- वयाच्या पाचव्या वर्षांपासून शैक्षणिक आयुष्याला सुरुवात होते.
- वयाच्या १५व्या वर्षी माध्यमिक शिक्षण पूर्ण होते.
- पुढे वयाच्या २२ ते २५ वर्षापर्यंत पदवी-पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होते.
- वयाच्या पंचविशी पासून अर्थार्जनाचे मार्ग, नोकरी-व्यवसाय निवड करण्याची सुरुवात होते.
- २-४ वर्षे प्रयत्नपूर्वक धडपड केल्यानंतर आपल्याला नेमके काय करायचे आहे ? याचा अंदाज येतो.
- याचकाळात लग्न आणि कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडते.
- मग स्वतःच्या भविष्याची म्हणजेच निवृत्ती नंतरची तरतूद कधी करणार ?

जगात जपान हा सर्वाधिक वृध्दांचा तर भारत हा तरुणांचा देश समजला जातो. प्रगतीपथावर अग्रेसर असलेल्या भारताची सर्वात मोठी ‘ताकद’ ही आजची ‘तरुणाई’ हीच आहे. एकूण लोकसंख्येच्या पन्नास ते पंचावन्न टक्के तरुण हे पंचविशी ते पस्तिशीच्या वयोगटातील आहेत. म्हणजेच सत्तर ते पंचाहत्तर कोटी तरुणांच्या हातात या देशाचे भवितव्य आहे. मात्र व्यक्तिगत पातळीवर त्यांचे ‘भविष्य’ त्यांच्या हातात आहे का ? २०५० नंतर भारताच्या लोकसंख्येत वृध्दांची लक्षणीय वाढ झालेली दिसणार आहे.

वयाच्या तिशीपासून आयुष्याकडे गंभीरतेने पहायला सुरुवात होते, असे मानले तर खऱ्या अर्थाने कुटुंबाची जबाबदारी पेलण्याची कसरत याच वयात सुरू होते. त्यातच लग्न आणि स्वतःची मुलेबाळे ही अधिकची जबाबदारी त्याच्या अंगावर पडते. बेकारी, आर्थिक मंदी, आपत्ती, कुटुंबातील आजारपण अश्या अनेक संकटांचे डोंगर त्याला पार करायचे असतात. त्यातच उत्पन्नाची अनिश्चितता ही सर्वात खोल दरी त्याला पार करायची असते.

देशात सर्वच क्षेत्रात खासगीकरणाने वेग घेतला असल्याने कार्पोरेट कल्चरचा नुसता सुळसुळाट झाला आहे. यातूनच भविष्याची तरतूद नसलेल्या उत्पन्नाची जीवघेणी स्पर्धा वाढली आहे. ‘पॅकेज’ सिस्टममुळे सक्तीच्या भविष्य निर्वाह निधीला छाटण्यात येत आहे. अश्यावेळी आपणच आपल्या भविष्याची तरतूद करण्याची जबाबदारी प्रत्येकावर येवून पडली आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या मागे लागलेल्या या तरुणाईला याचाच विसर पडत चाललाय. भविष्याची तरतूद करण्याचं नेमकं वय कोणतं ? तर त्याचं उत्तर हे ‘पस्तिशी’ हेच आहे. या वयात जर भविष्याची सक्तीने तरतूद करण्याची सवय लागली तरच पुढे येणारा वृद्धापकाळ जोखमीचा होणार नाही अन्यथा…..म्हातारपणी असहाय्यतेचे जगणे आपल्या ‘कर्माने’च आपल्याला स्वीकारावे लागेल.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.