तुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……!

कुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी संकटं कोसळायला लागली की आपल्याला ‘वडील’ आठवतात. तोपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा हा घरातला कमावता माणूस आपल्याला फक्त हुकूमशहा वाटत असतो. मात्र तो नसेल तर किंवा आपण आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारतो तेंव्हा ‘तो’ आपल्या अवती-भवती असल्याची सतत जाणीव छळत राहते. कारण कळत नकळत का होईना त्याला ‘थॅंक्यु’ म्हणायचं राहून गेलेलं असतं…….

खूप वर्षांपूर्वीची नाही पण काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. तरी पण त्याला आता दीड वर्ष झालं असेल. म्हणजे कोरोना महामारीचा शिरकाव होण्या अगोदरची ही गोष्ट आहे. ऑफिसला जाताना रिक्षास्टॉपवर एक वयस्कर रिक्षावाला जणू माझी वाट पहात उभारलेला असायचा. घरापासून ऑफिस चांगलं आठ किलोमीटर अंतरावर असल्याने गर्दीतून रिक्षातून किमान अर्धातास लागायचा. यावेळेत रिक्षावाल्याशी चांगल्या गप्पा व्हायच्या. सुरुवातीला माझ्या कामकाजाविषयी आणि ऑफिस विषयीच तो भरभरून विचारायचा. माझ्या इतर सहकाऱ्यांच्या ओळखी सांगायचा. मला त्यात फार आश्चर्य वाटले नाही. एकतर रिक्षा चालविण्याचा त्याचा व्यवसाय असल्याने त्यांना शहराची खडानखडा माहिती असती. त्यात माझ्या सहकाऱ्यांविषयी एव्हढी माहिती कुठून मिळाली ? असं विचारण्याची मला देखील आवश्यकता वाटत नव्हती. एक म्हणजे गप्पांचा विषय माहितीतील असला म्हणजे कंटाळा येत नाही. शिवाय गप्पा मारणारा जर चांगलं बोलत असेल तर त्याचा सहवास आपल्याला आवडतो. माझी त्या रिक्षावाल्याशी मैत्री झाली ती अशी. काही दिवसांनी माझ्या एका सहकाऱ्याने मला सहजच हटकले. ‘एव्हढं काय बोलत असता हो तुम्ही त्या रिक्षावाल्याबरोबर ?’ मी म्हणालो ‘काही नाही रे आपल्याच ऑफिसच्या कामकाजा बद्दल बोलत असतो, बघ ना ! रिक्षावाला आहे तो…पण आपल्या ऑफिसमधल्या प्रत्येक जणांची त्याला पूर्ण माहिती आहे. माझ्या या वाक्यावर क्षणभर तो हसला आणि मग माझ्या नजरेला नजर भिडवत म्हणाला ‘ ते माझे वडील आहेत.’ मी अवाकच झालो. अरे पण त्यांनी कधी तुझा विषय काढला नाही ? माझ्या या प्रश्नावर तो हसतच उत्तराला,’ काय करणार आपल्या मुलाबद्दल कितीही काळजी वाटली तरी ते थेट कधीच बोलणार नाहीत. इतरांकडूनच माहिती घेतील. अंदाज बांधून आपल्या मुलाचे व्यवस्थित आहे ना ! याची खात्री करतील. वडील आहेत ना ते…!’ मला त्याच्या या शेवटच्या वाक्याने खूपच अंतर्मुख केले. मी माझ्या वडिलांना आठवायला लागलो.

माझ्या वडिलांचे निधन होवून सात वर्षे झालीत. याकाळात वडिलांची मला नेमकी किती वेळा आठवण झाली ? घरात सणवार असला की आठवण निघायची. मग त्यांचा स्वभाव, त्यांची काम करण्याची पद्धत सगळ्याची पुन्हा आठवण व्हायची. कधी खूप निराश वाटायला लागलं की त्यांची खूप आठवण यायची. पण हे सगळं आपल्यासाठी. त्यांच्यासाठी म्हणून त्यांची कधी आठवण काढली का आपण ? निवृत्तीनंतर घरात बसून कंटाळा येतो म्हणून ते बाहेर भटकायला निघायचे. अलीकडे त्यांचा विसराळूपणा वाढला होता. त्यातच चालताना केंव्हाही त्यांचा तोल जाईल याची भीती असायची. त्यामुळे घरातील सर्वांनाच त्यांची काळजी वाटायची. तश्या अवस्थेतही ते घरी येणाऱ्या माझ्या मित्रांकडे सारखी चौकशी करायचे. त्यावेळी मला त्यांचा राग यायचा…चिडचिड व्हायची. त्यांचं वागणं त्यावेळी विचित्र वाटायचं. आता माझा मुलगा नोकरीसाठी बाहेरगावी राहतोय. त्याच्या काळजीपोटी मी देखील आता तेच करतोय जे माझे वडील माझ्यासाठी करत होते.

गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे अनेकांची जवळची माणसे दगावली. कुणाचे आई-वडील, कुणाची मुले दगावली. कित्येकांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र गेले. खंबीरपणे पाठीशी उभे राहणारा आधार गेल्यानंतर किती एकाकी वाटते याचा अनुभव अनेकांच्या नशिबी आलाय. याकाळात एकमात्र नक्की झालं……वडिलांची आठवण प्रत्येकाला आली. ज्यांचे वडील त्यांच्यासोबत आहेत ते खरेच भाग्यवान आहेत. कारण त्यांना आपल्या वडिलांना फक्त एकदा का होईना…थॅंक्यु म्हणण्याची संधी आहे. पण ज्यांचे वडील नाहीत, अशांना प्रत्यक्ष ‘थॅंक्यु’ म्हणण्याची संधी कधीच मिळणार नाही. पण एका गोष्टीवर मात्र विश्वास ठेवायलाच हवा. जेंव्हा केंव्हा वडिलांची आठवण येईल तेंव्हा क्षणभर डोळे मिटून त्यांच्या चेहरा आठवा आणि मनातल्या मनात एकदाच ‘थॅंक्यु’ म्हणा….बघा काय वाटतंय ते ? खूप हलकं हलकं वाटेल. आपल्या पाठीशी वडील कायम आहेत याची निश्चित जाणीव होईल.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

9 Replies to “तुला थॅंक्यु म्हणायचं राहूनच गेलं……!”

  1. फादर्स डे निमित्त वडिलांविषयी व्यक्त झालेल्या संवेदना मनाला भावून गेल्या.

    Liked by 1 person

  2. माता-पिता, हमेशा अपने बच्चों का भला चाहते है। यह कहना गलत होगा कि हमारे जीवन में उनकी भूमिका पालन -पोषण तक ही रही है। हमारें आचार -विचार और व्यवहार पर उनका गहरा प्रभाव है।

    Happy father’s day💐💐

    Liked by 1 person

KK साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.