
जवळपास १५६ पूर्ण झालेले सोलापुरातील दत्त चौकात असलेले ‘फर्स्ट चर्च’ हे अमेरिकन मराठी मिशनच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याची साक्ष म्हणून आजही दिमाखात उभे आहे. रेव्हरंड चार्लस हार्डिंग, रेव्हरंड लॉरीन सॅम्युअल गेट्स आणि इतर मिशनरी यांनी दि. १ जानेवारी १८६४ साली ‘फर्स्ट चर्च’ची स्थापना केली. ब्रिटिशांच्या सेवेत असणाऱ्या ख्रिश्चन धर्मीयांव्यतिरिक्त सोलापुरात ख्रिश्चन धर्माचा प्रसार केंव्हा सुरू झाला असावा ? याचा कालावधी दृष्टीक्षेपात आणण्यासाठी या चर्चकडे ऐतिहासिक ठेवा म्हणून बघितले जावू शकते.

अमेरिकन मिशीनरी भारतात केंव्हा आले ? याचा ऐकीव इतिहास देखील रंजक आहे. सन १८१२ च्या सुमारास अमेरिकेतून शिडाच्या जहाजातून काही तरुण आणि मध्यमवयीन मंडळी भारताच्या दिशेने प्रवासाला निघाली. अनंत अडचणींशी सामना करीत ही मंडळी १८१३ साली मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचली. व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी हळूहळू देश काबीज करण्याचा तो काळ होता. पुढे मुंबई हेच अमेरिकन मिशनचे पहिले केंद्र बनले.

सन १८१५ च्या सुमारास सोलापुरात अमेरिकन मिशीनऱ्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांचे जीवनमान उंचावण्याकरिता सेवाकार्य सुरू केले. शहराजवळील सेटलमेंट भागातील उमेदपूर येथे गुन्हेगारी जमातीच्या लोकांकरिता रोजगार केंद्र सुरू केले. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना स्वावलंबी बनविण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर कुमठा नाका परिसरात कुष्ठरोग्यांकरिता वसाहत निर्माण करून त्याला ‘विश्रांतीपुर’ हे नाव दिले. सुरुवातीला एका खोलीत प्रार्थनासभा घेणाऱ्या या मिशनऱ्यांनी जवळपास ५० वर्षांनंतर चर्च बांधण्यास सुरुवात केली. दत्त चौकातील ‘फर्स्ट चर्च’ हे अमेरिकन मराठी मिशनचे सोलापुरातील पहिले चर्च आहे. धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांवर त्यांनी भर दिला. दत्त चौकात ज्याठिकाणी त्यांनी रुग्णतपासणी व मोफत औषध पुरवठा केला त्याच जागी दि. १ जानेवारी १८६४ साली चर्च उभारले. तेच पुढे ‘फर्स्ट चर्च’ या नावाने ओळखले जावू लागले.

हे चर्च उभारणाऱ्या रेव्हरंड लॉरीन गेट्स यांच्याबाबत फारशी माहिती उपलब्ध होत नसली तरी त्यांनी मृत्युपर्यंतचा कालावधी सोलापुरातच धार्मिक आणि सामाजिक कार्यात व्यतीत केल्याचा उल्लेख आढळतो. दि. ६ सप्टेंबर १९२२ रोजी त्यांचे निधन झाले. सोलापुरातच ख्रिश्चन कब्रस्तानमध्ये त्यांची कबर आहे. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी १९३० साली त्यांच्या स्मरणार्थ सिध्देश्वर पेठेत ख्रिस्तसेवा मंदिर नेबरहूड हाऊस सुरू केले. या वास्तूमध्ये पाळणाघर, शिवणकला वर्ग, बाहुली वर्ग, कुटुंब कल्याण केंद्र, सर्वधर्मीय विद्यार्थी दत्तक योजना, बालकामगार वर्ग यासह अनेक उपक्रम अनेक वर्षे सुरू होते.
ले :- मुकुंद मधुकर हिंगणे.
मोबा. क्र. :- 8806188375.
दादा ,छान माहिती
LikeLike
धन्यवाद मित्रा
LikeLike
ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि पोस्ट आवडल्या तर लाईक आणि कॉमेंट्स अवश्य करा.
LikeLike