चक्रीवादळ नावाचा ‘इव्हेंट’…!

जेंव्हा तुम्हाला एका संकटाशी मुकाबला करण्यासाठी सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात बंदिस्त केलं असेल अश्यावेळी तुमच्या जवळपासही न येणाऱ्या संकटाकडे तुम्ही कश्या नजरेने बघाल..? समुद्र किनाऱ्यापासून तीनशे-चारशे किलोमीटर दूर असणाऱ्या पण कोरोनामुळे ‘लॉक डाऊन’मध्ये सुरक्षित असणाऱ्या लोकांनी ‘तौक्ते चक्रीवादळ’ने मांडलेला उच्छाद अन केलेल्या विध्वंसाकडे टीव्हीसमोर बसून ‘चिप्स’ किंवा आवडीची ‘डिश’ चघळत कसे बघत असाल..? थॅंक्यु मीडिया….एव्हढा जीवघेणा पण जिवंत ‘इव्हेंट’ तू आम्हाला बसल्या जागेवर ‘बोअर’ होऊ न देता दाखविलास. संवेदनांचा देखील बाजार मांडता येतो हे अलीकडच्या काळात ग्राहक म्हणून आम्ही मनापासून स्वीकारले आहे.

ज्यांना कधी गुडघाभर पाणी देखील बघायला मिळत नाही, त्यांनी वादळामुळे उसळणाऱ्या लाटा स्क्रीनवर पाहिल्या….

दुसऱ्यांच्या संकटाची किंवा त्यांच्यावर होणाऱ्या आघातांची जाणीव देखील करून द्यावी लागते. एव्हढी संवेदनशून्यता आल्यानंतर संकटांचा देखील ‘इव्हेंट’ बनतो. हे जसे माध्यमांना माहिती झालंय तसेच ते दूर अंतरावर असलेल्या बघ्यांना देखील माहीत आहे. एकसारखे संकटे झेलणाऱ्याची संवेदना बोथट होते. हाच अनुभव यानिमित्ताने दिसून आला. सतत चौदा महिन्यांपासून कोरोना महामारीच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी ‘लॉक डाऊन’ नावाची खुल्या कारागृहाची शिक्षा भोगणाऱ्या नागरिकांची यापेक्षा वेगळी अवस्था कोणती असणार ? रोज मृत्युमुखी पडणारे आप्तस्वकीय, ओळखीचे, जवळपासचे, शेजारचे बघण्याची सवय झालेल्या मेंदूला आता दुसऱ्याच्या दुःखाची, वेदनेची, संकटाची जाणीव अस्वस्थ करेल का…? मला वाटतं वेदनेचा बाजार मांडणाऱ्या माध्यमांना हे माहिती असल्यानेच ते याचा ‘इव्हेंट’ करीत असावेत.

वृत्तपत्र माध्यमात काम करणाऱ्या नव्या पिढीतील पत्रकारांना देखील अगम्य असे अंदाज वर्तविणाऱ्या भारतीय हवामान खात्याची भाषा आता समजायला लागलीय. त्यांचे गणितीय संकेत आणि आलेख दिवसभर उलगडून सांगतांना तोंडातून थुंकीच्या लाटा बाहेर पडताना स्क्रीनवर दिसतात. बहुदा प्रवाही निवेदन हे इव्हेंटची परिणामकारकता वाढविते, हे त्यांच्या ‘बॉस’ने शिकवलेले तंत्र ते उपयोगात आणत असावेत. आपल्या रोजच्या वेदना, दुःख यापासून सुटका करून घेण्यासाठी आम्ही देखील ‘दुसऱ्यांच्या’ वेदनेचा हा इव्हेंट घरात बैठकीत टीव्हीसमोर अगदी सोवळ्यात बसून चविष्ट पदार्थांच्या डिशेस चघळत हा इव्हेंट साजरा करतोय. त्यातल्या त्यात जीवितहानी होतेय का ? अनोळखी असलेल्या माणसांची देखील वित्तहानी किती होतेय ? याची आकडेमोड करीत आपल्यापेक्षा त्यांचे दुःख, वेदना आणि नुकसान जास्त आहे का याची मनोमन तपासणी करतोय. कारण हे चक्रीवादळ थांबणार आहे, नंतर या वादळग्रस्त लोकांना मदतीचा ओघ सुरू होईल. तेंव्हा आमच्याकडे दुर्लक्ष झाले तर….?

आमच्या देशात माध्यमांपेक्षाही राजकारणी लोक जास्त सतर्क आणि नाटकी आहेत. त्यांना सतत अश्या घटनांची प्रतिक्षाच असते. लोकांची विकासकामे करण्यापेक्षा लोक अडचणीत कसे सापडलेत याचा देखावा निर्माण करीत आपण मदतीसाठी कसे धावून गेलो याचे नाट्य ते बेमालूमपणे साकारतात. नव्हे त्यांचे ते आद्य कर्तव्यच बनले आहे. त्यामुळे दरवर्षी येणाऱ्या चक्रीवादळाला सरावलेल्या लोकांना (मच्छीमार, कोळीबंधु) हे या संकटातून सहजतेने बाहेर पडतील पण समुद्र किनाऱ्यापासून तीनशे-चारशे किलोमीटर अंतरावर आता राजकीय चक्रीवादळाचा ‘तडाखा बसायला सुरुवात होईल. मदतीवरून उसळणाऱ्या आरोपांच्या गोलाकार लाटांमध्ये सत्तेच्या खुर्चीला धक्के बसायला सुरुवात होईल. लॉक डाऊनमुळे घरात रिकामे बसलेल्या आमच्या सारख्या नागरिकांना आता पुढच्या ‘इव्हेंट’ची स्पेशल डिश यातूनच मिळणार आहे. खरंय ना…!

:-मुकुंद मधुकर हिंगणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.