
जगातला सर्वात मोठा लोकशाहीवादी देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतासारख्या विकसनशील देशात समाज आणि विकास यामधला महत्वाचा दुवा म्हणून ‘राजकीय’ नेत्यांकडे फार अपेक्षेने पाहिले जाते. मात्र संथगतीने होत असलेला विकास आणि राजकारण्यांच्या प्रत्येक गोष्टीतील ‘हस्तक्षेपा’मुळे भारतीयांना राजकारण्यांचा राग येतोय का ?

भारतासारख्या बहुभाषिक आणि बहुधर्मीय देशात सर्वसमावेशक आणि समानतेच्या धोरणावरच सत्ताकारण केले जावू शकते. मात्र अलीकडच्या काळात बहुतांश सर्वच राजकीय पक्ष हे ‘व्होट बँके’च्या राजकारणामुळे कोणत्या न कोणत्या जाती-धर्माच्या संघटनांशी हितसंबंध जोडून कार्य करतांना दिसत आहेत. यामुळे जाती-धर्मांच्या संघटनांचे ‘प्राबल्य’ वाढलेले दिसत आहे. यातूनच सामाजिक तेढ, वैमनस्य वाढत चालल्याचे दिसत आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाही ही फक्त उच्चारण्या पुरतीच दिसत आहे.

यातूनच जाती-धर्मांच्या संघटनांचा वर्चस्ववाद वाढला असून मतांचं लांगुणचालन करणाऱ्या राजकारण्यांकडून फूस लावणारी कृती आणि विधाने होत असल्याने सामाजिक अशांतता आणि अस्थिरता वाढू लागली आहे. याबरोबरच लोकशाहीमध्ये राजकीय भूमिकेचे अनन्यसाधारण महत्त्व असल्यानेच राजकीय नेत्यांच्या शैक्षणिक अहर्ता आणि पात्रतेविषयी नव्या शिक्षित पिढीमध्ये तिरस्काराची भावना घट्ट होताना दिसत आहे.

देशातील वाढती बेरोजगारी आणि आर्थिक असमानतेमुळे तरुण पिढी मोठ्या अपेक्षेने राजकीय पक्ष आणि नेत्यांकडे पहात असतांना त्यांचा भ्रमनिरास होत असल्याची भावना वाढत आहे. कमी शिकलेले नेते आणि पदवीधर युवक यांच्यात पात्रतेचा समतोल राखला जावू शकत नाही. यातूनच भारतीयांना राजकारण्यांचा राग येत असावा.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
मोबा. क्र. :- 8806188375.