
- कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या १ एप्रिल पासून पूर्णतः बंद झालेल्या कार्यालये आणि उद्योग-व्यवसायाच्या कार्यालयांमधून कर्मचाऱ्यांची उपस्थिती शंभर टक्के दिसू लागली आहे.
- जवळपास ८ महिने ‘वर्क फ्रॉम होम’च्या कचाट्यात अडकलेल्या उद्योग विश्वातील लाखों कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा ‘वर्क कल्चर’चा कार्यालयीन अनुभव मिळू लागलाय.
- भारतात पहिल्या टप्प्यातील लसीकरण दि. १६ जानेवारीपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर काही महिन्यांत लस आपल्यापर्यंत पोहोचेल हा आशावाद आता जनतेला कोविडपासून निर्भयतेकडे नेत आहे.
- २०२१ या नव्या वर्षाचे स्वागत जरी जंगी झाले नसले तरी गेल्या आठ दिवसातील गतिमान झालेल्या सकारात्मक बदलामुळे भारतातील उद्योग, व्यापार आता हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे.
- आता फक्त शिक्षणक्षेत्राकडे लक्ष देणे आवश्यक बनले असून यावर्षी अगदी वेळेत शैक्षणिक सत्र सुरू करण्याकडे सरकारचे प्राधान्य राहील.

दि. 23 मार्च 2020 पासून सुरू झालेल्या लॉक डाऊनमुळे विविध आस्थापना कार्यालये आणि उद्योग-व्यवसायावर फार मोठा परिणाम झाला. कार्यालयांचे कामकाज ठप्प होवू लागले. मल्टी नॅशनल आणि कार्पोरेट कंपन्यांनी मात्र ‘वर्क फ्रॉम होम’चा फंडा वापरून लॉक डाऊनमुळे कार्यालयात येवू न शकणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करायला भाग पाडले. अर्थात कार्यालयीन कामे होत असली तरी उत्पादकता पूर्णपणे ठप्प झाल्याने उद्योगविश्व धोक्यात आले होते.

याकाळात कोविड योद्धा म्हणून प्रशासन व्यवस्था, आरोग्य विभाग, रुग्णालये, स्वयंसेवी संस्था आणि प्रसार माध्यमांनी प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून आपली सर्वोत्कृष्ठ सेवा बजावली. यामुळे कोविड विरोधात राष्ट्रीय पातळीवर एकात्मिक भावना रुजविण्यास मदत झाली. या प्रयत्नाव्यतिरिक्त उत्पादकता पातळीवर कमालीचे नुकसान उद्योग क्षेत्राला सोसावे लागले. अर्थात सर्व जगाचीच ही स्थिती झाली होती. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जगाने नरसंहार सहन केला. मात्र युद्ध ज्वराने पछाडलेल्या अथवा बाधित झालेल्या कोणत्याही देशात उत्पादकतेवर अंकुश आला नव्हता. यापूर्वीही अनेकवेळा जगभर साथीच्या महामारीने थैमान घातले होते. पण उत्पादकता कधी ठप्प झाली नव्हती. कोविड मुळे मात्र जगाला ही झळ मोठ्याप्रमाणात सहन करावी लागली आहे. आता मात्र ज्या-ज्या देशात लसीकरण सुरू होत आहे त्या-त्या देशातील जनजीवन पूर्वपदावर येवू लागले आहे. हीच या नव्या वर्षाची सकारात्मक सुरुवात आहे.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.