
इसवीसन १७०७ मध्ये बादशहा औरंगजेब याच्या मृत्यूनंतर मुघलांच्या नजरकैदेत असलेल्या शाहू महाराजांची सुटका झाली. त्यानंतर मराठेशाहीची विस्कटलेली घडी बसवितांना आप्तस्वकीयांशी दोन हात करीत छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या न्यायप्रिय धोरणांचा ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या शेवटच्या काळात राज्याचा वारस कोण असावा याविषयी चाचपणी केली असता अष्टप्रधान मंडळाकडून छत्रपती शाहू महाराजांचे मानसपुत्र अक्कलकोटचे नरेश फत्तेसिंह राजे भोसले यांचे नाव पुढे आले होते. मात्र फत्तेसिंह राजे भोसले यांनी मराठेशाहीचे छत्रपती पद अतिशय विनम्रतेने नाकारले होते. राज्याची ही जोखीम घेण्यास कुणीच तयार न झाल्याने मराठेशाहीचे राज्य चालविण्याची जोखीम पेशव्यांकडे चालत आली. जर फत्तेसिंह राजे भोसले यांनी ही संधी सोडून दिली नसती तर…? पण ‘जर आणि तर’ला इतिहासात स्थान नसते हेच खरे आहे.

पुत्रवत सन्मान प्राप्त झालेले फत्तेसिंह राजे भोसले नेमके कोण ? तर मुघलांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर स्वराज्यात परत येत असतांना पारद या गावी छत्रपती शाहू आणि पारदचे शहाजी पाटील यांच्यात छोटी लढाई झाली. या लढाईत पारद गावचा शहाजी पाटील मारला गेला. त्याच्या विधवा पत्नीने नुकतेच जन्माला आलेले मूल शाहू महाराजांच्या पायावर घालून जीवदान मागितले. शाहूंनी आनंदाने त्या मुलाचा स्वीकार केला अन् पारद गावी लढाईत फत्ते झाली म्हणून या मुलाचे फत्तेसिंह असे नामकरण करून त्याला आपल्या सोबत घेतले. तेच हे अक्कलकोटचे राजे फत्तेसिंह भोसले. पुढे छत्रपती शाहू यांच्या एक राणी बिरुबाई ही फत्तेसिंह यांना आपला मुलगा मानत होती. औरंगजेब बादशहाच्या नजरकैदेत असतांनाच छत्रपती शाहू यांचे १७०३ साली खेड येथील छावणीत रुस्तुमराव जाधव यांच्या कन्या अंबिकाबाई यांच्यासोबत बादशाही खर्चाने लग्न लावले होते. रिवाजाप्रमाणे लग्नानंतर बादशहाच्या दर्शनाला जाताना करवली म्हणून आलेल्या बिरुबाई या दासीलाच आपली नववधू म्हणून शाहू महाराज सोबत घेऊन बादशहाच्या दर्शनाला गेले. बादशहाच्या लक्षात हा प्रकार आला. मात्र त्याने दोघांना आशीर्वाद दिले. पुढे तेहतीस वर्षे हीच दासी महाराणी बिरुबाई म्हणून ओळखली गेली. मराठी राज्यकारभारात बिरुबाईचे मोठे वजन होते. तिचा शब्द डावलण्याचे धाडस कोणी करत नसत. हे सांगण्याचे कारण याच बिरुबाईने फत्तेसिंह यांना आपला मुलगा मानलेले असल्याने स्वराज्यावर आपला अधिकार दाखविणे फत्तेसिंह यांना फार अवघड नव्हते. पहिला बाजीराव पेशवा आणि फत्तेसिंह हे समवयस्क असल्याने निदान पेशवेपदावर तरी अधिकार सांगणे त्यांच्या हातात होते. मात्र शौर्यात बाजीराव आपल्यापेक्षा काकणभर सरस आहेत हे मान्य करीत त्यांनी पेशवेपदाची चालून आलेली संधी देखील सोडून दिली होती.

छत्रपती शाहू यांच्या राज्याभिषेकानंतर दिल्लीच्या बादशहाने त्यांना दख्खन मधील सहा सुभे चौथाई वसुलीसाठी सरदेशमुखी म्हणून बहाल केले होते. हे सहाही सुभे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या पराक्रमी सरदारांमध्ये वाटले. फत्तेसिंह यांना ते राजपुत्राप्रमाणे वागवीत असल्याने या सहा सुभ्या पैकी कर्नाटक सुभा त्यांनी फत्तेसिंह यांच्या नावे बहाल केला होता. बाल फत्तेसिंह यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या निगराणी खाली युद्धकलेचे धडे गिरविल्या नंतर वयाच्या १७ व्या वर्षापासूनच स्वराज्यासाठी तलवार परजली. स्वराज्याची घडी सुव्यवस्थित बसविण्यासाठी पेशवे आणि पंतप्रतिनिधी यांच्यासमवेत फत्तेसिंह भोसले यांनी अनेक लढाया यशस्वी केल्या. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला होता. जवळपास चाळीस वर्षे शत्रूच्या ताब्यात असलेला हा किल्ला परत स्वराज्यात सामील करण्यात फत्तेसिंह यांनी पेशवे आणि प्रतिनिधींच्या मदतीने जिंकलेले युद्ध इतिहासात दखलपात्र ठरले.

आयुष्यभर तन मन आणि धनाने सातारच्या गादीशी इमान राखलेल्या फत्तेसिंहराजे भोसले यांनी छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी बिरुबाई यांच्या आशीर्वादानेच अक्कलकोट संस्थानाची निर्मिती केली. महाराणी बिरुबाईंच्या अंतसमयी त्यांच्यावर फत्तेसिंह राजे भोसले यांनीच मुलगा म्हणून अंत्यसंस्कार केले होते. तर १७४९ साली छत्रपती शाहू महाराजांच्या महानिर्वाणानंतर मराठेशाहीचे चालून आलेले छत्रपती पद नाकारत फत्तेसिंह यांनी अखेरपर्यंत स्वराज्याची चाकरी केली. आयुष्याच्या उत्तरकाळात अक्कलकोट येथे आयुष्य व्यतीत करणाऱ्या फत्तेसिंह महाराजांचे १७६० मध्ये महानिर्वाण झाले. त्यानंतरही त्यांच्या पुढच्या पिढीने सातारच्या गादीशी असलेले आपले इमान कायम ठेवले. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी संपूर्ण मराठेशाहीचे पारिपत्य केल्यानंतरही कोल्हापूरची गादी आणि सातारच्या गादीबरोबरच अक्कलकोट संस्थानाला कायम ठेवले. कदाचित यामुळेच स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र निर्मितीच्यावेळी बेळगाव कर्नाटकात समाविष्ट झाला असला तरी सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातच कायम ठेवावा लागला असावा. फत्तेसिंहराजे भोसले यांच्या मराठेशाहीशी असलेल्या इमानाचाच हा परिपाक असावा.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.