
एकीकडे कोविड व्हायरस वरील ‘लस’ तयार करण्यात भारताने आघाडी घेतली असतांनाच सुखावलेल्या भारतीयांमध्ये ही लस आपल्यापर्यंत पोहोचणार की नाही याबद्दल गोंधळाचे वातावरण निर्माण होवू लागले आहे. सुरुवातीपासूनच माध्यमातून येणाऱ्या संबंधित माहितीनुसार संपूर्ण देशभर ही लसीकरणाची मोहीम राबविली जाईल असा देशवासीयांचा समज झाला होता. मात्र भारत सरकारने आता या भूमिकेपासून ‘घुमजाव’ केल्याने देशवासीय गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहेत. कोविड 19 लसी वरून भारत सरकारची भूमिका अस्पष्ट दिसत आहे.

निरनिराळ्या देशांना चाचण्यांद्वारे कोविडवरील लस तयार करण्यास यश मिळाले आहे. त्यासर्व देशांमधून लसीकरणाचे वारे वाहू लागले आहे. भारतात देखील सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून लसीची निर्मिती केली जात आहे. मात्र भारत सरकारने अद्यापही कोणत्याही लसीला मान्यता दिली नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना लस दिली जाईल असे आश्वासन दिले होते. बिहारच्या निवडणूक प्रचारात बिहारमधील सर्व जनतेला मोफत लस दिली जाईल असे आश्वासन दिले होते.

सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि औषध क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योगपती सायरस पुनावाला यांनी कोविड लसीच्या संदर्भात बोलताना देशातील पन्नास टक्के लोकांना मोफत लस देणार असल्याचे वक्तव्य केले होते. तर सिरमचेच सीईओ अदर पुनावाला यांनी मात्र सुरुवातीपासूनच मोफत ऐवजी सर्वसामान्यांना खिशाला परवडेल अश्या दरात म्हणजेच पाचशे ते हजार रुपयांपर्यंत ‘लस’ उपलब्ध करून देण्याची भूमिका मांडली होती. आता ही भूमिका देखील देशवासियांना मान्य झालेली असली तरी सरसकट देशभर लसीकरण होणार नसल्याच्या भारत सरकारच्या नव्या भूमिकेने गोंधळ उडाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय औषध नियंत्रण बोर्डाचे कार्यकारी संचालक बलराम भार्गव यांनी मात्र संपूर्ण देशभरातील लसीकरणाचा मुद्दा फेटाळून लावला आहे. अश्यापद्धतीचे कोणतेही आश्वासन केंद्र सरकारने दिले नसल्याचे स्पष्ट करीत ज्या राज्यांमधून रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे अश्याच राज्यांमध्ये लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. आपला उद्देश हा कोरोनाची साखळी तोडण्याचा आहे. त्यामुळे अश्या ठिकाणीच लसीकरण केले जाईल असे त्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधानांची भूमिका आणि आरोग्य मंत्रालयाची भूमिका या दोन्हीही सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्या भूमिकेनंतर बदललेल्या दिसत आहेत. तर सिरमचे संस्थापक सायरस पुनावाला यांची पन्नास टक्के जनतेला मोफत लस देण्याची भूमिका सिरम इन्स्टीट्यूटने बदलली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने मात्र लसीकरणासाठी यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या स्तरावर तीस कोटी जनतेला लस देण्याचे उद्दिष्ट्य आहे.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
मोबा.क्र. :- 8806188375.
धन्यवाद पवार सर, आपण ब्लॉगशी कनेक्ट रहा. आपल्याला नवनवीन विषयांवरचे लेख वाचायला मिळतील.
LikeLike
सर तुमचा लेख अतिशय छान वाटलं…वस्तुस्थिति शी धरून आहे…
LikeLiked by 1 person