‘कोरोनाचा जन्म’ हा मुद्दा युद्धाचा की व्यापाराचा..?

संपूर्ण जगाला मृत्यूच्या कराल दाढेत ढकलणाऱ्या 'कोविड 19'ची साथ महामारीच्या रूपाने भेट देणाऱ्या 'कोरोना'चा जन्म चीनच्या वूहान मधील प्रयोगशाळेत मुद्दाम करण्यात आल्याचा आरोप आता अमेरिकेसह सर्व जगच करीत असतांना चीनने मात्र हा आरोप कायम फेटाळूनच लावला आहे. आता अमेरिकेने त्यांच्या गुप्तहेर संघटनेला याचा अहवाल तयार करायला सांगून नव्या वादाला 'तोंड' फोडले आहे. दोन महासत्तांमधील हा वाद आता सम्पूर्ण जगाला महायुद्धाकडे नेईल की जगाच्या विशेषतः भारताच्या बाजारपेठेवर कब्जा मिळविण्यासाठीची ही कुटनीती असेल...हे आता येणारा काळच ठरवेल.
कोरोनाला जन्माला घालणारी चीनच्या वूहान शहरातील हीच ती इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (डब्ल्यू आय व्ही) प्रयोगशाळा.

कोरोना विषाणूच्या साथीचा रोग जगभर नेमका कसा पसरला ? याबद्दल अजूनही रहस्य कायम असून हा व्हायरस चीनच्या वूहान शहरातील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (डब्ल्यू आय व्ही) मधून पहिल्यांदा आढळला हे जगासमोर आले आहे. या लॅब मधील ३ कर्मचारी नोव्हेंबर २०१९ मध्ये आजारी पडले होते. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डिसेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात चीन प्रशासनाने वूहान शहरात पहिल्यांदाच कोविड 19 च्या संक्रमणाची नोंद केली होती. त्यानंतर ‘त्या’ प्रयोगशाळेतच ‘व्हायरस’ची निर्मिती करण्यात आली असून हाताळताना कर्मचाऱ्यांच्या गलथानपणामुळे ‘बाधा’ झाल्याचा आरोप पहिल्यांदा अमेरिकेकडूनच करण्यात आला होता. हा आरोप चीन सरकारने तात्काळ फेटाळला होता. या आरोपाबाबत कोणताही ठोस पुरावा अमेरिकेला मिळालेला नव्हता. याबरोबरच त्या पहिल्या तीन बाधित कर्मचाऱ्यांवर कोणती लक्षणे दिसली ? याचा अहवाल देखील चीनने जगासमोर आणला नव्हता. आता या विषाणूच्या उत्पत्ती संदर्भात सिध्दांत मांडण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू एच ओ) वूहानच्या प्रयोगशाळेतील ‘विषाणू गळती’ संदर्भात संशोधन करू पहात आहे. चिनी शास्त्रज्ञासमवेत तयार केलेल्या प्राथमिक अहवालानुसार हा विषाणू वटवाघूळापासून दुसऱ्या प्राण्याच्या मार्फत माणसांमध्ये संक्रमित झाला या तर्कावर जागतिक आरोग्य संघटना देखील संतुष्ट नाही. चीनने मात्र याविषयावर पडदा टाकण्याची भूमिका पहिल्यापासून घेतली आहे.

आता कोविड 19 ची उत्पत्ती या मुद्द्यावर अमेरिका आणि चीन आमनेसामने येवू पहात आहेत.

प्राण्यांमधून माणसात पसरणाऱ्या विषाणूंमुळे भविष्यातील साथीचे रोग थांबविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अशाप्रकारच्या घटनांची शक्यता पूर्णपणे समजून घेणे आणि अश्या घटना पुन्हा होण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करणे या भूमिकेतून जागतिक आरोग्य संघटनेने यावर संशोधनाची गरज व्यक्त केल्यानंतर अमेरिका सरसावली आहे. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच नूतन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देखील अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेला याविषयावर माहिती गोळा करण्याचे आदेश देत ९० दिवसांचा कालावधी दिला आहे. आता शास्त्रीय संशोधनासाठी माहिती गोळा करण्याचे आदेश जर गुप्तचर यंत्रणेला दिले जात असतील तर अमेरिकेला नेमके काय हवे आहे ? हा प्रश्न चीनला देखील सतावणारा असाच आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे दावे पूर्णपणे खोटे असून अमेरिका सतत लॅब मधील विषाणू निर्मिती आणि गळती संदर्भात करीत असलेला आरोप हा जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी करीत असल्याचा आरोप चीन प्रशासनाने केला आहे. कोविड व्हायरसच्या उत्पत्तीचा निष्कर्ष काढण्यासाठी व्हाईट हाऊसला संपूर्ण ‘डेटा’ हवा आहे. चीन तो डेटा देणार नाही किंवा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला तपासासाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही. यातूनच आगामीकाळात या दोन्ही महासत्तामध्ये संघर्षाची ठिणगी पडणार आहे. यात मध्य आशिया विशेषतः भारत ओढला जावू शकतो.

नव्या संघर्षाच्या मुद्द्यावर भारत-अमेरिका विरुद्ध चीन असे चित्र निर्माण केले जाईल.

गेल्या काही महिन्यांपासून सीमेवर उचापती करणाऱ्या चीनच्या विरोधात भारतीय जनमत अगोदरच तयार असताना कोविडची उत्पत्ती वूहानच्या प्रयोगशाळेतच झाली असल्याची भूमिका आता भारतीयांना देखील खात्रीची वाटू लागली आहे. त्यामुळेच भारतीय बाजारपेठेत चीनने उत्पादित केलेल्या वस्तूंवर बंदी आणण्याची नवी भूमिका तयार होवू लागली आहे. सीमेवर अतिशय तणावपूर्ण स्थिती निर्माण होत असतानाही भारत सरकारने अद्याप चीन बरोबरच्या ट्रेडिंगवर बंदी घालण्याची भूमिका घेतलेली नाही. चीन सीमेवर कितीही कागाळ्या करीत असला तरी भारताशी तो थेट युद्ध करू शकत नाही. कारण युद्धाचा त्याच्या ट्रेडिंगवर विपरीत परिणाम होवून चीनची अर्थव्यवस्था डळमळू शकते याची चीनला जाणीव आहे. तर या परिस्थितीची अमेरिकेलाही पूर्ण जाणीव आहे. सध्या अमेरिका आपले लष्कर अफगाणिस्तानातून काढून घेण्याच्या तयारीत असले तरी त्याला आशियातून रोवलेला पाय काढायचा नाही. अश्यास्थितीत नव्या संघर्षाला तोंड फोडून पाकिस्तान किंवा भारताच्या हवाई तळांचा ताबा घेत अफगाणिस्तानातील लष्कर हलवायचे ही कुटनीती अमेरिका अवलंबू शकतो. अर्थात कितीही मैत्रीपूर्ण संबंध असले तरी भारत हवाई तळ वापरण्याची अमेरिकेला परवानगी देणार नाही. तेंव्हा भारताला न दुखावता पाकिस्तानवर दबाव टाकण्याची खेळी अमेरिका खेळू शकते. अमेरिकेची ही चाल ओळखूनच चीनने गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाकिस्तानात आर्थिक गुंतवणूक करीत पाकिस्तानला आपला ‘आश्रित’ बनविण्यास सुरुवात केली आहे. मात्र अर्थव्यवस्था कोलमडलेला पाकिस्तान जो जादा आर्थिक मदत देईल त्याच्या बाजूला झुकू शकतो याची जाणीव झाल्याने चीन आता पाकिस्तानवर विश्वास ठेवू शकणार नाही.

भारतीय बाजारपेठ मिळविण्यासाठीच आता आशियाखंडात युद्धाचे वारे वाहू लागेल.

नुकत्याच काहीकाळासाठी शांत झालेल्या इस्त्रायल आणि पॅलेस्टिन यांच्यातील संघर्षातून जग आता दोन गटात विभागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच युद्धखोर असलेल्या महासत्ता आता आशिया खंडावर कुणाचे वर्चस्व ? यासाठी महायुद्धाचा ‘घाट’ घालतील. अर्थात हे युद्ध बॉम्ब वर्षावा बरोबरच ‘ट्रेडिंग’च्या माध्यमातून देखील खेळले जाईल. आपल्या उत्पादनासाठी बाजारपेठ मिळविण्यासाठी महासत्ता वर्चस्वाची कुटनीती खेळत आहेत. आशियात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताने आपला दबदबा निर्माण केलेला आहे. वूहानच्या प्रयोगशाळेत कोविड 19 हा विषाणू जन्मला की नाही ? याचा अहवाल तयार करण्याची खेळी हे तर एक निमित्त आहे. खरा हेतू वेगळाच आहे.

कोरोनाचा जन्म या मुद्द्यावर आता अमेरिका आणि चीन संघर्षाच्या उंबरठ्यावर.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

10 Replies to “‘कोरोनाचा जन्म’ हा मुद्दा युद्धाचा की व्यापाराचा..?”

 1. एक सुंदर आणि विचार करणारा लेख. कारण शोधून काढले जाणे आवश्यक आहे।

  Like

  1. भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने सगळ्या महासत्ता भारताशी संबंध चांगले
   ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. केवळ चीन हा साम्राज्यवादी असल्याने त्याला
   साम्राज्य विस्ताराची खुमखुमी आहे. आशिया खंडात युद्ध झालेच तर चीन बरोबर
   किंवा चीनमुळेच होईल.

   mukund hingne

   Liked by 1 person

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.