- बालपणी आई-वडिलांकडे भोकाड पसरून हट्ट करीत पाहिलेल्या पहिल्या सिनेमा पासून आपल्या आयुष्याला घट्ट चिटकून राहते ती सिनेमा सृष्टी.
- बालपणातच सिनेमाविषयी आकर्षण तयार होतं अन् वय वाढत जातं तसं ते आकर्षणही वाढत जातं.
- शाळेत मधल्या सुट्टीत दप्तरात दडवून ठेवलेले नायक-नायिकांच्या फोटोंचा संग्रहाबरोबरच फिल्मच्या तुकड्यांचा संग्रह देखील महत्वाचा असायचा.
- बालपणी फिल्मचे तुकडे गोळा केले नाहीत असा माणूस अभावानेच सापडेल.
- आता यूएफओ तंत्रामुळे ना फिल्मची रिळे तयार होतात ना मोठ्या प्रोजेक्टरची आवश्यकता भासते.

सिनेमा हा फक्त भारतीयच नाही तर जगातल्या प्रत्येक माणसांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलेला आहे. फार इतिहासात डोकावून पाहण्याची आवश्यकता नाही. अगदी आपल्या बालपणापासून बघितलं तरी पुरेसे आहे. आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेला सिनेमा, त्याची ष्टोरी नाही आठवणार, नायक-नायिका देखील आठवणार नाहीत. पण सिनेमाचं नाव नक्कीच लक्षात असते. घरातील वडील धाऱ्यांनी आठवणीने सांगितलेला आपला धांगडधिंगा पुढे आयुष्यभर आपला तोंडपाठ असतो. तर अश्या सिनेमा नावाच्या जादूशी आपली घट्ट मैत्री होते ती साधारणतः वयाच्या १०-१२ वयापासून. शाळेतील मित्रांकडून गयावया करून जमवलेल्या फिल्मच्या तुकड्यांपासून ही मैत्री सुरू होते.

सर्वात जास्त फिल्मचे तुकडे आपल्याजवळच असावेत या इर्षेपोटी शाळेत-वर्गात ‘दोस्ती-दुश्मनी’चे नाट्य देखील घडते, प्रसंगी मारामारी देखील होते. फिल्मचे तुकडे मिळविण्यासाठी बाल वयाला शोभेल असा ‘काळाबाजार’ करायला देखील आपण मागेपुढे पहात नाही. फिल्मचे तुकडे मिळविण्यासाठी सिनेमा थिएटरच्या अवतीभवती चकरा मारण्यात शाळेला दांडी मारली जायची. शहरात ‘थिएटर’ असल्याने शहरी मुलांना वर्षभर फिल्मचे तुकडे मिळायचे. पण अर्धशहरी अथवा ग्रामीण भागातील मुलांना या फिल्मच्या तुकड्यांसाठी वर्षभर वाट पहावी लागायची. गावच्या जत्रेत येणाऱ्या ‘टुरिंग टॉकीज’मुळे ही तहान भागविली जायची.

जत्रेत टुरिंग टॉकीज आल्या की जवळपास महिनाभर त्यांचा मुक्काम असायचा. याकाळात शाळेला बुट्टी मारून फिल्मच्या तुकड्यांच्या शोधात ‘टोळी’ने जाण्यात मजा यायची. पहाटे शो संपल्यानंतर तंबूतच झोपलेल्या कर्मचाऱ्यांना जाग यायच्या अगोदर म्हणजेच सकाळी ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास कनातीचे कापड उचकटून हळूच तंबूत प्रवेश मिळवायचा अन् मग प्रोजेक्टरच्या पत्र्याच्या शेड पर्यंत दबकत चोरपावलांनी जाऊन रिळचे तुकडे गोळा करायचे. एकदा काम फत्ते झाले की तिथून सुम्बाल्या करायचा. पकडले गेलोच तर एकतर गपगुमान मुस्काटात खायची, चड्डीत खोचलेले फिल्मचे तुकडे परत करायचे किंवा मोठ्याने भोकाड पसरून गोंधळ उडवून पसार होण्याचा प्लॅन बनवायचा. हे तंत्र वापरावे लागायचे.

फिल्मचे तुकडे गोळा करण्यातही ‘स्मार्ट वर्क’ असायचे. टुरिंग टॉकीजच्या सफाई कामगारापासून कोणाचीही दोस्ती करायची. अन् मग त्याच्याकडून गोडीगुलाबीने फिल्मचे तुकडे मिळवायचे. पण हे काम खूपच वेळ खाणारे आणि ‘शान के खिलाफ’ असायचे. पण काहीही करून फिल्मचे तुकडे गोळा करण्यासाठी या तंत्राचा देखील वापर करावा लागायचा. यात प्रोजेक्टर चालवणारा ऑपरेटर महत्वाचा असायचा. त्याच्याशी दोस्ती करायची म्हंटल्यावर त्याने सांगितलेली किरकोळ कामेही प्रसंगी करावी लागायची. विडी, सिगारेट, तंबाखू आणून देणे, चहाची ऑर्डर सांगायला जाणे अशी ती कामे असत.

आधुनिकीकरणाच्या लाटेत सिनेमाचे तंत्र देखील बदलले. एकेकाळी लाखों रुपयांची गुंतवणूक करून खरेदी करावी लागणारी फिल्मची रिळे, त्यावरची अमेरिकेत जावून करावी लागणारी प्रोसेस आणि मोठमोठे फिल्म प्रोजेक्टर आता सर्व कालबाह्य झालेत. छोट्या शहरातूनही मल्टिप्लेक्स उभारलेत. यूएफओ तंत्राने सॅटेलाईटद्वारे चित्रपट प्रदर्शित करण्याचे तंत्र विकसित झाल्याने आता प्रोजेक्टरचा जमाना संपला आहे. ऍप्स आणि चॅनल्सच्या माध्यमातून चित्रपट आता तुमच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे थिएटरची गर्दी ओसरली आहे तर जत्रेची उत्सुकता संपल्याने ‘टुरिंग टॉकीज’ची सद्दी संपली आहे. मुलांना देखील इलेक्ट्रॉनिक खेळणी आणि कॉम्प्युटर गेम्सचे वेड लागल्याने फिल्मचे तुकडे गोळा करण्याचा छंद कसा लागणार .? आता ह्या सगळ्या अडगळीतल्या आठवणी ठरल्या आहेत.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
सर मला लहानपणी म्हसोबा यात्रा तील पिक्चर आठवला ..
रील वाला
LikeLiked by 1 person
धन्यवाद सरजी
LikeLike