एकशे साठ वर्षांचे झाले सोलापूर रेल्वे स्टेशन….!

भारतातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे ही कंपनी स्थापन करण्यात आली. त्यानंतर हळूहळू तिचा सर्वत्र प्रसार सुरू झाला. त्यातूनच २३ ऑक्टोंबर १८५९ रोजी पुण्यापर्यंत आलेल्या रेल्वेने पुणे ते बारसी रोड म्हणजे आत्ताचे कुर्डुवाडी पर्यंत मजल मारली. त्यानंतर मुंबई ते मद्रास म्हणजे आत्ताचे चेन्नईकडे मार्गस्थ होणारी रेल्वे १८६० मध्ये सोलापूर पर्यंत आली. निश्चित तारीख मिळाली नसली तरी सोलापूर रेल्वे स्थानकाचे हेच वर्ष गृहीत धरावे लागेल. म्हणजेच आजमितीस सोलापूर रेल्वेस्थानक हे १६० वर्षांचे झाले आहे.

भारतावर गुलामी लढणाऱ्या ब्रिटिश सत्तेला १८५० ते १८६० हे दशक जसे राजवटीसाठी धामधुमीचे होते तसेच भारतीयांसाठी देखील हे दशक महत्वाचे ठरले होते. १७ व्या शतकाच्या सुरुवातीला व्यापारासाठी आलेल्या इंग्रजांनी १७५६ च्या प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलाचा पराभव करीत खऱ्या अर्थाने ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल सुरू केला. पुढे शंभर वर्षे एक-एक प्रदेश काबीज करीत संपूर्ण भारत, नेपाळ, अफगाणिस्तानात कंपनीची सत्ता स्थापन केलेल्या ब्रिटिशांना १८५० पासूनच सत्तेला हादरे बसू लागले. या दरम्यान लष्कराच्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारी रेल्वे त्यांनी १८५३ मध्ये भारतात आणली. गोऱ्या लोकांना घेवून धावणाऱ्या या रेल्वेत तेंव्हा अंधश्रध्देपोटी भारतीय बसायला देखील घाबरायचे. १८५७ च्या लष्करी उठावानंतर ब्रिटिश सत्तेमध्ये मोठा फेरबदल झाला. ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता काढून घेत राणी व्हिक्टोरियाची राजवट १८५८ पासून सुरू झाली. कंपनीच्या व्हॉइसरॉयच्या जुलमी अनिर्बंध राजवटीला थोडासा लगाम घालत ब्रिटिशांनी सत्ता चालविताना पहिल्यांदाच भारतीयांच्या नागरी सुविधांचा विचार सुरू केला. याबरोबरच लष्कराचे दळणवळण अधिक मजबूत करण्यासाठी भारतभर रेल्वे मार्गाचे जाळे पसरविण्यास सुरुवात केली. याचकाळात मुंबई ते मद्रास रेल्वेमार्ग सुरू करण्यामागे देखील मद्रास येथील लष्कराच्या कंपनीला सुविधा मिळावी हाच ब्रिटिशांचा प्रमुख हेतू होता. काहीही कारण असले तरी यानिमित्ताने का होईना भारतात रेल्वे सुरू झाल्यापासून अवघ्या सहा-सात वर्षात रेल्वेची चाकं सोलापूरपर्यंत पोहोचली हे मात्र खरं आहे.

सोलापूरला ब्रिटिश ‘शोलापूर’ म्हणायचे. त्यांचा उच्चार सदोष असला तरी सोलापूर हे स्वातंत्र्याच्या उठावात खरोखरच ‘शोला’पूर बनले होते. या रेल्वेने ब्रिटिशांच्या सत्तेला जशी मजबुती दिली. अगदी तशीच मजबुती भारतीय समाजाच्या विकासाला दिली. या रेल्वेमुळेच सोलापूरचे औद्योगिकीकरण जसे झपाट्याने वाढले तसेच स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र म्हणून देखील सोलापूर पुढे आले. संपूर्ण भारताला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर १९३० मध्ये सोलापूर शहर हे तीन दिवसांसाठी ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाले होते. केवळ रेल्वे आल्याने या शहराचा औद्योगिक कायापालट जसा झाला तसाच स्वातंत्र्याच्या लढ्याला वेग मिळाला त्याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल. सोलापूर मिल ही त्याकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी सूतगिरणी म्हणून लौकिक प्राप्त होती. त्याकाळी या मिलमध्ये दहा हजार कामगार होते. कामगारांच्या वसाहतींनी भरलेल्या सोलापूरला गिरणगाव म्हणून देखील ओळख मिळाली. रेल्वेमुळेच नवे तंत्रज्ञान या शहरात फार लवकर पोहोचले. मुंबई नंतर मोठमोठे उद्योग सोलापुरात उभारले गेले. या रेल्वेमुळेच सोलापूरला पारतंत्र्यात असतांनाही वैभव प्राप्त झाले होते.

सोलापूरचे सर्वात पहिले म्हणजे १८६० मधील रेल्वेस्टेशन नेमके कुठे होते ? आणि त्याचे स्वरूप कसे होते ? याबाबत जुनी छायाचित्रे किंवा माहिती उपलब्ध होत नाही. मात्र सध्या असलेल्या ठिकाणीच जर रेल्वे स्थानक असेल तर रेल्वेच्या इमारतीच्या विस्तारीकरणात त्याकाळचे ‘नॅरो गेज’ रेल्वेस्टेशन इतिहासजमा झाले असावे. नॅरो गेज, मीटर गेज आणि पुढे ब्रॉड गेज असे रेल्वेमार्गाचे बदल होत गेले तसे स्टीम इंजिन, कोळसा इंजिन, डिझेल इंजिन ते आता विद्युतीकरणाकडे जाणारे रेल्वे इंजिन हे गेल्या १६० वर्षातील रेल्वेचे विकासात्मक बदल या सोलापूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मने बघितले आहेत. प्रवाशांच्या सुखदुःखात सोबत करत त्याला यशाच्या प्रवासाला हिरवा झेंडा या स्थानकाने अव्याहतपणे दाखवला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे युनियन जॅक खाली उतरवून स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकताना या रेल्वेस्थानकाने लाखों भारतीयांना सुरक्षित आपल्या घरी परतताना पाहिले आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

9 Replies to “एकशे साठ वर्षांचे झाले सोलापूर रेल्वे स्टेशन….!”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.