तुमच्याकडे पाऊस पडतोय ना….!

गेल्या दोन दिवसांपासून एकतर उकाडा कमी झाल्याने हायसे वाटत आहे. त्याबरोबरच दिवसभर मोबाईलवर विचारणा करणाऱ्या ‘कॉल्स’चा विषय देखील बदलला आहे. रोजरोज तेच ते विचारणा करणारे कॉल्स…..तुमच्याकडे कोरोनामुळे किती गेले ?…..गेल्या दोन दिवसांपासून वेगळीच विचारणा करतायत…..केरळपर्यंत पाऊस आलाय म्हणे, तुमच्याकडे आला का..? प्रश्नांचा विषय बदलल्याने हे कॉल्स अटेंड करताना जरा बरं वाटायला लागलंय.

कोरोनाने गेल्या दीड वर्षापासून जगण्याची परिभाषाच बदलून टाकलीय. सुरुवातीला मोबाईलवर येणारे कॉल्स अटेंड करावे लागायचे. जिज्ञासा, माहिती, गांभीर्य, एकमेकांशी कनेक्ट राहण्याची धडपड…सगळ्या संमिश्र भावना असायच्या. मोबाईल खणखणला तरी आपली कुणीतरी आस्थेने विचारपूस करतंय या भावनेने जीव सुखावून जायचा. जसजसा कोरोना जीवावर उठला तसतसा कॉल अटेंड करताना भीती वाटायला लागली. नुसत्या रिंगटोनचा आवाज देखील आला तरी काळजात ‘धस्स’ व्हायला लागायचं…..आज तुमच्याकडे किती मृत्यू झाले ? हा प्रश्नच संवेदना नष्ट करण्याबरोबरच ‘फोबिया’ग्रस्त वाटू लागला. दिवसभर ‘सायलेंट’ मोडवर मोबाईल ठेवायचा प्रयत्न करून बघितला. पण न जाणो जवळच्या आप्तस्वकीयांची खबर नेमक्यावेळी आपल्यालाच कळणार नाही या काळजीने मोबाईल सायलेंट मोडवर ठेवायचं कधी धाडस केले नाही.

गेल्या वर्षीचा पावसाळा असा तसाच गेला. पावसापेक्षा मृत्यूच्या वेदनेचा पूर जास्त आला. यंदा मात्र असं काही होवू नये याची देवाकडे सारखी प्रार्थना करत असतानाच अवकाळी (प्रीमान्सून) दोन-चार वेळा चांगलीच हजेरी लावून गेला. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळांनी भलेही नुकसान केले असेल पण वातावरणात देखील बदल घडवला. नुकसानीची आता सवयच होवून गेलीय. त्यामुळे त्याचं आजकाल फारसं दुःख देखील होईना. पण चक्रीवादळानंतर आकाशात रोज ढग भरून यायला लागले अन मग पावसाचे वेध सुरू झाले. भविष्यवाले जागे झाले, कधी नव्हे ते हवामान खात्याचे अंदाज पण बरोबर आल्याने यंदा पावसाळा वेळेत सुरू होईल याची खात्री वाढलीय.

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर अडगळीत पडलेल्या, फाटलेल्या, काड्या तुटलेल्या नादुरुस्त छत्र्या दुरुस्त करून घ्यायचा हे एक आद्य कर्तव्यच असते. गेल्या पावसाळ्यापूर्वी ते सततच्या ‘लॉक डाऊन’मुळे शक्य झालेच नाही. यंदा मात्र छत्र्या दुरुस्त करण्यापुरते का होईना सरकारने ‘लॉक डाऊन’ हटवावे अशी मागणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट भारतासाठी ‘डेथ कॉल’ देणारीच ठरली. त्यामुळे लॉक डाऊनमधून सुटका काही होईना. पण म्हणतात ना…..आयुष्यात दुःखं खूप दाटून आली की अश्रूंचा बांध फुटून आपोआप मन हलकं होतं. आता पण असंच काहीसं होईल हा आशावाद आहे. शेवटी रोज आभाळ भरून येतंय…. कुठंतरी ते बरसत असेलच ना..! आज तुमच्या अंगणात तर उद्या माझ्या अंगणात पाऊस येईलच ना…..वर्षभराच्या सगळ्या वेदना, दुःखे धुवून काढायला…..तुमच्याकडे पाऊस पडतोय ना…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

6 Replies to “तुमच्याकडे पाऊस पडतोय ना….!”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.