‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…?

  • लहान मुले ही राष्ट्राचे भविष्य असते या विचाराला जगाची मान्यता आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया समजला जातो.
  • आज शिक्षणाच्या माध्यमात जगभरात इंग्रजी ही प्रमुख भाषा समजली जात असली तरी आजही सर्वच देशांमधून स्थानिक भाषांमध्ये दिले जाणारे शिक्षण प्रचलित आहे.
  • गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद कराव्या लागल्या.
  • या परिस्थितीत ‘ऑनलाईन एज्युकेशन’ हा पर्याय समोर आला. अर्थात ज्या विकसनशील देशांमध्ये शैक्षणिक सुविधा आणि विकास आहे त्याठिकाणी ऑनलाईन एज्युकेशन ही पध्द्त यापूर्वीच प्रचलित झाली आहे.
  • मात्र प्रत्येक देशाच्या धार्मिक-सामाजिक,सांस्कृतिक परंपरा आणि त्यावर आधारित शिक्षण व्यवस्था वेगळी आहे. त्यामुळे संगणक प्रणाली आणि अद्ययावत तंत्रप्रणालीवर आधारित असलेले ‘ऑनलाईन एज्युकेशन’ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य आहे का ? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
  • याशिवाय सतत संगणक आणि मोबाईल हाताळत शिक्षण घेणाऱ्या मुलांचे शाररीक विकास आणि सामाजिकज्ञान याविषयी आता प्रश्न निर्माण होत आहेत.
या वर्षीच्या ऑनलाईन शैक्षणिक सत्राला शाळेच्या बंद दरवाजाच्या आतून सुरुवात झालीय…..

जगातील सर्वच देशांची धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषा भिन्न असल्याने सामाजिकता देखील भिन्न आहेत. अश्यास्थितीत स्वतःचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक स्थान बळकट करणारे शिक्षण देण्यावर प्रत्येक देशाचा भर असतो. लहान मुले ही राष्ट्राची संपत्ती आणि त्या राष्ट्राचे भविष्य असल्याचे सर्वांनाच मान्य असल्याने उज्ज्वल भविष्यासाठी लहान मुलांची जडणघडण करणे हाच प्राथमिक शिक्षणाचा पाया असू शकतो. प्राचीनकाळातील शिक्षणपध्द्ती चांगली की आधुनिक शिक्षणप्रणाली चांगली हा वादाचा मुद्दा चर्चेला घेण्यापेक्षा सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर कोणतीही तयारी नसताना शिक्षण व्यवस्थेला अचानक स्वीकारावी लागलेली ऑनलाईन प्राथमिक शिक्षणप्रणाली ही लहान मुलांना कितपत पचनी पडणारी आहे ? हा मुद्दा चर्चिला जाणे मला महत्वाचा वाटतो. ज्या वयात मुले फक्त आपल्या आईशी संवाद साधत असतात अश्या वयात आपण त्यांच्यावर प्राथमिक शिक्षणाचे ओझे लादत असतो. मुले त्यांना आवडणाऱ्या व्यक्तींचे ऐकत असतात. त्यातही त्यांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंचे माध्यम बनवत ते जगाची ओळख करून घेत असतात. ज्ञानाबरोबरच मुलांच्या शारीरिक विकासावर लक्ष केंद्रित करून त्यांचा विकास साधणे आणि त्यांच्या इतर सामाजिक घटकांबद्दलच्या जाणिवा वाढविणे याची जबाबदारी प्राथमिक शिक्षणावरच असते. हे सर्व या ऑनलाईन शिक्षणातून साध्य होणार आहे का ? गेल्या दोन वर्षांच्या प्रयोगातून तर हे अशक्य वाटू लागले आहे. अर्थात अचानक बदलाव्या लागलेल्या शिक्षण प्रणालीला आत्मसात करण्यात शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांना जसा पुरेसा कालावधी मिळाला नाही तसाच पालकवर्गाला मिळाला नाही. त्यामुळे दोन वर्षांच्या प्रयोगातून आपल्या हाती फारसे काही लागले नाही अशी आपण समजूत करून घेवू शकतो. त्यातही ‘ऑनलाईन एज्युकेशन’ ही कायमस्वरूपी स्वीकारण्याची शिक्षण प्रणाली नाही अशी समजूत व्यवस्थेने देखील करून घेतलेली आहे. निदान प्राथमिक शिक्षण देताना तरी शाळा हीच योग्य व्यवस्था आहे यावर आता सर्वच शिक्षणतज्ज्ञ देखील ठाम आहेत. पण ही तात्पुरती स्वीकारलेली प्रणाली अजून कितीकाळ राहणार आहे ? सर्वात महत्वाचे म्हणजे याकाळात लहान मुलांच्या विकासाची होणारी हानी त्यांच्या भविष्याला पर्यायाने राष्ट्राला नुकसानकारक ठरणार नाही का ? हा प्रश्न सध्यातरी दडपून ठेवला आहे. मनात आले तरी कुणीच कुणाला हा प्रश्न विचारताना दिसत नाही.

ऑनलाईन एज्युकेशनमुळे वर्गमित्र हे सामाजिक नाते विसरले जात आहे….

मार्च २०१९ मध्ये जगभरात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ‘लॉक डाऊन’चे सत्र सुरू झाले आणि बऱ्याच ठिकाणी वार्षिक परिक्षेशिवायच त्या वर्षीचे शैक्षणिक सत्र अघोषितपणे थांबविण्यात आले. त्यानंतर कोरोनाचा कहर वाढत गेला. गर्दी टाळणे आणि संसर्ग टाळणे या मुद्यांवर पालकवर्गाने मुलांना शाळेत जायला विरोध केला तर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात कमकुवत ठरणाऱ्या शाळा व्यवस्थापनाने स्वतःहून शाळा बंद केल्या. सरकारला देखील सुरक्षेच्या दृष्टीने शाळा बंद रहाव्यात असेच वाटत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय सर्वांचीच सुटका करणारा ठरला. त्यानंतर घरातच अडकलेल्या मुलांना अभ्यासात गुंतवून ठेवण्याच्या गरजेपोटी ऑनलाईन एज्युकेशन प्रणालीचा शाळांनी स्वीकार केला. यापूर्वी ही प्रणाली काही इंटरनॅशनल स्कुल आणि कोचिंग क्लासेसने स्वीकारली असल्याने सर्वच शाळा व्यवस्थापनाला हा मार्ग सोयीचा वाटला. विद्यार्थिविना रिकाम्या क्लासरूममध्ये कॅमेरा समोर विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवत एखाद्या निवेदकाप्रमाणे शिकवण्याचा घाट घातला गेला. यालाच ‘ऑनलाईन एज्युकेशन’ असे नाव देण्यात आले. ज्या देशांमध्ये संगणक आणि मोबाईल हाताळणे नित्याचे झाले आहे अश्या देशांमध्ये कदाचित हा प्रयोग सोयीचा आणि परिणामकारक ठरला देखील असेल. मात्र गरीब किंवा विकासाच्या वाटेवर असणाऱ्या देशातील लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना ही खर्चिक प्रणाली पेलविली असेल का ? भारतात देखील ही खर्चिक प्रणाली परवडणारी नसल्याचेच दिसून आले आहे. अजूनही अँड्रॉईड मोबाईल घेणे सामान्य पालकाला परवडणारे नाही. एकीकडे मोफत प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारणारे सरकार तर दुसरीकडे पैसे मोजण्याची क्षमता असलेल्या वर्गालाच शिक्षण देणारी व्यवस्था असे विचित्र चित्र दिसू लागले आहे.

क्लासरूमला स्टुडिओ बनविणारी ऑनलाईन प्रणाली…

नाईलाज म्हणून स्वीकारलेल्या ऑनलाईन एज्युकेशन सिस्टिमद्वारे मुलांची खरीच किती प्रगती झाली हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. क्लासरूमला एखाद्या चॅनेलच्या स्टुडिओमध्ये रूपांतर करीत शाळांनी आपले स्वरूप पालटले असले तरी विद्यार्थ्यांचे काय ? तर हे काही दिवसांसाठीच असेल, पुन्हा शाळा पूर्ववत सुरू होतील असा आशावाद मांडला जातो. अर्थात हे सत्यच आहे. पुन्हा शाळा पूर्ववत भरतील. वर्गात विद्यार्थी जमतील. खेळाच्या तासिकेला मैदानात खेळायला जमतील. दुपारी लंच बॉक्समध्ये आईने दिलेला खाऊ आपल्या मित्राला खायला देतील. शाळा सुटल्यावर स्कुलबस मधून उतरताना ड्रायव्हर काकांना टाटा करतील कारण त्यांना हे सर्व टीचर प्रत्यक्ष शिकवू शकतो…..ऑनलाईनवर संस्कार शिकवले जात नसतात. नवे तंत्रज्ञान शिकण्याचे देखील एक वय असावे लागते. जगाच्या बरोबर धावण्याची शर्यत खेळताना मुलांचे बालपण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार कुणी करायचा…?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

5 Replies to “‘ऑनलाईन शिक्षण’ मुलांची सर्वांगीण वाढ रोखणारे आहे का…?”

  1. अतिशय संवेदनशील विषय आहे….पण या विषयावर सध्या तरी काहीच उत्तर नाही, असे मला वाटते…..येणारा काळच यावर चोख उत्तर देवू शकेल😷😷😷

    Liked by 1 person

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.