
मावळत्या वर्षाला निरोप देणे अन् येणाऱ्या नववर्षाचे आतषबाजी आणि जल्लोषात स्वागत करणे ही आता प्रथाच झाली आहे. जगभर हा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. यंदा मात्र पहिल्यांदाच येणारे नवे वर्ष म्हणजेच २०२१ साल हे तणाव सोबत घेवून येणारे शतकातील पहिलेच नवे वर्ष ठरले आहे. अजूनही कोरोनाची दहशत कमी झालेली नाही. त्यामुळे जगभरात नव्या वर्षाचे स्वागत मास्क, सोशल डिस्टनसिंग आणि गर्दी टाळत अतिशय साध्या पद्धतीने केले जाईल.

‘संध्या छाया भिवविती हृदया’ असं म्हणतात. सर्व उपाय संपल्यावर मनात भीतीचे पिशाच्च उंच-उंच होत जाते. आपल्याला आपलीच सावली म्हणजे पिशाच्च सावट वाटायला लागते. अगदी तशीच अवस्था २०२० या वर्षाने आपली केली आहे. वर्षाच्या प्रारंभीच जगाला विळख्या,,त घेणाऱ्या कोरोना महामारीला सोबत घेऊन आलेले २०२० हे वर्ष निदान जाताना तरी महामारीला सोबत घेवून जाईल असे वाटत होते. मात्र हा निव्वळ भ्रम ठरला आहे. कदाचित येणारे वर्ष म्हणजे २०२१ देखील कोरोनाला कुरवाळत बसणारे वर्ष असेल या दडपणाने सगळ्यांना निरुत्साही केले आहे.

ज्यांना भविष्य नाही, ज्यांना जगण्याची उमेद नाही अश्या माणसांच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा वेदना घेवूनच येणारा असतो. अशी बेघर, लाचार, बेवारस दारिद्र्यात खितपत पडलेली लाखों माणसे कधीच जल्लोषात नववर्षाचे स्वागत करतांना दिसत नाहीत. ही अवस्था आता सगळ्या जगाची झालेली आहे. पाश्चात्य देशात तर प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार नववर्षाचे स्वागत दरवर्षी न चुकता करीत असतो. यंदाच्या वर्षी मात्र विदेशातही अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

आता संपर्कात येणे टाळण्यासाठी अजूनही किमान एकवर्ष तरी मास्क, सोशल डिस्टनसिंग आणि गर्दी टाळत गुपचूप अत्यंत साधेपणाने ‘हॅपी न्यू इयर’ साजरे करावे लागणार आहे.. १८९८ साली भारतात पसरलेल्या प्लेगने वीस वर्षे आपले बिऱ्हाड हलविले नव्हते. आता या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होवून गेले आहेत. त्यामुळेच आता कोरोना महामारीच्या काही आठवणी आपल्याला वेदना देणाऱ्या राहणार आहे. शंभर वर्षांपूर्वी प्लेगच्या वेळी जे नियम पाळले तेच आता शंभर वर्षानंतर पाळण्याची वेळ नियतीने आपल्यावर आणून ठेवली आहे.

:-मुकुंद मधुकर हिंगणे.