अफगाण आणि मध्य आशियातील अशांतता

गेल्या दीड महिन्यांपासून अफगाणिस्तानातील बंडाळीला अखेर सध्यातरी पूर्णविराम मिळाला असे आपण म्हणूयात. ३१ ऑगस्टची ‘डेड लाईन’ पाळत अमेरिकेने चोवीस तास अगोदरच काबूल सोडत तालिबानींच्या हाती अफगाणींचे भवितव्य सोपवत वीस वर्षाच्या अपयशी कारवाईवर शिक्कामोर्तब केले असले तरी आता फक्त अफगाणिस्तानाच नाही तर त्याला लागून असलेल्या सर्वच देशांमध्ये पर्यायाने मध्य आशियामध्ये धार्मिक कट्टरवादाला नव्याने पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याची झळ या सर्वच देशांना बसणार आहे. दहशतवादाचा पूर्ण सफाया करण्यासाठी अफगाणिस्तानात वीस वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अमेरिकेने जाताना मात्र दहशवादींच्या हातात देश दिला. आता पुढीलकाळात होणारे मानवी मूल्यांचे आणि विकासाचे नुकसान हे फक्त एकट्या अफगाणिस्तानचे होणार नाही. तर अफगाणिस्तानचे शेजारी असलेले पाकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, इराण, चीन आणि भारत या सर्वच आशियायी देशांचे विकासात्मक आणि मानवी मूल्यांच्या स्तरावर अतोनात नुकसान होणार आहे. धर्माधिष्ठित सत्ता स्थापन करण्याच्या महत्वाकांक्षेने पछाडलेल्या तालिबानाने जरी बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानात सत्तांतर घडवून आणले असले तरी त्याला स्वातंत्र्य नक्कीच म्हणता येणार नाही. देश कसा चालवायचा असतो ? याचे ज्ञान नसलेल्या या रानटी धर्मांध दहशतवाद्यांकडून लूटमार आणि हल्ल्यांची भीती सतत राहणार आहे.

तालिबानींच्या ताब्यात अफगाणिस्तानाचा नव्वद टक्के (९० टक्के) भूभाग आला असला तरी उरलेल्या दहा टक्के (१० टक्के ) भूभागावर असलेल्या पंजशीर भागातील नॉर्दन अलाईन्सचे अफगाणी हातात शस्त्र घेऊन तालिबानींना कंठस्नान घालायला सज्ज झाले आहेत. यास्थितीत तालिबानी राजवट ही नव्वद टक्के भूभागावरच राहू शकेल. त्यातही तालिबानी एकहाती सत्ता करू शकणार नाहीत. आयएसआयएस (खुरासान) ही अत्यंत घातक समजली जाणारी दहशतवादी संघटना आता तालिबानच्या विरोधात आपल्या स्फोटक कारवाया वाढवेल. अश्यास्थितीत अफगाणिस्तानात तालिबान राजवट शरियावर आधारित का होईना पण स्थिर सरकार देवू शकेल का ? हाच खरा प्रश्न आहे. मुळातच तालिबानच्या हाती सत्ता सुपूर्द करण्याची घाई ही दस्तुरखुद्द अमेरिकेलाच झाली हे आता उघड झाले आहे. २६ ऑगस्टला काबूल विमानतळाजवळ झालेले दोन बॉम्बस्फोट हे आयसिस (खुरासान) ने केले असल्याची घोषणा अमेरिकेने चोविसतासाच्या आत करणे आणि लगेचच बदल्याची कारवाई करणे यामुळे अमेरिकेची तालिबान सोबत दोहा मध्ये ‘डिल’ झाली असल्याचेच संकेत देते. ज्या अमेरिकेला 9/11 चा बदला घ्यायला दहा वर्षे लागली. त्याच अमेरिकेने काबूल विमानतळा जवळील झालेल्या हल्ल्याचे खापर आयसिस (खुरासान)वर फोडून लगेच मास्टर माईंडला ड्रोन हल्ल्याने उडविल्याची घोषणा देखील केली. कालपर्यंत आतंकवादी असलेल्या तालिबानला या हल्ल्यातून ‘क्लीन चिट’ देण्याचा जो हास्यास्पद प्रकार अमेरिकेने अफगाणभूमी सोडताना केला आहे. त्यातून आगामीकाळात अफगाणिस्तानात अतिरेकी संघटनांमध्ये वैमनस्यातून रक्तरंजित संघर्ष उभा राहणार आहे याची अमेरिकेला जाणीव नसावी का ? फक्त आयसिसच नाही तर गेल्या दहा वर्षात शांत झालेल्या अनेक दहशतवादी संघटना आता अफगाणच्या भूमीवर पुन्हा सक्रिय झालेल्या दिसणार आहेत. बंदुकीच्या जोरावर सत्तांतर घडवून आणणाऱ्या राजवटी शेवटी रक्तपातामध्येच संपत असतात याच इतिहासाची पुनरावृत्ती पहायला मिळणार आहे. मात्र महासत्ता म्हणविणाऱ्या अमेरिकेची शेवटची ही पलायनवादी खेळी संपूर्ण मध्य आशियाला दहशतवादाच्या तावडीत ढकलणारी ठरली आहे.

आता मुद्दा तालिबानच्या सत्ताकारणाचा….शरिया कायदा लागू करीत इस्लामी राजवट लागू करण्याची घोषणा करणारी तालिबान संघटना सर्व मुस्लिम देशांना आपल्या धर्माचे रक्षण करणारी संघटना वाटते का ? जर याचे उत्तर ‘होय’ असे असते तर आज तालिबानला मान्यता देण्यासाठी सर्व मुस्लिम राष्ट्रे एकमेकांच्या हातात घालून जगासमोर आली असती. म्हणजेच इस्लामीकरणाची हाक ही फक्त सत्ताकारणासाठी एक खेळी आहे हे सर्वच मुस्लिम राष्ट्रांना मान्य आहे. आता अंतस्थ एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी अश्या दहशतवादी संघटना पोसायच्या हे गेल्या पंचवीस-तीस वर्षांच्या काळात आशियाई देशांमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर नमूद झाले आहे. अश्यास्थितीत तालिबानने आता अफगाणिस्तानवर जरी सत्ता स्थापन केली तरी ते देश कसा चालवणार आहेत ? या प्रश्नाचे सर्व जग उत्तर शोधत आहेत. पाकिस्तान कितीही तालिबानला सध्या गोंजारत असला तरी तो त्यांना कुठल्याच प्रकारची मदत करू शकणार नाही. कारण पाकिस्तान स्वतः चीनच्या मदतीवर जगणारा देश बनला आहे. लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या भारताने अफगाणिस्तानच्या उभारणीत मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. मात्र तालिबान राजवटीला तो अर्थसहाय्य करेल याची सुतराम शक्यता नाही. रशिया देखील एकदा होरपळला आहे. त्यामुळे तो आर्थिक मदत करणार नाही पण अस्थिरता कायम ठेवण्यासाठी तालिबान विरोधी गटांना शस्त्र पुरवठा करेल. आता महासत्ता असलेला चीन हा एकटाच देश आहे जो सध्या मुस्लिम देशांना गोंजारण्याच्या मनस्थितीत आहे. मात्र चीनचे विस्तारवादी धोरण असल्याने तो तालिबानला मदत करेल पण त्याबदल्यात अफगाणिस्तानचा मोठा भूप्रदेश बळकावेल. चीनची ही चाल तालिबान विरोधी गटांना आवडणारी नसेल यातून अफगाण मध्ये यादवी माजेल. एकूणच उपासमारी, हिंसाचार आणि लुटमारीने त्रस्त होणारे अफगाणी लोकांचे स्थलांतराचे वाढते प्रमाण हे इतर देशांची डोकेदुखी वाढविणारे ठरेल. उत्पादन शून्य असलेली राजवट दहशतवादी कारवाया आणि खंडणीवर अवलंबून असते. इतर देशांमध्ये अशांतता पसरवीत त्यासाठी मोठ्या खंडण्यांची वसुली करणाऱ्या संघटना आता ‘कबिला’ संस्कृती असलेल्या अफगाणिस्तानातून कार्यान्वित झालेल्या दिसतील. एकूणच आशिया खंडाला अस्थिर ठेवत आपला शस्त्रास्त्र विक्रीचा व्यवसाय तेजीत आणण्याचा उद्योग अमेरिका, रशियासह महासत्ता करतील. कंगाल मुस्लिम राष्ट्रांपेक्षा याची जास्त झळ भारताला बसू शकते.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

2 Replies to “अफगाण आणि मध्य आशियातील अशांतता”

 1. रशीयन महासत्तेला सुरुंग लावण्यासाठी अफगाणिस्तानात धार्मिक कट्टरतावादाला
  प्रोत्साहन देण्याचे महापाप अमेरिकेने अगोदर केले पण याच कट्टरतावादाचे चटके
  अमेरिकेलाही बसले पण महत्वाचा मुद्दा हा आहे की, यापूढे अमेरिकेला मुस्लिम
  राष्ट्रातील दहशतवाद व धार्मिक कट्टरतावाद जिवंत ठेवून आपला शस्त्रास्त्र
  विक्रीचा व्यवसाय वाढवण्याचा हेतू दिसून येतो.
  शस्त्रास्र विक्री करणाऱ्या राष्ट्राला जागतिक शांतता रहावी असे वाटणे अशक्य
  असते त्यामुळेच अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला असवा अशी शंका येते

  Liked by 1 person

  1. अगदी खरंय, पण याचे थेट चटके आता काश्मीरच्या प्रश्नावरून भारताला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा दहशतवाद डोके वर काढेल. तालिबानला मिळालेल्या यशाने आता अतिरेकी संघटनांमध्ये खुमखुमी वाढणार हे नक्की.

   Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.