तौक्ते चक्रीवादळ, कोरोनाचं थैमान आणि बटरफ्लाय इफेक्ट…..!

एकीकडे भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच दुसरीकडे अरबी समुद्रात उसळलेले तौक्ते चक्रीवादळ हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर किती नुकसानकारक ठरेल याची चिंता वाढवीत आहे. या दोन्ही घटनांमध्ये साम्य असणारी एक गोष्ट आहे, ती म्हणजे ‘बटरफ्लाय इफेक्ट’…प्रसिद्ध गणितज्ञ आणि हवामान शास्त्रज्ञ एडवर्ड लॉरेन्झ यांचा हवामानशास्त्रात वापरला जाणारा ‘बटरफ्लाय इफेक्ट’ हा सिध्दांत. काय सांगतो हा सिध्दांत..?

बटरफ्लाय इफेक्ट ही संकल्पना हवामानशास्त्रात अतिशय प्रसिद्ध आहे. या संकल्पनेनुसार फुलपाखराच्या पंख फडकाविण्याच्या एका छोट्याशा कृतीने जगात त्सुनामी निर्माण होवू शकते. ज्वालामुखीचे उद्रेक होवू शकतात. थोडक्यात आत्ता क्षुल्लक वाटणारी एखादी घटना पुढे जाऊन रौद्ररूप धारण करीत खूप जास्त मोठा परिणाम घडवून आणू शकते. या सिध्दांतामुळे हवामानाचा अंदाज घेणाऱ्या जुन्या पद्धती मोडीत निघाल्याने आज हवामानातील होणाऱ्या बारीक बदलांची तत्परतेने दखल घेतल्याने माणूस चक्रीवादळ, त्सुनामी सारख्या मोठ्या आपत्तीपासून स्वतःला वाचवू शकतो. किंबहुना होणारे मोठे नुकसान टाळू शकतो. हीच थेअरी आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काटेकोरपणे पाळली असती तर…?

फुलपाखराच्या पंख फडफडविण्यामुळे अमेझॉनच्या जंगलात ‘वणवा’ भडकला ही अतिशयोक्ती पूर्ण गोष्ट हवं तर तिला ‘दंतकथा’ म्हणूयात. या गोष्टी वरूनच एडवर्ड लॉरेन्झ याला हा सिध्दांत सुचला असाही लोकप्रवाद आहे. एडवर्ड लॉरेन्झ यांनी १९५० च्या दशकात हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी एक साधन शोधले. कारण त्यांना हवामानाचा अंदाज व्यक्त करणारे रेषात्मक मॉडेल कुचकामी असल्याचे लक्षात आले होते. त्यांनी शोधलेल्या या छोट्या बदलामुळे हवामान परीक्षण आणि निरीक्षणात अचूकता येण्यास मदत झाली. फुलपाखराच्या पंख फडफडविण्याने जंगलात वादळ निर्माण होवून आग भडकू शकत नाही हे सत्य असले तरी प्रक्रियेच्या सुरुवातीपासून लहान-लहान बदल घडविले तर त्यातून मोठे बदल घडू शकतात. फुलपाखरामध्ये लहान बदल घडविण्याची क्षमता असते. हेच सांगणारा ‘बटरफ्लाय इफेक्ट’ हा सिध्दांत आहे.

कितीही आवाहन केले, दंडात्मक कारवाई केली तरी आपण ‘मास्क’ वापरण्याला प्राधान्य देत नाहीय…..

आता एडवर्ड लॉरेन्झ यांच्या ‘बटरफ्लाय इफेक्ट’ या सिध्दांताचा कोरोनाशी काय संबंध ? असा विचार आपल्या मनात येणे स्वाभाविक आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सतत स्वच्छता पाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि तोंडावर ‘मास्क’ परिधान करणे हे अतिशय छोटे पण शक्य असणारे बदल आपण आजही पूर्णतः अंगिकारले नाहीत. आजही आपण छोट्या छोट्या गरजेच्या नसलेल्या गोष्टींसाठी बाजारात, दुकानासमोर, सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करतो. अश्यास्थितीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होणाऱ्या बाधितांची आणि मृतांची आकडेवारी ही वादळी अशीच आहे. त्यातही आपण लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहोत. भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात प्राधान्यक्रम देतानाही यंत्रणा कोलमडते. अश्यावेळी आपण ‘बटरफ्लाय इफेक्ट’ या सिध्दांतानुसार कोरोनाशी मुकाबला केला तर निदान ईथुनपुढे तरी होणारी मनुष्यहानी आपण टाळू शकतो. बाकी अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळापासून बचावासाठी यंत्रणा आधीच ‘अलर्ट’ झाली आहे. दरवर्षीच याकाळात चक्रीवादळे येत असतात. पण कोरोनाच्या लाटेपासून बचावाची दक्षता आपण घेणार नाही का…?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

‘मृत्यूभया’चा बाजार महागाईची वाढ करतोय का…?

जन्म ही जशी नैसर्गिक कृती आहे, तसाच मृत्यू देखील नैसर्गिकच आहे. मात्र मृत्यूचे निर्माण होणारे किंवा मुद्दामहून निर्माण केले जाणारे 'भय' हे नैसर्गिक असूच शकत नाही. गेल्या चौदा महिन्यांपासून कोरोना महामारीच्या परिणामांना तोंड देताना जो मृत्यूच्या भयाचा बाजार फुलला आहे त्याचा अर्थकारणावर विपरीत परिणाम होवून महागाईवाढीच्या दिशेने तर आपण चाललो नाहीत ना...?
गिरणगाव म्हणून ओळखले जाणारे माझे शहर आता बदलाच्या उंबरठ्यावर आहे…….

मी राहतो ते सोलापूर शहर (महाराष्ट्र राज्य) हे साधारणतः दहा-बारा लाख लोकवस्तीचे जिल्ह्याचे ठिकाण आहे. पूर्वी सूत मिल जोमात चालत होत्या, त्यामुळे कामगारांच्या चाळींनी गच्च भरलेले ‘गिरणगाव’ म्हणून या शहराची ओळख होती. आता चाळींच्या ठिकाणी बंगले, अपार्टमेंट उभारले आहेत. बरीच स्थित्यंतरे होत शहर बदलू लागले आहे. पण अजून पूर्ण विकसित या व्याख्येत हे शहर बसत नाही. बदलाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या शहरात वेगवेगळ्या दडपणाचे मनोविकार अगोदरपासूनच जडलेले आहेत. त्यात आता कोरोना महामारीमुळे मृत्यूच्या भयाचा मनोविकार (फोबिया) आकार घेत आहे. माझे मित्र मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नितीन भोगे यांना याबाबत विचारले तर ते म्हणाले की, बदलणाऱ्या या शहरात भौतिक चंगळवाद वाढतोय. कोरोना महामारीच्या असुरक्षिततेच्या वातावरणात मरण्यापूर्वी जगून घेण्याचा चंगळवाद वाढतोय. यातूनच मृत्यूचे भय (fear of death) हा फोबिया आकाराला येतोय.

बेचैनी किंवा विनाकारण मृत्यूच्या भीतीने हा फोबिया सर्वसामान्यपणे प्रत्येकाच्याच मनात आकाराला येतोय. मग मृत्यूच्या अगोदर जगून घ्यायला काय हरकत आहे म्हणून चंगळवाद वाढतोय. अगदी ऐंशीच्या दशकात अमेरिकेचे ‘स्काय लॅब’ कोसळण्याच्यावेळी याच ‘फोबिया’ने चंगळवाद वाढवला होता. आताही तेच दिसून येतंय. महामारीच्या सोबत मृत्यूची आलेली भीती ही जरी नैसर्गिक असली तरी ती नियंत्रित ठेवण्यासाठीचे जे प्रयत्न व्हायला हवेत ते झालेले दिसत नाहीत. त्यामुळेच लोक आता सततच्या ‘लॉक डाऊन’च्या सत्रामुळे सैरभैर झालेले दिसत आहेत. लस तयार होईपर्यंतची भीती आता लस तयार झाल्यानंतरही लसीकरणातील अनियमिततेमुळे अधिक पटीने वाढली आहे.

पहाटेपासून खरेदीसाठी स्टोअर समोर रांगा लागण्याचे प्रमाण केवळ अस्थिरतेच्या वातावरणातून निर्माण झाले आहे.

काल सकाळी माझा मित्र नौशाद शेख यांच्यासोबत गावात कामानिमित्त कार मधून जात असताना सहज मॉल कडे लक्ष गेले. सकाळी ७ वाजता उसळलेली गर्दी पाहिली….’यांना काय म्हणायचं ?’ सहजच पुटपुटलो. तेंव्हा कार चालवीत असलेला मित्राचा मुलगा साहिल म्हणाला, अंकल तुम्हाला माहिती आहे का ? गेल्या चौदा महिन्यांपासून ‘लॉक डाऊन’मुळे सर्व व्यापार-उद्योग बंद असतांना सर्वाधिक व्यवसाय हा जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीचा झाला आहे. गेल्या पाच वर्षात जेव्हढा नफा या व्यवसायात कमावला नव्हता त्यापेक्षा कैक पटीने अधिक नफा या लॉक डाऊनच्या काळात या व्यावसायिकांनी कमावला आहे. आता मला सांगा अंकल, उत्पादन शून्य टक्क्यांवर असताना गरजेपेक्षा अधिक मागणी आणि पुरवठा केला गेला तर बाजारात साठवणूक केलेली गोदामे रिकामी होतील. तरीही मागणी वाढतच जाणार आहे. मग काळाबाजार आणि पर्यायाने दरवाढ ही होत जाणार आहे. मरणाच्या भीतीने जगून घेण्याच्या या शर्यतीत आगामीकाळात आपल्याला महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. मी निरुत्तर असतांनाच कार पुढे सरकत होती. मरणाची भीती डोळ्यात साठवत चंगळवादासाठी प्रतिबंधाचे आदेश झुगारून घराबाहेर पडलेली गर्दी कारच्या काचेतूनही अंगावर येत असल्याचा भास होत होता.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

महामारीत अन्नदानाचे पवित्र कार्य करणारा निर्धन योद्धा…!

सोमनाथ मधुकर माशाळ

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेच्या वेळी म्हणजे मार्च २०२० नंतर लॉक डाऊनमुळे उपासमार होणाऱ्या गोरगरीब आणि मजूर,परराज्यातील मजूर, स्थलांतरितांच्या मदतीसाठी अनेक उद्योजक, कारखानदार, व्यापारी, गर्भश्रीमंत, करोडपती कलावंत मदतीसाठी धावून आले. माध्यमांनी देखील त्यांना चांगलीच प्रसिद्धी दिली. मात्र कोरोनाच्या सध्याच्या दुसऱ्या लाटेवेळी हे सगळे ‘दानशूर’ थकलेले असतांना गरीबवर्गातीलच काही तरुण मुले आपल्या उदरनिर्वाहाची ‘पुंजी’ याकामी खर्च करीत मानवतेची सेवा करताना अनेक ठिकाणी दिसत आहेत. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे सोलापूर शहरातील सलगरवस्ती भागात राहणारा सोमनाथ मधुकर माशाळ हा तरुण.

दररोज छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल झालेल्या रुग्ण आणि त्यांच्या सोबत आलेल्यांना ‘खिचडी’ वाटप करताना….

सोमनाथ माशाळ हा कुणी धनाढ्य कुटुंबातून आलेला तरुण नाही. सलगरवस्ती सारख्या वस्तीत राहणारा अंगमेहनतीचे काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवणारा तिशीतील तरुण आहे. सोमनाथ हा दिव्यमराठी या सोलापूरच्या वृत्तपत्र कार्यालयात ‘माळी’ या पदावर काम करणारा सेवक आहे. गत महिन्यात एकेदिवशी कार्यालयातून घरी जात असतांना सातरस्ता चौकात त्याला एक चार-पाच लोकांचा घोळका रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना विनवण्या करताना दिसला. सुरुवातीला चौकात उभारणारे भिकारी असतील असे समजून त्याने दुर्लक्ष केले. मात्र नंतर बारकाईने बघितल्यावर तो सुन्न झाला. तो घोळका हात पसरून पैश्याची भीक मागत नव्हता. तर ‘आम्हाला काहीतरी खायला द्या’ अशी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला विनवणी करीत होता. हे दृश्य पाहून हेलावलेल्या सोमनाथ माशाळने अश्या गरजूंना काहीतरी मदत करायची ! असा निर्धार केला. जवळ पैसे नाहीत. तरी मित्रांच्या मदतीने चार-पाच हजार रुपये पगार झाल्यावर परत देण्याच्या बोलीवर उसने घेतले. अन दि. १ मे या महाराष्ट्रदिनी अन्नदानाची ‘खिचडी’ प्रत्यक्षात शिजायला सुरुवात झाली.

सोमनाथ माशाळची संवेदनशीलता बघून दिव्यमराठी वृत्तपत्र कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, त्याचे गल्लीतील मित्र यथाशक्ती मदत करीत आहेत. कुणी तांदूळ, कुणी डाळ, अगदी तेल-तिखट, मिठापासून पौष्टिकतेसाठी त्यात मिक्स करण्यात येणाऱ्या ताज्या भाज्या, सोया याची मदत उभारतेय.

सहृदयता, माणुसकीचा झरा जिवंत असेल तर सोमनाथ माशाळ सारखा महिना सहा हजारी पगार कमावणारा देखील दररोज शंभर पोटांची भ्रांत मिटविण्यासाठी धडपड करू शकतो. त्याने सुरू केलेल्या या ‘अग्निहोत्रा’त कुणाला आपल्या मदतीच्या समिधा टाकायच्या असतील तर त्याला या मोबाईल क्रमांक 7798033325 वर संपर्क साधून आपली ऐच्छिक मदत करावी.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

पंढरपूरच्या दोनशे वर्षांपूर्वीच्या ‘बाजीराव’ विहिरीच्या निमित्ताने….!

पंढरपूर येथे १८११ च्या दरम्यान दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी बांधलेली अध्यात्मिक विसाव्याचे केंद्र ठरलेली हीच ती बाजीराव विहीर.
 • सामान्यतः इतिहासकालीन म्हणजेच साधारणतः दोनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वीची बांधकामे आपल्याला नेहमीच आकर्षित करतात.
 • त्यातही जी आजही सुस्थितीत आहेत त्याबद्दल आपल्या ‘अस्मिता’ही तीव्र असतात. मात्र त्या कालानुरूप नैमित्तिक असतात. ठराविक वेळेलाच त्याबद्दल आपण खूप संवेदनशील होतो.
 • पंढरपूर-पुणे रोडवरील पंढरपूर पासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाखरी येथील ‘बाजीराव’ विहिरीबाबत देखील आपली संवेदना अशीच आहे.
 • अर्थात ही विहीर एक उदाहरणच…इतिहासाची साक्ष आणि प्रेरणादायी ठरणाऱ्या अनेक वास्तू, गड किल्ले, विहिरी आज कोणत्या अवस्थेत आहेत ?
 • बाजीराव विहीर ही फक्त ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेली विहीर नसून महाराष्ट्राचे आणि वारकरी संप्रदायाचे आराध्यदैवत असणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या भेटीसाठी आषाढी एकादशीला लाखोंच्या संख्येने पायी चालत येणाऱ्या भक्तांच्या विसाव्याचे ठिकाण म्हणून या विहिरीला एक आगळे महत्व प्राप्त झाले आहे.
 • गेल्या दोनशे वर्षाहून अधिक काळापासून या बाजीराव विहिरीच्या ठिकाणी आषाढी एकादशीला श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे शेवटचे उभे गोल रिंगण होते. अशी आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली ही बाजीराव विहीर आहे.
उभ्या गोल रिंगण सोहळ्यासाठी दरवर्षी जमणारी वारकऱ्यांची लाखोंची गर्दी यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर होवू शकली नाही.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०२० पासून सातत्याने सुरू असलेल्या ‘लॉक डाऊन’च्या अंमलबजावणीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सर्वसामान्यांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. याबरोबरच वर्षातील चार एकादशीनिमित्त भरणारा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई केल्याने आषाढी-कार्तिकी एकादशीला पालखी-दिंड्यासह लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरला येवू शकले नाहीत. त्यामुळे या महामारीमुळे गेल्या दोनशे वर्षात पहिल्यांदाच बाजीराव विहिरीजवळ वारकरी भक्त विसाव्याला थांबले नाहीत. पहिल्यांदाच वाखरी जवळील या बाजीराव विहिरीचा परिसर पहिल्यांदाच लाखोंच्या संख्येतील वारकऱ्यांच्या गर्दीशिवाय निर्मनुष्य झालेला पहायला मिळाला.

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेकरिता लागणाऱ्या फुलांची आणि तुळशीची कायमस्वरूपी तजवीज करण्यासाठी दुसऱ्या बाजीराव पेशव्याने देवस्थानाला ही बाजीराव विहीर बांधून दिली तसेच विहिरीभोवतीची १५ बिघा जमीनही घेऊन दिली. हा उल्लेख पेशवेकालीन दफ्तरात सापडतो. दरम्यान लॉक डाऊनच्या काळातच राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात ही विहीर पाडण्याचा विचार सुरू असल्यावरून वारकरी मंडळांनी आवाज उठविल्यानंतर बाजीराव विहीर परत चर्चेत आली. अखेर शासनाने आपला विचार मागे घेतला असला तरी यानिमित्ताने जगातील पर्यटकांना आकर्षित करणारा महाराष्ट्राच्या मध्ययुगीन कालखंडातील ऐतिहासिक वारसा आपण जपणार आहोत की नाही हा प्रश्न इतिहासप्रेमी आणि पर्यटकांना पडला आहे. सध्या कोरोना महामारीच्या विळख्यातून सुटका करण्याला प्राधान्य असल्याने हा विषय तूर्त तरी शांत आहे.
उभ्या गोल रिंगणात मानाचे अश्व पळविताना.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

असहाय्य करणारी ‘भूक’ कोरोनाला घाबरेल काय…?

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १४ महिन्यांपासून ‘लॉक डाऊन’मुळे होणारी उपासमार आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. अजूनही पगारदार नोकरदारवर्ग महिनाभर पुरेल एव्हढा अन्नधान्याचा साठा करून सरकारने पुकारलेल्या ‘लॉक डाऊन’ला केवळ मरणाच्या भीतीने पाठिंबा दाखवीत निमूटपणे बंदिस्त जीवन जगतोय. पण ज्यांचं हातावर पोट आहे, दिवसभरात कमाई केली तरच संध्याकाळी ज्यांच्या घरात अन्न शिजू शकते अश्या दरिद्री लोकांनी हे लॉक डाऊनमधील बंदिस्त जीवन कसे जगायचे ? मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना अर्धपोटी जगता येईल एव्हढा शिधापुरवठा करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, उदारमतवादी श्रीमंत माणसे देखील आता थकली आहेत. आता त्यांच्यावरच कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. कोरोना महामारीच्या सोबतच आता भुकेची महामारी सुरू होईल की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. आभाळच फाटलंय तिथं ठिगळ कुठे कुठे लावणार..?

शिथिलतेच्या काळात भल्या पहाटे साडेपाच वाजल्यापासून मॉल समोर खरेदीसाठी रांगा लागत आहेत.

एकीकडे मोलमजुरी करणाऱ्या श्रमिक कष्टकरी वर्गाची उपासमार होत असतानाच पगारदार असणारा मध्यमवर्ग आणी लघु व्यापारी वर्ग देखील गेल्या १४ महिन्यांच्या लॉक डाऊनमुळे आर्थिकदृष्ट्या अर्धमेला झाला आहे. उद्योगधंदे, दुकाने, व्यापार सतत बंद असल्याने या वर्गाचे देखील कंबरडे मोडले आहे. आता कुटुंबाला पुरेल एव्हढा किराणा माल भरण्यासाठी ते देखील शिथिलतेच्या काळात पहाटेपासून मॉल समोर रांगा लावताना दिसत आहेत. कर्फ्यु मध्ये जराशी शिथिलता आली की गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात अनियंत्रित अशी गर्दी होतेय. हीच गर्दी पुढे कोरोनाचा ‘वाहक’ झालेली असते. टेस्टचे प्रमाण वाढवले की लगेचच कोरोना बाधितांचा आकडा वाढलेला दिसतोय. मग सरकारी यंत्रणा तणावात आल्या की पुन्हा अनिश्चित काळासाठी ‘लॉक डाऊन’ किंवा ‘कर्फ्यु’ची अंमलबजावणी करण्यात येते. परिणामशून्य नियोजनामुळे जनतेचा ठिकठिकाणी ‘उद्रेक’ होताना दिसतो. यातूनच सरकारवर अविश्वास दाखवत सर्वसामान्यांकडून कायदा मोडण्याच्या घटना घडत आहेत.

लॉक डाऊन सुरू होणार म्हंटलं की भाजीमंडईत खरेदीसाठी अशी झुंबड उडतेय.

कमीतकमी गरजा ठेवून जगायचं ताळेबंद आराखडा कितीही आखला तरी तो फक्त कागदावरच राहतोय. अनावश्यक चैन टाळून दोन वेळेचं पोट भरेल एव्हढं अन्न शिजवायचे ठरवले तरी भारतीय आहार पद्धतीनुसार जेवणासाठी ताटात किमान एकतरी ‘भाजी’ असावी हीच सामान्य अपेक्षा असते. त्यानुसार कर्फ्यु शिथिल झाला की किमान चार-पाच दिवस पुरेल एव्हढी भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांची भाजी मंडईत ‘गर्दी’ उसळते. बघता-बघता गर्दी एव्हढी होते की विक्रेता, बंदोबस्तासाठी असलेले पोलीस यांचं नियोजन कोसळते. मग हीच ‘गर्दी’ पुन्हा एकदा कोरोनाची ‘वाहक’ बनते. आता त्यात पुन्हा ‘लसीकरणासाठी’ जमणाऱ्या गर्दीची भर पडत आहे. लसीकरणासाठी पुरविण्यात येणाऱ्या कोविशील्ड आणि कोव्हाक्सीन लसीचा पुरवठा नियमित होत नसल्याने दररोज लसीकरण केंद्राच्या आवारात नोंदणीधारकांची ‘गर्दी’ होतेय. गर्दी होवू नये म्हणून सरकार ज्या-ज्या उपाययोजना करीत आहे. त्याच्या अंमलबजावणीतच ‘गर्दी’ होताना दिसत आहे. एकतर परिणामशून्य उपाययोजना आणि कालावधीची निश्चितता नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच पोटात उसळणारी भूक आता मरणाच्या भीती पलीकडे पोहोचली आहे. डोळ्यात ‘मरण’ साठवलेल्या गिधाडांसारखा माणसांचा ‘घोळका’ हवी ती वस्तू मिळविण्यासाठी तुटून पडताना दिसत आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

आई म्हणजे ममता, प्रेम अन वात्सल्य…!

घे जन्म तू फिरोनी येईन मी ही पोटी , खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी…प्रेमास्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई

जगात एकच नातं चिरंतन मानल्या जातं…ते म्हणजे आई ! इतर सगळी नाती ही माणूस स्वतःभोवती व्यवहारातून निर्माण करीत जातो. अनेक देश, अनेक प्रांत, अनेक धर्म, अनेक जाती,अनेक भाषा असल्या तरी आईचा देश, प्रांत, धर्म, जात आणि भाषा एकच असते. ती म्हणजे….. ममता, प्रेम, वात्सल्य !

आई जवळ असेल तर तो जगातला सर्वात भाग्यवान समजल्या जातो. तो वर्षातून फक्त एकदाच नाही तर रोज ‘मदर्स डे’ साजरा करीत असतो. काही कारणास्तव आईपासून शरीराने दूर असेल तरी रोज तिच्या आठवणीने तो ‘मदर्स डे’ साजरा करीत असतो. पण आई शरीराने जिवंत नसेल, कायमचीच ‘फोटोफ्रेम’ मध्ये रहायला गेली असेल तर….? विरहाच्या व्याकुळतेने तो ‘मदर्स डे’ कसा साजरा करीत असेल बरं..! आई जवळ असेल तर एकप्रकारची आश्वासकता असते. ती दूर असली तरीपण तिचे चैतन्य, तिची सदभावना कायम आपल्या सोबत असते. अन तिचे देहरूपी अस्तित्वच लुप्त झालेले असेल तर……तिने केलेल्या संस्कारातून तिचे अस्तित्व आपल्या सोबत असते. ‘आई’ ही फक्त व्यक्ती नाही, ती नुसतंच पवित्र नातं नाही तर आई हे वात्सल्याचं अजब प्रेमळ रसायन असते. ती आपल्याला नुसता जन्मच देत नाही तर प्रेमाची ऊब देत संस्काराच्या सुरक्षित कवचामधून ती आपलं आयुष्य फुलविते.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने कोट्यवधी जीवांचे बळी घेतलेत. त्यात जसे अनेक मातांची बालके बळी पडली तसेच अनेक बालकांच्या मातांचाही बळी गेला आहे. रोज सर्वत्र मृत्यूचे तांडवनृत्य सुरू आहे. अश्या भयग्रस्त आणि अशाश्वत वातावरणात एकच विश्वासाचा आधार….तो म्हणजे….आई..! मग ती फोटोफ्रेम मध्ये कायमची रहायला गेलेली असेल तरी पण….हॅपी मदर्स डे..!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

भारतात सध्या काय चाललंय…?

सगळं जग सध्या कोरोना महामारीच्या विळख्यात सापडलेले असताना भारतात सध्या नेमकं काय चाललंय…? याची उत्सुकता निर्माण झालेले जगातील २३२ देशांपैकी फक्त दोनच देश असावेत. भारताबद्दल नेहमीच शत्रुत्वाचं नातं जपणारे चीन आणि पाकिस्तान हे दोन देश निश्चितच या महामारीच्या काळात भारताचा सर्वनाश व्हावा अशी मनोकामना बाळगून असतील. सारे जग महामारीच्या काळात भारताकडे आशेने पहात असतांना हे दोन देश मात्र सध्या भारतात काय चाललंय…? यावरच चॅनेलच्या ‘टॉक शो’ मधून गरळ ओकताना दिसत आहेत. विशेषतः पाकिस्तानच्या टीव्ही चॅनेलमधून रोज उठून ‘इंडियामे क्या चल रहा है’ म्हणत काश्मीरप्रश्नावर बकवास सुरू असते.

घर में नही दाना

अम्मा पुऱ्या पकाना

अशी अवस्था असणारा पाकिस्तान तर खैरात मध्ये कोविड लस मिळविण्यासाठी जगभर टाचा घासत असताना शेजारी डोकावण्याचा उपद्व्याप करण्यात धन्यता मानतो ही बाबच जगाला अचंभित करणारी अशीच आहे.

कोरोना महामारीच्या काळातच नोव्हेंबर २०२० मध्ये मी माझ्या ‘dhagedore.in’ या ब्लॉगला सुरुवात केली. हे माध्यम माझ्यासाठी नवीन असल्याने अजूनही चाचपडतच आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांच्या काळात भारतासह युनायटेड स्टेटस, आयर्लंड, जर्मनी, जपान, नॉर्वे, लिथुआनिया, कॅनडा, सिंगापूर या देशांसह चक्क चीनच्या ब्लॉगर्सनी देखील माझ्या ब्लॉगवर ट्रान्सलेटर्सच्या मदतीने सैरसपाटा केल्याचे माझ्या दृष्टीक्षेपात आले. पाकिस्तानी अजून फिरकलेले नाहीत. चिनी ब्लॉगर सुद्धा ‘आपल्या विरोधात काही लिहीत नाही ना..!’ याची खातरजमा करून अदृश्य झालेले आढळून आले. खरंच गल्लीतल्या गँगवार सारख्याच आंतरराष्ट्रीय उचापती असतात का हो…? नाहीतर माझ्या सारख्या नवख्याचा ब्लॉग उचकून का जात असतील ? बाकीच्या देशांचे वाचक आणि ब्लॉगर नियमित व्ह्यूज देतात. उगीच शंका आली.

भारत गरीब देश नाही तर विकासाच्या मार्गावर आगेकूच करणारा, महाशक्तीच्या दिशेने वाटचाल करणारा लोकशाहीप्रधान देश आहे, हे आम्ही अभिमानाने सांगतो. इथे सुदृढ लोकशाही आहे म्हणूनच इथल्या प्रत्येक राजकीय हालचाली अगदी ‘चव्हाट्या’वर मांडल्या जातात. पण वेळ आली तर देशाच्या एकात्मतेसाठी सर्व विचारधारा एकत्र येतात हेच सार्वभौमत्व आहे. पण जरा काही राजकीय उलथापालथ झाली की लगेचच ‘भारतात सध्या काय चाललंय ?’ ची आरोळी ठोकणारे जगाच्या पाठीवर हे दोनच देश आहेत.

भारतीय चॅनेल्सवर 'फॉग'या सेंट, परफ्युम, बॉडिस्प्रे उत्पादनाची एक जाहिरात सारखी दाखविली जाते. त्यात अति चौकश्या करणारा....आपल्या भाषेत त्याला नाक खुपसणारा म्हणूयात. तो समोर भेटणाऱ्या प्रत्येकाला एकच प्रश्न विचारत असतो. आजकल क्या चल रहा है ?...त्यावर उत्तर एकच...'फॉग' चल रहा है....

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक कारवाईसाठी दीर्घकाळ सुरू ठेवावा लागणारा लॉक डाऊन, नागरिकांची उपासमार, रोजगार थांबल्याने होणारे हाल, कोलमडलेली आरोग्यव्यवस्था, सरकारी यंत्रणेचे अथक प्रयत्न, त्यातच काही ठिकाणच्या निवडणुका, कुंभमेळा, लसीकरणासाठीची उडणारी झुंबड, रुग्णांनी ओव्हरफुल्ल झालेली हॉस्पिटल्स, रुग्णांची होणारी हेळसांड, इंजेक्शनचा तुटवडा, रोज मृतांचा वाढणारा आकडा….. सारं काही इतर प्रगत देशांमध्ये (लसधारक) जे काही सध्या सुरू आहे ना ! अगदी तेच भारतात देखील सुरू आहे. फक्त रोज आम्ही येणाऱ्या संकटावर मात करीत उद्याचा विचार करतोय….त्यामुळे तुमच्याकडे सध्या काय चाललंय हे नाही विचारणार…..

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

आमरसाचा मोसम सुरू झालाय….येताय ना आंबा चाखायला…?

एप्रिल ते जून महिन्या अखेरपर्यंत आंब्याचा (मँगो) सिझन असतो. विशेषतः महाराष्ट्रात घरा-घरात याकाळात आमरसाची मेजवानी झोडण्यासाठी पाहुण्यांची वर्दळ असते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या फैलावामुळे पाहुण्यांची वर्दळ नसली तरी कुटुंबासह आमरसाची लज्जत चाखण्यासाठी खवैय्ये सरसावले आहेत. सध्याच्या काळात एकमेकांच्या घरी येणे-जाणे बंद असले तरी व्हॉट्सअप-फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून घरी बनवलेल्या आमरसाचे फोटो टाकून एकमेकांना आग्रहाची आमंत्रणे दिली जात आहेत.

फळांचा राजा आंबा हे तर भारतीयांचे राष्ट्रीय फळ आहे. याबरोबरच पाकिस्तान, बांगलादेश, फिलिपाईन्स या देशातून देखील आंबा मोठ्याप्रमाणात पिकतो. तसं बघायला गेलं तर आंब्याच्या जवळपास तेराशे जाती आहेत. पण आपल्याला जास्तीत जास्त वीस ते पंचवीस जातीच माहिती असतात. त्यातही हापूस, पायरी, बदाम, तोतापुरी, नीलम, लंगडा, मलगोवा, केशर या जातीचे आंबे बाजारात विक्रीला आलेले दिसतात. कोकणात तर आंब्याचा सिझन म्हणजे अर्थकारणाला उभारी देणारा फळविक्रीचा हंगाम असतो. कोकणी माणूस भलेही वर्षभर आर्थिक तंगीमुळे पाय दुमडून घरातच बसेल. पण गणपती उत्सव आणि आंब्याचा सिझन आला की त्याच्या उत्साहाला उधाण येते.

आंबा म्हंटल की ‘हापूस’ एव्हढंच आपल्या डोक्यात येतं. हा मार्केटिंगचा प्रपोगंडा म्हणा हवं तर… ‘एक्स्पोर्ट’ होणारा म्हणून बाजारात बोलबाला झाल्यानेच ‘हापूस’चा तोरा आहे. पण गावाकडं शेताच्या बांधावर पिकणारा गावठी ‘गोटी’ आंबा देखील तेव्हढाच रसाळ आणि गोड असतो. अर्थात जेवताना वाट्या-वाट्या आमरस प्यायचा आग्रह झाला तरच कोणत्याही आंब्याचा रस गोड लागतो हे देखील तितकेच खरे आहे. आंब्याच्या सिझनमध्येच शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागत असल्याने मामाच्या गावाला (आजोळी) जायची ओढ खरं म्हणजे मनमुराद आंबा खायला मिळेल या आशेनेच असावी. अलीकडे धकाधकीच्या काळात मामा देखील नोकरीच्या निमित्ताने गाव सोडून शहराकडे आलाय, त्यामुळे आत्ताची पिढी आजोळाला जाणे विसरूनच गेली आहे. आतातर काय…कोरोनाचं निमित्त झालंय.

बाजारात आंबा खरेदीला गेल्यावर विक्रेत्याला ‘भैय्या देनेका भाव बोलो’ असं म्हणत भावाची ‘घासाघीस’ करीत आंबे खरेदी केले नाहीत तर आंबा ‘गोड’ निघत नाही अशी अंधश्रद्धा समस्त महिलावर्गात आढळते. याबरोबरच आपल्या नवऱ्याला यातील काहीएक कळत नाही. विक्रेता त्याला फसवून ‘आंबट’ आंबे गळ्यात मारतो यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. हे सांगायचं कारण याच काळात सोसायटीतून, अपार्टमेंटमधून, कॉलनीतून महिला एकमेकींना फोन, व्हॉट्सअपच्या माध्यमातून याच विषयावर हितगुज साधत असतात. आंब्याचं कौतुक नसणारा मराठी माणूस सापडणं केवळ अशक्यच. खाण्यातल्या अनेक पदार्थांबाबत आवड-निवड असू शकते पण आंबा खाणे हा मराठी माणसाचा खाद्यधर्मच आहे. येताय ना मग आंबा खायला…….!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

कोविडला हरविणारी ‘जादू’ सरकारकडून हवी आहे….!

कोविड 19 बाबतची माहिती आता लहान मुलांना देखील तोंडपाठ झालेली आहे. गेल्या चौदा महिन्यांपासून सगळे जगच हा जीवघेणा अनुभव घेत आहे. कोविडला आपल्या शरीरात प्रवेश करू द्यायचा नाही हाच चांगला उपाय आहे अन अवघड ‘टास्क’ देखील आहे. अवघड यासाठीच म्हणायचं कारण गेल्या चौदा महिन्यांपासून एव्हढी मनुष्यहानी, उपासमार, आर्थिक हानी, मानसिक खच्चीकरण, तणाव आणि दडपणाच्या अनंत यातना सोसाव्या लागल्या. एव्हढं होवूनही आमच्यात आजही काहीच फरक पडलाय असं जाणवतच नाही. तोंडावर मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि स्वच्छता पाळणे या तीन प्राथमिक पण महत्वाच्या नियमांचे पालन देखील आम्ही करणार नसू तर अजून कोणत्या नव्या ‘जादू’ची वाट पहात आहोत.

ज्या देशातील जनता आडमुठी, अशिक्षित आणि सनातनी विचारांना घट्ट चिटकून राहते त्या देशाची प्रगती होत नाही हे आजवरच्या इतिहासातून आपण शिकलोय. ही तर महामारी आहे. यातून बचाव करण्यासाठी आपल्याला सहजतेने पाळता येणारे नियम अंगीकारण्यासाठी सक्ती का करावी लागत आहे. मुळात याकरिता सातत्याने ‘लॉक डाऊन’चा आधार घ्यावा लागतो हे सरकारचे नाही तर नागरिकांचे अपयश आहे. १३० कोटी लोकसंख्येच्या देशात कोणत्याही सरकारला अंमलबजावणी करताना अनेक अडथळे येणार, परिणाम दिसण्यासाठी कालावधी लागणार….हे अपेक्षितच आहे. मात्र काहीच होत नसल्याच्या समाजातून आपण सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेवर आपला राग व्यक्त करतो. भारतासारख्या लोकशाहीवादी देशात लोकांना हीच मुभा असते. कारण राज्यात एका राजकीय पक्षाचे सरकार तर केंद्रात दुसऱ्या राजकीय पक्षाचे सरकार आपणच निवडून देत असतो. त्यामुळे त्यांच्यात वैचारिक मतांतरे आणि श्रेय लाटण्याचा स्पर्धेचे राजकारण आपसूकच सुरू असते. त्या-त्या राजकीय पक्षांचे पाठीराखे म्हणून आपण या राजकारणात स्वतःला झोकून देतो. समाजाशी संबंधित कोणतीही सामूहिक कृती करताना हाच अनुभव येतो. कदाचित लोकशाहीवादी असण्याची ही जबर किंमत आपण मोजीत असू.

आता देखील हेच सुरू आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत अनभिज्ञते मुळे आणि औषध किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे आपण खूप मोठे नुकसान सहन केले. मधल्या काळात लस निर्मितीमध्ये आपण आघाडी घेतली. सगळ्या जगाने कोविशील्ड आणि कोव्हाक्सीन लसीला प्राधान्य दिले. इथपर्यंत आपण विकसनशील मार्गावरच चालत असल्याचे जगाला दाखविले. मग लसीकरणाच्या मोहिमेदरम्यानच आपण अतिमागास राष्ट्रात उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे का जातोय ? एकतर कोविडची दुसरी आणि त्यानंतरही तिसरी लाट येणार याबरोबरच त्याच्या होणाऱ्या परिणामाची माहिती सरकार आणि आरोग्य यंत्रणेला देखील आहे. त्यांनी देखील ही माहिती दडवून ठेवली नाही. वेळोवेळी जनहितार्थ ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून सरकारने जनतेपर्यंत पोहोचविली आहे. मात्र जनतेला आपल्या कोणत्याच सवयी न बदलता कोविडला हरविणारी ‘जादू’ सरकारकडून अपेक्षित आहे.

राजा आणि सैन्य नुसते पराक्रमी असून चालत नाही, तर जनता देखील धैर्यशील आणि संयमशील असावी लागते तरच युद्ध जिंकता येते.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

फ्रान्सचे ऍक्शन “क्यूलोटी” आंदोलन आणि आपण….!

 • लॉक डाऊनच्या काळात अंतर्वस्त्र विक्रीची दुकाने अत्यावश्यक सेवांतर्गत समाविष्ट व्हावीत म्हणून ‘टिक टॉक’च्या माध्यमातून फ्रान्समध्ये छोट्या विक्रेत्यांनी सुरू केलेले ‘ऍक्शन क्यूलोटी’ जगभर चर्चेत आले.
 • सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणून त्याकडे पाहिले गेले.
 • या आंदोलनाला समर्थन देणाऱ्या नागरिकांनी थेट पंतप्रधान जीन कॅस्टक यांच्या कार्यालयात कुरियरने ‘क्युलेटस’ (अंतर्वस्त्र) पाठवून आपला निषेध नोंदवला.
 • लॉक डाऊनच्या काळात भारतातही अत्यावश्यक सेवा सुविधांच्या शासकीय यादीबद्दल वादप्रवाद आहेत. मात्र संकुचित वृत्तीचे भारतीय या आंदोलनाकडे कसे बघत असतील..?

तुल्यबळ असलेल्यांबरोबरच तुलना करावी असं म्हणतात. त्यानुसारच भारतीयांना छोट्या मोठ्या गोष्टीतही फ्रान्सबरोबर तुलना केलेली आवडते. विशेषतः राजकीय पक्षांकडून अशाप्रकारची तुलना होत असल्याचे आपल्याला नेहमी पहायला मिळते. त्यामुळे फ्रान्सवासीय आपल्यापेक्षाही खूप श्रीमंत, शिक्षित आणि प्रगत असल्याचा साक्षात्कार आपल्याला नेहमीच करून दिला जात असतो. कोरोना महामारीने संपूर्ण जगालाच ‘जागेवर’ आणलंय हेच दिसून येतंय. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वच देशांनी लॉक डाऊनची उपाययोजना अंमलात आणली. प्रत्येक देशातील जनसमूहाची जीवनपद्धती, सभ्यता आणि आचारविचार पाहूनच त्या-त्या देशांनी अत्यावश्यक सेवा-सुविधांच्या यादीत गरजेच्या आवश्यक गोष्टींचा समावेश केला. मात्र लॉक डाऊनच्या काळात प्रत्येक देशात नागरिकांनी आपआपल्या शासकांच्या विरोधात ओरडही केलीच. त्यातून काही अफलातून मागण्यांचे किस्सेही समोर आले.

हे ‘ऍक्शन क्यूलोटी’ आहे तरी काय ? तर फ्रान्सवासीयांना स्वच्छतेच्या सवयीमुळे दरमहिन्याला आपली अंतर्वस्त्रे बदलण्याची अत्यावश्यकता वाटते. मात्र फ्रान्स सरकारने लॉक डाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा-सुविधांच्या यादीतून आपल्या भाषेत सांगायचे तर ‘होजिअरी’ विक्रेत्यांना वगळले. मात्र ऑनलाईन विक्रीव्यवस्था आणि मॉल मधून ही अंतर्वस्त्रे विकली जावू लागली. त्यामुळे होजिअरी विक्री करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांमध्ये असंतोष पसरला. त्यांनी अगोदर याला टिक टॉक वर वाचा फोडली. मग ट्विटरवर ट्रेण्ड सुरू झाला. त्यातूनच पंतप्रधान जीन कॅस्टक यांना कुरिअरद्वारे ‘लेडीज वेअर’ पाठवायला सुरुवात झाली. फ्रान्स वासीयांची निषेध नोंदविण्याची देखील अफलातून पद्धत दिसून येते. आता हीच स्थिती भारतात देखील आहे. फ्रान्स सारखाच भारत देश देखील सुदृढ लोकशाही असलेला देश आहे. इथेही लोकांना अमर्याद असे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. फरक फक्त ‘अत्यावशकतेचा’ आहे. त्यांच्याकडे महिन्याला अंतर्वस्त्र बदलतात. आपल्याकडे……टिरीवर अंतर्वस्त्राच्या झिरमाळ्या झाल्या तरी आपण उंची बाह्यवस्त्रे घालून मिरवतो. पण दारूची दुकाने अत्यावश्यक सेवेत असावीत म्हणून ओरड करतो.

आपल्याकडे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळीच दारू आणि व्यसनाच्या सर्व वस्तूंना लॉक डाऊनच्या नियमातून वगळा म्हणून ‘अ’ वर्गाच्या विचारवंतांकडून मुक्ताफळे उधळली गेली होती. नशीब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात दारूच्या बाटल्या कुरिअरद्वारे पाठविल्या गेल्या नाहीत. पण शेवटी अप्रत्यक्षपणे सरकारला या मागणी पुढे हात टेकावे लागलेच. जनक्षोभापुढे सत्ताधाऱ्यांना लोटांगण घालावेच लागते. मग फ्रान्स असो की भारत…आता भारतात कोणतेही आंदोलन न करता लॉक डाऊनमध्येही दारू मुबलक प्रमाणात मिळते. अर्थात सरकारच्या या अश्या धोरणांमुळे कोरोनाचा फैलाव किती वेगाने झाला याची लोकशाही प्रणाली स्वीकारलेल्या सर्वच देशांना जबर किंमत मोजावी लागत आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

सत्ता कुणाची……. समाजमाध्यमांची की राजकीय पक्षांची….?

 • देश कोणताही असो त्या देशाची प्रगती ही तिथे वर्चस्व अर्थात सत्ता कोण करतंय ? यावरच अवलंबून असते.
 • सत्ता प्रस्थापित करण्याचे जसे अनेक प्रकार आहेत तसेच सत्तेचे देखील.
 • स्वातंत्र्याचा विचार मांडणारा व्यक्ती अथवा समूह सत्ताधीशाच्या रूपात समोर असतो.
 • मात्र याच स्वातंत्र्याच्या विचारधारेला आपल्या ताकदीच्या जोरावर सत्तेमध्ये परावर्तित करणारी एक छुपी यंत्रणा असते. सत्तेचा खरा उपभोग हीच यंत्रणा घेत असते.
 • अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बळावर सत्ता गाजवू पाहणाऱ्या राजकीय पक्ष आणि माध्यमांचा संघर्ष प्रत्येक देशात पहायला मिळतो.
 • सध्याच्या काळात प्रसार माध्यमांना देखील मागे टाकत पुढे आलेल्या समाजमाध्यमामुळे राजकीय पक्षांना देखील काही वेळा नमते घ्यावे लागत आहे. जनक्षोभ निर्माण करण्याची ताकद असणारी समाजमाध्यमे यामुळेच शिरजोर ठरत आहेत.

गुलामगिरीच्या बंधनातून देशस्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे शस्त्र म्हणूनच प्रसार माध्यमांचा जन्म झाला. अनेक देशात जुलमी राजवट उलथवून सत्तांतरे घडवीत लोकनियुक्त सत्ता प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वृत्तपत्र माध्यमाचा आजही बोलबाला असला तरी एकविसाव्या शतकातील जगाचा त्राता म्हणून सर्वसामान्यांच्या मेंदूचा ताबा घेतलेल्या समाजमाध्यमांच्या प्रमाणाबाहेरील हस्तक्षेपामुळे प्रत्येक देशातील राजव्यवस्था चालविणाऱ्या यंत्रणा, राजकीय विचारधारेचे पक्ष, संघटना हतबल झाल्या आहेत. विचार व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याच्या नावावर वाढलेला उच्छाद हा अराजकतेकडे नेणारा ठरत आहे.

भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात तर गेल्या काही वर्षांपासून समाजमाध्यमांचा अतिरेक होताना दिसत आहे. सर्वच विकसनशील देशांमध्ये कमीअधिक प्रमाणात हा उच्छाद दिसतो. मुक्तपणे अभिव्यक्तीच्या प्रदर्शनाला स्थान देणारे व्यासपीठ असा चेहरा देत समाजमाध्यमांना लोकाभिमुख करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी याकडे केवळ व्यवसाय म्हणूनच बघितले असले तरी सर्वसामान्य माणूस याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हत्यार म्हणून पहात आहे. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाच्या त्रिसूत्रीवर उभारलेले हे समाजमाध्यम नावाचे ‘साधन’ लोकांचे ‘हत्यार’ केंव्हा बनले हेच कळून आले नाही. विशेषतः धर्म आणि राजकारण या विषयाची आवड असणाऱ्या भारतीयांनी या साधनाला आपल्या प्रतिकारासाठीचे हत्यार बनवल्याचेच दिसून येते.

अर्धशिक्षित आणि बेरोजगार पिढीच्या हातात हे ‘साधन’ आल्याने त्याचा नकारात्मक प्रतिक्रियावादी वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. सुरुवातीपासूनच या वर्गाला समाजमाध्यमांच्या प्रवाहात आणण्याचे काम या देशातल्या राजकारणी आणि धर्मकारणी लोकांनी अट्टहासाने केले. त्याचाच परिणाम आता दिसून येत आहे. जो तो व्यक्त होण्याच्या या स्पर्धेत अतिरंजित, कपोलकल्पित विचारांना ‘हवा’ देताना दिसत आहे. राजकारणी लोक निवडणुकांची प्रचार यंत्रणा देखील समाजमाध्यमांवर विसंबून राबवितात हेच दुर्दैव आहे. बरं या समाजमाध्यमांवर जे काही रोज ओकल्या जात असते त्याची विश्वासहर्ता किती ? याचे उत्तर कुणीही ठामपणे देवू शकत नाही. आपोआपच एकसारखा अपप्रचाराचा भडिमार करीत व्यक्तीचे चारित्र्यहनन करण्यापासून सुरू होणारा हा खेळ समूहाच्या जात-धर्म आणि त्यांच्या वर्चस्वापर्यंत जावून पोहोचतो. हा खेळ रोज सेकंदागणिक खेळला जातो. सुरुवातीला स्वतःच्या हातचे खेळणे बनविण्याच्या नादात असलेले राजकारणी आता या समाजमाध्यमांच्या हातचे खेळणे बनले आहेत. म्हणूनच सत्तेविरोधात मत व्यक्त करण्यासाठीच जणू समाजमाध्यमांचे हत्यार हातात आल्याची भावना बळावत चालली आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

या अवकाळी पावसा बरोबर कोरोना पण वाहून जाऊ दे रे महाराजा….!

 • दिवसभर उकाड्याने हैराण झाल्यानंतर संध्याकाळी अचानक आभाळ गच्च भरून येते.
 • ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाच्या हजेरीने खूप शांत-शीतल वाटायला लागते.
 • आपला देश कृषिप्रधान आहे. त्यामुळे पावसाचे नेहमीच जल्लोषात स्वागत केले जाते. मात्र या अवकाळी किंवा मान्सूनपूर्व पावसाचे स्वागत शेतकऱ्यांकडून होत नाही.
 • अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच नुकसानीचा ठरतो. नाही म्हणायला लेखक, कवी, साहित्यिक आणि डॉक्टर मंडळींना या अवकाळीची देखील प्रतीक्षा असते, अगदीच खरं नाही पण चेष्टेने असं म्हंटल्या जातं.
 • गेल्या वर्षापासून अवकाळी पावसासोबत ‘कोरोना’ फैलावण्याची एक अनामिक भीती सतावत असते. रोगराईला घेवून येणाऱ्या या अवकाळी पावसासोबत कोणत्या रूपात कोरोना आपल्या शरीरात प्रवेश करेल याचीच जास्त धास्ती गेल्या वर्षापासून सतावतेय.

शेतात जोमाने येऊ पाहणाऱ्या पिकांची नासधूस करीत शेतकऱ्याला भिकेला लावणारा हा अवकाळी पाऊस ग्रामीण भागात भलेही नकोसा वाटत असला तरी शहरी भागात मात्र रस्ते आणि परिसर स्वच्छ धुवून काढणारा हा पाऊस शहरवासीयांना स्वप्नवत वाटतो. अर्थात सखल भागात पाणी साचल्याने, गटारे तुंबल्याने रोगराई पसरण्याची भीती वाढते. पण आरोग्याच्या उद्भवणाऱ्या समस्या म्हणजे वैद्यकीय क्षेत्राचा ‘सिझन’ समजला जातो. त्यामुळे वैद्यकीय सेवेकडे ‘धंदा’ म्हणून पाहणारे डॉक्टर अगदी बाह्या सारून रुग्णांची वाट पहात बसलेले असतात.

सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. अगदी वाड्या वस्त्यांपासून महानगरापर्यंत कोरोना पसरत चालला आहे. शासकीय रुग्णालयांसह सर्वच खासगी हॉस्पिटल कोरोना बाधित रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत. त्यात रेमडीसेव्हरचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा तर केवळ बेड उपलब्ध होत नसल्याने हॉस्पिटलच्या पायरीवरच रुग्ण आपला जीव सोडण्याच्या हृदयद्रावक घटना रोज कुठे ना कुठे घडत आहेत. अश्या भयावह वातावरणातही शासनाची आरोग्य यंत्रणा जीवावर उदार होवून एक एक जीव वाचविण्याची प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. कोविशील्ड आणि कोव्हक्सीन च्या लसीकरणाची मोहीम आता तिसऱ्या टप्प्यात आली आहे. या तिसऱ्या टप्प्यात अठरा वर्षावरील वयोगटातील नागरिकांना या लसीचा लाभ मिळणार आहे. उपलब्ध लसीचा साठा आणि पुरवठ्यावर ही मोहीम किती काळ चालेल हे ठरणार आहे. मात्र या देशातील प्रत्येक नागरिक ‘लसधारक’ होईल हेच या मोहिमेचे अंतिम लक्ष्य आहे.

हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागले तरी हे अवकाळी गडद मळभ पुन्हा पुन्हा नकारात्मकता वाढवते. त्यापासून आम्हाला वाचव महाराजा….सगळ्या प्रकारच्या जीवजंतू पासून येणारी ‘इडापिडा’ गावाच्या वेशी बाहेरच ठेव रे महाराजा…..घर उजाडू देवू नकोस रे महाराजा….भरल्या घरातील अन्नपूर्णा अन तिच्या भरल्या कपाळावरचं कुंकू हिरावून जावू देवू नकोस रे महाराजा…..आणखी काय पण मागणं नाही, माणसांनी भरलेलं घर आणि गाव दोन्ही सुखरूप ठेव रे महाराजा…..

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

सोलापूरचा किल्ला लढवत ठेवणारा एकांडा शिलेदार गणपतराव पानसे

महाराष्ट्रातील प्राचीन भुईकोट दुर्ग प्रकारात मोडणारा सोलापूरचा किल्ला हा भारतातील अनेक राजवटी पाहिलेला मूक साक्षीदार आहे. आनंदनाम संवत्सरे भाद्रपद मास, अष्टमी,वार बुधवार शके १२३५ म्हणजेच इ.स. १३१३ या दिवशी सोलापूरचा हा भुईकोट किल्ला बांधावयास आरंभ झाल्याचा उल्लेख मिळतो. म्हणजेच ७०७ वर्षांपूर्वी हा किल्ला बांधला गेला आहे. बहामनी राज्याच्या विभाजनानंतर हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडे काही दिवस तर अहमदनगरच्या निजामशहा कडे काही काळ होता. तर दिल्लीच्या अकबर बादशहाच्या काळात हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. पुढे दक्षिणेत मराठ्यांचा बंदोबस्त करायला आलेल्या औरंगजेबाने १६८५ पासून त्याच्या मृत्यूपर्यंत हा किल्ला ताब्यात ठेवला होता. पुढे पेशवाईचा अंमल सुरू झाल्यानंतर १७५० पासून ते मराठेशाहीचा अस्त होईपर्यंत म्हणजेच १८१८ पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता. २० फेब्रुवारी १८१८ मध्ये आष्टीच्या लढाईत ब्रिटिशांनी पेशवाईचा शेवट केला. मराठेशाहीचा शेवटचा सेनापती बापू गोखले या लढाईत धारातीर्थी पडल्यानंतर दुसरा बाजीराव पेशवा लढाई सोडून पळाला आणि मराठेशाहीची शिकस्त झाली. तरीपण सोलापूरचा भुईकोट किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात आला नव्हता. जवळपास तीन महिन्यानंतर झालेल्या घनघोर लढाईत सोलापुरात किल्ल्याच्या भोवती रक्तामांसाचा चिखल झाल्यानंतर ब्रिटिशांना समझोता करून हा किल्ला ताब्यात घ्यावा लागला. जवळपास तीन आठवडे किल्ला झुंजवत ठेवणारा मराठेशाहीचा शेवटचा एकांडा शिलेदार म्हणून तोफखाना बहाद्दर गणपतराव पानसे याची इतिहासातून तशी उपेक्षाच झाली.

हे गणपतराव पानसे यांचे मूळ चित्र नाही.

गणपतराव पानसे यांच्या घराण्याचे मूळ पुरुष भुतावा उर्फ भुतोपंत पानसे हे होते. त्यांचे मुळगाव सोलापूर जिल्ह्यातील पानगाव (ता.-बार्शी) हे होय. सध्या त्यांचे वंशज सोलापुरात रहात आहेत. माधवराव पेशव्यांपासून पानसे घराण्याची तलवार मराठेशाहीसाठी तळपल्याची इतिहासात नोंद आढळते. मात्र या पानसे घराण्याचा सविस्तर इतिहास तपशिलासह आढळून येत नाही. १९२९ च्या दरम्यान गंगाधरराव नारायणराव मुजुमदार यांनी पानसे कुलवृत्तांत प्रकाशित केल्याचे उल्लेख सापडतात. मात्र तपशीलवार माहिती मिळत नाही. त्यांच्या वारसांना देखील तपशील मिळत नाही. पराक्रमाची शर्थ करणाऱ्या शुरांचा इतिहासाच्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या उपमर्दाचे हे एकमेव उदाहरण असावे.

ब्रिटिश आणि मराठ्यांच्या युद्धाचे कल्पित चित्र.

आष्टीच्या लढाईनंतर जवळपास तीन महिन्यानंतर गणपतराव पानसे यांनी ब्रिटिशांशी केलेली ही लढाई म्हणजे पराक्रमी मराठी एकांड्या शिलेदाराची ही नुसतीच शौर्यगाथा नाही तर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध पुकारलेल्या बंडाची ती ‘पहिली ठिणगी’ समजली जाते. पारतंत्र्यात गेलेली भारतभूमी परकीयांच्या तावडीतून सोडवून घेण्यासाठी झालेल्या प्रदीर्घ संघर्षातील ही पहिली लढाई आहे. इथून पुढे १९४७ पर्यंत जे सशस्त्र उठाव, बंड, सत्याग्रह, अहिंसात्मक आंदोलने या भूमीत झाली त्यासर्वांचा आरंभ करणारी ब्रिटिशांच्या विरोधातील पहिली कारवाई गणपतराव पानसे यांनी केली. दि. ६ मे १८१८ रोजी या लढाईला प्रत्यक्ष तोंड फुटले. पानशांनी किल्ल्यावरून तसेच शहराच्या बाळीवेस आणि विजापूर वेस भागातून आपल्या तोफांचा भडिमार केला. दोन्हीकडून तोफा चालविल्या गेल्या. या धुमश्चक्रीत सैन्याबरोबरच नागरिकांची देखील आहुती पडली. ६ मे ते १५ मे १८१८ असे दहा दिवस सोलापूर गाव रणभूमी बनले होते. हजारोच्या संख्येने युद्धात कामी आलेल्यांचा प्रेताचा खच पडलेला होता. शहरालगतच्या बाळे, मंद्रुप, कुंभारी, आहेरवाडी गावापर्यंत धडाडणाऱ्या अग्नीच्या ज्वाळा बघून प्रत्यक्ष ब्रिटिशांना देखील मराठ्यांच्या चिवट शौर्याची धडकी भरली होती.

आपल्या शौर्याची कहाणी गिळून अजगरासारखा सुस्त पडलेला हाच तो भुईकोट किल्ला.

शौर्य गाजवून इंग्रजांना समझोता करायला भाग पाडणाऱ्या गणपतराव पानसे यांनी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात देवून डोणज येथे स्थलांतर केले. या घनघोर युद्धाला जवळपास २०३ वर्षे झाली आहेत. आता तर सोलापूरकरांना देखील आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा इतिहास माहीत नाही. कधीही लढाई न बघितलेला भुईकोट किल्ला म्हणून संभावना करणाऱ्या तथाकथित इतिहासाच्या अभ्यासकांना माहिती व्हावे आणि पुढच्या पिढीला आपण शूर मराठ्यांचे वंशज आहोत याचे आकलन व्हावे हीच श्रींच्या चरणी प्रार्थना..!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

शंभर वर्षात पहिल्यांदाच सलग पंढरीची ‘वारी’ खंडित …..!

मोलाचे आयुष्य वेचूनिया जाय ! पूर्व पुण्ये होय लाभ याचा!! अनंत जन्मीचा शेवट पाहता ! नरदेह हाता आला तुझ्या !! कराल ते जोडी येईल कार्यासी! घ्यावे विठ्ठलासी सुखालागी !! करा हरिभक्त परलोकी ये कामा ! सोडविल यमा पासोनिया !! तुका म्हणे करा आयुष्याचे मोल ! नका वेचू बोल नामेवीण !!

भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन टाळ -मृदंगाच्या गजरात विठ्ठल भेटीसाठी न चुकता ‘वारी’ करणारा वारकरी

भू वैकुंठ म्हणून पुराणापासुन ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुराच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षातून चैत्र वारी, आषाढी वारी, कार्तिकी वारी आणि माघी वारीला लाखोच्या संख्येने जमणाऱ्या वारकऱ्यांना कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षीपासुन म्हणजेच २०२०च्या चैत्री वारी पासून श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीला जाता येत नाहीय. सुमारे हजार -बाराशे वर्षांची परंपरा असलेली वारी गेल्या शंभर वर्षात पहिल्यांदाच सलग दुसऱ्या वर्षीही खंडित झाली आहे. ऊन, वारा, पाऊस, नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती जरी आली तरी अभावानेच वारी खंडित झाल्याच्या ऐतिहासिक नोंदी आढळतात. भारतातील प्लेगच्या साथी नंतर बहुदा ही पहिलीच वेळ असावी.

वर्षातील पहिली वारी म्हणून चैत्री वारीला फार महत्व असते. ‘विठोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’चा जयघोष करीत प्रपंच व्याधी पासून सुटका करीत घरापासुन विठुरायाच्या दर्शनासाठी जत्थ्याने भजन -कीर्तन करीत पंढरीला पायी चालत जाण्याला ‘वारी’ म्हणतात. या वारीला हजार -बाराशे वर्षांची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, संत जनाबाई, चोखोबा, सावता माळी, गोरोबा, दामाजी पंत अश्या अनेक संतांची परंपरा लाभलेली आहे. या वारीतूनच भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला आहे. आपत्कालीन परिस्थिती शिवाय कधीही खंडित न होणारी ही वारी कोरोना महामारीमुळे मात्र गेल्या वर्षापासुन खंडित होवू लागली आहे. अर्थात मंदिर समिती आणि प्रशासनाच्या माध्यमातून या काळात श्री विठ्ठल -रुक्मिणीची विधिवत पूजा अर्चा केली जाते. मात्र भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद असल्याने काहीतरी चुकल्यासारखे नक्कीच वाटत राहते. कारण ‘वारी’ म्हणजे केवळ ‘धार्मिक’ उत्सवाचा जल्लोष नाही तर बहुजनांच्या सांस्कृतिक आणि संस्काराच्या आदान – प्रदानाचा तो एक विधिवत उत्सवच असतो. वारी चुकली तर जन्माची पायरी चुकली…. विठ्ठल…. विठ्ठल….. विठ्ठल…..

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

चला ‘इमोशनॅलिटी’च्या बागा फुलवू…..!

आजकाल मनावर एकसारखं खूप दडपण येत राहतंय. कधी काय होईल काही सांगता येत नाही, कधीच एव्हढी अस्थिरता वाटली नसेल जेव्हढी अस्थिरता सध्या प्रत्येकाच्या मनात आहे. युद्धकाळात सीमेवर असलेल्या गावांना देखील एव्हढा तणावं झेलावा लागला नसेल. किमान त्यांना हे तरी माहीत असते कि आपल्या जीविताला कोणापासून धोका आहे. शत्रू समोर दिसतो…… इथं ते सुद्धा घडणार नाहीय. इथं शत्रू आहे, पण तो खूप सूक्ष्म रूपातला आहे. मानवी नजरेने त्याला बघता येत नाही. आणखीन एक आगतिकता अशी कि त्याच्याशी दोन हात करायचे तर कसे करायचे ? ज्यामुळे त्याचा शेवट होईल ? तर त्याचा शेवट करणारे शस्त्र अजूनतरी माणसाच्या हाती लागलेले नाही. नुसताच बचावात्मक प्रतिकार करीत रहायचं एव्हढंच आपल्या हाती उरलंय का? दडपणामुळे नुसता मेंदू फुटायचा बाकी आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी काही ठराविक शहरातून, गजबजलेल्या वस्त्यातून कोरोनाचे पेशंट सापडत होते. तेंव्हा आपल्या गावाबद्दल, आपण रहात असलेल्या एरियाबद्दल, आपल्या सोसायटी बद्दल विशेषतः आपल्या शेजाऱ्याबद्दल आपल्याला ठाम विश्वास असायचा, काही झाले तरी कोरोना विषाणू आपल्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही.

तरीसुद्धा शासनाचे आदेश ‘सर आँखोपर’ म्हणत मास्क परिधान करणे, सुरक्षित अंतर पाळणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे, अनावश्यक गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे यासर्व सूचनावजा आदेशांचे गेल्या वर्षभरापासून कसोशीने पालन करूनही कोरोनाने दुसऱ्यांदा धडक मारलीच. आता यावेळी तो पहिल्यापेक्षाही जास्त ताकदवान होवून आला आहे. त्यामुळे आता उलट पहिल्यापेक्षा जास्त बंधनात आपल्याला अडकून घ्यावं लागणार आहे. नाही म्हणायला लसीचा डोस पोहोचलाय… पण त्याला देखील सर्व वयोगटात पोहोचायला अजून काही महिने अवकाश आहे. तोपर्यंत दोन डोस लसीचे घेतलेले काही प्रमाणात का होईना सुरक्षित राहतील असे मानायला काही हरकत नाही. शासनाचा हा सकारात्मक प्रयोग निश्चितच नागरिकांची मानसिक रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा ठरणार आहे असं मानायला काहीच हरकत नाही.

कुणी काहीही म्हणोत आजूबाजूला रोजच मृत्यूचे तांडव सुरु असताना भाबडेपणाने नाही पण सावधानतेनेच काही मनाला ऊर्जा देणारे काही भावनिक प्रयोग केले तर…? काय हरकत आहे. नीम हकीम खतरे जाँ अगदी असं पण नाही, पण अलोपॅथी असो होमिओपॅथी असो आयुर्वेदिक किंवा युनानी असो शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर विश्वासाने यासर्व प्रयत्नांना साथ द्यायला काय हरकत आहे….? नाहीतरी आता आपल्या हाती उरलंय काय….? इमोशनलिटीची बाग फुलविण्याशिवाय आणखी आपण काय करू शकू…!

:-मुकुंद मधुकर हिंगणे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपण नेमके कुठे आहोत …?

 1. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडण्याच्या घटनेला जवळपास चौदा महिने उलटून गेलेत.
 2. पहिल्या लाटेच्या वेळी खूप संभ्रमित अवस्था होती. कोरोना या संसर्गजन्य साथी विषयी पहिल्यांदाच माहिती मिळत होती.
 3. अश्या स्थितीत वेगाने संक्रमित होणाऱ्या या साथीपासून बचाव कसा करायचा ? याविषयी देखील वैद्यकीय क्षेत्रात देखील बरेच मतप्रवाह होते.
 4. कोणतीही ठोस उपचार पद्धती किंवा औषधोपचार सापडले नव्हते. अश्यास्थितीत रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे यावरच भर देत ट्रीटमेंट सुरु करण्यात आल्या.
 5. जगभर फैलावलेल्या या महामारीशी प्रतिकार करण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीच्या संशोधनात प्रमुख देश गुंतले. यात भारताचा देखील समावेश आहे.
 6. या जीवघेण्या साथीच्या पहिल्या लाटेपेक्षाही अधिक तीव्रता दुसऱ्या लाटेत आढळून येत आहे. याबरोबरच मृत्यूदर देखील वाढताना दिसत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तडाख्यात संपूर्ण जगाचेच अतोनात असे नुकसान झाले आहे. महासत्ता म्हणून जगावर राज्य करू पाहणारे बलाढ्य देश देखील या महामारीत दुबळे बनले. सर्वात सुरक्षित आणि ताकदवान देश कोणता ? तर जो देश आपल्या नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये तात्काळ आरोग्य सुविधा पुरवू शकतो हे प्रकर्षाने पुढे आले. अश्यास्थितीत भारत देश नेमका कुठे आहे ? महामारीच्या पहिल्या लाटेत आपण किती जीव गमावले ? किती जीवांना सुखरूप वाचवू शकलो ? यावरच दुसऱ्या लाटेत आपण या महामारीशी कसा मुकाबला करणार आहोत हे अवलंबून होते. महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या भारताकडे आता जगाचे नेतृत्व करण्याची आयती संधी चालून आलेली असताना आपण नेमके कोणत्या ठिकाणी आहोत हेच कोरोनाने दुसऱ्या तडाख्याने दाखवून दिले आहे. आपण आपत्कालीन परिस्थितीत स्वतःला वाचवायला देखील अजून सक्षम झालेलो नाहीत हेच चित्र समोर आले आहे.

पहिल्या लाटेच्या वेळी असलेली अनभिज्ञता आरोग्यसेवेतील दुबळेपणावर पांघरून घालण्यास उपयोगी पडली होती. मात्र या संसर्गजन्य साथीची दुसरी लाट आली तर आपण प्रतिकार कसा करणार ? याची कोणतीच पूर्वतयारी आपण केली नाही. पहिल्या लाटेतील नुकसान, केलेले मदतकार्य, लसीचे संशोधन अश्या चर्चेतच आपण आपला महत्वाचा वेळ खर्ची घातला. वास्तविक पहिली लाट ओसरतानाच म्हणजेच डिसेंबर २०२० मध्येच आपल्याला दुसऱ्या लाटेची तीव्रता समजली होती. मात्र आपत्कालीन व्यवस्थापन करण्यात आपण जगातील इतर प्रगत देशांच्या तुलनेत खूपच मागे आहोत हेच चित्र प्रकर्षाने पुढे आले.

कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्ड या प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या लसीच्या उत्पादनात आघाडी घेतल्यानंतर आपण कोरोनावर विजय मिळविल्याच्या भ्रमात राहिलो. इतर देशांना लस पुरवठा करण्याचे आपलें धोरण नुसतेच मानवता वादी नाही तर आपली क्षमता सिद्ध करणारे ठरले हे अभिनंदनीयच आहे. पण या बरोबरच देशांतर्गत लसीकरण किती वेगाने पूर्ण करू शकतो यावर आपत्कालीन व्यवस्थापनाचा आराखडा सक्षम असायला हवा होता. कारण लसीकरणाची मोहीम राबवीत असतानाच दुसऱ्या लाटेला थोपविण्याचे कार्य आरोग्य व्यवस्थापनाला करावयाचे आहे. इथेच ‘डिझास्टर मॅनेजमेंट ‘चा पुरता गोंधळ उडाला आहे. वास्तविक दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेची पुरेशी कल्पना आपल्याला चार महिने अगोदरच आलेली होती. तरी देखील आज जे काही विदारक चित्र समोर येत आहे ते कश्याचे द्योतक आहे ?

मुळातच बाजारीकरणावर स्थिर झालेली देशातील आरोग्य व्यवस्था शासनाच्या नियंत्रणात राहिलेली नाही हेच उघड झाले. उपचाराच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात लूटमार, रेमीडिसिव्हर सारख्या इंजेक्शनचा काळाबाजार, हॉस्पिटल्स मधून बेडचा तुटवडा, आरोग्य यंत्रणेचा अकार्यक्षमपणा, दुबळी यंत्रणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णांना प्राणवायुचा (ऑक्सिजन ) पुरवठा करण्याची असमर्थता हे विदारक चित्र सुन्न करून टाकणारे आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशाची एक ‘गोची’ आहे, इथे कोणतीही गोष्ट राजकीय विचारातून अंमलात आणायची असते. कोरोना देखील सत्ताधारी aan8 विरोधी विचारसरणीतूनच या देशात आता सुखाने नांदू लागला आहे असेच म्हणावे वाटते.

सामान्य माणूस आपली ‘वंशावळ’ का शोधतो..?

आईचं पहिलंच वर्षश्राद्ध काही दिवसांवर आले असता बहिणीचा फोन आला. आई श्रद्धाळू होती त्यामुळे तिचे राहून गेलेले विधी व्यवस्थित पार पाड. गत वर्षी लॉक डाऊन असतानाच तिचे निधन झाले होते. अंत्यविधी नियमांच्या सोपस्कारातच उरकलेला, त्यामुळेच बहिणीने सूचना केली अन् सोबत वंशावळी देखील पाठविते म्हणाली. एरवी आजोबा-पणजोबाच्या पुढे नावे माहीत नसलेल्या माझ्यासारख्या असंख्य सर्वसामान्य लोकांना आपले ‘पूर्वज’ किती माहीत असतात ? या वंशावळीची आपल्याला किती गरज पडते ? मग आपली वंशावळ आपण का शोधतो ? अश्या प्रश्नांनी डोक्यात एकच गर्दी केली…..

:- मुकुंद हिंगणे.

‘पुढच्या सत्तर पिढ्या तुम्हाला लक्षात ठेवतील’ असा तोंड भरून आशीर्वाद जरी मिळाला तरी देखील खरंच सत्तर पिढ्या आपल्याला लक्षात ठेवतील का ? आपण तरी आपले किती पूर्वज लक्षात ठेवले आहेत ? एखाद्या कार्याचे मूल्यमापन करताना कौतुक म्हणून मिळालेला हा आशीर्वाद सर्वसामान्यांना निश्चितच अनुत्तरित करणारा असाच वाटतो. पण ‘वंशावळी’ भोवती फिरणारी ही समाजरचना केवळ ‘अस्तित्वा’साठी नाकारता येत नाही हेच खरे आहे.

‘वंश’ विचार हा फक्त भारतातच मानला जातो असे नाही. तर जगातल्या प्रत्येक देशात, धर्मात, विचारधारेत, वसाहतीत, समूहात वंशाला प्राधान्य दिले जाते. मुळात तुमच्या कुळाच्या आद्य पुरुषाच्या उपजीविकेच्या साधनावरूनच तुमचे आडनाव ठरते. ( आद्यनावाचा अपभ्रंश आडनाव असा आहे) चातुर्वर्ण्य व्यवस्था जर फक्त भारतदेशातच आहे असे मानले तर इतर देशात व्यक्तींची आडनावे (सरनेम) कशावरून पडलीत हा देखील कुतूहलाचा विषय ठरू शकतो. एकूणच ‘कुलोत्पन्न’ हा विषय जागतिकस्तरावर सर्वमान्य असाच आहे.

पुराणातील घटना, प्रसंग आणि कालावधी याची सांगड घालताना अनेकवेळा त्याला आधार मिळत नसल्याने त्या कपोलकल्पित वाटतात. त्यामुळे त्यातील व्यक्तिरेखांची ‘वंशावळ’ देखील आपल्याला खोटी वाटते. पण मग इतिहासकालीन व्यक्तिरेखा तरी सत्य आहेत ना ! त्यातील घराणी आणि त्यांची वंशावळ देखील जशी आहे तशीच सर्वसामान्य माणसांची देखील वंशावळ आहे. किमान चारशे-पाचशे वर्षांचा प्रवास सांगणाऱ्या नोंदी देखील आढळतात. पण मग कर्तृत्वाचा कोणताही इतिहास नसलेल्या माणसांनी आपली ‘वंशावळ’ का शोधायची ? हा देखील एक प्रश्न आहेच.

कुठल्याही कर्तबगारीची परंपरा नाही असा वंश टिकतो का ? त्याची वाढ होते का ? परावलंबी जीवांची शृंखला जरी निसर्गनिर्मित असली तरी त्याची वंशावळ असू शकते का ? शेवटी प्रत्येक कुळात कधी ना कधी एक कर्तबगार पूर्वज तळपलेला असतो. त्याचे स्मरण करून त्याच्यासारखेच ‘तेजोवलय’ आपल्याला प्राप्त होवून आपले ‘कूळ’ पुढे सुरू रहावे याच आशेने सर्वसामान्य माणूस आपल्या कुळातील पराक्रमी पूर्वजांच्या शोध घेण्याच्या नेहमीच प्रयत्नात असतो. आडनाव साधर्म्य असणाऱ्या इतिहासकालीन व्यक्तींमध्ये देखील तो आपल्या कुळपुरुषाला शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. इतरांप्रमाणेच आपल्याला देखील पराक्रमाची परंपरा लाभली आहे या सिद्धतेसाठीच तो ‘वंशावळ’ शोधत असतो.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

कोरोनाच्या फैलावात महाराष्ट्र आघाडीवर का …?

 • शिक्षण, विकास आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्रात संसर्गजन्य साथीचा फैलाव देशातील इतर राज्यांच्या तुलनेत नेहमीच अधिक असतो.
 • लोकसंख्येच्या दृष्टीने देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी परराज्यातून आणि परदेशातून येणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे.
 • सर्वात जास्त शहरे असलेले हे देशातील एकमेव राज्य आहे. दाटीवाटीने लोकवस्ती असणाऱ्या मुंबई महानगराबरोबरच पुणे, नागपूर, औरंगाबाद, ठाणे, नाशिक अशी सोळा शहरे प्रमाणापेक्षा अधीक लोकसंख्येचा भार सोसत आहेत.
 • आशिया खंडात सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या ‘धारावी’ प्रमाणेच आता महाराष्ट्रातील प्रत्येक शहरे झोपडपट्ट्यांच्या विळख्यात अडकलेली आहेत.
 • संसर्गजन्य आजारांचा फैलाव वेगाने होण्यास कारणीभूत ठरणारी माणसांची गर्दी यामुळे प्रशासन, आरोग्ययंत्रणा यांचा नेहमीच बोजवारा उडतो.

जगाशी सागरी मार्गाने आणि हवाईमार्गाने जोडलेल्या मुंबई महानगराची लोकसंख्या ही दोन कोटीच्या घरात आहे. रोज वेगवेगळ्या कारणांसाठी मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या महानगरांची परिस्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही. औद्योगिक विकासामुळे महाराष्ट्रात रोजगार शोधण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्याने महाराष्ट्रातील शहरांच्या जीवनमानावर त्याचा परिणाम होत आहे. प्रत्येक राज्यातील भाषा, धर्म, संस्कृतीप्रमाणेच तिथली लोकवस्ती आणि नगररचना असते.

महाराष्ट्रातील शहरांना मात्र वाढत्या गर्दीने बकाल स्वरूप येवू लागले आहे. दाटीवाटीने गर्दी केलेल्या वसाहती हे चित्र एकट्या मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात दिसत आहे. महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक आरोग्य यंत्रणा यांना संसर्गजन्य आजारावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करताना सर्वात मोठा अडसर येतो तो दाटीवाटीने गर्दी करणाऱ्या अनिर्बंध वसाहतींचा. या कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईच्या धारावी झोपडपट्टीने कोरोनावर मात करताना शासनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत एक आश्चर्याचे उदाहरण निर्माण केले हे देखील खरे आहे. मात्र इतर शहरातून हा ‘धडा’ गिरवला गेला नाही हे देखील तितकेच सत्य आहे.

अद्ययावत वैद्यकीय सेवा पुरविणारी सुसज्ज अशी हॉस्पिटल्स जवळपास सर्वच शहरे आणि निमशहरातून उपलब्ध असतांना सातत्याने वाढणारी परराज्यातील गर्दी हीच अश्या संसर्गात सर्वात जास्त डोकेदुखी असते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या वाट्याला ही डोकेदुखी कायमच आहे. लोकशाही असलेल्या देशात अधिवास आणि रोजगाराची प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे. इथे प्रांतवाद नको ही भूमिका जरी योग्य असली तरी वाढत्या गर्दीला रोखण्यासाठी प्रत्येक राज्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात येणारी गर्दी थोपविण्यासाठी एकट्या महाराष्ट्राने प्रयत्न करण्यापेक्षा इतर राज्यांनी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांचा विकास आणि अर्थकारण याबरोबरच पर्यावरण आणि आरोग्य बळकट करावे.

गर्दीला जसे हृदय नसते तशीच राजकारणाला संवेदना नसते. प्रगतीच्या वाटेवर चालणाऱ्या महाराष्ट्राच्या नशिबी पहिल्यापासूनच गर्दीचे राजकारण आले आहे. या राज्यात सहज प्रवेश करून गुजराण करणारे इथली सभ्यता, संस्कृती आणि शहरांच्या आरोग्याची नासधूस करायला कारणीभूत होतात. कोरोना, एचआयव्ही, सार्स, एच1एन1 सारखे संसर्गजन्य आजार फैलावण्याची हीच प्रमुख कारणे आहेत. गर्दीचा रेटा थोपवा अन्यथा हीच श्वासागणिक वाढणारी गर्दी संसर्गाच्या माध्यमातून आपला ‘काळ’ बनून येतील.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

पुन्हा पुन्हा लॉक डाऊन…..!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र पुन्हा लॉक डाऊनच्या दिशेने….

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झपाट्याने वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने सध्यातरी रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी या धोरणाचा अवलंब केला असला तरी आठवड्यातील दोन दिवस शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत लॉक डाऊनची घोषणा केली आहे. गेल्या वर्षभरापासून याच दुष्टचक्रात अडकल्याने व्यवसाय-उद्योग पार बुडीत निघाले आहेत. अजून काही वर्षे तरी कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन अर्थात निर्मूलन होणार नाही हे ढळढळीत सत्य आहे. अश्या परिस्थितीत नागरिकांना सुसह्य होणारी आणि सुरक्षितता बहाल करणारी नवी नियमपद्धती शासन अंमलात आणेल का ?

१२ मार्च २०२० पासून भारतात पहिला घोषित कोरोना संक्रमित रुग्ण सापडल्या पासून संपूर्ण देशाचेच या संक्रमित साथीने ‘खुले कारागृह’ करून टाकले आहे. २२ मार्च २०२० च्या ‘जनता कर्फ्यु’ नंतर देशभर ‘लॉक डाऊन’चे सत्र सुरू झाले. जवळपास ८ महिने कडकडीत ‘लॉक डाऊन’ पाळल्यानंतर काही ठिकाणी जनजीवन सुरळीत करण्यासाठी शासनाने लॉक डाऊन उठवले. या आठ महिन्यात बंदिस्त जीवन जगण्याची शिक्षा भोगल्या नंतर तरी परिस्थिती पूर्वपदावर येईल हा जनतेचा भाबडा आशावाद फोल ठरला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा आपण लॉक डाऊनच्या दिशेनेच निघालो आहोत. हीच परिस्थिती आपल्याला स्वीकारावी लागणार आहे ? संक्रमण आपत्ती असल्याने ह्यात चूक जनतेची की सरकारची ? या फालतू चर्चेचे गुऱ्हाळ करण्यापेक्षा, पुढे काय…? या प्रश्नाची सोडवणूक करणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि आता दुसऱ्या लाटे दरम्यान एक महत्वाचा बदल देखील आहे. पहिल्या लाटेदरम्यान कोविड 19 वर लस नव्हती. तिने जेंव्हा संपूर्ण जगालाच विळखा घातला, त्यानंतर जगाला प्रतिबंधात्मक लस निर्मितीची गरज भासली. आजही असे अनेक आजार, साथी आहेत ज्यांच्या प्रतिबंधात्मक लस आणि औषधींची निर्मिती झालेली नाही. किंबहुना त्यावर संशोधन करण्याची गरज पडली नाही. जेंव्हा एखाद्या साथीचा मोठ्या प्रमाणात फैलाव होतो. तेंव्हा तिला आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक लस अथवा औषधींच्या निर्मितीकडे लक्ष वेधले जाते. प्लेगच्या साथीवरून जगाने हा अनुभव घेतला आहे. सुदैवाने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान जगातील चार-पाच देशातील औषधी कंपन्यांनी लस निर्मितीकडे आपले लक्ष घातले. यात भारत देखील आहे. यशस्वी चाचणींद्वारे भारताने कोरोना प्रतिबंधात्मक लस बाजारात आणली. जगातील काही देशांना या लसीचा पुरवठा करतानांच देशांतर्गत लसीकरण सुरू केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी ‘लस’ हे सुरक्षा कवच असेल. कदाचित याच गाफील विचाराने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देखील उच्छाद मांडला असावा.

ही आकडेवारी प्रतिदिन वाढतानांच दिसत आहे.

गेल्या आठवड्याचा विचार केला तर महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. एकीकडे लसीकरणाने वेग पकडला आहे. तर दुसरीकडे साथीचे संक्रमण देखील वेगाने सुरू आहे, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजना अधिक तीव्र करीत असतानाच जर लसीकरणाचा वेग वाढविला तर तो समर्पक उपाय ठरू शकतो. मात्र इथेच ‘गोची’ आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी लसीचा पुरवठा योग्य रीतीने होत नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण होत आहे. यातून खासगी रुग्णालयातून संभाव्य ‘काळाबाजार’ होण्याची जास्त शक्यता आहे. आत्ताशी लोकांना लसीचे महत्व पटायला लागले आहे. लसीकरण केंद्रावर सामान्य माणूस गर्दी करीत असतानाच नेमका लसीचा तुटवडा निर्माण झाला तर दोष पुरवठा यंत्रणा अर्थात सरकारच्या माथी मारला जाईल.

राज्य सरकारने कोरोनाची ही दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंधाची घोषणा करीत पुन्हा त्याच त्या उपाय योजनांची अंमलबजावणी केली आहे. दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी करताना गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे हे चांगलेच आहे. मात्र या उपाय योजनांमध्ये हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना उपजीविकेसाठी नवी सुरक्षित उपाय योजना तयार करणे अपेक्षित आहे. १८९७ च्या ब्रिटिशांनी केलेल्या साथीच्या आजाराच्या प्रतिबंधात्मक कायद्यात देखील मूलतः सुधारणा करणे अपेक्षित आहे. एकतर जमावबंदी ही घोषित झालेली कळते, ती पुन्हा मागे केंव्हा घेतली ही दुसऱ्यांदा घोषित झाल्यावरच कळते. शिवाय या जमाव नियंत्रण कायद्या बरोबरच वैद्यकीय उपचार आणि सेवा कायद्यातही सुधारणा अपेक्षित आहे. ज्यामुळे साथीचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी उपयोगी होवू शकेल. आत्ता आठवड्यातील दोन दिवस लॉक डाऊन पुकारणाऱ्या महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा लॉक डाऊनच्या दिशेनेच पावले टाकायला सुरुवात केली आहे का….?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

कोविड लसीकरणासाठी भास्कर वृत्तपत्र समूहाची जनजागृती

‘भास्कर’ समूहाच्या दै. दिव्यमराठी, सोलापूर आवृत्तीने शहरातील सातरस्ता चौकात कोविड लसीकरणासाठी उभारलेले तीस फुटी सिरिंजचे भव्य कटआउट.

नुसताच व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता समाजप्रबोधन आणि जनजागृतीला अग्रक्रम देणाऱ्या देशातील वृत्तपत्र माध्यम जगतात अग्रणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भास्कर’ समूहाकडून गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीच्या राष्ट्रीयसंकट काळात विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. नैसर्गिक आपत्ती असो अथवा महामारीचे संकट असो, राष्ट्रीय आपत्तीच्या काळात व्यवसाय बाजूला ठेवून प्रबोधन आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात भास्कर माध्यम समूह नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे.

देशातील १२ राज्यातून ३ भाषांमधून ६५ आवृत्यांच्या माध्यमातून ६ कोटी ५० लाख वाचकांशी दररोज हितगुज.

गतवर्षी २२ मार्च रोजी देशभर पाळण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यु’नंतर पुकारलेल्या लॉक डाऊनच्या काळात शहरातून आपापल्या गावाकडे पायी चालत निघालेल्या कष्टकरी मजूर आणि सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाताना ‘भास्कर’ समूहाने आपल्या देशभरातील ३०० ब्युरो ऑफिसेसच्या सहाय्याने यंत्रणा उभी केली. ज्या ठिकाणी आवृत्ती कार्यालये आहेत तिथून गरजू नागरिकांना तातडीची मदत म्हणून किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. या उपक्रमातून ‘भास्कर’ समूहाने लाखों गोरगरिबांच्या अडचणीत मदतीचा हात दिला. याबरोबरच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना लोकांना समजाव्यात याकरिता विविध जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. गत मार्च महिन्यात सोशल डिस्टनसिंग आणि मास्कचा वापर याची जनजागृती करण्यासाठी गुजरात मधील सुरत शहरात आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात २५ फुटी उंचीची ‘मास्क’ची प्रतिकृती शहरात मध्यवर्ती ठिकाणी उभारली होती. हा उपक्रम ‘विक्रम’ म्हणून नोंदविल्या गेला.

सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा आरोग्य अधिकारी आदींच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रम लोकार्पण.

‘भास्कर’ समूहाच्या मराठी वृत्तपत्र दै. दिव्यमराठीचे महाराष्ट्र राज्य सीईओ निशीत जैन, महाराष्ट्र संपादक संजय आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली दै. दिव्यमराठी सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक संजीव पिंपरकर आणि युनिट हेड नौशाद शेख यांनी सोलापूर महापालिका आणि सोलापूर जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने कोरोना 19 लसीकरणाच्या जनजागृतीसाठी रंगपंचमीच्या मुहूर्तावर दि. २ एप्रिल रोजी शहरातील मध्यवर्ती समजल्या जाणाऱ्या सातरस्ता चौकात ‘कोविड सिरिंज’ची ३० फुटी भव्य प्रतिकृती उभारली. या सोहळ्याला सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा परिषदेचे सीईओ स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

दै.दिव्यमराठी सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक संजीव पिंपरकर आणि युनिट हेड नौशाद शेख यांच्या समवेत उपक्रमात सहभागी झालेली टीम.

याप्रसंगी निवासी संपादक संजीव पिंपरकर आणि युनिट हेड नौशाद शेख यांनी उपक्रमाबाबतची दै. दिव्यमराठी आणि भास्कर समूहाची भूमिका व्यक्त केली. जनजागृतीसाठी उभारण्यात आलेल्या ३० फुटी प्रतिकृतीने आपलाच अगोदरचा २५ फुटी प्रतिकृतीचा विक्रम मोडीत काढल्याचे यावेळी स्पष्ट केले. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या चौकात ही प्रतिकृती उभारल्याने नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. स्वतःच्या व्यावसायिक ‘ब्रँडिंग’साठी लाखों रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या वृत्तपत्रांच्या स्पर्धेत जनजागृतीसाठी देशभर उपक्रम राबविणाऱ्या भास्कर समूहाचे वेगळेपण दिसून येते.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.