
माझ्या पाठीवर
उमटलेल्या शाबासकीच्या
वळाने
पाठ त्वचेचे सर्व रंध्रे
रक्तवर्णी होतात,
मी चित्कारतो…..
भेसूरतेने अन्
शाश्वत जग विसरत
होतो चेतना भ्रष्ट…!
युगायुगाच्या अंतानंतर
या प्रक्रियेला
इतिहासानेच नाव दिले
गुलामी…..!
अलौकिक इतिहास,
असामान्य कर्तृत्व,
म्हणूनच अभिमान वाटतो
मी “गुलाम” असल्याचा…..
एकदा का रक्त गोठले
की मग गुलामीचा बिल्ला
आपल्या कपाळावर
ठोकल्या जातो…..
मग त्या खिळ्यांना वाट मिळते
आत…खोलवर रुतून बसण्याची
त्यांचंही बरोबरच आहे…!
पिढ्यानपिढ्या हालायचं नसतं
आता रक्ताला अन् ठिसूळ हाडांना
पूर्ण सराव होतो..!
गुलामीत सुद्धा नैसर्गिक वाढ
असतेच
त्याशिवाय का गुलाम जन्मतात ?
कधीतरी जखमा चिघळतात,
किडेही वळवळतात
मग त्यावर वंश, जात, धर्म
याचा मलम लावावा लागतो.
जालीम असल्याने
रक्तातल्या शत्रू सैन्याशी
मुकाबला तोच करतो
आपण फक्त विजयाची
वाट पहायची….
एकदा का रक्तातला बंडखोर
धारातीर्थी पडला की मग
उर्वरित आयुष्य सुखाने
जगता येते……
गुलाम म्हणून
अगोदरच्या अन् नंतरच्या
पिढ्यांचा नाही लेखाजोखा
कारण….
गुलामांचा इतिहास नसतो
तो तर जगण्याचा
उपहास असतो.
मुकुंद मधुकर हिंगणे.
मोबा.क्र.:-8806188375.