2020 सालाच्या सरतेशेवटी लॉक डाऊनच्या कचाट्यातून सुटका झालेल्या ग्रामीण भागातून कोविड प्रतिबंधक लसीच्या चर्चेचे ‘गुऱ्हाळ’ जसे गावच्या चावडीवर-पारावर सुरू झाले तसे यंदाच्या ऊसाच्या हंगामातील गूळ निर्मितीचे ‘गुऱ्हाळ’ देखील सुरू झाले आहे. सेंद्रिय गूळ आणि काकवी (ऊसाचा उकळता पाक) तयार करण्याकडे गूळ उत्पादकांचा वाढता कल दिसून येत आहे.

पूर्वी ग्रामीण भागातून गावोगावी ऊस उत्पादक आपल्या शेतात गूळ निर्मितीचे ‘गुऱ्हाळ’ लावायचे. मात्र सहकारीकरणातील साखर कारखान्यांबरोबरच खासगी मालकी तत्वांच्या वाढलेल्या साखर उद्योगामुळे उसाच्या मळ्यात सर्रास दिसणारे ‘गुऱ्हाळ’ हळूहळू कमी दिसू लागले. एकीकडे साखरेची मागणी वाढत गेली तर दुसरीकडे वाढत्या महागाईने गूळ निर्मितीला लागणाऱ्या वस्तू महाग मिळू लागल्या आणि गूळ निर्मितीसाठी लागणारे मनुष्यबळ मिळत नसल्याने ‘गुऱ्हाळ’ चालवणाऱ्यांची संख्या कमी होत गेली.

साखर कारखाने नव्हते तेंव्हा गुळाचाच वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने गूळ निर्मितीचा उद्योग तेजीत होता. गुऱ्हाळ हे फक्त गूळ निर्मितीचे उद्योगकेंद्र नव्हते तर ग्रामीण संस्कृती आणि सांस्कृतिक घटनांचे ते प्रमुख केंद्र बनले होते. ज्याच्या शेतात गुऱ्हाळ लागायचे त्याच्या शेतात गावकरी, पै-पाहुणे काकवी प्यायला अन् ताज्या गुळाची चव चाखायला गर्दी करायचे. सोबत जेवणावळींच्या पंक्ती झडायच्या. करमणुकीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जायचे. येणाऱ्या पाहुण्यांमध्ये ‘सोयरिकी’, नवे नातेसंबंध जुळायचे. महिना-दोनमहिने निव्वळ महोत्सवी वातावरण असायचे. मात्र कारखान्यांमुळे साखर उत्पादन वाढले, मागणीही वाढली तसे गूळ महात्म्य हळूहळू कमी झाले.

मात्र पुन्हा एकदा प्रकृतीवर परिणाम करणाऱ्या रासायनिक प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा वापर कमी करण्याची जागर मोहीम तीव्र झाली तसे सेंद्रियशेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला. आरोग्यदायी आणि रसायनमुक्त म्हणून सेंद्रिय गूळ निर्मितीसाठी ‘गुऱ्हाळे’ सुरू झाली. अर्थात मनुष्यबळाचा अभाव आणि गुळाला योग्य भाव मिळत नसल्याची गूळ उत्पादकांची तक्रार आहेच. सरकारने त्यांना देखील हमी भाव द्यावा हीच त्यांची मागणी आहे. मात्र यासगळ्या अडथळ्यातूनही ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असणारे ‘गुऱ्हाळ’ आपले अस्तित्व टिकवून आहे. हे ही नसे थोडके.

सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरच्या ग्रामीण भागात गूळ निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. २०१९ ची पूरपरिस्थिती आणि २०२० ची कोविड महामारीची परिस्थिती या पार्श्वभूमीवर यंदा २०२१ च्या हंगामात ‘गुऱ्हाळ’ सुरू झालेत. यंदा अपेक्षित गूळ उत्पादन होईल की नाही ? त्याला रास्तभाव मिळेल की नाही ? या प्रश्नांची उत्तरे सध्यातरी मिळत नसली तरी गुऱ्हाळे सुरू झालीत. कोविडची लस आपल्याला कधी मिळेल ? याची खात्री नसतांनाही आपण सोशल डिस्टनसिंग तोडत ‘मास्क’ भिरकावून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवले अगदी तसेच गूळ निर्मितीचे गुऱ्हाळ सुरू झालेत.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.