मराठी नाटकांचे काय होणार..?व्यावसायिक मराठी रंगभूमीला कोरोना महामारीच्या संकटाने मार्च २०२० मध्येच पहिला धक्का बसला. जनता कर्फ्यु अन् त्यानंतर सुरू झालेल्या लॉक डाऊनच्या सत्रांमुळे २२ मार्चपासूनच नाटकांचे प्रयोग आणि राज्यभरातील दौरे थांबविण्यात आले. इतर व्यवसायांप्रमाणेच लॉक डाऊन उठविल्यानंतर नाट्यप्रयोग सुरळीतपणे सुरू होतील हा भाबडा विश्वास व्यावसायिक नाट्यनिर्माते, कलावंत आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर घटकांना होता. आता राज्यसरकारने नाट्यगृहांना अटी व शर्थींसह परवानगी दिली असली तरी आसनक्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षक संख्येवर नाट्य व्यवसायिकाला किंवा हौशी कलावंताला प्रयोग लावणे परवडणारे असेल का ? सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या दहशतीखाली असलेले प्रेक्षक नाटक पहायला येतील का ? काहीच दडपण नाही अश्या अविर्भावात मनोरंजन करण्याची नाटकवेड्या मराठी माणसाची मानसिकता असेल का ? मग मराठी नाटकाचं काय होणार ?
किमान एक महिनाभर जनजीवन ठप्प झाल्यानंतर तरी कोरोनाची साखळी तुटेल हा विश्वास असल्याने नाट्यक्षेत्र इतरांप्रमाणेच निर्धास्त होते.
मात्र महिन्याभरानंतरही लॉक डाऊनचा विळखा सुटत नाही म्हटल्यानंतर नाट्य व्यावसायिक आणि त्यावर अवलंबित घटकांचे धाबे दणाणले. याकाळात निर्मार्त्यांनी आपआपल्या नाटक कंपनीतील पडद्यामागील कलावंत-तंत्रज्ञ तसेच ज्येष्ठ कलावंतांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी, वैद्यकीय खर्चासाठी काही प्रमाणात मदत केली. मात्र अनिश्चीततेच्या या वातावरणात रंगकर्मींची भ्रांत वाढू लागली होती.
याकाळात प्रशांत दामले पासून ते अनेक नामवंत कलावंतांनी पडद्यामागील कलावंत, तंत्रज्ञ आणि ज्येष्ठ रंगाकर्मींसाठी मदतीचा ओघ सुरू ठेवला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनेही शंभरावे नाट्य संमेलन अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलून कलावंत मदतनिधीची योजना पुढे आणली. अ.भा.नाट्य परिषदेचे तरुण अध्यक्ष प्रसाद उर्फ नवनाथ मच्छिंद्र कांबळी यांनी दहा कोटींचा मदतनिधी उभारण्याचा संकल्प केला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भरत जाधव, माधुरी दीक्षित अशी अनेक मंडळी पुढे सरसावली आहे. या संकटातून रंगकर्मींच्या तात्पुरत्या उपजीविकेचा प्रश्न सोडविण्याचा यातून प्रयत्न होताना दिसतोय. मात्र या महामारीनंतर व्यावसायिक नाटकांचे भवितव्य काय ? यावर मात्र भलेमोठे टाळे लागलेले सध्या तरी दिसत आहे.
कोरोना महामारीने सगळं जगच बदलतेय की काय ? असं वाटू लागलंय. सगळेच व्यवसाय आणि व्यवहार बदलतील असा बोलबाला सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी नाटक बदलेल का ? याची घालमेल रंगकर्मींच्या मनात नक्कीच सुरू आहे. दोन्ही जागतिक महायुद्धानंतर जसे जागतिक पातळीवर एकूणच जीवनमानावर बदल घडून आले होते. त्याचा प्रभाव हा कला सादरीकरणावरही झाला होता. आताही असाच काहीसा बदल होवू पाहतोय.
कोरोनाच्या प्रभावातून सुटका झाल्यानंतर समूहांच्या जीवनमानात बरेच सूक्ष्म असे पण परिणाम करणारे बदल घडून आलेले दिसणार आहेत. त्याचे पडसाद कला सादरीकरणावर नक्कीच पडणार आहेत, यात शंकाच नाही. पण नेमके बदल कोणते ? याबद्दलच रंगकर्मी सध्यातरी अनभिज्ञ दिसत आहे.
नाटक हे ‘टीमवर्क’ आहे, अर्थात समूहाचे सादरीकरण आहे. त्यामुळे त्याच्या अस्तित्वापासून ते बदलते सादरीकरण कसे असेल ? याबाबतचे आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे.
मराठी नाटकाच्या बाबतीतच बोलायचे झाल्यास इथे सादरीकरणाचे प्रचलित दोन प्रवाह आहेत. एक म्हणजे व्यावसायिक रंगभूमी आणि दुसरी हौशी रंगभूमी. व्यावसायिक रंगभूमीवरची नाटके बदलत्या जीवनमानात कोणता बदल स्वीकारणार याचे आडाखे व्यावसायिक नट आणि निर्माते बांधत आहेत. तर हौशी रंगभूमीवर देखील हौशी, प्रायोगिक आणि अर्धव्यावसायिक रंगकर्मी आपआपली मत मांडू लागली आहेत.
नाटकाच्या व्यवहार्य बाजूमध्ये म्हणजेच अर्थकारणात अतिशय कमकुवत समजला जाणारा वर्ग म्हणजे बॅक स्टेज आर्टिस्ट, त्याला आपण पडद्यामागील कलाकार म्हणतो. या होणाऱ्या बदलांचा परिणाम हा पहिल्यांदा त्याच्यावर दिसतो. त्यानंतर नाटक निर्मिती व्यवस्थेवर आर्थिक स्वरूपात परिणाम दिसून येतो. प्रसिद्धीच्या वलयात असलेल्या अभिनेता-अभिनेत्रींवर झालेले आर्थिक परिणाम हे फार उशिरा समोर येतात. व्यावसायिक पातळीवर हे परिणाम अगदी गंभीरपणे रोजच्या ‘ब्रेड-बटर’ पर्यंत येऊन थडकतात.
व्यावसायिकता झुगारून कलासक्त म्हणून निर्भेळ आनंद देणाऱ्या आणि मिळविणाऱ्या हौशी रंगभूमीवर आर्थिक खाचा नसल्या तरी नाटक जगण्याची आणि जगवण्याची उर्मी तयार होत असते. त्याच्यावर परिणाम होवून एकूणच रंगभूमीच्या विकासाला खीळ बसण्याची भीती निर्माण होवू शकते.
मुळात काही वर्षे किंवा काही महिने नाटक थांबले तर एव्हढा काय परिणाम होणार आहे ? असा वरवरचा विचार मांडून या प्रश्नाचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न करणे देखील गफलतीचे ठरणार आहे.
यापूर्वी आलेल्या महामारी आणि आत्ता आलेली कोरोना महामारी याच्या परिणामांची देखील भिन्नता आहे. या महामारीने सोशल डिस्टनसिंग अर्थात सामाजिक अंतर हा नवा संस्कार स्वीकारण्यास समाजाला भाग पाडले आहे. महामारीचे पूर्ण निर्दालन होईपर्यंत हे सोशल डिस्टनसिंग पाळावे लागणार आहे. शिवाय हा कालावधी नेमका किती वर्षांचा असेल याचा अंदाज आजमितीस कुणीच बांधू शकत नाही.
अशास्थितीत नाटकाकडे येणारा प्रेक्षकवर्ग हाच आता नाटकाच्या अस्तित्वाचा मुख्य घटक ठरणार आहे. जसे महायुद्धानंतर भीषणतेचे सावट कथानकांवर पडलेले होते. अगदी तसेच सावट आता नव्या नाटकांच्या कथानकातून दिसेल. ते अगदी अपरिहार्यतेने येईल. प्रेक्षकही त्या कथानकांशी एकरूप होतील. त्यामुळे नाटके कशी असावीत ? हा फार कळीचा मुद्दा असणार नाही. सादरीकरणाची तंत्रे आणि कालावधी यामध्येही फार मोठे बदल करावे लागणार नाहीत.
बदल करावा लागेल तो प्रेक्षागारातील आसन व्यवस्थेत. सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत आसन व्यवस्था करावी लागेल. याचाच अर्थ थिएटरमध्ये सध्या अस्तित्वात असलेली आसन व्यवस्था मोडून ती निम्म्यावर आणावी लागणार आहे. नाटकाचं अर्थकारण बिघडणार आहे ते नेमकं इथेच.
नाटक निर्मिती, वाहतूक, कलावंतांची बिदागी, थिएटर भाडे, जाहिराती यासगळ्याची बेरीज करून तयार झालेल्या बजेटचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ घालणे व्यावसायिक निर्मात्याला अशक्य ठरणार आहे.
हौशी रंगभूमीवर बजेटचा प्रश्न गौण जरी ठरवला तरी अश्या नाटकांना आधीच उदासीनता दाखविणारा प्रेक्षक किती प्रतिसाद देणार ? त्याचा प्रतिसाद मिळविण्यासाठी प्रयोगाची संख्या वाढविण्याचे ‘मृगजळ’ हौशी रंगभूमीला तयार करणे पराकोटीचे ठरणार आहे. असं काहीच घडणार नाही, अशी ठाम समजूत असणारा रंगकर्मींचा वर्गही असू शकतो. नेहमी नाटकाच्या सुखांतात रमणारे असतात अनेक, पण बदल हा निसर्गाचा नियम आहे, अन् कला हा देखील निसर्गाचाच अविष्कार आहे. मराठी नाटक आता बदलाच्या वळणावर आलेले आहे हे मात्र नक्की.
मराठी नाटकाचा तारणहार हा मध्यमवर्गीय नोकरदार मराठी माणूस आहे. महिनाभर चाकरी करून मिळणाऱ्या पगारात आपल्या कौटुंबिक गरजा भागवून शिलकीतल्या पैश्यात मनोरंजनासाठी नाटक पाहण्याची हौस भागविणाऱ्या मराठी नाट्य रसिकाला आता बदलत्या मराठी नाटकाचे व्यावसायिक अर्थकारण पेलवेल का ? हाच मुद्दा आहे.
सोशल डिस्टनसिंग पाळत जर थिएटरमधील आसन व्यवस्था केली, तर आपोआपच त्याची संख्या निम्म्यावर येणार आहे. म्हणजेच याचा भार हा तिकिटांचे दर वाढविण्यावर होणार आहे. आत्ताचा असणारा दर नाट्यरसिकाला परवडणारा नसल्यानेच मराठी व्यावसायिक नाटकाकडे रसिकांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. त्यातूनही पुन्हा तिकीट दरवाढ केली तर मखमली पडदा उघडणे अवघडच होणार आहे. यातुलनेत गुजराती नाटकांची स्थिती ही मराठी नाटकांपेक्षा चांगली आहे. त्यांचा प्रेक्षकवर्ग हा धनिक-व्यापारी वर्ग असल्याने त्यांना मर्यादित प्रेक्षक संख्येतही अपेक्षित व्यवसाय करणे शक्य होणार आहे. मराठी व्यावसायिक नाटकांची हीच खरी गोची आहे. हा नुकसानीचा व्यवसाय नको म्हणून मराठी नाट्य निर्माते आणि त्यांचे अर्थ पुरवठादार इथून पुढे नाट्य निर्मिती करतील का ? हाच प्रश्न आहे.
शिवाय प्रसिद्धी आणि पैसा मिळतो म्हणून व्यावसायिक नाटक करणारे सेलिब्रिटी नटमंडळी देखील मराठी नाटकाकडे पाठ फिरवतील. त्यांना सिरीयल, वेबसिरीज, सिनेमा, जाहिरातीचे जग खुणावेल. मग मराठी नाटक जगणार कसे ?
तर नाटक ही हौस समजणारा हौशी रंगकर्मी इथून पुढे मराठी नाटकांचा तारणहार म्हणून पुढे येताना दिसेल. त्याला जशी आर्थिक फटाक्याची भीती वाटत नसते तशीच पाचपन्नास रसिकांसमोर नाटक सादर करण्यात तोटा वाटत नसतो.
जर सुरक्षित अंतराची आसन व्यवस्था होणार असेल तर मिनी थिएटर ही संकल्पना बाळसे धरू शकेल. याबाबतीत गोव्याचे हौशी रंगकर्मी विजयकुमार नाईक यांनी ‘बॉक्स थिएटर’ ही संकल्पना तर वर्ध्याच्या हरीश इथापे यांनी ‘ग्रीन थिएटर’ या रुजवलेल्या संकल्पना मार्गदर्शक ठरतील.
दरवर्षी राज्यनाट्य आणि कामगार नाट्य स्पर्धांमधून पाचशे ते सहाशे नाटके रंगभूमीवर येतात. त्यातही नव्या संहितांचे प्रमाण जास्त असते. शिवाय अनेक चांगल्या दर्जाचे कलावंत या स्पर्धांमधूनच मिळतात. त्यामुळे भलेही व्यावसायिक नाटकांचा अवतार संपत आला असला तरी हौशी नाटकांची सद्दी सुरूच राहणार आहे.
हौशी रंगभूमीवर सातत्याने वेगवेगळे प्रयोग यशस्वी करणाऱ्या रंगकर्मींना सोशल डिस्टनसिंगमुळे बदलणाऱ्या प्रेक्षागाराची अडचण न होता बंदिस्त प्रयोगाची उंची वाढविण्यास मदतच होणार आहे. विदेशात ऑनलाईन नाटक ही संकल्पना देखील जोर धरत आहे. मात्र प्रत्यक्ष रंगाविष्कार आणि स्क्रीनवरचा अविष्कार यात अंतर असल्याने हा प्रकार आपल्याकडे फारसा रुजेल याची शाश्वती वाटत नाही. शिवाय निर्मिती संस्थेच्या बँक अकाऊंट मध्ये तिकिटांचे पैसे ट्रान्स्फर होतील याचीही शाश्वती वाटत नाही. त्यामुळे अश्या स्थितीत हौशी रंगकर्मीच नाटकाची धुरा समर्थपणे वाहू शकतात. मराठी नाटकाचं काय होणार ? याचं नेमकं उत्तर हौशी रंगभूमीचं देवू शकणार आहे.
लेखक :- मुकुंद मधुकर हिंगणे.
मोबा.क्र. :- 8806188375

प्रयोगाच्या प्रतीक्षेत रंगमंच.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.