- मनुष्यप्राणी शतायुषी असतो असं म्हणतात. म्हणजेच शंभर वर्षांच्या आयुष्यात आपल्याला कर्तबगारी दाखवायला नेमका किती वेळ मिळतो ? कधी विचार केलाय का ?
- माझ्या जवळ जरा सुद्धा मोकळा वेळ नाही, असं म्हणत आपण आपल्या जवळ असलेली वेळ चुकवितो की आपण खूप ‘बिझी’ आहोत अशी समजूत करून घेतो ?
- शंभर वर्षांचे आयुष्य गृहीत धरले तर आयुष्याचे एकूण ३६ हजार ५०० दिवस होतात. या दिवसातून कर्तबगारीची नेमके किती दिवस आपल्या हाती असतात ?

परमेश्वराने जरी आपल्याला १०० वर्षांचे आयुष्य दिले असले तरी त्यातील निम्मी वर्षे रात्रीत निघून जातात. म्हणजेच ५० वर्षाचे आयुष्य आपण खऱ्या अर्थाने जागेपणी जगतो. यातील २५ वर्षे हे बालपण आणि पदवी पर्यंतचे शिक्षण घेण्यात जातात. तर उर्वरित २५ वर्षात कुटुंबाची जबाबदारी, लग्न आणि स्वतःच्या मुलांचे संगोपन यासह मृत्यू येईपर्यंतचा वृद्धापकाळ यामध्ये जातात. याच २५ वर्षात आपल्याला कर्तबगारी दाखविण्यासाठी वेळेचे नियोजन करायचे असते. अर्थात वयाच्या पंचविसाव्या वर्षी व्यवसाय अथवा नोकरीच्या माध्यमातून कमाईला सुरुवात झाली की लगेचच एक-दोन वर्षात आपण लग्न करतो. त्यानंतर एक-दोन वर्षातच मुलाबाळांची संगोपनाची जबाबदारी अंगावर पडते. याच काळात परिश्रमपूर्वक व्यवसाय अथवा नोकरीत स्थिरता मिळविण्यासाठी आपल्याला ५ ते १० वर्षांचा कालावधी खर्च करावा लागतो. मग पुढे कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मुलाबाळांचे शिक्षण आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी वेळ खर्च करावा लागतो.

हेच गणित आपण तासांच्या हिशोबावर मांडले तर आयुष्यात दिवसाचे चोवीस तास याप्रमाणे एका वर्षाचे ८ हजार ७६० तास होतात. जर काही करण्यासाठी २५ वर्षांच्या काळात सर्व जबाबदाऱ्यांच्या व्यस्ततेमधून वेळ काढला तर केवळ ५ वर्षांचा कालावधी शिल्लक राहतो. म्हणजेच संपूर्ण आयुष्यात ४३ हजार ८०० तास तुमच्यासाठी महत्वाचे ठरतात. यातच तुम्हाला कर्तबगारी दाखविण्यासाठी संधी मिळते. काहीजणांना या पाच वर्षात वारंवार तर काही जणांना ती एकदाच मिळते. त्या संधीचे सोने करता आले तरच जन्माचे सार्थक झाले असं आपण म्हणतो. हा पाच वर्षांचा कालावधी सर्वसाधारणपणे वयाच्या ४० ते ४५ च्या दरम्यान येतो. काहीजणांना त्याही अगोदर किंवा शेवटच्या टप्प्यात म्हणजेच निवृत्तीच्या अगोदर मिळतो. शेवटी आयुष्यभर काबाडकष्ट आणि संघर्ष केल्यानंतर गणिती भाषेत सांगायचे तर अवघ्या एक वर्षाचे म्हणजेच ८ हजार ७६० तासांचे समाधानाचे आयुष्य मिळते. यालाच जीवन ऐसें नाव.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.