
- शिक्षण, विकास आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्रात संसर्गजन्य साथीचा फैलाव देशातील इतर राज्यांच्या तुलनेत नेहमीच अधिक असतो.
- लोकसंख्येच्या दृष्टीने देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी परराज्यातून आणि परदेशातून येणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे.
- सर्वात जास्त शहरे असलेले हे देशातील एकमेव राज्य आहे. दाटीवाटीने लोकवस्ती असणाऱ्या मुंबई महानगराबरोबरच पुणे, नागपूर, औरंगाबाद, ठाणे, नाशिक अशी सोळा शहरे प्रमाणापेक्षा अधीक लोकसंख्येचा भार सोसत आहेत.
- आशिया खंडात सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या ‘धारावी’ प्रमाणेच आता महाराष्ट्रातील प्रत्येक शहरे झोपडपट्ट्यांच्या विळख्यात अडकलेली आहेत.
- संसर्गजन्य आजारांचा फैलाव वेगाने होण्यास कारणीभूत ठरणारी माणसांची गर्दी यामुळे प्रशासन, आरोग्ययंत्रणा यांचा नेहमीच बोजवारा उडतो.

जगाशी सागरी मार्गाने आणि हवाईमार्गाने जोडलेल्या मुंबई महानगराची लोकसंख्या ही दोन कोटीच्या घरात आहे. रोज वेगवेगळ्या कारणांसाठी मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या महानगरांची परिस्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही. औद्योगिक विकासामुळे महाराष्ट्रात रोजगार शोधण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्याने महाराष्ट्रातील शहरांच्या जीवनमानावर त्याचा परिणाम होत आहे. प्रत्येक राज्यातील भाषा, धर्म, संस्कृतीप्रमाणेच तिथली लोकवस्ती आणि नगररचना असते.

महाराष्ट्रातील शहरांना मात्र वाढत्या गर्दीने बकाल स्वरूप येवू लागले आहे. दाटीवाटीने गर्दी केलेल्या वसाहती हे चित्र एकट्या मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात दिसत आहे. महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक आरोग्य यंत्रणा यांना संसर्गजन्य आजारावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करताना सर्वात मोठा अडसर येतो तो दाटीवाटीने गर्दी करणाऱ्या अनिर्बंध वसाहतींचा. या कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईच्या धारावी झोपडपट्टीने कोरोनावर मात करताना शासनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत एक आश्चर्याचे उदाहरण निर्माण केले हे देखील खरे आहे. मात्र इतर शहरातून हा ‘धडा’ गिरवला गेला नाही हे देखील तितकेच सत्य आहे.

अद्ययावत वैद्यकीय सेवा पुरविणारी सुसज्ज अशी हॉस्पिटल्स जवळपास सर्वच शहरे आणि निमशहरातून उपलब्ध असतांना सातत्याने वाढणारी परराज्यातील गर्दी हीच अश्या संसर्गात सर्वात जास्त डोकेदुखी असते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या वाट्याला ही डोकेदुखी कायमच आहे. लोकशाही असलेल्या देशात अधिवास आणि रोजगाराची प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे. इथे प्रांतवाद नको ही भूमिका जरी योग्य असली तरी वाढत्या गर्दीला रोखण्यासाठी प्रत्येक राज्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात येणारी गर्दी थोपविण्यासाठी एकट्या महाराष्ट्राने प्रयत्न करण्यापेक्षा इतर राज्यांनी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांचा विकास आणि अर्थकारण याबरोबरच पर्यावरण आणि आरोग्य बळकट करावे.

गर्दीला जसे हृदय नसते तशीच राजकारणाला संवेदना नसते. प्रगतीच्या वाटेवर चालणाऱ्या महाराष्ट्राच्या नशिबी पहिल्यापासूनच गर्दीचे राजकारण आले आहे. या राज्यात सहज प्रवेश करून गुजराण करणारे इथली सभ्यता, संस्कृती आणि शहरांच्या आरोग्याची नासधूस करायला कारणीभूत होतात. कोरोना, एचआयव्ही, सार्स, एच1एन1 सारखे संसर्गजन्य आजार फैलावण्याची हीच प्रमुख कारणे आहेत. गर्दीचा रेटा थोपवा अन्यथा हीच श्वासागणिक वाढणारी गर्दी संसर्गाच्या माध्यमातून आपला ‘काळ’ बनून येतील.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.