भारतीयांची ‘मास्क’ पासून सुटका कधी होणार….?

कायम मुक्त वातावरणात राहू पाहणाऱ्या भारतीयांची निमित्ताने का होईना एखादे ‘बंधन’ पाळताना फार मोठी ‘गोची’ होत असते. कोरोना महामारीच्या निमित्ताने तोंडावर सुरक्षा कवच म्हणून आलेला ‘मास्क’ परिधान करणे आता अगतिकता बनले आहे. जोपर्यंत ‘मास्क’ शिवाय राहण्याचा विषय दुसरा कुणी हाताळत नाही तोपर्यंत नाईलाजाने मास्क बंधन पाळणाऱ्या भारतीयांना आता मात्र मास्क भिरकावून द्यावासा वाटत असून अमेरिकेने ‘मास्क’ भिरकावला मग आमच्या तोंडावरचा मास्क केंव्हा दूर होणार..? ही अगतिकता आता सर्वसामान्य भारतीयांमधून व्यक्त होवू लागली आहे.

अमेरिके पाठोपाठ लसीकरणात वेग घेतलेल्या भारताची मास्क आणि विलगीकरणातून केंव्हा सुटका होणार ? हाच आता प्रश्न उरला आहे.

मुक्त स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या भारतीयांना मात्र पहिल्यापासूनच अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जपान, जर्मनी या प्रगत देशातील राहणीमानाचे आकर्षण आहे. प्राचीन भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भले जगाला आकर्षण असले तरी भारतातील नव्या शिक्षित आणि अर्धशिक्षित पिढीला पाश्चात्य देशांच्या मुक्त राहणी आणि विचारसरणीचे नेहमीच आकर्षण आहे. त्यांचे अंधानुकरण करीत आपण पाश्चात्य पद्धती स्वीकारण्यात पुढारलेपणा मानतो हेच वास्तव आहे. कोरोना महामारीच्या निमित्ताने हे अंधानुकरण पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे आले आहे. आपण इतर बाबतीत भलेही जगाशी स्पर्धा करीत असलो तरी अंधानुकरणाच्या बाबतीत आपण पाश्चात्य देशांकडे नेहमीच आपले मार्गदर्शक म्हणून पहात आलोय. आता देखील या जागतिक महामारीच्या काळात मास्क आणि सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे अनुकरण आपण त्याच धर्तीवर स्वीकारले आहे. एरव्ही भारत सरकारने आणि भारतीय आरोग्य विभागाने कितीही ओरडून जरी सांगितले असते तरी आपण मास्क आणि सोशल डिस्टनसिंगचे बंधन स्वीकारले असते का ? हा प्रश्न स्वतःलाच विचारला तर त्याचे उत्तर नकारार्थी असेल यात शंका नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांची मास्क मुक्त झाल्याची घोषणा केली.

गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जग मास्क, सोशल डिस्टनसिंग आणि लॉक डाऊनच्या विळख्यात सापडलेले असतांना दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेच्या तडाख्यात अनेक देश बाधित आणि बळींची आकडेवारी आवाक्यात आणण्यासाठी जीवतोड प्रयत्न करीत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी १४ मे रोजी लसीकरणाचे टप्पे पूर्ण केलेल्या अमेरिकेतील नागरिकांना मास्क मुक्त आणि सोशल डिस्टनसिंग पासून मुक्त करण्याची महत्वपूर्ण घोषणा करीत जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरोना संक्रमणात सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे तर ब्राझील दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या स्थानावर आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेला बंधमुक्त करीत सामान्य स्थितीकडे घेवून जाण्याचा जो बायडन यांचा हा प्रयत्न जगाचे विशेषतः भारताचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाताना भारताची अवस्था अतिशय विस्कळीत झाली आहे. लस उत्पादनात अग्रेसर म्हणून जगाकडून पाठ थोपटून घेतल्यानंतरची देशांतर्गत प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविणाऱ्या यंत्रणेची पूर्णतः वाताहत झाल्याचे शोचनीय चित्र निर्माण झाले आहे. जगाला लस पुरविण्याची हिंमत दाखविणाऱ्या भारतामध्ये मात्र लसीकरणाचे तीनतेरा झाले आहेत. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात वयोवृद्ध आणि फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या कोविड सोल्जरच्या लसीकरणानंतर दुसऱ्या टप्प्यात ४५ वयोगटापुढील नागरिकांना सुरळीत पुरवठ्या अभावी अडखळतच लसीकरणाला सुरुवात झाली. त्यातच सरकारने १८ वर्षे वयोगटापुढील युवकांना देखील लसीकरण करण्याची घोषणा केली. लसनिर्मिती आणि पुरवठा याचे कोणतेही नियोजन न करता केलेली ही घोषणा सरकारच्या अंगलट आली आहे. तशातच अमेरिकेने लसीकरणात वेग घेऊन आता लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना मास्कमुक्त आणि सोशल डिस्टनसिंग पासून मुक्त करीत देशात सामान्यस्थिती निर्माण करण्याकडे एक पाऊल पुढे टाकले आहे. अमेरिकेत हे घडू शकते मग भारतात का घडत नाही ? याची नाराजी आता सरकारलाच झेलावी लागणार आहे. मात्र अमेरिकेतील नागरिकांनी त्यांच्या सरकारला साथ देत लॉक डाऊन कसोशीने पाळला. मास्क आणि सोशल डिस्टनसिंग कर्तव्यभावनेने पाळले हे भारतीय नागरिक कधीच समजून घेणार नाहीत. अनुकरण प्रिय असणारे भारतीय याबद्दल सरकारलाच दोष देत आहेत हे मात्र खरे..! भारतातील सध्याचा लसीकरणाचा वेग, संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती आणि बंधमुक्त वातावरणाची अधीरतेने वाट पाहणारे भारतीय पाहता २०२२ हे वर्ष बंधनातच जाईल अशी भीती व्यक्त होत आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

4 Replies to “भारतीयांची ‘मास्क’ पासून सुटका कधी होणार….?”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.