगाला काहीतरी देण्यासाठी त्याच्याकडे दुःख आणि कष्टाशिवाय काय असू शकते. मग त्यांच्यासाठी आनंदाचा इकीगाय फॉर्म्युला कोणता असावा…?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

तुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……!

कुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून गेलेलं असतं…….

खूप वर्षांपूर्वीची नाही पण काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. तरी पण त्याला आता दीड वर्ष झालं असेल. म्हणजे कोरोना महामारीचा शिरकाव होण्या अगोदरची ही गोष्ट आहे. ऑफिसला जाताना रिक्षास्टॉपवर एक वयस्कर रिक्षावाला जणू माझी वाट पहात उभारलेला असायचा. घरापासून ऑफिस चांगलं आठ किलोमीटर अंतरावर असल्याने गर्दीतून रिक्षातून किमान अर्धातास लागायचा. यावेळेत रिक्षावाल्याशी चांगल्या गप्पा व्हायच्या. सुरुवातीला माझ्या कामकाजाविषयी आणि ऑफिस विषयीच तो भरभरून विचारायचा. माझ्या इतर सहकाऱ्यांच्या ओळखी सांगायचा. मला त्यात फार आश्चर्य वाटले नाही. एकतर रिक्षा चालविण्याचा त्याचा व्यवसाय असल्याने त्यांना शहराची खडानखडा माहिती असती. त्यात माझ्या सहकाऱ्यांविषयी एव्हढी माहिती कुठून मिळाली ? असं विचारण्याची मला देखील आवश्यकता वाटत नव्हती. एक म्हणजे गप्पांचा विषय माहितीतील असला म्हणजे कंटाळा येत नाही. शिवाय गप्पा मारणारा जर चांगलं बोलत असेल तर त्याचा सहवास आपल्याला आवडतो. माझी त्या रिक्षावाल्याशी मैत्री झाली ती अशी. काही दिवसांनी माझ्या एका सहकाऱ्याने मला सहजच हटकले. ‘एव्हढं काय बोलत असता हो तुम्ही त्या रिक्षावाल्याबरोबर ?’ मी म्हणालो ‘काही नाही रे आपल्याच ऑफिसच्या कामकाजा बद्दल बोलत असतो, बघ ना ! रिक्षावाला आहे तो…पण आपल्या ऑफिसमधल्या प्रत्येक जणांची त्याला पूर्ण माहिती आहे. माझ्या या वाक्यावर क्षणभर तो हसला आणि मग माझ्या नजरेला नजर भिडवत म्हणाला ‘ ते माझे वडील आहेत.’ मी अवाकच झालो. अरे पण त्यांनी कधी तुझा विषय काढला नाही ? माझ्या या प्रश्नावर तो हसतच उत्तराला,’ काय करणार आपल्या मुलाबद्दल कितीही काळजी वाटली तरी ते थेट कधीच बोलणार नाहीत. इतरांकडूनच माहिती घेतील. अंदाज बांधून आपल्या मुलाचे व्यवस्थित आहे ना ! याची खात्री करतील. वडील आहेत ना ते…!’ मला त्याच्या या शेवटच्या वाक्याने खूपच अंतर्मुख केले. मी माझ्या वडिलांना आठवायला लागलो.

माझ्या वडिलांचे निधन होवून सात वर्षे झालीत. याकाळात वडिलांची मला नेमकी किती वेळा आठवण झाली ? घरात सणवार असला की आठवण निघायची. मग त्यांचा स्वभाव, त्यांची काम करण्याची पद्धत सगळ्याची पुन्हा आठवण व्हायची. कधी खूप निराश वाटायला लागलं की त्यांची खूप आठवण यायची. पण हे सगळं आपल्यासाठी. त्यांच्यासाठी म्हणून त्यांची कधी आठवण काढली का आपण ? निवृत्तीनंतर घरात बसून कंटाळा येतो म्हणून ते बाहेर भटकायला निघायचे. अलीकडे त्यांचा विसराळूपणा वाढला होता. त्यातच चालताना केंव्हाही त्यांचा तोल जाईल याची भीती असायची. त्यामुळे घरातील सर्वांनाच त्यांची काळजी वाटायची. तश्या अवस्थेतही ते घरी येणाऱ्या माझ्या मित्रांकडे सारखी चौकशी करायचे. त्यावेळी मला त्यांचा राग यायचा…चिडचिड व्हायची. त्यांचं वागणं त्यावेळी विचित्र वाटायचं. आता माझा मुलगा नोकरीसाठी बाहेरगावी राहतोय. त्याच्या काळजीपोटी मी देखील आता तेच करतोय जे माझे वडील माझ्यासाठी करत होते.

गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे अनेकांची जवळची माणसे दगावली. कुणाचे आई-वडील, कुणाची मुले दगावली. कित्येकांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र गेले. खंबीरपणे पाठीशी उभे राहणारा आधार गेल्यानंतर किती एकाकी वाटते याचा अनुभव अनेकांच्या नशिबी आलाय. याकाळात एकमात्र नक्की झालं……वडिलांची आठवण प्रत्येकाला आली. ज्यांचे वडील त्यांच्यासोबत आहेत ते खरेच भाग्यवान आहेत. कारण त्यांना आपल्या वडिलांना फक्त एकदा का होईना…थॅंक्यु म्हणण्याची संधी आहे. पण ज्यांचे वडील नाहीत, अशांना प्रत्यक्ष ‘थॅंक्यु’ म्हणण्याची संधी कधीच मिळणार नाही. पण एका गोष्टीवर मात्र विश्वास ठेवायलाच हवा. जेंव्हा केंव्हा वडिलांची आठवण येईल तेंव्हा क्षणभर डोळे मिटून त्यांच्या चेहरा आठवा आणि मनातल्या मनात एकदाच ‘थॅंक्यु’ म्हणा….बघा काय वाटतंय ते ? खूप हलकं हलकं वाटेल. आपल्या पाठीशी वडील कायम आहेत याची निश्चित जाणीव होईल.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

इच्छापूर्तीचा पाऊसखेळ…!

इच्छापूर्ती म्हणा किंवा स्वप्नपूर्ती म्हणा..फरक पडत नाही. शेवटी दबलेल्या इच्छांची सलग चित्रफीत म्हणजेच स्वप्न..!

सध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून ! त्याच क्षणी तिने पालटून पाहिले तर इच्छापूर्ती झाली म्हणायचो. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात अगदी तसंच असतं. अगदी अंधारून यावं इतके ढग दाटून आले तरी आपण मनात इच्छा व्यक्त करावी….कोसळ आता आणि त्याचक्षणी पाऊस कोसळायला सुरुवात व्हावी हीसुद्धा इच्छापूर्तीचं म्हणायची. अगदी छोट्या छोट्या गोष्टींची मनमुराद लयलूट करण्याचा सिझन म्हणजे पावसाळा. लहानपणी आकाशातल्या प्रत्येक काळ्याकुट्ट ढगांवर आम्ही आमची मालकी ठरवायचो. त्या ढगातून पडणारा पाऊस हा आमची प्रॉपर्टी असायचा. गंमतीचा भाग पुढेच असायचा. आकाशात काही एकच ढग नसायचा. असंख्य ढग एकमेकात मिसळून जायचे मगच पाऊस पडायचा. आमची मात्र पंचाईत व्हायची. पडलेला पाऊस नेमका कुणाच्या मालकीचा ? मग आम्ही आपसात समझोता करायचो. मग अंगणात प्रत्येकाच्या नावाचा चौकोन तयार करायचा. त्यात पडलेले पावसाचे पाणी त्याच्या मालकीचे. व्यवहार परिपूर्ण नसला तरी इच्छापूर्तीचा आनंद देणारा असायचा.

आणखीन एक आवडीचा खेळ म्हणजे पाऊस पडून गेल्यावर ढगाआड सूर्य अस्ताला जात असतांना जी काही रंगांची उधळण करतो ती पाहण्याचा मनमुराद आनंद लुटणे. हा आनंद घेताना पण सूर्याला आदेश देणारा एक खेळ आम्ही खेळायचो. सूर्य अस्ताला जाताना डोळे मिटून रंगाची इच्छा व्यक्त करायची. वन टू थ्री म्हणत डोळे उघडले की आपण इच्छा व्यक्त केलेल्या रंगांची उधळण दिसली तर सूर्य आपले ऐकला. त्याने आपले ऐकावे म्हणून त्याला तीन संधी द्यायच्या. हा खेळ अगदी अंधारून येईपर्यंत चालायचा. खेळ कुठलाही असो त्यात इच्छा व्यक्त करणे आणि निसर्गाने ती इच्छा पूर्ण करणे हा नियम असायचा. त्यावेळी हे जरासुद्धा विचित्र वाटत नसायचे. काही समजायचं वय नसल्यामुळेच ‘असं कुठं असतंय का ?’ हा प्रश्न देखील मनात येत नव्हता. स्वप्नाळू वयातच निसर्गाबरोबर खेळ खेळल्या जातो ना. शेवटी घरातली वडीलधारी मंडळी आपली जी इच्छा पूर्ण करू शकत नाहीत ती इच्छा जादूने किंवा निसर्गाने पूर्ण कराव्यात हे स्वप्न बघायचं वय तेच असतं ना ! बालिश, पोरकट, नादान…तुम्ही त्याला काहीही म्हणू शकता. पण त्यावयात प्रत्येकजण असे विचित्र पण मनमुराद आनंद देणारे खेळ खेळत असतो. आता आपल्याला आठवलं तरी आपण त्या कृतीला स्वतःचा बावळटपणा समजतो. हाच बावळटपणा मोठे झाल्यावर आपण करतो का हो…?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…?

 • लहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो.
 • आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे.
 • गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद कराव्या लागल्या.
 • या परिस्थितीत ‘ऑनलाईन एज्युकेशन’ हा पर्याय समोर आला. अर्थात ज्या विकसनशील देशांमध्ये शैक्षणिक सुविधा आणि विकास आहे त्याठिकाणी ऑनलाईन एज्युकेशन ही पध्द्त यापूर्वीच प्रचलित झाली आहे.
 • मात्र प्रत्येक देशाच्या धार्मिक-सामाजिक,सांस्कृतिक परंपरा आणि त्यावर आधारित शिक्षण व्यवस्था वेगळी आहे. त्यामुळे संगणक प्रणाली आणि अद्ययावत तंत्रप्रणालीवर आधारित असलेले ‘ऑनलाईन एज्युकेशन’ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य आहे का ? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
 • याशिवाय सतत संगणक आणि मोबाईल हाताळत शिक्षण घेणाऱ्या मुलांचे शाररीक विकास आणि सामाजिकज्ञान याविषयी आता प्रश्न निर्माण होत आहेत.
या वर्षीच्या ऑनलाईन शैक्षणिक सत्राला शाळेच्या बंद दरवाजाच्या आतून सुरुवात झालीय…..

जगातील सर्वच देशांची धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषा भिन्न असल्याने सामाजिकता देखील भिन्न आहेत. अश्यास्थितीत स्वतःचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक स्थान बळकट करणारे शिक्षण देण्यावर प्रत्येक देशाचा भर असतो. लहान मुले ही राष्ट्राची संपत्ती आणि त्या राष्ट्राचे भविष्य असल्याचे सर्वांनाच मान्य असल्याने उज्ज्वल भविष्यासाठी लहान मुलांची जडणघडण करणे हाच प्राथमिक शिक्षणाचा पाया असू शकतो. प्राचीनकाळातील शिक्षणपध्द्ती चांगली की आधुनिक शिक्षणप्रणाली चांगली हा वादाचा मुद्दा चर्चेला घेण्यापेक्षा सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर कोणतीही तयारी नसताना शिक्षण व्यवस्थेला अचानक स्वीकारावी लागलेली ऑनलाईन प्राथमिक शिक्षणप्रणाली ही लहान मुलांना कितपत पचनी पडणारी आहे ? हा मुद्दा चर्चिला जाणे मला महत्वाचा वाटतो. ज्या वयात मुले फक्त आपल्या आईशी संवाद साधत असतात अश्या वयात आपण त्यांच्यावर प्राथमिक शिक्षणाचे ओझे लादत असतो. मुले त्यांना आवडणाऱ्या व्यक्तींचे ऐकत असतात. त्यातही त्यांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंचे माध्यम बनवत ते जगाची ओळख करून घेत असतात. ज्ञानाबरोबरच मुलांच्या शारीरिक विकासावर लक्ष केंद्रित करून त्यांचा विकास साधणे आणि त्यांच्या इतर सामाजिक घटकांबद्दलच्या जाणिवा वाढविणे याची जबाबदारी प्राथमिक शिक्षणावरच असते. हे सर्व या ऑनलाईन शिक्षणातून साध्य होणार आहे का ? गेल्या दोन वर्षांच्या प्रयोगातून तर हे अशक्य वाटू लागले आहे. अर्थात अचानक बदलाव्या लागलेल्या शिक्षण प्रणालीला आत्मसात करण्यात शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांना जसा पुरेसा कालावधी मिळाला नाही तसाच पालकवर्गाला मिळाला नाही. त्यामुळे दोन वर्षांच्या प्रयोगातून आपल्या हाती फारसे काही लागले नाही अशी आपण समजूत करून घेवू शकतो. त्यातही ‘ऑनलाईन एज्युकेशन’ ही कायमस्वरूपी स्वीकारण्याची शिक्षण प्रणाली नाही अशी समजूत व्यवस्थेने देखील करून घेतलेली आहे. निदान प्राथमिक शिक्षण देताना तरी शाळा हीच योग्य व्यवस्था आहे यावर आता सर्वच शिक्षणतज्ज्ञ देखील ठाम आहेत. पण ही तात्पुरती स्वीकारलेली प्रणाली अजून कितीकाळ राहणार आहे ? सर्वात महत्वाचे म्हणजे याकाळात लहान मुलांच्या विकासाची होणारी हानी त्यांच्या भविष्याला पर्यायाने राष्ट्राला नुकसानकारक ठरणार नाही का ? हा प्रश्न सध्यातरी दडपून ठेवला आहे. मनात आले तरी कुणीच कुणाला हा प्रश्न विचारताना दिसत नाही.

ऑनलाईन एज्युकेशनमुळे वर्गमित्र हे सामाजिक नाते विसरले जात आहे….

मार्च २०१९ मध्ये जगभरात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ‘लॉक डाऊन’चे सत्र सुरू झाले आणि बऱ्याच ठिकाणी वार्षिक परिक्षेशिवायच त्या वर्षीचे शैक्षणिक सत्र अघोषितपणे थांबविण्यात आले. त्यानंतर कोरोनाचा कहर वाढत गेला. गर्दी टाळणे आणि संसर्ग टाळणे या मुद्यांवर पालकवर्गाने मुलांना शाळेत जायला विरोध केला तर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात कमकुवत ठरणाऱ्या शाळा व्यवस्थापनाने स्वतःहून शाळा बंद केल्या. सरकारला देखील सुरक्षेच्या दृष्टीने शाळा बंद रहाव्यात असेच वाटत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय सर्वांचीच सुटका करणारा ठरला. त्यानंतर घरातच अडकलेल्या मुलांना अभ्यासात गुंतवून ठेवण्याच्या गरजेपोटी ऑनलाईन एज्युकेशन प्रणालीचा शाळांनी स्वीकार केला. यापूर्वी ही प्रणाली काही इंटरनॅशनल स्कुल आणि कोचिंग क्लासेसने स्वीकारली असल्याने सर्वच शाळा व्यवस्थापनाला हा मार्ग सोयीचा वाटला. विद्यार्थिविना रिकाम्या क्लासरूममध्ये कॅमेरा समोर विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवत एखाद्या निवेदकाप्रमाणे शिकवण्याचा घाट घातला गेला. यालाच ‘ऑनलाईन एज्युकेशन’ असे नाव देण्यात आले. ज्या देशांमध्ये संगणक आणि मोबाईल हाताळणे नित्याचे झाले आहे अश्या देशांमध्ये कदाचित हा प्रयोग सोयीचा आणि परिणामकारक ठरला देखील असेल. मात्र गरीब किंवा विकासाच्या वाटेवर असणाऱ्या देशातील लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना ही खर्चिक प्रणाली पेलविली असेल का ? भारतात देखील ही खर्चिक प्रणाली परवडणारी नसल्याचेच दिसून आले आहे. अजूनही अँड्रॉईड मोबाईल घेणे सामान्य पालकाला परवडणारे नाही. एकीकडे मोफत प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारणारे सरकार तर दुसरीकडे पैसे मोजण्याची क्षमता असलेल्या वर्गालाच शिक्षण देणारी व्यवस्था असे विचित्र चित्र दिसू लागले आहे.

क्लासरूमला स्टुडिओ बनविणारी ऑनलाईन प्रणाली…

नाईलाज म्हणून स्वीकारलेल्या ऑनलाईन एज्युकेशन सिस्टिमद्वारे मुलांची खरीच किती प्रगती झाली हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. क्लासरूमला एखाद्या चॅनेलच्या स्टुडिओमध्ये रूपांतर करीत शाळांनी आपले स्वरूप पालटले असले तरी विद्यार्थ्यांचे काय ? तर हे काही दिवसांसाठीच असेल, पुन्हा शाळा पूर्ववत सुरू होतील असा आशावाद मांडला जातो. अर्थात हे सत्यच आहे. पुन्हा शाळा पूर्ववत भरतील. वर्गात विद्यार्थी जमतील. खेळाच्या तासिकेला मैदानात खेळायला जमतील. दुपारी लंच बॉक्समध्ये आईने दिलेला खाऊ आपल्या मित्राला खायला देतील. शाळा सुटल्यावर स्कुलबस मधून उतरताना ड्रायव्हर काकांना टाटा करतील कारण त्यांना हे सर्व टीचर प्रत्यक्ष शिकवू शकतो…..ऑनलाईनवर संस्कार शिकवले जात नसतात. नवे तंत्रज्ञान शिकण्याचे देखील एक वय असावे लागते. जगाच्या बरोबर धावण्याची शर्यत खेळताना मुलांचे बालपण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार कुणी करायचा…?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

अन लॉक नंतरचा पहिला रविवार….

रात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही ? त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर ? लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस सुट्टी असावी ही गरज ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असतांना पुढे आली असावी. त्यांनी रविवार निवडला म्हणून आम्हा भारतीयांना देखील रविवार हा दिवस जास्त महत्वाचा ठरला. रविवारी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करता यावी यासाठी ब्रिटिशांनी हा दिवस निवडला असेल कदाचित. हिंदूइझम मध्ये आठवड्याच्या सर्वच दिवसांचे सारखेच महत्व आहे. मुस्लिम धर्मीयांमध्ये शुक्रवारचे महत्व आहे. पण बहुसंख्य हिंदू असणाऱ्या भारतात सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून रविवार निवडला त्यालाही आता दीडशे वर्षांहून अधिक काळ लोटला असेल. पण रोजच्या कामातून मोकळीक मिळणारा दिवस म्हणूनच भारतीयांना रविवार महत्वाचा वाटतो. त्यामुळेच प्रत्येक रविवारची सुरुवात ही स्वप्नवत आणि आल्हाददायक व्हावी असेच वाटत असते.

उद्या सुट्टीचं आहे म्हणून आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत म्हणजे शनिवारी रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने रविवारी सकाळी उशिरापर्यंत अंथरुणात लोळत पडण्यात जो आनंद असतो तो फक्त रविवारीच मिळू शकतो यावर बहुदा जगभरात एकमत होवू शकते. त्यामुळे रविवारच्या दिवसभराचे शेड्युल हे सकाळी दहा वाजल्यानंतरच सुरू करण्याकडे सगळ्यांचाच कल असतो. सगळेच जण घरात असल्याने अगदी अंघोळीपासून सर्व कामे संथगतीने करण्याकडे कल असतो. रोजचीच घरातली कामे पण ती घाईत न करता संथगतीने करणे यालाच बहुदा रविवारचा प्लॅन म्हणत असावेत. नाही म्हणायला नाश्त्यासाठी काहीतरी वेगळा मेन्यू बनविणे आणि तो दिवसभर भूक लागेल तसा खाता येईल एव्हढ्या प्रमाणात तयार करायचा असतो. कारण घरकाम करणाऱ्या आपल्या घरातील महिला सदस्यांना देखील एक दिवस स्वयंपाकातून सूट मिळायला हवी ना..! ब्रिटिशांनी त्यांच्यासाठी आठवड्यात वेगळा दिवस सुट्टीचा ठेवला नाही. अन्यथा भारतात ती प्रथा देखील सुरू झाली असती. तर हे आहे भारतातील रविवारच्या सुट्टीचे पुराण.

घरात नाश्ता बनवण्याची तयारी सुरू झाल्याशिवाय घरातील पुरुष मंडळींनी अंथरुणातून बाहेर पडायचं नसतं. म्हणजे सकाळच्या पहिल्या चहाबरोबर गरमागरम नाश्त्याची टेस्ट त्याशिवाय कळतच नसते यावर माझा ठाम विश्वास आहे. भारत हा बहुप्रांतीय आणि बहुधर्मीय देश असल्याने इथे खाद्यपदार्थांमध्ये देखील विविधता आहे. प्रत्येक गावाची, शहराची जशी स्वतंत्र सभ्यता आहे तशी खाद्यसंस्कृती देखील ‘स्पेशल’ आहे. दक्षिणेकडे सकाळी नाश्त्याला इडलीसांभार खूप प्रसिद्ध आहे. आता तो भारतभर प्रसिद्ध आहे. फक्त प्रत्येकाच्या तयार करण्याच्या पध्द्तीप्रमाणे सांभाराच्या चवीत बदल होवू शकतो. चिनी लोक नूडल्स खातात अगदी तसे भारतीय लोक इडलीसांभार खातात. युरोपीय लोक पास्ता अगदी दुपारचे जेवण म्हणूनही खातील. आमच्याकडे तर रविवारी दिवसभर इडलीसांभारच खायला मिळेल.गरमागरम वाफाळलेली इडली सोबत ओल्या नारळाची खोवलेली चटणी अन चिंच-आमसुलचा सांभार हा रविवारच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करणारा असतो.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सततच्या लॉक डाऊनमध्ये अडकल्याने घरातच असल्याने आठवड्याचे सर्वच दिवस रविवार झाले होते. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अन लॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. अजूनही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आहेच. पण सरकार आता सरसकट लॉक डाऊन करण्याच्या मनस्थितीत नाही. निदान सध्यातरी सरकारची हीच भूमिका आहे. त्यामुळे अन लॉक प्रक्रियेनंतरचा पहिला रविवार म्हणून घरातच उत्साहात साजरा होतोय. त्यातही पावसाने निर्माण झालेल्या आल्हाददायक वातावरणात दिवसभर सुट्टीचा आनंद घेणे यापेक्षा स्वर्गसुख वेगळे काय असते. दुपारी जरा वेळ मिळाल्यावर मित्रांना फोन करून चौकशी करण्याशिवाय दिवसभर फारसे काम करायचेच नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोरोनावर अजिबात चर्चा देखील करायची नाही तरच रविवारच्या सुट्टीचा आनंद घेता येईल. माझा तर हाच प्लॅन आहे….तुम्ही काय करताय ?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

माणसांचे ‘क्रिप्टोबायोसिस’ किंवा ‘क्लोनिंग’ होईल तेंव्हा….!

अलीकडे सायबेरियामध्ये २४ हजार वर्षांपासून बर्फाखाली दबलेला एक सूक्ष्मजीव नुकताच पुन्हा जिवंत झाला आहे.'बडेलॉइड रोटीफर' असे त्याचे नाव आहे. रशियन वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार तो नुसताच जिवंत झाला नाही तर त्याने त्याचा 'क्लोन' देखील यशस्वीरीत्या तयार केला आहे. तर 'क्रिप्टोबायोसिस'अवस्थेत हजारो वर्षे जिवंत राहणाऱ्या या बहुपेशीय सुक्ष्मजीवाप्रमाणे माणूस जर 'क्रिप्टोबायोसिस' अवस्थेत पोहचू शकला आणि त्याने त्याचा जर 'क्लोन' यशस्वीरीत्या बनवला तर....वैज्ञानिक सिरियसली त्यावर संशोधन करत असतीलही पण आपण याच्याकडे 'फँटसी' म्हणून पाहिलं तर....?

जेंव्हा अस्तित्वासाठी परिस्थिती योग्य नसते तेंव्हा चयापचय तात्पुरते निलंबित करण्याची क्षमता सुक्ष्मजीवांमध्ये असते. या प्रक्रियेला ‘क्रिप्टोबायोसिस’ म्हंटले जाते. अश्या अवस्थेत हे सूक्ष्मजीव हजारो वर्षे जिवंत राहू शकतात. ही सुक्ष्मजीवशास्त्रीय व्याख्या झाली. विज्ञानापासून दूर असणाऱ्या आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचे म्हणजे अन्न पाण्यावाचून एकाच अवस्थेत हे सूक्ष्मजीव हजारो वर्षे जिवंत राहू शकतात. माणसाला हे शक्य आहे का.? म्हणूनच मी याकडे एक ‘फँटसी’ म्हणून बघतोय. खरंच माणूस अन्न पाण्याशिवाय एकाच अवस्थेत किती दिवस जिवंत राहू शकतो..? ईश्वरप्राप्तीसाठी तपश्चर्येला बसणारे संत-महात्मे वर्षानुवर्षे जिवंत राहू शकत होते असे हिंदुधर्माच्या पुराणात आढळते. मोक्षप्राप्ती साठी आजही जैन धर्मामध्ये अशाप्रकारचे व्रत जैनमुनीकडून केले जाते. त्याला यम सल्लेखना म्हंटले जाते. मात्र अशावस्थेत ते देखील तीन-चार महिन्यांच्यावर जिवंत राहू शकत नाहीत. अर्थात ते हे व्रत मोक्षप्राप्तीसाठीच करत असतात. एकूणच मनुष्य तीन ते चार महिन्यांच्यापेक्षा जास्तकाळ जिवंत राहू शकत नाही. आता ‘क्लोनिंग’ प्रक्रियेबाबत विचार करू.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही माणसांची क्षमता वाढवेल, ती अन्य कृत्रिम बुद्धिमत्तेशी संवाद साधेल. त्यासाठी लागणारी स्वतंत्र भाषा निर्माण होईल जी माणसांना कळेल,शिकता येईल. या अभ्यासातूनच वैज्ञानिकांनी सर्वात प्रथम १९९७ मध्ये एका मेंढीचे ‘क्लोन’ तयार केले होते. तिला ‘डॉली’ असे नाव दिले होते. स्कॉटलँडच्या वैज्ञानिकांनी हा प्रयोग यशस्वी केला होता. तेंव्हापासून क्लोनिंगचे तंत्रज्ञान हे ‘डॉली द शीप’ या नावाने प्रसिद्ध आहे. आता माणसाच्या क्लोनिंग तंत्रज्ञानाकडे संशोधक वळले आहेत. चीनमधील शांघाय येथील क्लोनिंग करण्याच्या संशोधन समितीने डॉ. मुमिंग पू यांच्या नेतृत्वाखाली माकडाचे क्लोनिंग केले आहे. माकडाची आणि माणसाची शरीररचना जवळपास सारखीच असल्याने आता माणसाच्या क्लोनिंगच्या संशोधनाकडे ते वळले आहेत. आता ही सगळी विज्ञानकथा समजूया. खरंच आपला क्लोनिंग तयार झाला तर…? जगात एकसारखी सात माणसे असतात या निष्कर्षाला देखील आपण मागे टाकू. मग आपल्याला ‘अलास्का’ची देखील गरज पडणार नाही. किंवा फक्त अवयवांचेच क्लोनिंग होणार असेल तर आपण आपला क्लोनिंग केलेला ‘कृत्रिम मेंदू’ सोबत घेऊनच हिंडणार का ? सहज म्हणून कल्पना करा….आपण हेल्मेट घालून मोटरबाईकवर शहराबाहेर भरधाव वेगाने चाललो आहोत. आपल्या पुढ्यात आपला क्लोन केलेला कृत्रिम मेंदू आपल्याशी इंटलक्च्युअल चॅटिंग करतोय. एव्हढ्यात ट्रॅफिक पोलीस आपली बाईक अडवतो आणि त्याचा क्लोन मेंदू आपल्या क्लोन मेंदूला विदाऊट हेल्मेटसाठी दंडाची पावती फाडतोय. किंवा अजून एक नवी कल्पना मांडतो…..समजा आपल्याला कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराने मृत्यू येतो तेंव्हा आपल्या सोबत असलेला कृत्रिम मेंदू मरेल का ? तो जर हजारो वर्षे जगणार असेल तर आपण मृत होवूनही मृत घोषित केले जाणार नाहीत. हळूहळू काही शतकानंतर या पृथ्वीवर फक्त क्लोनच राहतील. गोंधळात पडलात ना..? इट्स ओन्ली फँटसी….

:- मुकुंद मधुकर हिंगणे.