- २० फेब्रुवारी १८१८ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील त्याकाळी माढा तालुक्यात असलेल्या आष्टी (सध्या मोहोळ तालुक्यात) येथे ब्रिटिशांबरोबर झालेल्या युद्धातील पेशवाईच्या दारुण पराभवाची अनेक कारणे आहेत.
- ज्या दुसऱ्या बाजीरावाला ‘पळपुटा’ हे विशेषण इतिहासाने बहाल केले ते हेच आष्टीचे मराठेशाहीचे शेवटचे निकराचे युद्ध.
- अंतर्गत कलहाने जर्जर झालेल्या पेशवाईत बंडाळी माजल्यानंतर ठिकठिकाणी होणाऱ्या उठावांना सैनिकी बळ देवून मराठेशाहीचे पतन करणारे हे शेवटचे युद्ध, ज्या युद्धानंतर फक्त मराठेशाहीच नाही तर सारा देश पारतंत्र्यात गेला तेच हे आष्टीचे युद्ध.
- ‘फोडा आणि झोडा’ या कुटनीती बरोबरच या युद्धात मराठेशाहीची कर्दनकाळ ठरली ती ब्रिटिशांची ‘गॅलिपर’ गन.
- दोनशे वर्षांपूर्वी आष्टीत घडलेल्या मराठेशाहीच्या पानिपतचा नव्याने अभ्यास मांडणे म्हणजे इतिहासाचे पुनर्विलोकन करणे ठरू शकते.

आष्टीच्या लढाईतील मराठेशाहीच्या पराभवाची कारणमीमांसा अतिशय तटस्थतेने शोधणे गरजेचे झाले आहे. मुळातच त्याकरिता मराठेशाहीचे राज्यशकट चालविणाऱ्या ‘पेशवाई’तील अंतर्गत कलह, बेदिली आणि तिजोरीतील खडखडाटामुळे वाढलेली लूटमार ही कारणे दुसरा बाजीराव पेशव्यांच्या विरोधात बंडाळी माजविण्यासाठी प्रमुख कारणे ठरली होती. त्यातच आत्तापर्यंतच्या पेशव्यांच्या तुलनेत पराक्रमी नसलेला दुसरा बाजीराव सत्तास्थानी बसणे हे एक मराठेशाहीतील बेदिलीचे प्रमुख कारण बनले असावे.

मराठेशाहीतील बंडाळीने उग्ररूप धारण करायला सुरुवात केली ती साधारणतः ऑक्टोबर १८१७ पासून. ब्रिटिशांनी याच संधीचा फायदा घेत बंडखोरांना सैन्यबळ, दारुगोळा आणि रसद पुरविण्यासोबतच सत्तांतराचे आमिष दाखविले. ब्रिटिशांचे सैन्य ताकदवान बनले होते, स्वदेशी सत्तेतील बेदिली हे प्रमुख कारण असले तरी ब्रिटिशांची स्वयंशिस्त आणि आधुनिकतेचा पुरस्कार हे देखील ब्रिटिश सैन्य ताकदवान बनण्याची कारणे होती. त्यातही ब्रिटिश सैन्यात नव्याने समाविष्ट झालेली ‘गॅलिपर गन’ ही प्रमुख ताकद बनली होती.

१७४० सालात ब्रिटिशांनी युरोपात वसाहतवादी युद्धात यशस्वी वापर केलेली ही भारतात आपले वर्चस्व वाढविण्यासाठी आणली तीच मुळात १८०० सालात. त्यामुळेच याकाळात देशी राजवटी विरोधात ब्रिटिश वरचढ होताना दिसतात. ही गॅलिपर गन म्हणजेच छोट्या आकाराची तोफ अवघी ६० पौंड वजनाची आहे. तर ती एका घोड्याच्या मदतीने सहजतेने ओढून नेता येते. कॅरेजसह तिचे वजन फक्त ६०० पौंड एव्हढे होते. अत्यंत वेगवान हालचालीत दिशा बदलून प्रखर मारा करण्यात सक्षम असणारी ही गॅलिपर गन आष्टीच्या लढाईत मराठ्यांचा कर्दनकाळ ठरली.

तर ऑक्टोबर १८१७ पासून बंडाळीने त्रस्त झालेल्या दुसऱ्या बाजीरावाला ९ जानेवारी १८१८ मधील भीमा-कोरेगावच्या युद्धात नामोहरम करीत ब्रिटिशांनी त्याला पुण्यातून हुसकावून लावले. सातारच्या छत्रपतींकडे सैन्याची कुमक मागायला आलेल्या दुसऱ्या बाजीरावाच्या मागावर ब्रिटिश होते. सतत ब्रिटिशांना चुकवत त्यांच्यावर छुपे हल्ले करीत निघालेला दुसरा बाजीराव आणि मराठ्यांचा शेवटचा सेनापती बापू गोखले हे आष्टी येथे मिळाले. त्यांच्या मागावर असलेला ब्रिटिश ब्रिगेडियर स्मिथ आणि त्याची रेजिमेंट कंपनी यांचा सामना २० फेब्रुवारी १८१८ मध्ये याच मैदानावर झाला. उजव्या बाजूला भीमा नदी तर डाव्या बाजूला ओढा असलेल्या या जंगलात गनिमी काव्याने लढणाऱ्या सेनापती बापू गोखले यांच्यावर आणि त्यांच्या मूठभर मावळ्यांवर गॅलिपर गनचे गोळे बरसले. बापू गोखले धारातीर्थी पडले ही खबर समजल्यावर युद्ध सोडून दुसरा बाजीराव घोड्यावर मांड ठोकून पळाला. मराठा सैन्य सैरभैर झाले अन् ब्रिटिशांनी आष्टीचे युद्ध जिंकले. या युद्धानंतरच भारतावर युनियन जॅक फडकून ब्रिटिशांचा एकछत्री अंमल सुरू झाला. जेंव्हा सैन्यदल अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज होते तेंव्हा पराक्रमी शत्रूला देखील नामोहरम करता येते हेच यातून सिद्ध झाले. या इतिहासाचे अतिशय तटस्थतेने पुनर्विलोकन होणे यासाठीच गरजेचे आहे.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.