सामान्य माणूस आपली ‘वंशावळ’ का शोधतो..?

आईचं पहिलंच वर्षश्राद्ध काही दिवसांवर आले असता बहिणीचा फोन आला. आई श्रद्धाळू होती त्यामुळे तिचे राहून गेलेले विधी व्यवस्थित पार पाड. गत वर्षी लॉक डाऊन असतानाच तिचे निधन झाले होते. अंत्यविधी नियमांच्या सोपस्कारातच उरकलेला, त्यामुळेच बहिणीने सूचना केली अन् सोबत वंशावळी देखील पाठविते म्हणाली. एरवी आजोबा-पणजोबाच्या पुढे नावे माहीत नसलेल्या माझ्यासारख्या असंख्य सर्वसामान्य लोकांना आपले ‘पूर्वज’ किती माहीत असतात ? या वंशावळीची आपल्याला किती गरज पडते ? मग आपली वंशावळ आपण का शोधतो ? अश्या प्रश्नांनी डोक्यात एकच गर्दी केली…..

:- मुकुंद हिंगणे.

‘पुढच्या सत्तर पिढ्या तुम्हाला लक्षात ठेवतील’ असा तोंड भरून आशीर्वाद जरी मिळाला तरी देखील खरंच सत्तर पिढ्या आपल्याला लक्षात ठेवतील का ? आपण तरी आपले किती पूर्वज लक्षात ठेवले आहेत ? एखाद्या कार्याचे मूल्यमापन करताना कौतुक म्हणून मिळालेला हा आशीर्वाद सर्वसामान्यांना निश्चितच अनुत्तरित करणारा असाच वाटतो. पण ‘वंशावळी’ भोवती फिरणारी ही समाजरचना केवळ ‘अस्तित्वा’साठी नाकारता येत नाही हेच खरे आहे.

‘वंश’ विचार हा फक्त भारतातच मानला जातो असे नाही. तर जगातल्या प्रत्येक देशात, धर्मात, विचारधारेत, वसाहतीत, समूहात वंशाला प्राधान्य दिले जाते. मुळात तुमच्या कुळाच्या आद्य पुरुषाच्या उपजीविकेच्या साधनावरूनच तुमचे आडनाव ठरते. ( आद्यनावाचा अपभ्रंश आडनाव असा आहे) चातुर्वर्ण्य व्यवस्था जर फक्त भारतदेशातच आहे असे मानले तर इतर देशात व्यक्तींची आडनावे (सरनेम) कशावरून पडलीत हा देखील कुतूहलाचा विषय ठरू शकतो. एकूणच ‘कुलोत्पन्न’ हा विषय जागतिकस्तरावर सर्वमान्य असाच आहे.

पुराणातील घटना, प्रसंग आणि कालावधी याची सांगड घालताना अनेकवेळा त्याला आधार मिळत नसल्याने त्या कपोलकल्पित वाटतात. त्यामुळे त्यातील व्यक्तिरेखांची ‘वंशावळ’ देखील आपल्याला खोटी वाटते. पण मग इतिहासकालीन व्यक्तिरेखा तरी सत्य आहेत ना ! त्यातील घराणी आणि त्यांची वंशावळ देखील जशी आहे तशीच सर्वसामान्य माणसांची देखील वंशावळ आहे. किमान चारशे-पाचशे वर्षांचा प्रवास सांगणाऱ्या नोंदी देखील आढळतात. पण मग कर्तृत्वाचा कोणताही इतिहास नसलेल्या माणसांनी आपली ‘वंशावळ’ का शोधायची ? हा देखील एक प्रश्न आहेच.

कुठल्याही कर्तबगारीची परंपरा नाही असा वंश टिकतो का ? त्याची वाढ होते का ? परावलंबी जीवांची शृंखला जरी निसर्गनिर्मित असली तरी त्याची वंशावळ असू शकते का ? शेवटी प्रत्येक कुळात कधी ना कधी एक कर्तबगार पूर्वज तळपलेला असतो. त्याचे स्मरण करून त्याच्यासारखेच ‘तेजोवलय’ आपल्याला प्राप्त होवून आपले ‘कूळ’ पुढे सुरू रहावे याच आशेने सर्वसामान्य माणूस आपल्या कुळातील पराक्रमी पूर्वजांच्या शोध घेण्याच्या नेहमीच प्रयत्नात असतो. आडनाव साधर्म्य असणाऱ्या इतिहासकालीन व्यक्तींमध्ये देखील तो आपल्या कुळपुरुषाला शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. इतरांप्रमाणेच आपल्याला देखील पराक्रमाची परंपरा लाभली आहे या सिद्धतेसाठीच तो ‘वंशावळ’ शोधत असतो.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

कोरोनाच्या फैलावात महाराष्ट्र आघाडीवर का …?

 • शिक्षण, विकास आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्रात संसर्गजन्य साथीचा फैलाव देशातील इतर राज्यांच्या तुलनेत नेहमीच अधिक असतो.
 • लोकसंख्येच्या दृष्टीने देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी परराज्यातून आणि परदेशातून येणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे.
 • सर्वात जास्त शहरे असलेले हे देशातील एकमेव राज्य आहे. दाटीवाटीने लोकवस्ती असणाऱ्या मुंबई महानगराबरोबरच पुणे, नागपूर, औरंगाबाद, ठाणे, नाशिक अशी सोळा शहरे प्रमाणापेक्षा अधीक लोकसंख्येचा भार सोसत आहेत.
 • आशिया खंडात सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या ‘धारावी’ प्रमाणेच आता महाराष्ट्रातील प्रत्येक शहरे झोपडपट्ट्यांच्या विळख्यात अडकलेली आहेत.
 • संसर्गजन्य आजारांचा फैलाव वेगाने होण्यास कारणीभूत ठरणारी माणसांची गर्दी यामुळे प्रशासन, आरोग्ययंत्रणा यांचा नेहमीच बोजवारा उडतो.

जगाशी सागरी मार्गाने आणि हवाईमार्गाने जोडलेल्या मुंबई महानगराची लोकसंख्या ही दोन कोटीच्या घरात आहे. रोज वेगवेगळ्या कारणांसाठी मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या महानगरांची परिस्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही. औद्योगिक विकासामुळे महाराष्ट्रात रोजगार शोधण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्याने महाराष्ट्रातील शहरांच्या जीवनमानावर त्याचा परिणाम होत आहे. प्रत्येक राज्यातील भाषा, धर्म, संस्कृतीप्रमाणेच तिथली लोकवस्ती आणि नगररचना असते.

महाराष्ट्रातील शहरांना मात्र वाढत्या गर्दीने बकाल स्वरूप येवू लागले आहे. दाटीवाटीने गर्दी केलेल्या वसाहती हे चित्र एकट्या मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात दिसत आहे. महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक आरोग्य यंत्रणा यांना संसर्गजन्य आजारावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करताना सर्वात मोठा अडसर येतो तो दाटीवाटीने गर्दी करणाऱ्या अनिर्बंध वसाहतींचा. या कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईच्या धारावी झोपडपट्टीने कोरोनावर मात करताना शासनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत एक आश्चर्याचे उदाहरण निर्माण केले हे देखील खरे आहे. मात्र इतर शहरातून हा ‘धडा’ गिरवला गेला नाही हे देखील तितकेच सत्य आहे.

अद्ययावत वैद्यकीय सेवा पुरविणारी सुसज्ज अशी हॉस्पिटल्स जवळपास सर्वच शहरे आणि निमशहरातून उपलब्ध असतांना सातत्याने वाढणारी परराज्यातील गर्दी हीच अश्या संसर्गात सर्वात जास्त डोकेदुखी असते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या वाट्याला ही डोकेदुखी कायमच आहे. लोकशाही असलेल्या देशात अधिवास आणि रोजगाराची प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे. इथे प्रांतवाद नको ही भूमिका जरी योग्य असली तरी वाढत्या गर्दीला रोखण्यासाठी प्रत्येक राज्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात येणारी गर्दी थोपविण्यासाठी एकट्या महाराष्ट्राने प्रयत्न करण्यापेक्षा इतर राज्यांनी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांचा विकास आणि अर्थकारण याबरोबरच पर्यावरण आणि आरोग्य बळकट करावे.

गर्दीला जसे हृदय नसते तशीच राजकारणाला संवेदना नसते. प्रगतीच्या वाटेवर चालणाऱ्या महाराष्ट्राच्या नशिबी पहिल्यापासूनच गर्दीचे राजकारण आले आहे. या राज्यात सहज प्रवेश करून गुजराण करणारे इथली सभ्यता, संस्कृती आणि शहरांच्या आरोग्याची नासधूस करायला कारणीभूत होतात. कोरोना, एचआयव्ही, सार्स, एच1एन1 सारखे संसर्गजन्य आजार फैलावण्याची हीच प्रमुख कारणे आहेत. गर्दीचा रेटा थोपवा अन्यथा हीच श्वासागणिक वाढणारी गर्दी संसर्गाच्या माध्यमातून आपला ‘काळ’ बनून येतील.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

पुन्हा पुन्हा लॉक डाऊन…..!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र पुन्हा लॉक डाऊनच्या दिशेने….

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झपाट्याने वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने सध्यातरी रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी या धोरणाचा अवलंब केला असला तरी आठवड्यातील दोन दिवस शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत लॉक डाऊनची घोषणा केली आहे. गेल्या वर्षभरापासून याच दुष्टचक्रात अडकल्याने व्यवसाय-उद्योग पार बुडीत निघाले आहेत. अजून काही वर्षे तरी कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन अर्थात निर्मूलन होणार नाही हे ढळढळीत सत्य आहे. अश्या परिस्थितीत नागरिकांना सुसह्य होणारी आणि सुरक्षितता बहाल करणारी नवी नियमपद्धती शासन अंमलात आणेल का ?

१२ मार्च २०२० पासून भारतात पहिला घोषित कोरोना संक्रमित रुग्ण सापडल्या पासून संपूर्ण देशाचेच या संक्रमित साथीने ‘खुले कारागृह’ करून टाकले आहे. २२ मार्च २०२० च्या ‘जनता कर्फ्यु’ नंतर देशभर ‘लॉक डाऊन’चे सत्र सुरू झाले. जवळपास ८ महिने कडकडीत ‘लॉक डाऊन’ पाळल्यानंतर काही ठिकाणी जनजीवन सुरळीत करण्यासाठी शासनाने लॉक डाऊन उठवले. या आठ महिन्यात बंदिस्त जीवन जगण्याची शिक्षा भोगल्या नंतर तरी परिस्थिती पूर्वपदावर येईल हा जनतेचा भाबडा आशावाद फोल ठरला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा आपण लॉक डाऊनच्या दिशेनेच निघालो आहोत. हीच परिस्थिती आपल्याला स्वीकारावी लागणार आहे ? संक्रमण आपत्ती असल्याने ह्यात चूक जनतेची की सरकारची ? या फालतू चर्चेचे गुऱ्हाळ करण्यापेक्षा, पुढे काय…? या प्रश्नाची सोडवणूक करणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि आता दुसऱ्या लाटे दरम्यान एक महत्वाचा बदल देखील आहे. पहिल्या लाटेदरम्यान कोविड 19 वर लस नव्हती. तिने जेंव्हा संपूर्ण जगालाच विळखा घातला, त्यानंतर जगाला प्रतिबंधात्मक लस निर्मितीची गरज भासली. आजही असे अनेक आजार, साथी आहेत ज्यांच्या प्रतिबंधात्मक लस आणि औषधींची निर्मिती झालेली नाही. किंबहुना त्यावर संशोधन करण्याची गरज पडली नाही. जेंव्हा एखाद्या साथीचा मोठ्या प्रमाणात फैलाव होतो. तेंव्हा तिला आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक लस अथवा औषधींच्या निर्मितीकडे लक्ष वेधले जाते. प्लेगच्या साथीवरून जगाने हा अनुभव घेतला आहे. सुदैवाने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान जगातील चार-पाच देशातील औषधी कंपन्यांनी लस निर्मितीकडे आपले लक्ष घातले. यात भारत देखील आहे. यशस्वी चाचणींद्वारे भारताने कोरोना प्रतिबंधात्मक लस बाजारात आणली. जगातील काही देशांना या लसीचा पुरवठा करतानांच देशांतर्गत लसीकरण सुरू केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी ‘लस’ हे सुरक्षा कवच असेल. कदाचित याच गाफील विचाराने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देखील उच्छाद मांडला असावा.

ही आकडेवारी प्रतिदिन वाढतानांच दिसत आहे.

गेल्या आठवड्याचा विचार केला तर महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. एकीकडे लसीकरणाने वेग पकडला आहे. तर दुसरीकडे साथीचे संक्रमण देखील वेगाने सुरू आहे, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजना अधिक तीव्र करीत असतानाच जर लसीकरणाचा वेग वाढविला तर तो समर्पक उपाय ठरू शकतो. मात्र इथेच ‘गोची’ आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी लसीचा पुरवठा योग्य रीतीने होत नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण होत आहे. यातून खासगी रुग्णालयातून संभाव्य ‘काळाबाजार’ होण्याची जास्त शक्यता आहे. आत्ताशी लोकांना लसीचे महत्व पटायला लागले आहे. लसीकरण केंद्रावर सामान्य माणूस गर्दी करीत असतानाच नेमका लसीचा तुटवडा निर्माण झाला तर दोष पुरवठा यंत्रणा अर्थात सरकारच्या माथी मारला जाईल.

राज्य सरकारने कोरोनाची ही दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंधाची घोषणा करीत पुन्हा त्याच त्या उपाय योजनांची अंमलबजावणी केली आहे. दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी करताना गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे हे चांगलेच आहे. मात्र या उपाय योजनांमध्ये हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना उपजीविकेसाठी नवी सुरक्षित उपाय योजना तयार करणे अपेक्षित आहे. १८९७ च्या ब्रिटिशांनी केलेल्या साथीच्या आजाराच्या प्रतिबंधात्मक कायद्यात देखील मूलतः सुधारणा करणे अपेक्षित आहे. एकतर जमावबंदी ही घोषित झालेली कळते, ती पुन्हा मागे केंव्हा घेतली ही दुसऱ्यांदा घोषित झाल्यावरच कळते. शिवाय या जमाव नियंत्रण कायद्या बरोबरच वैद्यकीय उपचार आणि सेवा कायद्यातही सुधारणा अपेक्षित आहे. ज्यामुळे साथीचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी उपयोगी होवू शकेल. आत्ता आठवड्यातील दोन दिवस लॉक डाऊन पुकारणाऱ्या महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा लॉक डाऊनच्या दिशेनेच पावले टाकायला सुरुवात केली आहे का….?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

कोविड लसीकरणासाठी भास्कर वृत्तपत्र समूहाची जनजागृती

‘भास्कर’ समूहाच्या दै. दिव्यमराठी, सोलापूर आवृत्तीने शहरातील सातरस्ता चौकात कोविड लसीकरणासाठी उभारलेले तीस फुटी सिरिंजचे भव्य कटआउट.

नुसताच व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता समाजप्रबोधन आणि जनजागृतीला अग्रक्रम देणाऱ्या देशातील वृत्तपत्र माध्यम जगतात अग्रणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भास्कर’ समूहाकडून गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीच्या राष्ट्रीयसंकट काळात विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. नैसर्गिक आपत्ती असो अथवा महामारीचे संकट असो, राष्ट्रीय आपत्तीच्या काळात व्यवसाय बाजूला ठेवून प्रबोधन आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात भास्कर माध्यम समूह नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे.

देशातील १२ राज्यातून ३ भाषांमधून ६५ आवृत्यांच्या माध्यमातून ६ कोटी ५० लाख वाचकांशी दररोज हितगुज.

गतवर्षी २२ मार्च रोजी देशभर पाळण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यु’नंतर पुकारलेल्या लॉक डाऊनच्या काळात शहरातून आपापल्या गावाकडे पायी चालत निघालेल्या कष्टकरी मजूर आणि सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाताना ‘भास्कर’ समूहाने आपल्या देशभरातील ३०० ब्युरो ऑफिसेसच्या सहाय्याने यंत्रणा उभी केली. ज्या ठिकाणी आवृत्ती कार्यालये आहेत तिथून गरजू नागरिकांना तातडीची मदत म्हणून किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. या उपक्रमातून ‘भास्कर’ समूहाने लाखों गोरगरिबांच्या अडचणीत मदतीचा हात दिला. याबरोबरच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना लोकांना समजाव्यात याकरिता विविध जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. गत मार्च महिन्यात सोशल डिस्टनसिंग आणि मास्कचा वापर याची जनजागृती करण्यासाठी गुजरात मधील सुरत शहरात आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात २५ फुटी उंचीची ‘मास्क’ची प्रतिकृती शहरात मध्यवर्ती ठिकाणी उभारली होती. हा उपक्रम ‘विक्रम’ म्हणून नोंदविल्या गेला.

सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा आरोग्य अधिकारी आदींच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रम लोकार्पण.

‘भास्कर’ समूहाच्या मराठी वृत्तपत्र दै. दिव्यमराठीचे महाराष्ट्र राज्य सीईओ निशीत जैन, महाराष्ट्र संपादक संजय आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली दै. दिव्यमराठी सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक संजीव पिंपरकर आणि युनिट हेड नौशाद शेख यांनी सोलापूर महापालिका आणि सोलापूर जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने कोरोना 19 लसीकरणाच्या जनजागृतीसाठी रंगपंचमीच्या मुहूर्तावर दि. २ एप्रिल रोजी शहरातील मध्यवर्ती समजल्या जाणाऱ्या सातरस्ता चौकात ‘कोविड सिरिंज’ची ३० फुटी भव्य प्रतिकृती उभारली. या सोहळ्याला सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा परिषदेचे सीईओ स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

दै.दिव्यमराठी सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक संजीव पिंपरकर आणि युनिट हेड नौशाद शेख यांच्या समवेत उपक्रमात सहभागी झालेली टीम.

याप्रसंगी निवासी संपादक संजीव पिंपरकर आणि युनिट हेड नौशाद शेख यांनी उपक्रमाबाबतची दै. दिव्यमराठी आणि भास्कर समूहाची भूमिका व्यक्त केली. जनजागृतीसाठी उभारण्यात आलेल्या ३० फुटी प्रतिकृतीने आपलाच अगोदरचा २५ फुटी प्रतिकृतीचा विक्रम मोडीत काढल्याचे यावेळी स्पष्ट केले. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या चौकात ही प्रतिकृती उभारल्याने नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. स्वतःच्या व्यावसायिक ‘ब्रँडिंग’साठी लाखों रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या वृत्तपत्रांच्या स्पर्धेत जनजागृतीसाठी देशभर उपक्रम राबविणाऱ्या भास्कर समूहाचे वेगळेपण दिसून येते.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

सततच्या लॉक डाऊनच्या भीतीने हॉटेल व्यवसाय कोसळला…!

प्रत्येक गावाची-शहराची खाद्य संस्कृतीशी निगडित अशी खासियत असते. त्या खासीयतीवरच तिथला हॉटेल व्यवसाय पर्यायाने अर्थकारण सुरू असते. २२ मार्च २०२० पासून आजपर्यंत कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अंमलात येणाऱ्या कडक निर्बंधांमुळे आणि सततच्या लॉक डाऊनच्या भीतीने हॉटेल व्यवसाय पूर्णतः कोसळला असून पर्यायाने ‘त्या’ गावाचे-शहराचे अर्थकारण बिघडले आहे.

दर दहा कोसावर भाषेचा ‘लहेजा’ जसा बदलतो अगदी तशीच खाद्यपदार्थाची ‘चव’ देखील बदलते. ही बदलणारी ‘चव’च त्या गावाची-शहराची ओळख बनून जाते. प्रवासी,पर्यटक,पाहुणे मंडळींना या ‘चवी’चं गारुड खेचून आणत असतं. ज्यांचे नातेसंबंध आहेत अश्यांना कधीही याचा मनमुराद आनंद घेता येतो, बाकीच्या अनोळखी लोकांसाठी खवैय्येगिरीचा हा आनंद फक्त हॉटेल्स मधूनच घेता येतो. हॉटेल व्यवसायाचा हाच मुख्य ‘कणा’ ठरतो. त्यामुळेच ही ‘खासियत’ जपतच स्थानिक बाजारपेठेत अर्थकारणात हॉटेल्स आपला कायम वरचष्मा ठेवतात.

अगदी घरगुतीपणाचा महिमा सांगणाऱ्या खानावळी देखील खासियत जपत आपल्या व्यवसायातून अर्थकारण करीत आपले ‘वेगळे’ अस्तित्व जपताना दिसतात. आतातर मोठमोठे नावाजलेले हॉटेल्स देखील खास ‘चुली’वरचे जेवण अशी जाहिरातबाजी करीत खवैय्यांना आकर्षित करत असतात. खास घरगुती वातावरणाचा आपलेपणा जपणारे वातावरण हा हॉटेल व्यवस्थापनाचा मुख्य भाग बनला आहे. हे सर्व सांगण्याचे महत्वाचे कारण म्हणजे भारतीय शहरी-निमशहरी आणि ग्रामीण भागातील हॉटेल व्यवसाय हा खाद्यसंस्कृती बरोबरच अर्थकारणाचा मुख्य कणा बनला आहे. भलेही औद्योगिक वसाहती विकसित झाल्या नसतील तरीही वेगळेपण जपणारी खाद्यसंस्कृती अश्या अविकसित भागांच्या अर्थकारणाचा प्रमुख स्रोत झालेला आहे.

पर्यटक-प्रवासी असणाऱ्या खवैय्यांना लुभावण्यासाठी हॉटेल्समधून स्वीकारले जाणारे बदल हे शहरीकरण करणारे ठरले आहेत. कोरोना महामारीमुळे इतर व्यवसायांवर जसे संकट कोसळले तसेच हॉटेल व्यवसायावर देखील कोसळले. मात्र इतर संकटांवर मात करण्याची क्षमता असणाऱ्या हॉटेल व्यवसायाला या संकटांवर मात करणे इतर व्यवसायांपेक्षा जास्त अवघड चालले आहे. एकतर सततच्या ‘लॉक डाऊन’मुळे पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे. याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला आहे. स्थानिक खवैय्यावर आता हॉटेल्सची मदार आहे. त्यातच सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टनसिंग या प्रतिबंधात्मक उपाय योजनांमुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे.

ज्याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येतोय अश्या ठिकाणी मर्यादित सूट देत लॉक डाऊन शिथिल केले जात आहे. मात्र कोरोनाची दहशत अजूनही कमी झाली नसल्याने कुटुंबासह हॉटेलमध्ये जाण्याचे धाडस अजूनही केले जात नाही. शिवाय मर्यादित वेळेत लोकांच्या भुकेच्या वेळेत हॉटेल व्यवसायाची सांगड घालणे व्यावसायिकांना अजूनतरी जमताना दिसेना. कोरोनाची एकापाठोपाठ येणारी लाट आणि सततच्या लॉक डाऊनच्या भीतीच्या दडपणातून केंव्हा सुटका होणार ? हे सध्यातरी सरकार किंवा कुठला भविष्यवेत्ता देखील सांगू शकणार नाही.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

मराठेशाहीचे छत्रपती पद नाकारणारे राजे फत्तेसिंह भोसले

अक्कलकोटचे राजे फत्तेसिंह भोसले

इसवीसन १७०७ मध्ये बादशहा औरंगजेब याच्या मृत्यूनंतर मुघलांच्या नजरकैदेत असलेल्या शाहू महाराजांची सुटका झाली. त्यानंतर मराठेशाहीची विस्कटलेली घडी बसवितांना आप्तस्वकीयांशी दोन हात करीत छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या न्यायप्रिय धोरणांचा ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या शेवटच्या काळात राज्याचा वारस कोण असावा याविषयी चाचपणी केली असता अष्टप्रधान मंडळाकडून छत्रपती शाहू महाराजांचे मानसपुत्र अक्कलकोटचे नरेश फत्तेसिंह राजे भोसले यांचे नाव पुढे आले होते. मात्र फत्तेसिंह राजे भोसले यांनी मराठेशाहीचे छत्रपती पद अतिशय विनम्रतेने नाकारले होते. राज्याची ही जोखीम घेण्यास कुणीच तयार न झाल्याने मराठेशाहीचे राज्य चालविण्याची जोखीम पेशव्यांकडे चालत आली. जर फत्तेसिंह राजे भोसले यांनी ही संधी सोडून दिली नसती तर…? पण ‘जर आणि तर’ला इतिहासात स्थान नसते हेच खरे आहे.

स्वराज्यासाठी मुलूखगिरी करताना…

पुत्रवत सन्मान प्राप्त झालेले फत्तेसिंह राजे भोसले नेमके कोण ? तर मुघलांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर स्वराज्यात परत येत असतांना पारद या गावी छत्रपती शाहू आणि पारदचे शहाजी पाटील यांच्यात छोटी लढाई झाली. या लढाईत पारद गावचा शहाजी पाटील मारला गेला. त्याच्या विधवा पत्नीने नुकतेच जन्माला आलेले मूल शाहू महाराजांच्या पायावर घालून जीवदान मागितले. शाहूंनी आनंदाने त्या मुलाचा स्वीकार केला अन् पारद गावी लढाईत फत्ते झाली म्हणून या मुलाचे फत्तेसिंह असे नामकरण करून त्याला आपल्या सोबत घेतले. तेच हे अक्कलकोटचे राजे फत्तेसिंह भोसले. पुढे छत्रपती शाहू यांच्या एक राणी बिरुबाई ही फत्तेसिंह यांना आपला मुलगा मानत होती. औरंगजेब बादशहाच्या नजरकैदेत असतांनाच छत्रपती शाहू यांचे १७०३ साली खेड येथील छावणीत रुस्तुमराव जाधव यांच्या कन्या अंबिकाबाई यांच्यासोबत बादशाही खर्चाने लग्न लावले होते. रिवाजाप्रमाणे लग्नानंतर बादशहाच्या दर्शनाला जाताना करवली म्हणून आलेल्या बिरुबाई या दासीलाच आपली नववधू म्हणून शाहू महाराज सोबत घेऊन बादशहाच्या दर्शनाला गेले. बादशहाच्या लक्षात हा प्रकार आला. मात्र त्याने दोघांना आशीर्वाद दिले. पुढे तेहतीस वर्षे हीच दासी महाराणी बिरुबाई म्हणून ओळखली गेली. मराठी राज्यकारभारात बिरुबाईचे मोठे वजन होते. तिचा शब्द डावलण्याचे धाडस कोणी करत नसत. हे सांगण्याचे कारण याच बिरुबाईने फत्तेसिंह यांना आपला मुलगा मानलेले असल्याने स्वराज्यावर आपला अधिकार दाखविणे फत्तेसिंह यांना फार अवघड नव्हते. पहिला बाजीराव पेशवा आणि फत्तेसिंह हे समवयस्क असल्याने निदान पेशवेपदावर तरी अधिकार सांगणे त्यांच्या हातात होते. मात्र शौर्यात बाजीराव आपल्यापेक्षा काकणभर सरस आहेत हे मान्य करीत त्यांनी पेशवेपदाची चालून आलेली संधी देखील सोडून दिली होती.

छत्रपती शाहू यांच्या राज्याभिषेकानंतर दिल्लीच्या बादशहाने त्यांना दख्खन मधील सहा सुभे चौथाई वसुलीसाठी सरदेशमुखी म्हणून बहाल केले होते. हे सहाही सुभे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या पराक्रमी सरदारांमध्ये वाटले. फत्तेसिंह यांना ते राजपुत्राप्रमाणे वागवीत असल्याने या सहा सुभ्या पैकी कर्नाटक सुभा त्यांनी फत्तेसिंह यांच्या नावे बहाल केला होता. बाल फत्तेसिंह यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या निगराणी खाली युद्धकलेचे धडे गिरविल्या नंतर वयाच्या १७ व्या वर्षापासूनच स्वराज्यासाठी तलवार परजली. स्वराज्याची घडी सुव्यवस्थित बसविण्यासाठी पेशवे आणि पंतप्रतिनिधी यांच्यासमवेत फत्तेसिंह भोसले यांनी अनेक लढाया यशस्वी केल्या. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला होता. जवळपास चाळीस वर्षे शत्रूच्या ताब्यात असलेला हा किल्ला परत स्वराज्यात सामील करण्यात फत्तेसिंह यांनी पेशवे आणि प्रतिनिधींच्या मदतीने जिंकलेले युद्ध इतिहासात दखलपात्र ठरले.

अक्कलकोट येथील नवीन राजवाडा

आयुष्यभर तन मन आणि धनाने सातारच्या गादीशी इमान राखलेल्या फत्तेसिंहराजे भोसले यांनी छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी बिरुबाई यांच्या आशीर्वादानेच अक्कलकोट संस्थानाची निर्मिती केली. महाराणी बिरुबाईंच्या अंतसमयी त्यांच्यावर फत्तेसिंह राजे भोसले यांनीच मुलगा म्हणून अंत्यसंस्कार केले होते. तर १७४९ साली छत्रपती शाहू महाराजांच्या महानिर्वाणानंतर मराठेशाहीचे चालून आलेले छत्रपती पद नाकारत फत्तेसिंह यांनी अखेरपर्यंत स्वराज्याची चाकरी केली. आयुष्याच्या उत्तरकाळात अक्कलकोट येथे आयुष्य व्यतीत करणाऱ्या फत्तेसिंह महाराजांचे १७६० मध्ये महानिर्वाण झाले. त्यानंतरही त्यांच्या पुढच्या पिढीने सातारच्या गादीशी असलेले आपले इमान कायम ठेवले. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी संपूर्ण मराठेशाहीचे पारिपत्य केल्यानंतरही कोल्हापूरची गादी आणि सातारच्या गादीबरोबरच अक्कलकोट संस्थानाला कायम ठेवले. कदाचित यामुळेच स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र निर्मितीच्यावेळी बेळगाव कर्नाटकात समाविष्ट झाला असला तरी सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातच कायम ठेवावा लागला असावा. फत्तेसिंहराजे भोसले यांच्या मराठेशाहीशी असलेल्या इमानाचाच हा परिपाक असावा.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

कोरोना महामारीच्या एक वर्षात आपण काय मिळवलं ?

 1. भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या पहिल्या ‘लॉक डाऊन’ सत्राला एक वर्ष पूर्ण झाले.
 2. जवळपास पाच सत्रांच्या या लॉक डाऊनचा कालावधी अकरा महिन्यांचा होता.
 3. अजूनही देशांतर्गत बऱ्याच ठिकाणी कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी ‘लॉक डाऊन’चे हुकमी शस्त्र सरकारकडून वापरात येत आहे.
 4. याकाळात पूर्णपणे बंदिस्त झाल्याने कोरोनाच्या दहशतीमुळे जीवनपद्धतीत बराचसा बदल स्वीकारावा लागला.
 5. रोजगार बंद झाल्याने उपजीविकेसाठी घरातूनच छोट्या व्यवसायांची सुरुवात करण्यात सर्वच स्तरातील लोक आघाडीवर राहिले.
 6. या छोट्या व्यवसायांना भवितव्य असेल का ? की जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर हे छोटे व्यवसाय गुंडाळून ठेवण्यात येतील ?
 7. ज्याठिकाणी लॉक डाऊन शिथिल करण्यात आलेले आहे त्याठिकाणी जणू काही झालेच नाही या अविर्भावात लोक पुन्हा पूर्वपदावर आल्याने उपजीविकेसाठी सुरू झालेले छोटे व्यवसाय गुंडाळून ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.

लॉक डाऊनच्या काळात उपजीविकेसाठी ‘वर्क फ्रॉम होम’चा नारा लावत घरातूनच छोट्या व्यवसायांना सुरुवात करण्यात आली होती. जीवघेण्या कोरोना महामारीने माणसाला जगण्यासाठी सध्याच्या जीवनपद्धतीत अमुलाग्र बदल करायला शिकवले. जगायचं असेल तर कोणतेही काम करायला लाजायचं नाही, ही शिकवण अंगीकारत श्रीमंत वर्गातील लोकांनी देखील घरातूनच छोट्या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला कौतुकाचा विषय ठरलेले हे छोटे व्यवसाय देशाच्या ‘जीडीपी ग्रोथ’ पर्यंत आणले. मात्र ‘कोरोनाने माणसाला जगायला शिकवले’ असा दिव्य संदेश देणारे हे छोटे व्यवसाय ज्याठिकाणी लॉक डाऊन शिथिल करण्यात आले आहे तिथून गडप झाल्याचे दिसत आहेत. भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या विशाल देशाच्या अर्थकारणाला टेकू देणारे हे छोटे व्यवसाय अचानक गडप का होत आहेत ? याचा अभ्यास मात्र कुणालाच करायची आवश्यकता वाटत नाही.

घरातून सुरु झालेल्या या छोट्या व्यवसायात सर्वात जास्त घरगुती महिलांचा सहभाग होता. खाद्यपदार्थांची विक्री, भाजीपाला विक्री, हस्तकलाकृतींची विक्री पासून घरगुती वापरासाठीच्या वस्तूंची विक्री, घरगुती पोळी-भाजी विक्री या अशाप्रकारच्या छोट्या व्यवसायातून घरखर्च भागवीत लॉक डाऊन काळातील उपजीविकेचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात निकाली निघाला हे जरी खरे असले तरी पण यापद्धतीचे व्यवसाय सातत्याने करण्यासाठी जी अंगमेहनत आणि व्यावसायिक दृष्टी लागते त्याचे गृहिणी असलेल्या महिलांमध्ये प्रमाण कमी आढळते. त्यामुळेच जनजीवन पूर्वपदावर आल्यावर हे व्यवसाय बंद होताना दिसत आहेत.

तरुण नवउद्योजकांच्या बाबतीतही यापेक्षा वेगळी स्थिती दिसत नाही. पुरुषवर्गातील नवउद्योजक भलेही अंगमेहनतीच्या कामात बाजी मारेल मात्र व्यावसायिक दृष्टीच्या बाबतीत तो जास्त अपडेट दिसत नाही. बाजारातील चढ-उताराबरोबरच भविष्यातील अडथळ्यांबाबत तो अनभिज्ञ असतो. त्यामुळे वेळप्रसंगी आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी छोट्या व्यवसायात गुंतून पडणारी तरुणाई सातत्य नसल्याने अर्थकारणाचा अविभाज्य भाग कसे बनतील ? शेवटी कोरोना महामारीच्या या एक वर्षाच्या काळात आपल्यातील या उणीवा प्रकर्षाने उघड झाल्या असल्या तरी कोरोनाने आपल्या जीवनपद्धतीत जे बदल घडविले आहेत त्याचा अंगीकार करत आपण बदलणे अपेक्षित आहे हे मात्र खरे…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

टोल नाका मुक्तीचा केंद्राचा निर्णय झाकोळला…!

पथकर वसुलीसाठी देशभर उभारल्या गेलेले टोल नाके

राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाबरोबरच ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या प्रणालीमुळे रस्ते बांधणी करणाऱ्या कंपन्या आणि केंद्र सरकारमध्ये करार होवून पथकर वसुलीसाठी ठिकठिकाणी ‘नाके’ उभारून ‘टोल संस्कृती’ची सुरुवात करण्यात आली. विकासासाठी रस्ते हवेत पण रस्त्या बरोबरच ‘टोळधाड’ स्वीकारण्याची पाळी आली. रस्ते बांधणी करणाऱ्या कंत्राटी कंपन्यांबरोबर तीस वर्षांपर्यंतच्या करारामुळे या टोलनाका वसुलीतून सुटका होत नव्हती. मात्र केंद्र सरकारने नव्या तंत्रप्रणालीचा अवलंब करीत टोल नाक्यापासून मुक्ती देणारा निर्णय घेतला आहे. आगामी वर्षात याची अंमलबजावणी संपूर्ण देशभर केली जाणार आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत संबंधित विषयाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना टोल नाक्याबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली.

पथकर भरण्यासाठी वाहनांच्या लागणाऱ्या रांगा.

एव्हढा महत्वपूर्ण निर्णय झाला असतांना देखील सध्या देशभर चर्चेत असलेल्या वाझे प्रकरण, हप्ता वसुली आणि लेटर बॉम्ब प्रकरणाने उलथापालथ सुरू असल्याने मुंबई या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू ठरला आहे. राज्याच्या गृहमंत्र्यानेच दरमहा शंभर कोटीच्या वसुलीचा आदेश दिला असल्याचे पत्र हा ठाकरे सरकारला ‘गोत्यात’ आणणारा विषय ठरत आहे. या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा ‘टोल नाका’ मुक्तीचा निर्णय झाकोळला गेला आहे. वाहनधारक, वाहतूकदार, सहप्रवासी यांच्याकडून वेळोवेळी टोल नाक्याच्या विरोधात विरोध उसळून आलेल्या घटना पहायला मिळतात. टोल नाक्यावरच्या गैरसोयी, टोल कर्मचाऱ्यांची अरेरावी, टोल नाका परिसरातील स्थानिकांचे प्रश्न यासंदर्भात तोडफोडीच्या हिंसक घटना देखील पहायला मिळतात. या पार्श्वभूमीवर टोल नाकामुक्त सीसीटीव्ही कॅमेराच्या सहाय्याने अद्ययावत यंत्रणेद्वारे आपल्या बँक खात्यातून पथकर वसूल करणारी पद्धत सरकार अवलंबित आहे. नेहमीच संघर्षाच्या रोषाला ‘खळ खट्याक’ संस्कृतीमुळे बळी पडणारे टोल नाके आणि सरकारची पथकर वसुली हे वाचणार आहेत. एव्हढ्या महत्वपूर्ण निर्णयाकडे मात्र सद्य परिस्थितीतील राजकीय घडामोडींमुळे डोळेझाक झाली असल्याचे दिसत आहे.

रांगेपासून मुक्ती मिळविण्यासाठी ‘फास्टॅग’पद्धतीचा अवलंब सुरू आहे.

टोल नाक्यावर पथकर भरण्यासाठी रांगा लावून प्रतीक्षा करावी लागते हा नेहमीचा कटकटीचा विषय ठरतो. याबरोबरच वाहनधारक आणि टोल कर्मचारी यांच्यातील नेहमीचा शाब्दिक संघर्ष यापासून आता सुटका होणार आहे. मात्र याबरोबरच हजारो टोल कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेवर आता गदा येणार आहे. याबरोबरच टोल नाक्याच्या अवतीभवती स्थिरावलेली छोटी दुकाने, हॉटेल्स, धाबे यांच्या व्यवसायावर आता परिणाम होणार आहे. एकतर रस्त्यांची बांधणी आणि विस्तारीकरणाने अनेक गावांच्या बाजारपेठा स्थलांतरित झाल्या आहेत. उड्डाणपुलामुळे अनेक गावे आर्थिक विकासाच्या नकाशावरून लुप्त होत आहेत. वाहतुकीची रहदारी वळविण्याच्या प्रयत्नात बाह्यवळण रस्त्यांमुळे गावांच्या उद्योग-व्यवसायावर परिणाम होत आहे.

आता गावाच्या अर्थकारणाला हातभार लावणारे छोटे मोठे व्यवसाय, गावाची बाजारपेठ ही टोल नाका परिसरातच वसलेली दिसत आहे. टोल वसुलीच्या नव्या प्रणालीमुळे या अर्थकारणाला फटका बसणार आहे. जर टोल साठी वाहने नाक्यावर थांबणारच नसतील तर या व्यवसाय कसा होणार ? शासनाने ग्रामीण अर्थकारण आणि विकासाचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. केवळ पथकर वसुली अधिक काटेकोर करण्याच्या प्रयत्नात ग्रामीण अर्थकारणाला धक्का बसवून चालणार नाही. शहर आणि महानगरांच्या जवळपास असणाऱ्या टोल नाक्याबाबतची स्थिती वेगळी असू शकते. मात्र छोट्या व्यवसायांची परिस्थिती सगळीकडे सारखीच आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

रिळ वाला प्रोजेक्टर…अडगळीतील आठवणी..!

 • बालपणी आई-वडिलांकडे भोकाड पसरून हट्ट करीत पाहिलेल्या पहिल्या सिनेमा पासून आपल्या आयुष्याला घट्ट चिटकून राहते ती सिनेमा सृष्टी.
 • बालपणातच सिनेमाविषयी आकर्षण तयार होतं अन् वय वाढत जातं तसं ते आकर्षणही वाढत जातं.
 • शाळेत मधल्या सुट्टीत दप्तरात दडवून ठेवलेले नायक-नायिकांच्या फोटोंचा संग्रहाबरोबरच फिल्मच्या तुकड्यांचा संग्रह देखील महत्वाचा असायचा.
 • बालपणी फिल्मचे तुकडे गोळा केले नाहीत असा माणूस अभावानेच सापडेल.
 • आता यूएफओ तंत्रामुळे ना फिल्मची रिळे तयार होतात ना मोठ्या प्रोजेक्टरची आवश्यकता भासते.
बाल मनाला भुरळ घालणारे हेच ते फिल्म प्रोजेक्टर….

सिनेमा हा फक्त भारतीयच नाही तर जगातल्या प्रत्येक माणसांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलेला आहे. फार इतिहासात डोकावून पाहण्याची आवश्यकता नाही. अगदी आपल्या बालपणापासून बघितलं तरी पुरेसे आहे. आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेला सिनेमा, त्याची ष्टोरी नाही आठवणार, नायक-नायिका देखील आठवणार नाहीत. पण सिनेमाचं नाव नक्कीच लक्षात असते. घरातील वडील धाऱ्यांनी आठवणीने सांगितलेला आपला धांगडधिंगा पुढे आयुष्यभर आपला तोंडपाठ असतो. तर अश्या सिनेमा नावाच्या जादूशी आपली घट्ट मैत्री होते ती साधारणतः वयाच्या १०-१२ वयापासून. शाळेतील मित्रांकडून गयावया करून जमवलेल्या फिल्मच्या तुकड्यांपासून ही मैत्री सुरू होते.

सर्वात जास्त फिल्मचे तुकडे आपल्याजवळच असावेत या इर्षेपोटी शाळेत-वर्गात ‘दोस्ती-दुश्मनी’चे नाट्य देखील घडते, प्रसंगी मारामारी देखील होते. फिल्मचे तुकडे मिळविण्यासाठी बाल वयाला शोभेल असा ‘काळाबाजार’ करायला देखील आपण मागेपुढे पहात नाही. फिल्मचे तुकडे मिळविण्यासाठी सिनेमा थिएटरच्या अवतीभवती चकरा मारण्यात शाळेला दांडी मारली जायची. शहरात ‘थिएटर’ असल्याने शहरी मुलांना वर्षभर फिल्मचे तुकडे मिळायचे. पण अर्धशहरी अथवा ग्रामीण भागातील मुलांना या फिल्मच्या तुकड्यांसाठी वर्षभर वाट पहावी लागायची. गावच्या जत्रेत येणाऱ्या ‘टुरिंग टॉकीज’मुळे ही तहान भागविली जायची.

प्रोजेक्टर चालकाने रिळ जोडताना केलेल्या फिल्मचे तुकडे गोळा करण्यात वेगळीच मजा असायची.

जत्रेत टुरिंग टॉकीज आल्या की जवळपास महिनाभर त्यांचा मुक्काम असायचा. याकाळात शाळेला बुट्टी मारून फिल्मच्या तुकड्यांच्या शोधात ‘टोळी’ने जाण्यात मजा यायची. पहाटे शो संपल्यानंतर तंबूतच झोपलेल्या कर्मचाऱ्यांना जाग यायच्या अगोदर म्हणजेच सकाळी ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास कनातीचे कापड उचकटून हळूच तंबूत प्रवेश मिळवायचा अन् मग प्रोजेक्टरच्या पत्र्याच्या शेड पर्यंत दबकत चोरपावलांनी जाऊन रिळचे तुकडे गोळा करायचे. एकदा काम फत्ते झाले की तिथून सुम्बाल्या करायचा. पकडले गेलोच तर एकतर गपगुमान मुस्काटात खायची, चड्डीत खोचलेले फिल्मचे तुकडे परत करायचे किंवा मोठ्याने भोकाड पसरून गोंधळ उडवून पसार होण्याचा प्लॅन बनवायचा. हे तंत्र वापरावे लागायचे.

प्रोजेक्टर जवळच बसून सिनेमा बघायचा…..

फिल्मचे तुकडे गोळा करण्यातही ‘स्मार्ट वर्क’ असायचे. टुरिंग टॉकीजच्या सफाई कामगारापासून कोणाचीही दोस्ती करायची. अन् मग त्याच्याकडून गोडीगुलाबीने फिल्मचे तुकडे मिळवायचे. पण हे काम खूपच वेळ खाणारे आणि ‘शान के खिलाफ’ असायचे. पण काहीही करून फिल्मचे तुकडे गोळा करण्यासाठी या तंत्राचा देखील वापर करावा लागायचा. यात प्रोजेक्टर चालवणारा ऑपरेटर महत्वाचा असायचा. त्याच्याशी दोस्ती करायची म्हंटल्यावर त्याने सांगितलेली किरकोळ कामेही प्रसंगी करावी लागायची. विडी, सिगारेट, तंबाखू आणून देणे, चहाची ऑर्डर सांगायला जाणे अशी ती कामे असत.

यूएफओ सिस्टिममुळे हे फिल्म प्रोजेक्टर आता अडगळीत जमा झालेत.

आधुनिकीकरणाच्या लाटेत सिनेमाचे तंत्र देखील बदलले. एकेकाळी लाखों रुपयांची गुंतवणूक करून खरेदी करावी लागणारी फिल्मची रिळे, त्यावरची अमेरिकेत जावून करावी लागणारी प्रोसेस आणि मोठमोठे फिल्म प्रोजेक्टर आता सर्व कालबाह्य झालेत. छोट्या शहरातूनही मल्टिप्लेक्स उभारलेत. यूएफओ तंत्राने सॅटेलाईटद्वारे चित्रपट प्रदर्शित करण्याचे तंत्र विकसित झाल्याने आता प्रोजेक्टरचा जमाना संपला आहे. ऍप्स आणि चॅनल्सच्या माध्यमातून चित्रपट आता तुमच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे थिएटरची गर्दी ओसरली आहे तर जत्रेची उत्सुकता संपल्याने ‘टुरिंग टॉकीज’ची सद्दी संपली आहे. मुलांना देखील इलेक्ट्रॉनिक खेळणी आणि कॉम्प्युटर गेम्सचे वेड लागल्याने फिल्मचे तुकडे गोळा करण्याचा छंद कसा लागणार .? आता ह्या सगळ्या अडगळीतल्या आठवणी ठरल्या आहेत.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

भारतात ‘व्हॅलेन्टाईन वीक’ म्हणजे ‘प्रपोज’चा उच्छाद…?

 • दरवर्षी प्रमाणे ७ फेब्रुवारी पासून व्हॅलेन्टाईन वीक सुरू झालाय. पहिलाच ‘रोझ डे’ असल्याने दिवसभर फुल विक्रेत्याकडे गुलाबाचा भाव वधारलेला दिसला.
 • रोमन परंपरेतील हा प्रेम व्यक्त करणारा उत्सव जेंव्हा ख्रिश्चन धर्मियांनी धार्मिकतेने स्वीकारला त्यानंतरच हा उत्सव जगभर पसरला.
 • भारतात ब्रिटिश राजवटीचा पाया भक्कम होवू लागला त्याच काळात म्हणजेच १८०० सालाच्या प्रारंभीच्या दशकात धर्म प्रसारासाठी भारतात आलेल्या ख्रिश्चन मिशीनरीच्या माध्यमातून ‘व्हॅलेन्टाईन डे’ हा उत्सव भारतीयांना माहीत झाला.

याचा अर्थ प्रेम व्यक्त करणारा उत्सव किंवा ती प्रकटिकरणाची भावना वैदिक धर्मात अथवा हिंदू तसेच इतर धर्मात नव्हती का ? तर होती. पण ब्रिटिशांनी आणि ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी ‘संत व्हॅलेन्टाईन’ यांच्या आत्मबलिदानाचा उदोउदो करण्यामागे धर्मप्रसार एव्हढेच कारण असल्याने ब्रिटिशांची ज्या-ज्या देशात राजवट होती,त्या-त्या देशात धर्मप्रसारकांनी संत व्हॅलेन्टाईन यांच्या बलिदानाचा उत्सव म्हणून ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्याला धार्मिक अधिष्ठान देत त्याचे धार्मिक सणात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. यापाठीमागे केवळ मुक्त स्वातंत्र्याचा गवगवा करीत अधिक प्रमाणात धर्मांतर घडवून आणणे हाच हेतू असावा. याबरोबरच इतर धर्माच्या तुलनेत आपला धर्म किती समतावादी आणि मानवतावादी आहे हे ठसविण्याचा देखील प्रयत्न असावा.

पण खरी गंमत अशी आहे की, ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होत स्वातंत्र्य मिळविलेल्या लोकशाही पुरस्कृत भारत देशात व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्याचे अलीकडच्या काळात म्हणजेच वीस-पंचवीस वर्षांपूर्वी पासून ‘पेव’ फुटले आहे. याला कारण जागतिकीकरणाच्या रेट्यात होणारे संस्कृती प्रदूषण हे असावे. पाश्चात्य जीवनपद्धती अंगिकारली की जगाच्या पाठीवर कुठेही आपण स्वीकारले जावू शकतो हा बुद्धिभ्रम असे परकीय संस्कृतीची भलावण करणारे उत्सव साजरे करायला भाग पाडतो.

गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून या प्रेमदिवसाच्या सादरीकरणाचा फोलपणा अधिक गडदपणे समोर येवू लागला आहे. आता एकविसाव्या शतकात माणूस धर्म आणि त्याचं पावित्र्य बाजूला ठेवून उत्सव साजरे करताना दिसत आहे. अश्या काळात सर्वच प्रकारच्या सार्वजनिक उत्सवावर सामाजिक सलोख्यासाठी नियंत्रण ठेवावे लागणार आहे. मग संत व्हॅलेंटाईनच्या नावावर होणारा प्रेमाचा उच्छाद तरी आपण सहन का करायचा ?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

आष्टीच्या लढाईत मराठ्यांची धुळदान उडवणारी ‘गॅलिपर’ गन !

 • २० फेब्रुवारी १८१८ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील त्याकाळी माढा तालुक्यात असलेल्या आष्टी (सध्या मोहोळ तालुक्यात) येथे ब्रिटिशांबरोबर झालेल्या युद्धातील पेशवाईच्या दारुण पराभवाची अनेक कारणे आहेत.
 • ज्या दुसऱ्या बाजीरावाला ‘पळपुटा’ हे विशेषण इतिहासाने बहाल केले ते हेच आष्टीचे मराठेशाहीचे शेवटचे निकराचे युद्ध.
 • अंतर्गत कलहाने जर्जर झालेल्या पेशवाईत बंडाळी माजल्यानंतर ठिकठिकाणी होणाऱ्या उठावांना सैनिकी बळ देवून मराठेशाहीचे पतन करणारे हे शेवटचे युद्ध, ज्या युद्धानंतर फक्त मराठेशाहीच नाही तर सारा देश पारतंत्र्यात गेला तेच हे आष्टीचे युद्ध.
 • ‘फोडा आणि झोडा’ या कुटनीती बरोबरच या युद्धात मराठेशाहीची कर्दनकाळ ठरली ती ब्रिटिशांची ‘गॅलिपर’ गन.
 • दोनशे वर्षांपूर्वी आष्टीत घडलेल्या मराठेशाहीच्या पानिपतचा नव्याने अभ्यास मांडणे म्हणजे इतिहासाचे पुनर्विलोकन करणे ठरू शकते.
हीच ती गॅलिपर गन.

आष्टीच्या लढाईतील मराठेशाहीच्या पराभवाची कारणमीमांसा अतिशय तटस्थतेने शोधणे गरजेचे झाले आहे. मुळातच त्याकरिता मराठेशाहीचे राज्यशकट चालविणाऱ्या ‘पेशवाई’तील अंतर्गत कलह, बेदिली आणि तिजोरीतील खडखडाटामुळे वाढलेली लूटमार ही कारणे दुसरा बाजीराव पेशव्यांच्या विरोधात बंडाळी माजविण्यासाठी प्रमुख कारणे ठरली होती. त्यातच आत्तापर्यंतच्या पेशव्यांच्या तुलनेत पराक्रमी नसलेला दुसरा बाजीराव सत्तास्थानी बसणे हे एक मराठेशाहीतील बेदिलीचे प्रमुख कारण बनले असावे.

हाच तो दुसरा बाजीराव पेशवा.

मराठेशाहीतील बंडाळीने उग्ररूप धारण करायला सुरुवात केली ती साधारणतः ऑक्टोबर १८१७ पासून. ब्रिटिशांनी याच संधीचा फायदा घेत बंडखोरांना सैन्यबळ, दारुगोळा आणि रसद पुरविण्यासोबतच सत्तांतराचे आमिष दाखविले. ब्रिटिशांचे सैन्य ताकदवान बनले होते, स्वदेशी सत्तेतील बेदिली हे प्रमुख कारण असले तरी ब्रिटिशांची स्वयंशिस्त आणि आधुनिकतेचा पुरस्कार हे देखील ब्रिटिश सैन्य ताकदवान बनण्याची कारणे होती. त्यातही ब्रिटिश सैन्यात नव्याने समाविष्ट झालेली ‘गॅलिपर गन’ ही प्रमुख ताकद बनली होती.

१७४० सालात ब्रिटिशांनी युरोपात वसाहतवादी युद्धात यशस्वी वापर केलेली ही भारतात आपले वर्चस्व वाढविण्यासाठी आणली तीच मुळात १८०० सालात. त्यामुळेच याकाळात देशी राजवटी विरोधात ब्रिटिश वरचढ होताना दिसतात. ही गॅलिपर गन म्हणजेच छोट्या आकाराची तोफ अवघी ६० पौंड वजनाची आहे. तर ती एका घोड्याच्या मदतीने सहजतेने ओढून नेता येते. कॅरेजसह तिचे वजन फक्त ६०० पौंड एव्हढे होते. अत्यंत वेगवान हालचालीत दिशा बदलून प्रखर मारा करण्यात सक्षम असणारी ही गॅलिपर गन आष्टीच्या लढाईत मराठ्यांचा कर्दनकाळ ठरली.

हेच ते आष्टीचे रणांगण. जिथे मराठेशाहीचे पानिपत झाले. साठ वर्षांनंतर म्हणजेच १८८० मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांच्या पानिपताचा इतिहास पुसून टाकत तलाव बांधला.

तर ऑक्टोबर १८१७ पासून बंडाळीने त्रस्त झालेल्या दुसऱ्या बाजीरावाला ९ जानेवारी १८१८ मधील भीमा-कोरेगावच्या युद्धात नामोहरम करीत ब्रिटिशांनी त्याला पुण्यातून हुसकावून लावले. सातारच्या छत्रपतींकडे सैन्याची कुमक मागायला आलेल्या दुसऱ्या बाजीरावाच्या मागावर ब्रिटिश होते. सतत ब्रिटिशांना चुकवत त्यांच्यावर छुपे हल्ले करीत निघालेला दुसरा बाजीराव आणि मराठ्यांचा शेवटचा सेनापती बापू गोखले हे आष्टी येथे मिळाले. त्यांच्या मागावर असलेला ब्रिटिश ब्रिगेडियर स्मिथ आणि त्याची रेजिमेंट कंपनी यांचा सामना २० फेब्रुवारी १८१८ मध्ये याच मैदानावर झाला. उजव्या बाजूला भीमा नदी तर डाव्या बाजूला ओढा असलेल्या या जंगलात गनिमी काव्याने लढणाऱ्या सेनापती बापू गोखले यांच्यावर आणि त्यांच्या मूठभर मावळ्यांवर गॅलिपर गनचे गोळे बरसले. बापू गोखले धारातीर्थी पडले ही खबर समजल्यावर युद्ध सोडून दुसरा बाजीराव घोड्यावर मांड ठोकून पळाला. मराठा सैन्य सैरभैर झाले अन् ब्रिटिशांनी आष्टीचे युद्ध जिंकले. या युद्धानंतरच भारतावर युनियन जॅक फडकून ब्रिटिशांचा एकछत्री अंमल सुरू झाला. जेंव्हा सैन्यदल अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज होते तेंव्हा पराक्रमी शत्रूला देखील नामोहरम करता येते हेच यातून सिद्ध झाले. या इतिहासाचे अतिशय तटस्थतेने पुनर्विलोकन होणे यासाठीच गरजेचे आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

चाळीस वर्षांपासून ‘पेटंट’च्या प्रतीक्षेत असलेल्या घड्याळाची कहाणी…!

 1. कुटुंब नियोजनाचे महत्व सांगणारे टायटेक्स या सोलापूरस्थित ६ फूट ६ इंच उंचीचे वैशिष्ट्यपूर्ण घड्याळ.
 2. जुन्या अडगळीत बंद घड्याळाच्या पार्टसचा वापर करून हे घड्याळ बनवले.
 3. कुटुंब नियोजनाचे महत्व सांगणाऱ्या लक्षवेधी हलत्या देखाव्याचा समावेश.
 4. घड्याळ दुरुस्तीचे काम करणारे बसवराज विरपाक्षप्पा खंडी हे या घड्याळाचे निर्माते. सध्या त्यांचे वय ८१ वर्षाचे आहे.
 5. १९८० मध्ये कार्यान्वित झालेले हे घड्याळ गेल्या चाळीस वर्षात एकदाही बंद पडलेले अथवा नादुरुस्त झालेले नाही.
 6. बसवराज खंडी यांची या घड्याळाच्या पेटंटसाठी गेल्या चाळीस वर्षांपासून प्रतीक्षा सुरूच आहे.

कर्नाटकातील गुळेदगुडु (ता. बदामी, जि. विजापूर) येथे जन्मलेले बसवराज खंडी हे वडिलांच्या मृत्यूपश्चात उपजीविकेसाठी वयाच्या १७ व्या वर्षी १९६० साली सोलापुरात आले. सुरुवातीला १८ रुपये महिना पगारावर दुसऱ्याच्या घड्याळाच्या दुकानात नोकरी करणाऱ्या बसवराज खंडी यांनी १९६४ मध्ये शुक्रवारपेठेत स्वतःचे घड्याळाचे दुकान सुरू केले. उपासमार आणि आर्थिक विवंचनेतून स्वतःची सुटका करीत एक चांगला घड्याळजी म्हणून नावलौकिक निर्माण करण्यात आणि एका दुकानाची तीन दुकाने करण्यात त्यांची पुढची दहा वर्षे गेली. या दरम्यान त्यांनी लग्न करून संसार थाटला.

१९७४ च्या सुमारास त्यांनी घरातील अडगळीच्या सामानात जुनी बंद पडलेली घड्याळे उकलून त्यातील उपयुक्त साहित्यासह नवे अदभूत घड्याळ बनवायला सुरुवात केली. त्याकाळी देशात कुटुंब नियोजनाचे वारे वाहू लागले होते. शासनाने त्याकरिता खास धोरण राबविले होते. देशप्रेमाने भारावलेल्या बसवराज खंडी यांनी कुटुंब नियोजनाचा प्रसार आणि प्रचाराचा उदात्त हेतू ठेवून एक हालता देखावा या घड्याळात बसविण्याचा निर्णय घेतला. हेच या घड्याळाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. त्यासाठी त्यांनी एक ‘थीम’ तयार केली.

या थीम प्रमाणे ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबाची एक कथा तयार केली. एक महिला तिची लहान मुलगी अन् कडेवर एक तान्हुली मुलगी, गावाचा सरपंच आणि त्या महिलेचा पती अशी पाच पात्रे आणि स्थळ दर्शविणारे झाड अशी रचना या देखाव्यात केली आहे. घड्याळात तासाला बरोबर पाच मिनिटे कमी असतांना ती महिला घंटी वाजवून आपल्या पतीला बोलावते. तो झाडावरून खाली उतरतो. उतरताना तो लाईट लावतो. पत्नीशी सुखसंवाद साधतो. अन् पुन्हा घंटी वाजवून झाडावर कामासाठी चढतो. तास पूर्ण होण्या अगोदर चुकून जरी बोलावले तरी तो नुसताच येऊन घंटी न वाजवताच निघून जातो. हा हालता देखावा निव्वळ मूक दृष्यस्वरूपात बरेच काही सांगून जातो. हे घड्याळ बनवायला बसवराज खंडी यांना सात वर्षे लागली. २६ जानेवारी १९८० मध्ये हे घड्याळ कार्यान्वित झाले. तेंव्हापासून आजतागायत हे घड्याळ कधीच नादुरुस्त झालेले नाही अथवा बंद पडलेले नाही.

या घड्याळाची देशपातळीवर चर्चा झाली आहे. वृत्तपत्र माध्यमांनी या शोधाला त्याकाळी भरभरून प्रसिद्धी दिली आहे. विदेशातही या घड्याळाची चर्चा झाली. मात्र या घड्याळाचे पेटंट मात्र अद्यापही बसवराज खंडी यांना मिळालेले नाही. यासाठी ते गेली चाळीस वर्षे धडपडत आहेत. नुकताच २६ जानेवारीला त्यांनी आपला ८० वा वाढदिवस साजरा केला आहे. अजूनही ते या घड्याळाच्या पेटंटच्या प्रतीक्षेत आहेत.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

कोविड मुक्त चर्चेचे अन् हंगामातील गूळ निर्मितीचे ‘गुऱ्हाळ’ सुरू…..!

2020 सालाच्या सरतेशेवटी लॉक डाऊनच्या कचाट्यातून सुटका झालेल्या ग्रामीण भागातून कोविड प्रतिबंधक लसीच्या चर्चेचे ‘गुऱ्हाळ’ जसे गावच्या चावडीवर-पारावर सुरू झाले तसे यंदाच्या ऊसाच्या हंगामातील गूळ निर्मितीचे ‘गुऱ्हाळ’ देखील सुरू झाले आहे. सेंद्रिय गूळ आणि काकवी (ऊसाचा उकळता पाक) तयार करण्याकडे गूळ उत्पादकांचा वाढता कल दिसून येत आहे.

पूर्वी ग्रामीण भागातून गावोगावी ऊस उत्पादक आपल्या शेतात गूळ निर्मितीचे ‘गुऱ्हाळ’ लावायचे. मात्र सहकारीकरणातील साखर कारखान्यांबरोबरच खासगी मालकी तत्वांच्या वाढलेल्या साखर उद्योगामुळे उसाच्या मळ्यात सर्रास दिसणारे ‘गुऱ्हाळ’ हळूहळू कमी दिसू लागले. एकीकडे साखरेची मागणी वाढत गेली तर दुसरीकडे वाढत्या महागाईने गूळ निर्मितीला लागणाऱ्या वस्तू महाग मिळू लागल्या आणि गूळ निर्मितीसाठी लागणारे मनुष्यबळ मिळत नसल्याने ‘गुऱ्हाळ’ चालवणाऱ्यांची संख्या कमी होत गेली.

साखर कारखाने नव्हते तेंव्हा गुळाचाच वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने गूळ निर्मितीचा उद्योग तेजीत होता. गुऱ्हाळ हे फक्त गूळ निर्मितीचे उद्योगकेंद्र नव्हते तर ग्रामीण संस्कृती आणि सांस्कृतिक घटनांचे ते प्रमुख केंद्र बनले होते. ज्याच्या शेतात गुऱ्हाळ लागायचे त्याच्या शेतात गावकरी, पै-पाहुणे काकवी प्यायला अन् ताज्या गुळाची चव चाखायला गर्दी करायचे. सोबत जेवणावळींच्या पंक्ती झडायच्या. करमणुकीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जायचे. येणाऱ्या पाहुण्यांमध्ये ‘सोयरिकी’, नवे नातेसंबंध जुळायचे. महिना-दोनमहिने निव्वळ महोत्सवी वातावरण असायचे. मात्र कारखान्यांमुळे साखर उत्पादन वाढले, मागणीही वाढली तसे गूळ महात्म्य हळूहळू कमी झाले.

मात्र पुन्हा एकदा प्रकृतीवर परिणाम करणाऱ्या रासायनिक प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा वापर कमी करण्याची जागर मोहीम तीव्र झाली तसे सेंद्रियशेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला. आरोग्यदायी आणि रसायनमुक्त म्हणून सेंद्रिय गूळ निर्मितीसाठी ‘गुऱ्हाळे’ सुरू झाली. अर्थात मनुष्यबळाचा अभाव आणि गुळाला योग्य भाव मिळत नसल्याची गूळ उत्पादकांची तक्रार आहेच. सरकारने त्यांना देखील हमी भाव द्यावा हीच त्यांची मागणी आहे. मात्र यासगळ्या अडथळ्यातूनही ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असणारे ‘गुऱ्हाळ’ आपले अस्तित्व टिकवून आहे. हे ही नसे थोडके.

सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरच्या ग्रामीण भागात गूळ निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. २०१९ ची पूरपरिस्थिती आणि २०२० ची कोविड महामारीची परिस्थिती या पार्श्वभूमीवर यंदा २०२१ च्या हंगामात ‘गुऱ्हाळ’ सुरू झालेत. यंदा अपेक्षित गूळ उत्पादन होईल की नाही ? त्याला रास्तभाव मिळेल की नाही ? या प्रश्नांची उत्तरे सध्यातरी मिळत नसली तरी गुऱ्हाळे सुरू झालीत. कोविडची लस आपल्याला कधी मिळेल ? याची खात्री नसतांनाही आपण सोशल डिस्टनसिंग तोडत ‘मास्क’ भिरकावून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवले अगदी तसेच गूळ निर्मितीचे गुऱ्हाळ सुरू झालेत.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

कर्तबगारीसाठी नेमका किती वेळ मिळतो…?

 • मनुष्यप्राणी शतायुषी असतो असं म्हणतात. म्हणजेच शंभर वर्षांच्या आयुष्यात आपल्याला कर्तबगारी दाखवायला नेमका किती वेळ मिळतो ? कधी विचार केलाय का ?
 • माझ्या जवळ जरा सुद्धा मोकळा वेळ नाही, असं म्हणत आपण आपल्या जवळ असलेली वेळ चुकवितो की आपण खूप ‘बिझी’ आहोत अशी समजूत करून घेतो ?
 • शंभर वर्षांचे आयुष्य गृहीत धरले तर आयुष्याचे एकूण ३६ हजार ५०० दिवस होतात. या दिवसातून कर्तबगारीची नेमके किती दिवस आपल्या हाती असतात ?

परमेश्वराने जरी आपल्याला १०० वर्षांचे आयुष्य दिले असले तरी त्यातील निम्मी वर्षे रात्रीत निघून जातात. म्हणजेच ५० वर्षाचे आयुष्य आपण खऱ्या अर्थाने जागेपणी जगतो. यातील २५ वर्षे हे बालपण आणि पदवी पर्यंतचे शिक्षण घेण्यात जातात. तर उर्वरित २५ वर्षात कुटुंबाची जबाबदारी, लग्न आणि स्वतःच्या मुलांचे संगोपन यासह मृत्यू येईपर्यंतचा वृद्धापकाळ यामध्ये जातात. याच २५ वर्षात आपल्याला कर्तबगारी दाखविण्यासाठी वेळेचे नियोजन करायचे असते. अर्थात वयाच्या पंचविसाव्या वर्षी व्यवसाय अथवा नोकरीच्या माध्यमातून कमाईला सुरुवात झाली की लगेचच एक-दोन वर्षात आपण लग्न करतो. त्यानंतर एक-दोन वर्षातच मुलाबाळांची संगोपनाची जबाबदारी अंगावर पडते. याच काळात परिश्रमपूर्वक व्यवसाय अथवा नोकरीत स्थिरता मिळविण्यासाठी आपल्याला ५ ते १० वर्षांचा कालावधी खर्च करावा लागतो. मग पुढे कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मुलाबाळांचे शिक्षण आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी वेळ खर्च करावा लागतो.

हेच गणित आपण तासांच्या हिशोबावर मांडले तर आयुष्यात दिवसाचे चोवीस तास याप्रमाणे एका वर्षाचे ८ हजार ७६० तास होतात. जर काही करण्यासाठी २५ वर्षांच्या काळात सर्व जबाबदाऱ्यांच्या व्यस्ततेमधून वेळ काढला तर केवळ ५ वर्षांचा कालावधी शिल्लक राहतो. म्हणजेच संपूर्ण आयुष्यात ४३ हजार ८०० तास तुमच्यासाठी महत्वाचे ठरतात. यातच तुम्हाला कर्तबगारी दाखविण्यासाठी संधी मिळते. काहीजणांना या पाच वर्षात वारंवार तर काही जणांना ती एकदाच मिळते. त्या संधीचे सोने करता आले तरच जन्माचे सार्थक झाले असं आपण म्हणतो. हा पाच वर्षांचा कालावधी सर्वसाधारणपणे वयाच्या ४० ते ४५ च्या दरम्यान येतो. काहीजणांना त्याही अगोदर किंवा शेवटच्या टप्प्यात म्हणजेच निवृत्तीच्या अगोदर मिळतो. शेवटी आयुष्यभर काबाडकष्ट आणि संघर्ष केल्यानंतर गणिती भाषेत सांगायचे तर अवघ्या एक वर्षाचे म्हणजेच ८ हजार ७६० तासांचे समाधानाचे आयुष्य मिळते. यालाच जीवन ऐसें नाव.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

लॉक डाऊन मधल्या सवयी आता विसरायच्या का…?

 • गेल्या कित्येक वर्षांपासून धकाधकीच्या जीवनात आपण आपले कौटुंबिक सुख हरवून बसलो होतो. लॉक डाऊनमुळे कुटुंबात एकत्रितपणे वेळ घालवण्याची संधी मिळाली.
 • बालपणी घरातील वडीलधारी मंडळींकडून झालेल्या संस्काराची पुन्हा उजळणी झाली.
 • प्रत्यक्ष भेट होत नसली तरी ख्याली खुशाली विचारण्यासाठी का होईना जिवलग मित्रांशी सुखसंवाद साधला गेला.
 • कमाई बंद आणि बाजार बंद अश्या स्थितीत कमीतकमी खर्चात घर चालविण्याचा नवा मंत्र मिळाला. अनावश्यक गोष्टींना आपोआपच कात्री लागल्याने गरजा कमी झाल्या.
 • संकटकाळात एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची परोपकारी वृत्ती वाढली. आपल्या जवळचे दुसऱ्याला देताना मिळणारा आनंद उपभोगता आला.
 • घरातूनच काम (वर्क फ्रॉम होम) सुरू झाल्यानंतर घरकामाचे महत्व अधिक जाणवले. त्यामुळे घरातील महिला सदस्यांचे महत्व पटले. नाती अधिक घट्ट होण्यासाठी लॉक डाऊन कालावधी हा एकप्रकारे उपकारकच ठरला.

जवळपास दहा महिने कोरोनाच्या दडपणाखाली काढल्यानंतर संपूर्ण जग आता पूर्वपदावर येवू लागले आहे. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या कोविड-19 लस देखील आता उपलब्ध झाली आहे. अर्थात तिचे उपयोगीत्व अद्याप सिद्ध व्हायचे आहे, पण ‘बुडत्याला काडीचा आधार’ या म्हणी प्रमाणे दडपणाचे ओझे दूर झाले आहे हे मात्र खरे ! आत्ताशी पहिल्या टप्प्याचे लसीकरण सुरू झाले आहे. सरकार सगळ्यांनाच मोफत लस देवू शकणार नाही, तशी अपेक्षाही कुणी केलेली नाही. मात्र गोरगरिबांना परवडेल अश्या दरात लस उपलब्ध व्हावी एव्हढीच देशवासीयांची माफक अपेक्षा आहे. साधारणतः ऑगस्ट २०२१ मध्ये ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे. म्हणजे अजून सहा महिन्यांनी कोरोनाचा साधा ‘मलेरिया’ होईल, या विचाराने सर्वसामान्य लोक आत्तापासूनच निर्भयतेने पुन्हा ठिकठिकाणी गर्दी करू लागलेत. मास्क आता नाका-तोंडावरून घसरून गळ्यात ‘टायचा बो’ बनला आहे. सोशल डिस्टनसिंग म्हणजे अवमान असा समज पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. माणूस पूर्वपदावर येतो म्हणजे पुन्हा हटवादी बनतो, असंच काहीसं म्हणावं लागेल.

संकटकाळात एकमेकांच्या मदतीसाठी सरसावणारे ‘हात’ आता पुन्हा स्वतःपुरते पुढे येताना दिसणार का ? माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा जास्त संवेदनशील आणि सशक्त बुद्धीचा प्राणी समजला जातो. मग महामारीच्या संकटातून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली असतांनाच आपण याकाळात लागलेल्या चांगल्या सवयी भिरकावून देणार आहोत का ? हा प्रश्न प्रत्येकानेच आपल्या मनाला एकदा विचारलाच पाहिजे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

लस उपलब्ध होत असल्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला..!

 • कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या १ एप्रिल पासून पूर्णतः बंद झालेल्या कार्यालये आणि उद्योग-व्यवसायाच्या कार्यालयांमधून कर्मचाऱ्यांची उपस्थिती शंभर टक्के दिसू लागली आहे.
 • जवळपास ८ महिने ‘वर्क फ्रॉम होम’च्या कचाट्यात अडकलेल्या उद्योग विश्वातील लाखों कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा ‘वर्क कल्चर’चा कार्यालयीन अनुभव मिळू लागलाय.
 • भारतात पहिल्या टप्प्यातील लसीकरण दि. १६ जानेवारीपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर काही महिन्यांत लस आपल्यापर्यंत पोहोचेल हा आशावाद आता जनतेला कोविडपासून निर्भयतेकडे नेत आहे.
 • २०२१ या नव्या वर्षाचे स्वागत जरी जंगी झाले नसले तरी गेल्या आठ दिवसातील गतिमान झालेल्या सकारात्मक बदलामुळे भारतातील उद्योग, व्यापार आता हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे.
 • आता फक्त शिक्षणक्षेत्राकडे लक्ष देणे आवश्यक बनले असून यावर्षी अगदी वेळेत शैक्षणिक सत्र सुरू करण्याकडे सरकारचे प्राधान्य राहील.

दि. 23 मार्च 2020 पासून सुरू झालेल्या लॉक डाऊनमुळे विविध आस्थापना कार्यालये आणि उद्योग-व्यवसायावर फार मोठा परिणाम झाला. कार्यालयांचे कामकाज ठप्प होवू लागले. मल्टी नॅशनल आणि कार्पोरेट कंपन्यांनी मात्र ‘वर्क फ्रॉम होम’चा फंडा वापरून लॉक डाऊनमुळे कार्यालयात येवू न शकणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करायला भाग पाडले. अर्थात कार्यालयीन कामे होत असली तरी उत्पादकता पूर्णपणे ठप्प झाल्याने उद्योगविश्व धोक्यात आले होते.

याकाळात कोविड योद्धा म्हणून प्रशासन व्यवस्था, आरोग्य विभाग, रुग्णालये, स्वयंसेवी संस्था आणि प्रसार माध्यमांनी प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून आपली सर्वोत्कृष्ठ सेवा बजावली. यामुळे कोविड विरोधात राष्ट्रीय पातळीवर एकात्मिक भावना रुजविण्यास मदत झाली. या प्रयत्नाव्यतिरिक्त उत्पादकता पातळीवर कमालीचे नुकसान उद्योग क्षेत्राला सोसावे लागले. अर्थात सर्व जगाचीच ही स्थिती झाली होती. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जगाने नरसंहार सहन केला. मात्र युद्ध ज्वराने पछाडलेल्या अथवा बाधित झालेल्या कोणत्याही देशात उत्पादकतेवर अंकुश आला नव्हता. यापूर्वीही अनेकवेळा जगभर साथीच्या महामारीने थैमान घातले होते. पण उत्पादकता कधी ठप्प झाली नव्हती. कोविड मुळे मात्र जगाला ही झळ मोठ्याप्रमाणात सहन करावी लागली आहे. आता मात्र ज्या-ज्या देशात लसीकरण सुरू होत आहे त्या-त्या देशातील जनजीवन पूर्वपदावर येवू लागले आहे. हीच या नव्या वर्षाची सकारात्मक सुरुवात आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

‘कर’मूल्ये तू प्रशासन…वसुली ते ‘कर’ दर्शनम…!

कराग्रे दिसते पालिका
कर मध्ये धनसंपदा
कर'मूल्ये'तू प्रशासनम
वसुली ते 'कर'दर्शनम ।।

गतवर्षी बरोबर आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ३१ मार्च २०२० मध्ये आपण कोरोना महामारीच्या विळख्याला सुरुवात झाली होती. म्हणजे इतर देशात हाहाकार उडाला होता, पण आपल्याकडे कोरोना काही येणार नाही या भ्रमात आपण होतो. दि. २३ मार्च २०२० पर्यंत सर्वकाही आलबेल होते. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या अखेरीस सर्वप्रकारच्या करांची (टॅक्सची) वसुली सुरू झाली होती. एव्हढ्यात दि. २३ मार्चपासून सरकारला कोविड महामारीच्या प्रतिबंधाकरिता ‘लॉक डाऊन’ पुकारावा लागला. त्यामुळे पालिकेची कर वसुली मोहीम काही काळापुरती तूर्त स्थगित ठेवण्यात आली.

सुरुवातीला आठ-पंधरा दिवस ‘लॉक डाऊन’चे सत्र सुरू राहील या समजामुळे सर्वांनीच अगदी रिलॅक्स मूडमध्ये लॉक डाऊन एन्जॉय केला. पुढे लॉक डाऊनचे सत्र वाढतच गेले. सर्व व्यवहार ठप्प, कमाई बंद अश्या अवस्थेत शिल्लक पैसे संपले अन् मग सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होवून इतरांकडून ‘मदत’ मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले. निदान तशी मानसिकता तयार झाली. सरकारने देखील आठ महिन्यांच्या लॉक डाऊनच्या काळात किती सवलतींच्या घोषणा केल्या हे आता सरकारच्या तरी लक्षात आहेत का ? हा देखील एक प्रश्नच आहे. येनकेन प्रकारे आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा खेळ नशिबी आला.

याकाळातील प्रॉपर्टी टॅक्स माफ जरी झाला नाही तरी काही सवलत मिळेल या आशेपोटी बहुतांश लोकांनी टॅक्स भरलेला नाही. बरं वसुलीसाठी स्थानिक पालिका प्रशासन कितीकाळ वाट पाहणार ? जानेवारी २०२१ च्या प्रारंभातच कोविड लस देण्याच्या हालचालींना वेग आल्यानंतर वातावरणातला तणाव जरी हलका होत असला तरी कोविडचा प्रभाव अद्यापही कमी झालेला नाही. वर्षभर कमाई नसल्याने आणि शिल्लक रक्कम संपविल्याने आता कफल्लक झालेली जनता टॅक्स भरू शकणार आहे का ? तरी देखील प्रशासनाने टॅक्स गोळा करण्यासाठी आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.

३१ मार्चला आर्थिक वर्षाची सांगता करण्यासाठी जानेवारीच्या मध्यापासूनच प्रशासन टॅक्स वसुलीची मोहीम राबविण्यास सुरुवात करत असते. यावर्षी तर दोन वर्षांचा टॅक्स एकदम येणार आहे. जे लोक नियमित टॅक्स भरतात त्यांना देखील हे अडचणीचे ठरणार आहे. अनियमित टॅक्स भरणाऱ्यांचा तर विचारच करायला नको. सध्या ग्रामिणभागात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. मतदारांना गोंजारण्यासाठी कदाचित टॅक्स वसुलीची मोहिम सक्तीची होणार नाही असे जरी गृहीत धरले तरी शहरी भागातील वसुली सक्तीने करण्याकडे सरकारचा कल स्पष्ट दिसत आहे. सरकारच्या तिजोरीत पैसे येण्यासाठी सध्या हाच मार्ग प्रशासनाला सोयीचा वाटणार आहे. आज नाही तर उद्या टॅक्स हा भरावाच लागणार आहे. ‘बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी’ अशी अवस्था सध्या जनतेची झाली आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

टेंभुर्णी सारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका..!

 1. देशात सर्वदूर शिक्षण पोहोचले असे आपण म्हणत असलो तरी अद्यापही शैक्षणिक वातावरण सुदृढ झाले असे म्हणता येणार नाही.
 2. ग्रामीण भागात महाविद्यालये सुरू झाली पण पारंपारिक शिक्षणाव्यतिरिक्त स्पर्धात्मक तयारीचा अभाव दिसून येतो.
 3. ग्रामीण भागातील योग्यताधारक विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आणि मार्गदर्शन मिळत नसल्याने हे विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडतात.
 4. मोठ्या शहरातून स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी भरमसाठ शुल्क आकारणारे क्लासेस आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे परवडणारे नाही.
 5. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये देखील आयएएस,आयपीएस होण्याची क्षमता आहे. त्यांना पुस्तके, मार्गदर्शन आणि अद्ययावत अभ्यासिकेची खरी गरज आहे.
 6. ही गरज ओळखूनच टेंभुर्णी सारख्या गावात अवर ओन फाऊंडेशन (our own foundation) या सेवाभावी संस्थेने १२००० स्क्वेअर फूट जागेत अद्ययावत वातानुकूलित अभ्यासिका आणि ग्रंथालय उभारले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी (ता. माढा) या पन्नास हजार लोकवस्ती असलेल्या गावात आजूबाजूच्या खेडेगावातील विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची सोय आहे. मात्र महाविद्यालयीन शिक्षणाव्यतिरिक्त स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी या विद्यार्थ्यांना पुण्यातील महागड्या क्लासेसमधून लाखों रुपये शुल्क भरून प्रवेश घेणे आवाक्याबाहेरचे होते. ग्रामीण विद्यार्थ्यांची ही कुचंबणा लक्षात घेऊन टेंभुर्णीचे ज्येष्ठ समाजसेवक बशीरभाई जहागीरदार यांनी स्थापन केलेल्या ‘अवर ओन फाऊंडेशन’ या सेवाभावी संस्थेमार्फत सुसज्ज, अद्ययावत आणि वातानुकूलित ग्रंथालय आणि अभ्यासिका आता पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून संस्थापक अध्यक्ष बशीरभाई जहागीरदार यांनी गोरगरिबांना, अपंग तसेच विद्यार्थीवर्गासाठी भरीव असे मदतकार्य उभारले आहे. रुग्णांसाठी आर्थिक मदत दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉक डाऊनच्या काळात अन्नदान आणि मदतकार्य उभे केले आहे. त्यांना काही दानशूर व्यक्तींनी याकामी मदतही केली आहे. मात्र समाजोपयोगी कार्य करतांना बशीरभाई यांनी लाखोंची पदरमोड देखील केली आहे.

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्याच गावात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी. एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देऊन त्याने आयएएस-आयपीएस बनावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी एकवीस लाख रुपये खर्च करून अद्ययावत- वातानुकूलित असे ग्रंथालय आणि अभ्यासिका उभारली आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा हाच त्यामागे उदात्त हेतू आहे. सोलापूर शहरातही एम.के.क्लासेसने अश्याच पद्धतीने एक सुसज्ज ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू केली आहे. मुंबई-पुणे नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आता ग्रामीण भागातून अभ्यासिका सुरू होत आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

:-मुकुंद मधुकर हिंगणे.

ब्रिटन बरोबरची विमानसेवा सुरू करण्याची घाई कश्यासाठी…?

 1. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढू लागलाय.
 2. कोरोनाच्या नव्या प्रकारचे ८२ रुग्ण भारतात सापडले आहेत.
 3. नव्या स्ट्रेनचा फैलाव वेगाने होत असला तरी त्याच्या परिणामबद्दल अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून कुठलीही अद्ययावत माहिती नाही.
 4. भारत-इंग्लंडच्या फेब्रुवारीत होणाऱ्या टेस्ट सिरीजसाठी विमानसेवा सुरू होतेय का ?

भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढू लागलाय. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे भारतात ८२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अधिक सतर्कता बाळगण्याची ही वेळ आहे. गतवर्षी चीन मधील वुहान शहरातून कोरोना हा विमानसेवेच्या माध्यमातूनच जगभर पसरला होता. आता देखील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा फैलाव याच माध्यमातून होईल म्हणून अनेक देशांनी आपले हवाईमार्ग बंद केले आहेत. कोरोनावर लस निर्माण झाली असली तरी अजून लसीकरण आणि त्याचा परिणाम समोर यायचा आहे. मग ज्या ब्रिटनमधून कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला तिथे आपण विमानसेवा का सुरू करतोय ? हाच सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.

८ जानेवारी पासून ब्रिटन आणि भारत दरम्यान विमानसेवा पूर्ववत होत आहे. अर्थात विमानप्रवासी आणि क्रू मेंबर्स यांच्या आरटी पीसीआर चाचणी सक्तीची असून पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला तातडीने विलगिकरणात राहावे लागणार आहे. मात्र सुरक्षा यंत्रणा तैनात करून हा प्रयोग कश्यासाठी केला जातोय ? हा प्रश्न उरतोच. ही विमानसेवा दि. २३ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर तीनच दिवसांनी म्हणजेच २६ जानेवारी हा गणतंत्र दिवस येतोय. याकाळात आठवड्यात एकूण तीस फेऱ्या होणार आहेत. भारताकडून १५ तर ब्रिटनकडून १५ फेऱ्या होणार आहेत. म्हणजेच साधारणतः पंधरा दिवसात एकूण ६० फेऱ्या होणार आहेत. आता यामध्ये एखादा पॉझिटिव्ह आढळला. त्याला तातडीने विलगिकरण कक्षात ठेवला अन् तिथून तो निसटला तर…? गेल्या वर्षभरात अशाप्रकारच्या कित्येक घटना आपल्या अंगलट आल्या आहेत. मग ही विषाची परीक्षा आपण का घेतोय ?

दि. ५ फेब्रुवारी पासून ८ मार्च पर्यंत भारत आणि इंग्लंड दरम्यान चार मॅचेसची टेस्ट सिरीज होणार आहे. विमानसेवा सुरू होण्यावरच या टेस्ट सिरीजचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे सुरुवातीला २३ जानेवारीपर्यंत सुरू राहणारी विमानसेवा पुढे निरंतर केली जावी म्हणून हा प्रयोग केला आहे का ? हा प्रश्नही आता गुलदस्त्यात आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

औषध निर्मितीच्या क्षेत्रात भारत जगात अव्वल क्रमांकावर

निसर्ग निर्मित आपत्ती असो अथवा महामारीची आपत्ती असो, आपत्ती व्यवस्थापन आणि त्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न यात भारत आता जगात अव्वल क्रमांकाचा देश म्हणून पुढे येत आहे. भारत देश हा जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे, त्याबरोबरच आता औषध निर्मितीच्या क्षेत्रात देखील जगात अव्वल क्रमांकाचा ठरला आहे. महासत्ता बनण्याच्या दृष्टीने भारताचे एक पाऊल पुढे पडले आहे.

कोविड-19 च्या महामारीच्या निमित्ताने जगभरात भारताचे आपत्ती व्यवस्थापन आणि लस निर्मितीच्या प्रयत्नांचे जगभरातून कौतुक होत आहे. कित्येक देशांनी भारता बरोबरचे आपले व्यापारविषयक संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. महासत्ता म्हणून जगावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा चीन देखील भारताबाबत नरमाईची भूमिका घेत आहे, त्याचे कारण देखील भारत हा विकसनशील देशांच्या यादीतून महासत्तेच्या रांगेत जावून बसला आहे हे आता जगाने मान्य केले आहे.

जगात एकशे नव्वदहून अधिक देश आहेत. यामध्ये फक्त पन्नास देश हे विकासाच्या वाटेवर आहेत. तर सात देश महासत्ता असल्याचा दावा करणारे देश आहेत. शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधन आणि उत्पादन क्षेत्रात विकास साधत या सात देशांनी महासत्ता असल्याचा दावा केला आहे. भारत देखील आता त्या रांगेत जाऊन बसला आहे. कोविड-19 ची लसीच्या उत्पादनात भारत या महासत्ता समजल्या जाणाऱ्या देशांच्या बरोबरीचा झाला आहे. जवळपास पस्तीस देशांनी कोविड लसीची मागणी भारताकडे नोंदविली आहे, यातच सर्वकाही आले आहे. सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशीच ही घटना आहे. महामारीशी लढा देतांना जगाचे नेतृत्व करण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला मिळत आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.