इच्छापूर्तीचा पाऊसखेळ…!

इच्छापूर्ती म्हणा किंवा स्वप्नपूर्ती म्हणा..फरक पडत नाही. शेवटी दबलेल्या इच्छांची सलग चित्रफीत म्हणजेच स्वप्न..!

सध्या पावसाळी दिवस आहेत. म्हणजे भारतात तरी पावसाळा सुरू झालाय. अगदी पूर्ण आवेशात तो पडत नाही. पण हळूहळू सगळीकडे हजेरी लावतोय. हा मोसम म्हणजे इच्छापूर्तीचा मनमुराद आनंद लुटण्याचा उत्सवच समजा ना. कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आपल्याच नादात चालली तर क्षणभर का होईना मनातल्या मनात आपण पुटपुटतोच ना…’पलट’ म्हणून ! त्याच क्षणी तिने पालटून पाहिले तर इच्छापूर्ती झाली म्हणायचो. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात अगदी तसंच असतं. अगदी अंधारून यावं इतके ढग दाटून आले तरी आपण मनात इच्छा व्यक्त करावी….कोसळ आता आणि त्याचक्षणी पाऊस कोसळायला सुरुवात व्हावी हीसुद्धा इच्छापूर्तीचं म्हणायची. अगदी छोट्या छोट्या गोष्टींची मनमुराद लयलूट करण्याचा सिझन म्हणजे पावसाळा. लहानपणी आकाशातल्या प्रत्येक काळ्याकुट्ट ढगांवर आम्ही आमची मालकी ठरवायचो. त्या ढगातून पडणारा पाऊस हा आमची प्रॉपर्टी असायचा. गंमतीचा भाग पुढेच असायचा. आकाशात काही एकच ढग नसायचा. असंख्य ढग एकमेकात मिसळून जायचे मगच पाऊस पडायचा. आमची मात्र पंचाईत व्हायची. पडलेला पाऊस नेमका कुणाच्या मालकीचा ? मग आम्ही आपसात समझोता करायचो. मग अंगणात प्रत्येकाच्या नावाचा चौकोन तयार करायचा. त्यात पडलेले पावसाचे पाणी त्याच्या मालकीचे. व्यवहार परिपूर्ण नसला तरी इच्छापूर्तीचा आनंद देणारा असायचा.

आणखीन एक आवडीचा खेळ म्हणजे पाऊस पडून गेल्यावर ढगाआड सूर्य अस्ताला जात असतांना जी काही रंगांची उधळण करतो ती पाहण्याचा मनमुराद आनंद लुटणे. हा आनंद घेताना पण सूर्याला आदेश देणारा एक खेळ आम्ही खेळायचो. सूर्य अस्ताला जाताना डोळे मिटून रंगाची इच्छा व्यक्त करायची. वन टू थ्री म्हणत डोळे उघडले की आपण इच्छा व्यक्त केलेल्या रंगांची उधळण दिसली तर सूर्य आपले ऐकला. त्याने आपले ऐकावे म्हणून त्याला तीन संधी द्यायच्या. हा खेळ अगदी अंधारून येईपर्यंत चालायचा. खेळ कुठलाही असो त्यात इच्छा व्यक्त करणे आणि निसर्गाने ती इच्छा पूर्ण करणे हा नियम असायचा. त्यावेळी हे जरासुद्धा विचित्र वाटत नसायचे. काही समजायचं वय नसल्यामुळेच ‘असं कुठं असतंय का ?’ हा प्रश्न देखील मनात येत नव्हता. स्वप्नाळू वयातच निसर्गाबरोबर खेळ खेळल्या जातो ना. शेवटी घरातली वडीलधारी मंडळी आपली जी इच्छा पूर्ण करू शकत नाहीत ती इच्छा जादूने किंवा निसर्गाने पूर्ण कराव्यात हे स्वप्न बघायचं वय तेच असतं ना ! बालिश, पोरकट, नादान…तुम्ही त्याला काहीही म्हणू शकता. पण त्यावयात प्रत्येकजण असे विचित्र पण मनमुराद आनंद देणारे खेळ खेळत असतो. आता आपल्याला आठवलं तरी आपण त्या कृतीला स्वतःचा बावळटपणा समजतो. हाच बावळटपणा मोठे झाल्यावर आपण करतो का हो…?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

9 Replies to “इच्छापूर्तीचा पाऊसखेळ…!”

Rupali साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.