काही ठिकाणी सुडाचे तर काही ठिकाणी वादळाचे काळेकुट्ट ढग…!

चौदा महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग ‘लॉक डाऊन’ झालेले असताना यहुदी आणि पॅलेस्टिनी यांच्यातील जुन्याच पारंपारिक ‘वादा’ने उसळी घेत अचानक युद्ध छेडत मध्यपूर्व आशिया खंडासह युरोपला देखील चिंतेत टाकले आहे. तर भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मनुष्यहानी होवू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असताना अरबी समुद्रात उसळलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे चिंतेची भर टाकणाऱ्या काळ्याकुट्ट ढगांनी आकाश व्यापून टाकले. भारतासाठी तर ही दोन्ही संकटे अस्वस्थ करणारी अन लादणारी अशीच ठरली आहेत.

उपाययोजना करीत चक्रीवादळाला सामोरे जात असतांनाही न चुकवता येणारी हानी सोसावीच लागली.

अलीकडच्या काळात हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या भारतीय वेधशाळेचे अचूक अंदाज व्यक्त होतात ही जेव्हढी जमेची बाजू आहे. तेव्हढीच अश्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी सरकारची आपत्ती निवारण कृती दलाचे व्यवस्थापन देखील सक्षम असल्याने यावर्षी चक्रीवादळाच्या तडाख्यातही फार मोठ्या नुकसानीची आणि जीवितहानी झाल्याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. अर्थात २२ ते २५ बळी आणि शंभरएक बेपत्ता ही चिंतेची बाब आहेच. त्यातही बेपत्ता ही आकडेवारी देखील जिवंत अथवा मृत सापडले नाहीत अशीच समजायची असेल तर बळींची आकडेवारी ही निश्चितच वेदना देणारी अशीच आहे. एकतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताचे लाट रोखण्यासाठी जे गतिशील व्यवस्थापन हवे ते नसल्याचे उघड झाले आहे. लसीकरण, औषध पुरवठा, हॉस्पिटलायझेशन यासर्वच पातळीवरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. लस निर्मितीमध्ये अग्रेसर ठरलेल्या देशातच लसीकरणाला गती नसल्याने जगासमोर आपण आपल्या कुचकामी व्यवस्थापन कौशल्याचे ‘लक्तरे’ दाखवत आहोत याच तरी प्रशासकीय यंत्रणेला ‘भान’ राहिले आहे की नाही ? हाच प्रश्न आता उरला आहे. निसर्गानेच एक दयाळूपणा दाखविला. अन्यथा महामारीने कणा मोडलेल्या या देशाच्या व्यवस्थेला चक्रीवादळाने पूर्णतः मोडून टाकले असते. निसर्गाचीच मेहरबानी दुसरे काय !

स्वतःपुरते लसीकरण करून ‘कोरोना’मुक्त झाल्याचा दावा करणारे इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन हे दोन्हीही देश धार्मिक द्वेषाच्या साथीने पूर्णतः ग्रासलेले आहेत हेच त्यांनी पुन्हा सिद्ध केले आहे. सहा वेळा युद्ध करून इस्त्रायल कडून ‘माती’ खाल्ल्यानंतरही युद्धाची ‘खुमखुमी’ ठेवणाऱ्या पॅलेस्टिनने आता ५७ मुस्लिम देशांना या युद्धात त्यांच्याबाजूने उतरविण्याचा घाट घातलाय. यात धर्मांध मुल्ला-मौलवींच्या हातात सूत्रे असणारे मुस्लिम देशच आगपाखड करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सततच्या युद्धातून विस्तार करणाऱ्या इस्रायलच्या युद्धखोर सरकारला बलाढ्य देशांचा पाठिंबा मिळतोय. अर्थात ज्या बलाढ्य देशांनी गेल्या काही वर्षात मुस्लिम दहशतवादी हल्ले सहन केले आहेत असे देश इस्त्रायलच्या पाठीशी उभे राहतील हे न समजण्या इतकी ‘मुस्लिम युनियन’ देखील दूधखुळी नाही. शिवाय बोटावर मोजता येतील अशा चार-पाच देशांव्यतिरिक्त मुस्लिम देशात मजबूत अर्थकारण असणारे देश देखील नाहीत. केवळ धर्मांधतेवर देश चालवत स्वतःची ‘युद्धखोरी’ महत्वाकांक्षा जगावर लादण्याच्या वृत्तीने आता जगालाच महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून सोडले आहे. स्वतःला मानवतावादी आणि लोकशाहीवादी समजणाऱ्या इस्त्रायलने देखील आपण ‘यहुदी’ असल्याचा अहंभाव जपत शेजारच्या मुस्लिम देशांना नेहमीच युद्धखोर ठेवण्यासाठी चिथावणी दिली आहे. धर्मांध मुस्लिम सत्ताधीशांनी ‘यहुदी’चे समूळ उच्चाटन करण्याची स्वप्ने जशी कुरवाळली आहेत. तशीच भूभागावर हक्क सांगत विस्तारवादाची स्वप्ने इस्त्रायल कुरवाळत आला आहे. त्यामुळे विस्तारवादी भूमिका मांडणारे बलाढ्य देश इस्त्रायलच्या बाजूने उभे राहिले तर त्यात नवल ते कोणते ?

प्रत्युत्तरादाखल इस्रायलने गाझा पट्टीत बॉम्ब वर्षाव करून पार चाळणी करून टाकली.

या एका अर्थाने धार्मिक लढ्यात भारतासारखा सार्वभौम लोकशाहीवादी देश कुणाच्याच बाजूने ठामपणे उभा राहू शकणार नाही. म्हणूनच या युद्धाने भारताला परराष्ट्रसंबंध आणि मानवता यामुद्यावर अडचणीत टाकले आहे. पॅलेस्टाईन सोबत ‘यासर आराफत’ यांच्यापासून असलेले भारताचे संबंध तर तंत्रज्ञान आणि विकसित शस्त्रास्त्रे यातून इस्त्रायल बरोबरचे दृढ झालेले भारताचे नवे संबंध यामुळे भारत कुणा एकाची बाजू घेत आपल्या जागतिक निधर्मी प्रतिमेला धक्का देणार नाही. मात्र शेजारच्या उद्योगी पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांना अडचणीत आणण्यासाठी या पार्श्वभूमीवर गोंधळाची स्थिती निर्माण करणारी भूमिका घेवू शकतो. सध्यातरी हीच भूमिका योग्य ठरणारी असेल. म्हणूनच तो एकाचवेळी इस्त्रायलच्या प्रत्युत्तर देण्याच्या भूमिकेचे समर्थन करत असतानाच गाझा पट्टीत निरपराध नागरिकांचे बळी जात असल्याचा निषेध व्यक्त करत आहे. कदाचित कोरोनाची लहर विसावल्यानंतर काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तान पुन्हा युध्दखोरीची गरळ ओकू लागला तर….? एकूणच कोरोना महामारीच्या याकाळात जगभरच्या आकाशात काळजी आणि वेदनेचे काळेकुट्ट ढग जमा झालेत हे बाकी खरे…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

One Reply to “काही ठिकाणी सुडाचे तर काही ठिकाणी वादळाचे काळेकुट्ट ढग…!”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.