अन लॉक नंतरचा पहिला रविवार….

रात्रभर स्वतः जागे रहात इतरांना जागरण करायला लावणाऱ्या पावसाने पहाटे केंव्हातरी थांबावे आणि सूर्याने ढगाआडून डोके बाहेर काढत भिजलेल्या निसर्गाला कोरडे करावे अशी सकाळ कुणाला आवडत नाही ? त्यातही तो रविवारचा सुट्टीचा दिवस असेल तर ? लॉक डाऊन उठवल्यानंतरचा पहिला रविवार म्हणून दिवसाची अशी सुरुवात करणारा पहिला रविवार खूप दिवसांनंतर उत्साहवर्धक वाटला. आठवड्यात एक दिवस सुट्टी असावी ही गरज ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असतांना पुढे आली असावी. त्यांनी रविवार निवडला म्हणून आम्हा भारतीयांना देखील रविवार हा दिवस जास्त महत्वाचा ठरला. रविवारी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करता यावी यासाठी ब्रिटिशांनी हा दिवस निवडला असेल कदाचित. हिंदूइझम मध्ये आठवड्याच्या सर्वच दिवसांचे सारखेच महत्व आहे. मुस्लिम धर्मीयांमध्ये शुक्रवारचे महत्व आहे. पण बहुसंख्य हिंदू असणाऱ्या भारतात सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून रविवार निवडला त्यालाही आता दीडशे वर्षांहून अधिक काळ लोटला असेल. पण रोजच्या कामातून मोकळीक मिळणारा दिवस म्हणूनच भारतीयांना रविवार महत्वाचा वाटतो. त्यामुळेच प्रत्येक रविवारची सुरुवात ही स्वप्नवत आणि आल्हाददायक व्हावी असेच वाटत असते.

उद्या सुट्टीचं आहे म्हणून आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत म्हणजे शनिवारी रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने रविवारी सकाळी उशिरापर्यंत अंथरुणात लोळत पडण्यात जो आनंद असतो तो फक्त रविवारीच मिळू शकतो यावर बहुदा जगभरात एकमत होवू शकते. त्यामुळे रविवारच्या दिवसभराचे शेड्युल हे सकाळी दहा वाजल्यानंतरच सुरू करण्याकडे सगळ्यांचाच कल असतो. सगळेच जण घरात असल्याने अगदी अंघोळीपासून सर्व कामे संथगतीने करण्याकडे कल असतो. रोजचीच घरातली कामे पण ती घाईत न करता संथगतीने करणे यालाच बहुदा रविवारचा प्लॅन म्हणत असावेत. नाही म्हणायला नाश्त्यासाठी काहीतरी वेगळा मेन्यू बनविणे आणि तो दिवसभर भूक लागेल तसा खाता येईल एव्हढ्या प्रमाणात तयार करायचा असतो. कारण घरकाम करणाऱ्या आपल्या घरातील महिला सदस्यांना देखील एक दिवस स्वयंपाकातून सूट मिळायला हवी ना..! ब्रिटिशांनी त्यांच्यासाठी आठवड्यात वेगळा दिवस सुट्टीचा ठेवला नाही. अन्यथा भारतात ती प्रथा देखील सुरू झाली असती. तर हे आहे भारतातील रविवारच्या सुट्टीचे पुराण.

घरात नाश्ता बनवण्याची तयारी सुरू झाल्याशिवाय घरातील पुरुष मंडळींनी अंथरुणातून बाहेर पडायचं नसतं. म्हणजे सकाळच्या पहिल्या चहाबरोबर गरमागरम नाश्त्याची टेस्ट त्याशिवाय कळतच नसते यावर माझा ठाम विश्वास आहे. भारत हा बहुप्रांतीय आणि बहुधर्मीय देश असल्याने इथे खाद्यपदार्थांमध्ये देखील विविधता आहे. प्रत्येक गावाची, शहराची जशी स्वतंत्र सभ्यता आहे तशी खाद्यसंस्कृती देखील ‘स्पेशल’ आहे. दक्षिणेकडे सकाळी नाश्त्याला इडलीसांभार खूप प्रसिद्ध आहे. आता तो भारतभर प्रसिद्ध आहे. फक्त प्रत्येकाच्या तयार करण्याच्या पध्द्तीप्रमाणे सांभाराच्या चवीत बदल होवू शकतो. चिनी लोक नूडल्स खातात अगदी तसे भारतीय लोक इडलीसांभार खातात. युरोपीय लोक पास्ता अगदी दुपारचे जेवण म्हणूनही खातील. आमच्याकडे तर रविवारी दिवसभर इडलीसांभारच खायला मिळेल.गरमागरम वाफाळलेली इडली सोबत ओल्या नारळाची खोवलेली चटणी अन चिंच-आमसुलचा सांभार हा रविवारच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करणारा असतो.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सततच्या लॉक डाऊनमध्ये अडकल्याने घरातच असल्याने आठवड्याचे सर्वच दिवस रविवार झाले होते. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अन लॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. अजूनही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आहेच. पण सरकार आता सरसकट लॉक डाऊन करण्याच्या मनस्थितीत नाही. निदान सध्यातरी सरकारची हीच भूमिका आहे. त्यामुळे अन लॉक प्रक्रियेनंतरचा पहिला रविवार म्हणून घरातच उत्साहात साजरा होतोय. त्यातही पावसाने निर्माण झालेल्या आल्हाददायक वातावरणात दिवसभर सुट्टीचा आनंद घेणे यापेक्षा स्वर्गसुख वेगळे काय असते. दुपारी जरा वेळ मिळाल्यावर मित्रांना फोन करून चौकशी करण्याशिवाय दिवसभर फारसे काम करायचेच नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोरोनावर अजिबात चर्चा देखील करायची नाही तरच रविवारच्या सुट्टीचा आनंद घेता येईल. माझा तर हाच प्लॅन आहे….तुम्ही काय करताय ?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

9 Replies to “अन लॉक नंतरचा पहिला रविवार….”

    1. मग काय तर…..इडली सांभार त्यात पुन्हा ओल्या नारळाची चटणी….दिवसभर हेच खायचं. स्वयंपाक अजिबात नाही. बाहेर पाऊस पडतोय. कुठे जायचे नाही की कुणी येणार नाही. मै और मेरी इडली…

      Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.