वीस मिनिटात ३८० जणांचा मृत्यू परत गेल्याची सत्यकथा…!

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अचानक मृत्यूचे प्रमाण वाढले. उपचाराची दिशा निश्चित झाल्यानंतर देखील हे मृत्यूचे प्रमाण वाढले होते. हॉस्पिटलला होणारा ऑक्सिजन पुरवठा रुग्णांची संख्या वाढत चालल्याने कमी पडू लागला होता. ही स्थिती भारतात सगळीकडेच कमी-अधिक प्रमाणात होती. सरकार आपल्यापरीने प्रयत्न करीत होते. मात्र उत्पादन कमी असताना मागणी अचानक वाढली की बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होते. अगदी तेच मेडिकल ऑक्सिजन सिलेंडरच्या बाबतीत झाले होते. महाराष्ट्र राज्यात एप्रिल २०२१ मध्ये ठिकठिकाणी हॉस्पिटल मधून ही कृत्रिम टंचाई भीषण रूप धारण केलेली होती. मी राहतो त्या सोलापूर शहरातील ही सत्यघटना आहे. दि. २१ एप्रिल २०२१ रोजी रात्रीच्या सुमारास शासकीय रुग्णालयात ३८० अत्यवस्थ कोरोना पेशंट होते आणि फक्त २० मिनिटे पुरेल एव्हढाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक होता. जर २१ व्या मिनिटाला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला नसता तर…..?

अंदाजे दहा लाख लोकसंख्या असलेले सोलापूर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. एकेकाळी सूत गिरण्यांमुळे आशिया खंडात प्रसिद्ध असलेले औद्योगिक शहर म्हणून या शहराची ओळख होती. गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्रात हे शहर खूप पिछाडीला पडले आहे. हे सांगण्याचे कारण आजमितीस सोलापुरात लिक्विड ऑक्सिजन रिफिलिंगचे केवळ चारच प्लान्ट आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सगळीकडेच लिक्विड ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळेच सोलापूरला आवश्यक तेव्हढा साठा उपलब्ध करून देण्यात आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला अडचणी येत होत्या. तश्याही स्थितीत सोलापूरच्या होटगीरोड औद्योगिक वसाहतीत अलिम अकबर शेख या तरुण उद्योजकाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांच्या प्रोत्साहनामुळे नोव्हेंबर २०२० मध्येच लॉक डाऊनचा काळ असतांनाही मुंबई, पुणे, हैदराबाद येथे जाऊन मशिनरी खरेदी करून मेडिकल ऑक्सिजनचा प्लान्ट आरटीएस एअर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कार्यान्वित केलेला होता. सुरुवातीला दररोज ६ टन लिक्विड ऑक्सिजन उत्पादन होत असल्याने ते सुरळीतपणे पुरविले जात होते. याकाळात सलग ५० दिवस दिवसरात्र एकही मिनिट न थांबता उत्पादन घेऊन शहरातील रुग्णालयांना मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम आरटीएस एअर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक अलिम अकबर शेख यांनी केले.

एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासूनच शहरातील हॉस्पिटलमधून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली होती. त्यातच अतिशय अत्यवस्थ अवस्थेत ऑक्सिजनची पातळी खालावलेल्या अवस्थेतील रुग्णसंख्या वाढतच चाललेली होती. शासकीय रुग्णालयात ही संख्या चारशेच्या घरात पोहोचलेली होती. तर इतर प्रमुख दहा-बारा रुग्णालयातून प्रत्येकी ६० ते ७० रुग्ण ऑक्सिजनवर होते. दि. २१ एप्रिल २०२१ रोजी अचानक ऑक्सिजन साठ्याच्या पुरवठ्यामध्ये त्रुटी निर्माण झाली आणि प्रशासनाचे धाबे दणाणले. बाहेरून कुठूनही साठा उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा अलिम शेख यांच्या आरटीएस प्लान्ट वर दाखल झाली. केवळ २० मिनिटे पुरेल एव्हढाच मेडिकल ऑक्सिजनचा साठा शासकीय रुग्णालयात शिल्लक होता. त्यानंतर अलिम शेख यांनी इतर ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सिजन साठ्यात ऍडजेस्टमेंट करीत ६८ ऑक्सिजन सिलिंडर वेळेत शासकीय रुग्णालयात पोहोचविले. याबाबत प्रशासनाने रुग्णांमध्ये आणि शहरवासीयांमध्ये कोणत्याही प्रकारची घबराट पसरू नये म्हणून कमालीची गुप्तता पाळली. प्रसिद्धी माध्यमांपर्यंत देखील ही घटना पोहोचू नये याची दक्षता घेतली.

हेच ते कोविड योद्धा अलिम अकबर शेख.

जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आणि सर्व आरोग्य यंत्रणेच्या प्रोत्साहनातून इंडस्ट्रीयल लिक्विड गॅसची एजन्सी चालविणाऱ्या अलिम शेख यांनी कोरोना महामारीत लॉक डाऊनच्या काळात केवळ सामाजिक जाणिवेतून मेडिकल ऑक्सिजनचा ६ टन क्षमतेचा प्लान्ट सुरू केला. त्यांच्या या सामाजिक जाणिवेमुळेच शासकीय रुग्णालयातील ‘त्या’ ३८० अत्यवस्थ रुग्णांचे प्राण वाचले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय देणारी ही सत्यघटना आहे. आता आगामी काळात ते १० टन क्षमता वाढवीत आहेत. म्हणजे एकूण १६ टन उत्पादन क्षमता वाढेल. त्यामुळे शहरातील सर्व रुग्णालयांना आपत्कालीन परिस्थितीतही ऑक्सिजन पुरवठा शक्य होईल.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.