
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांच्या ‘तिघाडी’चे सरकार एक वर्षाचा आपला कार्यकाळ पूर्ण करीत असतांनाच राजकीय विश्लेषक आणि लेखिका असलेल्या प्रियम गांधी-मोदी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या नव्याकोऱ्या पुस्तकाने महाराष्ट्रात नवे राजकीय वादळ निर्माण केले आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या भाजपला पुरेसे संख्याबळ मिळाले नसल्याने सरकार बनविता येणे अशक्य असल्याचे बघून ‘युती’चा अजेंडा घेवून भाजपासोबत मतदारांसमोर ‘मत’ मागायला गेलेल्या शिवसेनेने स्वतःचे पुरेसे संख्याबळ नसतांनाही ‘मुख्यमंत्री’पदाची मागणी करीत राजकारणाचा नवा सारीपाट मांडायची तयारी सुरू केली. या घडामोडीतच राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देत एका पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सत्तानाट्याने राष्ट्रवादी पक्षासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात त्सुनामी उसळली.

फडणवीस-अजितदादा यांचं हे सत्तांतर नाट्य शपथविधी नंतर केवळ ऐंशी तास देखील टिकलं नाही. पण या सत्तानाट्याने राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबात सर्वकाही आलबेल नाही हे नवे चित्र मात्र जगासमोर आले. व्यथित झालेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पवार कुटुंबियांना अजूनही या प्रश्नाला उत्तर द्यावे लागत आहे. पुढे अजितदादा यांचे बंड शमवित शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी महाविकास आघाडी तयार करीत उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर आले. या मंत्रिमंडळात देखील अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आले. सरकार चालेल की नाही ? याबद्दल साशंकता निर्माण होत असतानाच कोरोना महामारी या सरकारच्या एकप्रकारे मदतीलाच धावली असे म्हणता येईल. महामारीच्या संकटाशी मुकाबला करतांना सत्ता उलथवून टाकण्याचे ‘नाट्य’ घडले नाही. ही जमेची बाजू म्हंटली पाहिजे. आता या सरकारने वर्षाचा कालावधी पूर्ण केलाय. नेमके याचवेळी प्रियम गांधी-मोदी यांचे ‘ट्रेडिंग पॉवर’ हे सत्तानाट्याच्या अंतरंगात डोकावणारे पुस्तक प्रकाशित झाल्याने पुन्हा एकदा ‘पहाटे’च्या शपथविधी सोहळ्याचेच चर्वितचर्वण सुरू आहे.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
मोबा. क्र. :- 8806188375.
आपल्याला ही पोस्ट आवडली का ? मला ईमेल द्वारे कमेंट कळवा.
LikeLike