
- कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढू लागलाय.
- कोरोनाच्या नव्या प्रकारचे ८२ रुग्ण भारतात सापडले आहेत.
- नव्या स्ट्रेनचा फैलाव वेगाने होत असला तरी त्याच्या परिणामबद्दल अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून कुठलीही अद्ययावत माहिती नाही.
- भारत-इंग्लंडच्या फेब्रुवारीत होणाऱ्या टेस्ट सिरीजसाठी विमानसेवा सुरू होतेय का ?

भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढू लागलाय. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे भारतात ८२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अधिक सतर्कता बाळगण्याची ही वेळ आहे. गतवर्षी चीन मधील वुहान शहरातून कोरोना हा विमानसेवेच्या माध्यमातूनच जगभर पसरला होता. आता देखील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा फैलाव याच माध्यमातून होईल म्हणून अनेक देशांनी आपले हवाईमार्ग बंद केले आहेत. कोरोनावर लस निर्माण झाली असली तरी अजून लसीकरण आणि त्याचा परिणाम समोर यायचा आहे. मग ज्या ब्रिटनमधून कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला तिथे आपण विमानसेवा का सुरू करतोय ? हाच सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.

८ जानेवारी पासून ब्रिटन आणि भारत दरम्यान विमानसेवा पूर्ववत होत आहे. अर्थात विमानप्रवासी आणि क्रू मेंबर्स यांच्या आरटी पीसीआर चाचणी सक्तीची असून पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला तातडीने विलगिकरणात राहावे लागणार आहे. मात्र सुरक्षा यंत्रणा तैनात करून हा प्रयोग कश्यासाठी केला जातोय ? हा प्रश्न उरतोच. ही विमानसेवा दि. २३ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर तीनच दिवसांनी म्हणजेच २६ जानेवारी हा गणतंत्र दिवस येतोय. याकाळात आठवड्यात एकूण तीस फेऱ्या होणार आहेत. भारताकडून १५ तर ब्रिटनकडून १५ फेऱ्या होणार आहेत. म्हणजेच साधारणतः पंधरा दिवसात एकूण ६० फेऱ्या होणार आहेत. आता यामध्ये एखादा पॉझिटिव्ह आढळला. त्याला तातडीने विलगिकरण कक्षात ठेवला अन् तिथून तो निसटला तर…? गेल्या वर्षभरात अशाप्रकारच्या कित्येक घटना आपल्या अंगलट आल्या आहेत. मग ही विषाची परीक्षा आपण का घेतोय ?

दि. ५ फेब्रुवारी पासून ८ मार्च पर्यंत भारत आणि इंग्लंड दरम्यान चार मॅचेसची टेस्ट सिरीज होणार आहे. विमानसेवा सुरू होण्यावरच या टेस्ट सिरीजचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे सुरुवातीला २३ जानेवारीपर्यंत सुरू राहणारी विमानसेवा पुढे निरंतर केली जावी म्हणून हा प्रयोग केला आहे का ? हा प्रश्नही आता गुलदस्त्यात आहे.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.